लेखिका – रू.द.घा.

काय दिपाली ?आज किती उशीर केलास आम्ही, केव्हाची वाट पाहतोय. मी म्हणालो.

अरे प्रथमेश आज अमावस्या नाही का रे! उशीर तर होणारच , आपल्या भित्र्या भागूबाई देवाकडे साकडं घालून आल्या असतील. आमच्यातला एक जण म्हणाल आणि प्रज्ञा आणि ग्रुपमधील सर्वजण हसू लागले. कॉलेज च्या आवारात आमचा ग्रुप तिची वाट पाहत थांबला होता. 

दिपाली ही कोकणकडील भागात राहणारी मुलगी, हुशार असल्याने स्कॉलरशिप मिळवून पुढील शिक्षणासाठी शहरात आलेली. ती स्वतः आणि तिच्या घरचे खूप सुशिक्षित, पण देव आणि भूत या गोष्टीवर प्रचंड विश्वास. हिचा जन्म दिपावली दिवशीचा म्हणूनं हिचे नाव दिपाली ठेवले होते.

आम्हाला हसताना पाहून ती जरा रागातच म्हणाली “प्लीज, कुणी थट्टा करू नका.. तुमचा विश्वास नसेल या सगळ्या वर पण माझा आहे. तुम्ही शहरात राहता, तुम्हाला विचित्र गोष्टीचा अनुभव फार कमी, किंबहुना येतच नसेल. पण असल्या गोष्टी मी अगदी लहानपणापासून पाहत आले आहे. पुढे कोणी काही बोलणार तितक्यात लेक्चर ची बेल झाली आणि आम्ही सगळे क्लास साठी जायला निघालो. आमचा तो विषय तिथेच थांबला. 

पहिली सेमिस्टर ची परीक्षा झाल्यानंतर दिवाळी साठी म्हणून जवळजवळ पूर्ण एक महिना सुट्टी मिळाली होती, सुट्टीला नेमके दिपालीच्या गावी कोकणात जायचे ठरले. बऱ्याच वर्षांनंतर असे मित्र मैत्रिणीसोबत कुठे बाहेर जाण्याचा बेत ठरला होता त्यामुळे आम्ही सगळेच उत्साही होती. ठरल्याप्रमाणे दिवाळीच्या अगदी 2 दिवस आधी आम्ही कोकणात पोहोचलो.

दिपाली राहत होती, तो एक भला मोठा वडिलोपार्जित वाडा होता. आणि वाड्याच्या आतमध्ये बरोबर मध्यभागी मोठे अंगण होते. एवढ्या भल्या मोठ्या वाड्यात पेशाने शिक्षक असलेले तिचे बाबा, आई आणि पणजी(बाबांची आजी) राहात असत. पणजीचे वय नव्वदी पार होते, पण तीची तब्येत अजून खणखणीत होती. तिला सगळे माई म्हणायचे. आम्ही तिथे पोहोचल्यावर दिपाली ने आम्हा सगळ्यांची ओळख करून दिली. नंतर आम्ही फ्रेश झालो तसे तिने आम्हाला तो वाडा ही दाखवला. अगदी प्रशस्त होता. पण माझे लक्ष गेले ते दोन बंद खोल्यांवर. त्या बाहेर भलं मोठं टाळ लावलेलं होत आणि त्यावर बरेच लाल केशरी धागे गुंडाळले होते. आम्ही नुकताच आलो असल्याने मी दिपाली ला काही विचारले नाही. पण नंतर मला लक्षात आले की माझ्या सोबत माझ्या मित्रांना ही त्या बद्दल खूप नवल वाटतेय. त्या दरवाज्याकडे पाहून आमची झालेली नजरा नजर हे ओळखण्यासाठी पुरेशी होती. आमच्यापैकी कोणीही तिला विचारले नाही. 

दिवाळीचे ते चार पाच दिवस अगदी छान गेले, मी अशी दिवाळी या आधी कधीच साजरी केली नव्हती. त्याच काही दिवसात सर्व गावही फिरून झाले. शेवटचे आणखी काही दिवस मुक्काम राहिला होता आमचा तीथे.

एके रात्री जेवण करून सर्वजण अंगणात गप्पा मारत बसलो होतो. सहज म्हणून दिपाली आम्हाला तिच्या कुटुंबाचे फोटो दाखवत होती. तसे फोटो साधेच होते पण काही फोटो पाहत असताना मला विचित्र गोष्ट जाणवली. त्यात एका व्यक्तीने असे फोटो काढले होते की तो कोण सोबत तरी बसला आहे. म्हणजे फोटोत दोन खुर्च्या आहेत, एकावर तो बसलाय आणि दुसरी खुर्ची रिकामी आहे. एखादा असा फोटो असता तर त्यात काही विशेष वाटले नसते पण पुढील अनेक फोटोत त्या व्यक्तिशेजारील जागा रिकामीच होती. आणि अनेक फोटोमध्ये तो व्यक्ती एकटाच होता, पण त्याचे हावभाव मात्र शेजारी कुणीतरी आहे असेच जाणवून देत होते. हे आम्हाला फार खटकलं.

