अनुभव – ऋतुजा धुरी

हा पहिला अनुभव माझ्या वडिलांचा आहे. आमच्या गावाकडचा. माझे वडील ९-१० वर्षांचे असतील तेव्हा. त्या काळी आमच्या कडे बरीच गुर ढोर होती. त्यांचा खूप लळा होता वडिलांना. त्यातलीच एक सुंदरा नावाची म्हैस होती. ते तिला नदीवर अंघोळीला घेऊन जायचे. आमचे खूप मोठे काजू चे पारडे होते. त्या दिवशी ही ते म्हशीला अंघोळ घालायला नदीवर घेऊन जायला निघाले. एरव्ही पेक्षा जरा उशिरा च निघाले. मध्यान्ह व्हायला अजून थोडा अवधी बाकी होता. निघताना आजी त्यांना म्हणाली की भर दुपारी असे जाऊ नकोस पण त्यांनी आजी चे म्हणणे ऐकले नाही. त्यांनी म्हशीच्या पाठीवर गोणपाट टाकले आणि त्यावर बसून नदीवर जायला निघाले. १५-२० मिनिटांची पायवाट होती.

पावसाळ्याचे दिवस असेल तरीही पावसाने उसंत घेतली होती. आणि नेमके त्या दिवशी खूपच रख रखत उन पडले होते. पाऊस पडून गेल्या मुळे रानात हिरवळ पसरली होती. त्या वाटेवरून जात असताना त्यांना एका झाडावर कोणी तरी बसलेले दिसले. तसे ते त्या झाडा जवळ गेले. त्या झाडाच्या फांदीवर एक बाई बसली होती. नक्की कोण आहे ते दिसले नाही कारण ती पाठमोरी बसली होती. पाय खाली सोडून हेलकावे देत होती. काळपट लाल रंगाची साडी नेसली होती. तिला असे झाडाच्या एका कोपऱ्यात फांदीवर बसलेले पाहून वेगळेच वाटले. त्यांना वाटले की असेल एखादी वेडी बाई म्हणून ते दुर्लक्ष करत पुढे निघून गेले. म्हशीला अंघोळ वैगरे घालून अर्ध्या पाऊण तासानंतर ते पुन्हा घराच्या वाटेला लागले. 

येताना वाटेत ते झाड दिसले तसे नकळत त्यांचे लक्ष त्या झाडाच्या फांदीवर गेले. ती बाई तिथेच होती. त्यांची नजर त्या पाठमोऱ्या बाईकडे लागून राहिली होती. तसे तिने अचानक पायाला हेलकावे देणे थांबवले. बहुतेक तिला यांची चाहूल लागली असावी. तिने एकदाही मागे वळुन पाहिले नाही. आणि एका क्षणी ती अचानक चिडून म्हणाली “इथे काय करतोयस तू.. ही आमची वेळ आहे.. इथे पुन्हा या वेळेला फिरकू नकोस”.. तो आवाज ऐकताच आमची म्हैस सरळ धावत सुटली. कदाचित तिला या अश्या विचित्र गोष्टीची तिला चाहूल लागली असावी. त्यांनी घरी येऊन सगळे आजीला सांगितले. दुसऱ्या दिवशी विचित्र गोष्ट घडली. वडीलांच्या मानेला नक्की काय झाले होते माहीत नाही पण त्यांची मान प्रचंड दुखत होती आणि त्यांनी वर पहायचा प्रयत्न केला की मान इतकी वळायची की अगदी पाठीला टेकायची. 

आजीला खूप काळजी वाटू लागली होती. त्यांना असा विचित्र त्रास का होत होता हे कळायला मार्ग नव्हता. खूप वैद्य केले पण काही फरक पडत नव्हता. पण बहुतेक वेळ हेच कधी कधी उत्तर असते. आजी त्यांची रोज तुपाने मॉलिश करायची. जसं जसे दिवस सरत गेले तसे त्यांना बरे वाटत गेले. त्या दिवशी त्यांनी जे पाहिले त्याचा आणि दुसऱ्या दिवशी पासून मान धरून आल्याच्या गोष्टीचा नक्कीच काही तरी संबंध असावा अशी माझी आजी नेहमी म्हणायची. 

