लेखिका – रुद्घा

आठवतीये का ? ती शाळेतील सहल… शाळेतील तसे सगळेच दिवस आपल्या आयुष्यातील खास असतात . पण शाळेतील ती वार्षिक सहल, त्यात केलेल्या गमतीजमती आपण आपल्या हृदयात एका कोपऱ्यात सांभाळून ठेवतो. माझेपण शाळेतील ते दिवस इतरांप्रमाणेच छान होते, पण त्या दिवशीच्या प्रसंगाने माझ्या आयुष्यालाच कलाटणी दिली.

सहलीचा दिवस ठरला फेब्रुवारी महिन्याची १२ तारीख . मी आणि माझा सगळ्यात जवळचा मित्र कुणाल आम्ही खूप उत्साहित होतो, कारण आम्ही पहिल्यांदाच घरच्यांशिवाय एवढ्या लांबवर प्रवास करणार होतो . सहलीचे ठिकाण होते गणपतीपुळे ! कुणालचे कुटुंब अंधश्रद्धावर फार विश्वास ठेवत असे. कुणालच्या आजीने नकारच दिला होता सहलीला जाण्याविषयी. 

याविषयी कारण विचारल्यावर ती म्हणाली, ” आमच्या कुटुंबातील व्यक्तींना पाण्यापासून व आगीपासून धोका आहे .” पण कुणालच्या हट्टापायी त्याला सहलीला येण्यास घरून परवानगी मिळाली. सकाळी ४.३० ला शाळेत जमायचे होते .माझे घर शाळेपासून बरेच लांब होते पण कुणालचे घर शाळेपासून अगदी जवळ होते, म्हणून मी बॅग पॅक करून रात्रीच्या मुक्कामाला कुणालच्या घरी गेलो. अशी रात्रीची कुणाल च्या घरी राहण्याची माझी पहिलीच वेळ होती . कुणाल बॅग पॅक करत असताना कुणालच्या आईने मंत्र पुटपुटत एक पिवळं लिंबू कुणालच्या बॅगमध्ये ठेवलं. मी आश्चर्यचकित झालो, पण कुणाल अगदी नार्मल होता, कदाचित त्याला या सागळ्याची सवय असावी.

दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही वेळेवर शाळेत पोहोचलो , पहाटे ५.०० वाजता बस सुटली. साधारण दहा वाजता आम्ही गणपतीपुळे येथे पोहोचलो, दर्शन घेतले, जेवणं केली, आणि साडेबाराच्या सुमारास शिक्षकांनी आम्हास सूचना देऊन बिचवर सोडले. त्यावेळी मोबाइल ची एवढी क्रेझ नव्हती, सरांकडे कॅमेरा होता खूप फोटो काढले आमचे , खूप वेळ खेळून झाल्यानंतर आम्ही शिंपले गोळा करायला लागलो, थोड्या वेळानंतर सरांनी आम्हाला एकत्र केले, तर तिथे कुणाल नव्हताच. आम्ही सगळे त्याला शोधू लागलो, समुद्रकिनारी दूरवर वाळूच्या एका ढिगाऱ्यावर कुणाल बसला होता, आणि एकटक समुद्राकडे पाहत होता, मला तो दिसला. मी त्याला आवाज दिला, पण त्याने काहीच प्रतिसाद दिला नाही. मी जवळ जाऊन त्याला गदागदा हलवून विचारले, “अरे इथे काय करतोयस ? सर्वजण तुला शोधतायेत” तो काहीच बोलला नाही माझ्याकडे बघून हसला आणि सरांच्या दिशेने चालू लागला, मला जरा विचित्रच वाटले. त्यानंतर तो घरी येईपर्यंत माझ्याशीच काय कोणाशीच काहीच बोलला नाही.

सायंकाळचा सूर्यास्त बघून परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली . रात्र झाली होती, दिवसभर खेळून थकले असल्यामुळे बरेसेचजण लगेचच झोपी गेले. सरांनी शिपायाला सर्व आले आहेत ना याची खात्री करून घ्यायला सांगितली, तसे शिपायी मामा बॅटरी घेऊन सगळ्यांना पाहू लागले, आमच्या सिट जवळ आल्यावर मामा जोरात ओरडले, आम्ही जागे झालो. सरांनी पटकन येऊन त्याला काय झाले ते विचारले, पण ते इतके घाबरले होते की त्यांच्या तोंडतून शब्दच निघत नव्हता. त्यांना पाणी वैगरे देऊन शांत केले आणि एके ठिकाणी खुर्ची वर बसवले. ते जरा शांत झाले आणि म्हणाले, ‘ कुणाल चा चेहरा विचित्र झाला होता, पूर्ण पांढराफटक पडला होता आणि त्याला डोळेच नव्हते ‘.

आम्ही कुणालकडे पाहिले पण तसे काहीच वाटले नाही. सर म्हणाले तुला भास झाला असेल.

रात्री ११.०० सुमारास आम्ही शाळेत पोहचलो, सर्व पालक आपल्या मुलांना नेण्यासाठी आले होते, पण कुणालचे घर अगदी जवळ असल्यामुळे आमच्या पालकांपैकी कोणीच आले नव्हते . सर्वांचा निरोप घेऊन आम्ही घराकडे येऊ लागली, थोडे चालल्यावर कुणाल एकाएकी खूप मोठ्याने हसू लागला, आणि माझे दोन्ही हात हातात घेऊन म्हणाला ,”आज मी खूप खुश आहे” आणि परत मोठयाने हसू लागला, मला आता खरच भीती वाटू लागली. कारण तो ज्या आवाजात बोलला तो त्याचा आवाज नव्हता. त्याचा तो स्पर्श अगदी थंड जाणवला मला, मी काहीच न बोलता चालू लागलो.