आमच्यापैकी कोणी तरी बोलले सुद्धा की हे काही फोटो असे काय आहेत, कोण आहे हा व्यक्ती. मी न राहवून माई ला म्हणजे पणजी ला विचारले. तेव्हा ती म्हणाली “हा व्यंकटेश आहे, माझा नातू, दिपालीचा काका. साधारणपणे वीस एक वर्षे झाली.. व्यंकटेश माझा मोठा राजबिंडा माणूस. देखणा, पिळदार शरीरयष्टी, गोरागोमटा, ऐन पंचवीशीतला आणि स्वभाव अगदी सोन्यासारखा. एका तिन्हीसांजेला गावात कोणीतरी मयत झालं, दिपालीच्या वडिलांना त्या काळी शाळेत उशिरा पर्यंत थांबावं लागत असे, आणि आजोबा शेतात गेलेले त्यामुळं मयताला पोहोचवायला व्यंकटेशला जाण भागच होते. त्याप्रमाणे तो मयताला गेला, पण परत यायला त्याला बराच उशीर झाला. तेव्हा बारा एक वाजले असावेत. घरी आला, अंघोळ केली आणि कोणाला काहीच काही न बोलता झोपी गेला, आम्हाला वाटलं उशीर झालाय, दमून आलाय म्हणून काही बोलला नसेल.

दुसऱ्या दिवशी सकाळी उठून माझ्या जवळ येऊन बसला आणि मला म्हणाला “आजी मी काल रात्री लग्न करून आलो सविता बरोबर, ती खूप सुंदर आहे आज मी तिला घेऊन येणार आहे.”

त्याचे असे बोलणे ऐकून मला वाटले तो माझी थट्टा करीत असावा. पण नंतर त्याच्या आई ला म्हणजे दिपालीच्या आजीला बोलवून ही हेच सांगितले. आता मात्र आमची काळजी वाढली. मला त्याचं काळात काही वर्षांपूर्वी घडलेली गोष्ट आठवली. सविता नावाची एक सुंदर मुलगी होती. एखाद्या राज्याच्या राणीलाही लाजवेल असे सौंदर्य होते तिचे. तिचे लग्न गावातल्या मोठ्या घराण्यातील मुलाशी ठरलं होतं. लग्न समारंभ गावात च होता. गावाच्या पुलावर येताच नवरी मुलगी असलेल्या गाडीचा जोरदार अपघात झाला आणि त्यात सविता जागीच ठार झाली. आणि व्यंकटेशच्या बोलण्यात आज तिचेच नाव निघाले. आम्ही पूर्णपणे हादरलो. गावाच्या देवीकडे जाऊन तिथल्या पुजाऱ्यांना हा प्रकार सांगितला. तसे ते आमच्याबरोबर घरी आले. त्याच वेळी व्यंकटेश ही आला.

घरात शिरल्या शिरल्या म्हणाला “सविता आली आहे आई, तिचे स्वागत करा..”

त्यावर गुरुजी त्याच्या नकळत म्हणाले “आता सध्या तरी त्याच्या म्हणण्याप्रमाणे वागा..

पण पोरांनो, त्याचे हे रोजचंच झालं. तो तिला गजरा आणायचा कधी साडी आणायचा, कधी कधी तरी दागिने सुद्धा.. बऱ्याचदा तो एकटाच बडबडत बसायचा, हसत बसायचा. कधी फोटो काढायचा म्हंटला की फोटो सुद्धा ती त्याच्या बाजूला उभी आहे असेच भास वायचा. म्हणून हे फोटो असे आहेत.. हे सांगताना तिच्या डोळ्यात पाणी आलं होत. ती पुढे सांगू लागली..  आम्ही अनेक वेगवेगळे उपाय केले, पण त्याला सविताने पूर्ण वश केलं होतं. थोड्याच दिवसात त्या आतल्या खोलीत त्याने गळफास घेऊन स्वतःला संपवले. असे म्हणत तिने त्या बंद खोली कडे बोट दाखवलं.. आम्ही तिचे बोलणे ऐकत होतो. वाईट वाटण साहजिक होत. दिपाली तिला धीर देऊ लागली.. तसे ती डोळ्याला पदर लावतच पुढे म्हणाली “हातातोंडाशी आलेला मुलगा नियतीने असा हिसकावून घेतला. .काही दिवसानंतर तेथून पैजणांचा, शीळ घातल्यासारखे विचित्र आवाज येऊ लागले, म्हणून पूजा करून ती खोली गुरुजींनी कायमची बंद केली.