तर हा माझ्या वडिलांना त्यांच्या लहानपणी आलेला अनुभव. मला सुद्धा माझ्या लहान पणी गावी एक विचित्र अनुभव आला होता. मी ७-८ वर्षांची असेन तेव्हा. गावी आमचे मोठे घर आहे. आणि तिथून काही अंतरावर माझ्या काकीचे ही घर आहे. आम्ही गावात गेल्या गेल्या गावात माझी बहिण शेजारी राहणाऱ्या माऊशी कडे गेली. माझ्या घरचे शक्यतो त्यांच्या घरी जाऊ द्यायचे नाही. पण त्या दिवशी मला याचे खरे कारण कळले. शेजारची माउशी घरा शेजारी लाकडे गोळा करत होती. बहिण ही तिला मदत करू लागली. चुली साठी लाकड गोळा करून झाल्यावर त्यांनी घरात आणून ठेवली. प्रवास करून आल्यामुळे माझी बहिण पाणी प्यायला म्हणून आत गेली. माठातले थंडगार पाणी घेण्यासाठी तिने वरचे झाकण उघडले आणि जवळ जवळ किंचाळली च. त्यात पाणी नव्हते पण तो माठ भरून काळया बाहुल्या ठेवल्या होत्या. 

ती सरळ धावत घरी आली. घरचे माझ्या बहिणीला बरेच ओरडले. आई सांगू लागली की तुम्हाला तिच्या कितीदा सांगितले की त्या घरी जाऊ नका पण कोणीही अजिबात ऐकत नाही. मोठ्यांचे जरा ऐकावे. बहिणी सोबत घडलेला तो प्रकार ऐकून मी खरंच घाबरले होते. दुसऱ्या दिवशी रात्री माझी आई आणि ती माऊशी बोलत बसल्या होत्या. त्या माऊ शी ला पायाला काही तरी जखम झाली होती. ती आई ला दाखवत होती. मी पाहिले आणि मला धक्काच बसला. तिला साधी सुधी जखम नव्हती झाली तर तिच्या पायाला अगदी पोखरल्यासारखे झाले होते. आई म्हणाली की आपल्या कडले औषध संपले आहे. तू काकी कडे जाऊन जखमेवर लावायचे मलम घेऊन ये. आई ने सांगितल्या प्रमाणे मी काकी कडे गेले आणि औषध घेऊन पुन्हा यायला निघाले. गावाचा परिसर असल्यामुळे स्ट्रीट लाईट असून नसल्या सारखे होते. 

मी एकटीच रस्त्याने चालत घरी येत होते. येताना माऊ शी कडे वळून औषध द्यायचे होते. तिचे घर साधेच होते. कौलारू घर. मी जसे तिच्या घराजवळ आले तसे मला जाणवले की तिच्या घराच्या छतावर कोणी तरी बसले आहे. नुसत्या कल्पनेने अंगावर सर्रकन काटा येऊन गेला. त्यात माझ्या मोठ्या बहिणी सोबत याच घरात घडलेला प्रसंग आठवला आणि अजूनच धडकी भरून आली. मी तिथे लक्ष न देण्याचा खूप प्रयत्न करत होते पण अश्या वेळी आपला स्वतःवर ताबा राहत नाही हे मला त्या दिवशी जाणवले. माझे लक्ष शेवटी वर गेलेच. तिथे एक लहान मुलगा बसला होता. पाय जवळ घेऊन डोके गूढ घ्यावर ठेऊन माझ्या कडेच पाहत होता. त्याला असे तिथे बसलेले पाहून भीती ने माझ्या हाता पायाला कंप सुटू लागला. मी जस जसे घरा जवळ चालत गेले मला त्याचा चेहरा स्पष्ट दिसू लागला. 

त्याच्या चेहऱ्यावर बऱ्याच जखमा होत्या. असे वाटत होते की त्याचा चेहरा भाजला आहे. मी त्याच्याकडे पाहिले तसे तो मला जवळ बोलावू लागला. मी इतकी घाबरले की उलट फिरून सरळ घराकडे धाव घेतली. घरात शिरल्या शिरल्या मोठ्या भावाला सांगितले आणि रडायलाच लागले. तो मला म्हणाला की चल आपण जाऊन बघू कोण होते तिथे. पण माझी पुन्हा जायची हिम्मत च झाली नाही म्हणून मी तिथे गेले नाही. पण दुसऱ्या दिवशी मी त्याच्याबरोबर पाहायला गेले. पण आम्हाला त्या परिसरात तसा कोणताच लहान मुलगा दिसला नाही. आम्ही घरी जायला निघालो. मी सहज म्हणून मागे वळून पाहिले तर तोच लहान मुलगा आमच्या पासून काही अंतरावर उभा राहून मला बोलवत होता.