त्या खोली चे बंद असण्याचे कारण समजल्यावर मात्र आम्ही जरा दचकलो. बराच वेळ सगळे शांत होते. आमच्यापैकी कोणी काहीच बोलले नाही. पण काही वेळा नंतर राहुल म्हणाला ” पण माई.. सविता त्यालाच कशी दिसली असेल ग, इतरही माणसे गेली असतील ना मयताला पोहोचवायला..?

त्यावर ती म्हणाली “अरे होरे बाबा, पण माझ्या व्यंकटेशच्या डाव्या डोळ्यात काळा तीळ होता ना, आणि ज्यांच्या डोळ्यात काळा तीळ असतो त्यांना म्हणे भुतं दिसतात. म्हणूनच सविता फक्त त्याला दिसली तो तिच्यावर भाळला आणि संपला…

अचानक सगळे माझ्याकडे पाहून हसू लागले, माझी थट्टा करू लागले, कारण माझ्या डोळ्यात तिळ आहे, माझी मात्र भीतीने गाळण उडाली होती. त्या रात्री काही केल्या मला झोपच येत नव्हती, फोटो मध्ये पाहिलेला दिपाच्या काकांचा चेहरा माझ्या डोळ्यासमोरून जातच नव्हता. एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर माझी चलबिचल सुरू होती. मी उठून बसलो आणि पाहिले तर सगळे गाढ झोपले होते. तितक्यात हळूहळू मला आवाज ऐकू आला, मोहक हसण्याचा !

तो आवाज हळूहळू स्पष्ट होत माझ्या जवळ आला, अगदी जवळ.. एका क्षणी स्पष्ट जाणवले की माझ्या शेजारीच बसून कोणीतरी हसते य. पांघरुण अंगाला गुंडाळून मी डोळे घट्ट मिटले घेतले. त्या नंतर मी केव्हा झोपी गेलो ते मला कळलेच नाही.

दुसऱ्या दिवशी मी कुणालाही रात्रीचा प्रकार कळून दिला नाही, नाहीतर भित्रा, घाबरा म्हणून नको नको ते चिडवून माझी खिल्ली उडवली असती. 

त्या दुपारी सगळे रात्रीचाच विषयावर गप्पा मारत बसले होते.

एवढ्यात दिपाली धावत आली आणि म्हणाली “अरे.. शेजारील वस्तीत एका व्यक्तीला देवाज्ञा झाली..”

त्यावर रश्मी म्हणाली “मग त्यात काय एवढं ‘जन्माला येतो तो एक ना एक दिवस जातो’ असं तूच तर म्हणतेस.”

“अगं, मान्य आहे पण आमच्या येथे हे नेहमी घडतं, दरवर्षी हे दिवाळीचे चार पाच दिवस झाले की गावात कोणालातरी सुतक लागतंच लागतं, आणि तो गेलेला मनुष्य फक्त २८ वर्ष वयाचा होता मुंबईला आय टी क्षेत्रात काम करणारा, सुट्टीला म्हणून आला होता तो..

परत एक प्रकारची शांतता पसरली.

शांततेचा भंग करत, राहुल म्हणाला “मग मान्य आहे तुला प्रथमेश?”

मी जरा गोंधळलो. राहुल चे बोलणे मला खरंच कळले नाही.. मी मी गोंधळून त्याला विचारले “काय..? काय मान्य आहे..?”

तसे राहुल लगेच म्हणाला “त्या मेलेल्या माणसाच्या मयताला तू एकट्याने जाऊन यायचं स”.

“नाही नको” सगळे एका सुरात म्हणाली. 

राहुल काही ऐकणाऱ्यातला नव्हता “अरे समशानात तर जायचं आहे, आणि गावातले इतर लोक असणारच आहेत की, आताचे फक्त पाच वाजाताहेत, याने जायचं आणि प्रेताला अग्नी दिला की परत यायचं..”

आता अश्या वेळी नाही म्हणालो तर पुढे आयुष्यभर भित्रा म्हणून शिक्का च लागेल असा विचार करून मी ठीक आहे म्हणत ते चॅलेंज स्वीकारले. 

साधारण सहाच्या दरम्यान अंत्ययात्रा निघाली. माझ्यासाठी सगळेच अनोळखी होते. तरीही मी गावकाऱ्याबरोबर चालू लागलो, थोडी भीती वाटत असल्या कारणाने मी जरा मागेच राहत होतो. आम्ही गावापासून थोडे दूर आलो तसे मला मागून हाक ऐकू आली “प्रथमेश…” मी थांबलो कारण मला आवाज ओळखीचा वाटला. मी मागे वळुन पाहणार तितक्यात मला पुन्हा माझ्या नावाने हाक ऐकू आली. रस्त्याकडे ला असलेल्या  झाडीमागून कोणीतरी मला आवाज देत होते. मला वाटले माझेच मित्र लपून मला घाबरवायचा प्रयत्न करतायेत म्हणून मी त्या झाडामागे येऊन पाहिले तर तिथे कुणीच नव्हतें. मी थोडे आतमध्ये गेलो पण रस्ता अगदी निर्मनुष्य होता. मी झटकन मागे वळून चालू लागलो आणि परत फिरून त्याच झाडापाशी आलो. पण मला आता कोणीच दिसत न्हवते. कदाचित अंत यात्रा खूप पुढे निघून गेली असेल.. मी आपला निमूटपणे चालू लागलो पण साधारण १० मिनिट चालून झाल्यावर परत फिरून त्याच झाडापाशी आलो. मला जाणवले की मी रस्ता चुकलोय.

हळु हळु अंधार पडायला सुरुवात झाली होती. मी फ्लॅश साठी मोबाईल बाहेर काढायला खिशात हात घातला तितक्यात समोरून वेगाने कोणी तरी पळत गेले. मी झटकन आवाजाच्या दिशेने फ्लॅश वळवला पण मला कोणीच दिसले नाही, माझे हात पाय लटपटू लागले. हे चलेंज महाग पडणार मला असे वाटून गेले. एवढ्यात माझ्या कानामागून थंडगार वाऱ्याची झुळूक आली, मी झटकन मागे वळलो, काहीही विचार न करता मी धावू लागलो, मला हळूहळू लोक दिसू लागले आणि मी एकदाचा काय तो स्मशानात येऊन पोहचलो. लोकांमध्ये आल्यामुळे मला थोडे हायसे वाटले. एव्हाना तिथे प्रेताला अग्नी दिला होता, मी स्मशानात आलोय हे मित्रांना दाखवायला म्हणून पटकन फोटो काढला. अंधार खूपच गडद होत चालला होता. त्यात मघाशी घडलेल्या प्रसंगामुळे एकटे परत जाण्याची भीती वाटत होती, म्हणून मी गावकाऱ्याबरोबर परत जायचे ठरवले.

बऱ्याच वेळा नंतर मला एक गोष्ट जाणवली की तिथे असणारी लोक कोणीच कोणाशी बोलत नाहीयेत. सगळे एकटक फक्त त्या चीतेकडे पाहत आहेत. म्हणून मीही तिथे पाहू लागलो. एवढ्यात गाडीचा आवाज झाला, गाडीतून एक सुंदर, पंचविशीतील एक तरुणी उतरली. तिने गुलाबी रंगाची साडी नेसली होती, हातात हिरव्या बांगड्या आणि अंगावर भरपूर दागिने चढविले होते. खूप सुंदर दिसत होती ती.. मला जरा आश्चर्यच वाटले कारण शक्यतो स्त्रिया स्मशानात कधी येत नाहीत त्यात आता रात्र झाली आहे. मी तिच्याकडे पाहत होतो. ती चालत त्या पेटत्या चीते जवळ गेली आणि पुढचा प्रसंग मी डोळे विस्फारून पाहतच राहिलो. तिने अक्षरशः जळत्या चितेत हात घातला आणि मेलेल्या माणसाच्या आत्म्याला बाहेर काढले आणि मोठ्याने हसू लागली. मी माझ्या आजूबाजूला असणाऱ्या इतर लोकांना पाहू लागलो. तिथे जमलेले सगळे लोक मोठ्याने हसत माझ्या भोवती जमा होऊ लागले. मी इतका घाबरलो होतो की तिथेच माझी शुद्धच हरपली..

पहाटे मी शुद्धीवर आलो. डोळे उघडले तेव्हा मी दिपाली च्याच घरी होतो. माझे सगळे मित्र माझ्या जवळ बसले होते, मी शुद्धीत येण्याची वाट पाहत होते. नंतर मला कळले की, स्मशानातून सर्व लोक परत आले तरीही मी आलो नव्हतो. मित्रांनी गावकऱ्यांना आमच्या चॅलेंज बद्दल सांगितले तसे सगळ्यांनी शोधा शोध सुरू केली. तेव्हा मी बेशुद्ध अवस्थेत त्यांना स्मशानात सापडलो. मी हिम्मत करून सर्वांना माझ्या बाबतीत घडलेला प्रकार सांगितला. माई ही माझ्या जवळ च बसल्या होत्या. माझे बोलणे ऐकुन फक्त एकच वाक्य म्हणाल्या “‘सविता, सविताच होती ती’.

दुसऱ्याच दिवशी आम्हाला शहरात पाठवण्याची व्यवस्था केली गेली. आमची गाडी पुलावरून बाहेर पडत असतानाच माझ्या कानावर पुन्हा तीच आवाज पडला ” हो, मीच होते ती , मी सविता “…..

Leave a Reply