मी भावाला लगेच म्हणाले “हा बघ.. हाच होता.. बघ मला बोलवतो य”. त्याने मागे वळून पाहिले पण त्याला कोणीही दिसले नाही. म्हणून त्याला वाटले की मी त्याची चेष्टा करतेय. पण खर सांगायचं तर तो लहान मुलगा फक्त मला दिसत होता, त्याला नाही. मी त्याला म्हणाले की तू इथून चल आधी. आपण घरी जाऊ. दुसऱ्या दिवशी आम्हा सगळ्या भावंडांनी नदीवर जायचा बेत आखला. नदीवर पोहायला जायचे आणि मग तिथे च चुलीवर जेवण वैगरे करून संध्याकाळी घरी परतायचे. ठरल्या प्रमाणे आम्ही तिथे गेलो चांगले २-३ तास पोहलो. पण काही कारणामुळे माझ्या बहिणीचे आणि चुलत बहिणीचे म्हणजे काकी च्या मुलीचे भांडण झाले. तसे ती आणि चुलत भाऊ जरा रागातच घरी जायला निघाले. 

आम्ही ज्या नदीवर आलो होतो तिथून आमचे घर तसे बरेच लांब होते. आम्ही त्यांना थांबवायचा प्रयत्न केला पण त्यांनी आमचे ऐकले नाही. ते निघून गेल्यावर साधारण तासाभराने आम्ही घरी जायला निघालो. काही वेळात आम्ही घरी येऊन पोहोचलो पण माझी चुलत बहीण आणि भाऊ अजुन घरी आले नव्हते. आमच्या जवळपास एक तास आधी ते घरी यायला निघाले होते त्यामुळे आमच्या आधी ते यायला हवे होते. बऱ्याच वेळा नंतर ते घरी आले. आम्ही त्यांची विचारपूस केली की तेव्हा त्यांनी जे सांगितले ते ऐकून मला तर धडकीच भरली. ते म्हणाले की आम्हाला बहुतेक चकवा लागला होता. आम्ही दोघं वेड्या सारखे त्या जंगल पट्टीच्या भागात एक तास फिरत होतो. कोणतीही वाट धरली की काही अंतर चालल्यावर ती वाट संपायची. शेवटी आम्ही कसे बसे त्यातून बाहेर पडलो. 

काही दिवसानंतर आम्ही गावावरून पुन्हा आमच्या घरी यायला निघालो. सगळे एकत्रच एस टी बस ने निघालो. तेव्हा प्रवासात मी सगळ्या गोष्टी आई आणि काकी ला सांगितल्या. तसे माझी काकी म्हणाली की त्या माऊ शी च्याच घरात काही तरी आहे. सगळे म्हणतात की तिच्या घरात तर कधी घरा शेजारी एक ४-५ वर्षांचा लहान मुलगा दिसतो. तो कोण आहे कोणाला माहीत नाही. कुठे जातो ते ही कळत नाही. काकी चे ते बोलणे ऐकून मी खरंच सुन्न झाले.. मला आता खरंच भीती वाटत होती. मी तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायला म्हणून एस टी बस च्याच खिडकीतून बाहेर पाहिले आणि माझे सर्वांग शहारले. तोच लहान मुलगा रस्त्या कडेला उभा होता. मी घाबरून नजर फिरवली आणि आई ला मिठी मारली. पुन्हा त्या दिशेला पाहायची माझी हिम्मत झाली नाही. मी डोळे बंद करून तशीच पडून राहिले. मला झोप कधी लागली कळलेच नाही..

बऱ्याच वेळा नंतर मला जाग आली तेव्हा आम्ही शहरात पोहोचलो होतो. मी उत रण्या आधी आई बाबा ना सांगितले की तो मुलगा मला पुन्हा दिसला. घरी जाण्याऐवजी ते मला एके ठिकाणी घेऊन गेले. तिथल्या व्यक्तीने मला बघताच ओळखले आणि म्हणाला की आहेस तिथेच थांब.. जागची हलू नकोस. त्या व्यक्तीने माझ्या जवळ येऊन माझ्या कपाळावर अंगारा लावला. त्यामुळे मला इतका त्रास झाला की मला सहन झाले नाही. म्हणजे काही क्षणासाठी मला असे वाटले की मला कोणी तर पूर्ण ताकदीनिशी मारते य. पण पुढच्या काही मिनिटांतच मला त्या वेदना व्हायच्या बंद झाल्या. मला त्यांनी बाहेर जाऊन बसायला सांगितले. पण मला त्यांचे आणि वडिलांचे बोलणे ऐकू येत होते. ते माझ्या बाबांना सांगत होते की ही कुठे रात्री बाहेर गेली होती का..? कारण हिला एकाने धरले होते. ही बहुतेक एकटीच तुमच्या कुटुंबात लहान आहे. ज्याने हिला धरले होते त्याचे ही वय जास्त नसावे. बरे झाले तुम्ही वेळेत आणले इथे नाही तर गोष्टी हा ता बाहेर गेल्या असत्या. 

आज ही मला त्या मुलाचा चेहरा चांगलाच लक्षात आहे. तो आठवला तरी मनात एक वेगळीच भीती दाटून येते.

Leave a Reply