दुसऱ्या दिवशी मी मुद्दामच लवकर उठून घरी गेलो. आज सहलीची सुट्टी होती . त्याच रात्री साधारण ८.०० वाजता कुणालच्या आईचा फोन आला, आणि मी, बाबा व आई तडक कुणालच्या घरी जायला निघालो. पाहतो तर काय, एक मांत्रिक कुणाल पुढे बसला होता, कुणाल पूर्ण कुंकवाने माखला होता आणि तो कुंकवाच्या रिंगणात होता. बाबांनी या प्रकाराबाबत विचारपूस केल्यावर कळले की, सकाळपासून कुणाल काहीच बोलत नव्हता, कुणालच्या आईला शंका आली, लगेचच तिने बॅगेतील लिंबू पाहिलं, तर त्या लिंबूचा रंग बदलून लाल झाला होता, आईला कळून चुकलं की हा काहीतरी भयंकर प्रकार आहे, म्हणून तिने मांत्रिकाला बोलावले. काल काय घडले ते मला विचारण्यात आले, मी घडलेला सर्व प्रकार त्यांना सांगितला, कुणाल ला समुद्रावरचे काहीतरी लगिरलेलं होतं.

म्हणजे आता जो आहे आणि काल माझ्याबरोबर परतीचा प्रवास करणारा कुणाल नव्हताच मुळी….

मी विचारांत होतो, एवढ्यात जोरदार किंकाळी मुळे मी भानावर आलो.मांत्रिक त्यांच्या अंगावरती पाणी फेकत होता त्यामुळे त्याला वेदना होत असाव्यात.

मांत्रिक म्हणाला, ” कोण आहेस तू ” ?

तो म्हणाला, ” मी कुणाल आहे ” .

मांत्रिकाने परत त्याच्या अंगावर पाणी फेकत म्हणाला ,” खोटं बोलू नको, तू या शरीराला वश केलं आहेस, मुकाट्याने सांग कोण आहेस तू , कशासाठी पकडलं आहेस याला, सांग “.

एवढ्यात कुणाल हसू लागला आणि अचानक मोठयाने रडू लागला, सांगू लागला-

” चार , चार वर्षे झालीत, मी माझ्या कुटुंबासोबत समुद्रावर फिरायला आलो होतो, मी आणि बाबा पोहायला आत समुद्रात उतरलो, मोठी लाट आली आणि मी आत ओढला गेलो, मी ओरडत होतो, पण मला बाबा शोधुचं शकले नाहीत. दरवर्षी माझे आईबाबा समुद्रावर येतात पण ते मला बघतच नाहीत मला तिथेच सोडून परत जातात.आता मला हे शरीर मिळालं आहे, मी परत जाणार नाही , मी माझ्या आईबाबांना भेटणार, मी नाही सोडणार या शरीराला “.

मांत्रिक म्हणाला, ” मी तुला तुझ्या आईबाबांना भेटवतो, पण नंतर तुला हे शरीर सोडावं लागेल “.

कुणाल मोठ्याने हसला आणि त्याची शुद्ध हरपली.

कुणाल व माझ्या वडिलांनी खूप माहीत काढून त्याच्या आईवडिलांना शोधून काढले. तर आम्हाला वेगळीच गोष्ट कळली, त्यांचा मुलगा योगेश हा खूप हट्टी होता, त्याला वाटत असे त्याची प्रत्येक इच्छा लगेचच पूर्ण व्हावी. गणपतीपुळे ला आल्यावर त्याने बाबांकडे नवीन व्हिडिओगेम साठी हट्ट धरला , खूप महाग असल्या कारणाने व्हिडिओगेम देण्यास बाबांनी साफ नकार दिला, म्हणून त्याने रागाने पळत जाऊन समुद्रात उडी घेतली, ती भरतीची वेळ असल्याने, समुद्रात खूप मोठ्या लता उसळत होत्या,आणि अशाच एका लाटेने योगेशला आत खेचून घेतले .खूप प्रयत्न करूनही त्याचे वडील त्याला वाचवू शकले नाहीत. हा सगळा प्रकार आम्ही मांत्रिकाला सांगितला.

मांत्रिकाने सर्व तयारी केली.

कुणालला झोपलेल्या स्थितीत रिंगणात आणण्यात आले, मांत्रिकाने मंत्रोच्चारास सुरुवात केली, लगेचच कुणाल जागा झाला, त्याच्या समोर त्या अतृप्त आत्म्याचे म्हणजेच योगेश चे आईबाबा होते. त्यांना पाहून तो म्हणाला,

” का वाचवलं नाही आईबाबा मला ? मला एकट्याला सोडून तुम्ही परत गेला ना. का ? “.

मांत्रिक त्याच्या अंगावर पाणी शिंपडून म्हणाला,

” आमच्याशी खोटं का बोललास, तू स्वतःहून पाण्यात गेला होतास, मग बाबांचा दोष कसा ? “.

तसा तो म्हणाला

” मग ते माझी इच्छा पूर्ण का नाही करू शकले, आणि त्यांनी मला वाचवायला हवं होतं, का नाही वाचवलं . आता मी त्यांना सोडणार नाही, मी त्यांना ठार मारण्यासाठी च या शरीरात प्रवेश केला आहे, मी त्यांना  मारूनच जाणार “.

मांत्रिक म्हणाला,

” मी तसं होऊ देणार नाही, तूझ्या म्हणण्यानुसार मी तुला आईबाबांना भेटवल आहे, आता तुला हे शरीर सोडवच लागेल”.

आणि त्यांनी जोरजोरात मंत्रोच्चार सुरू केले.

तसा कुणाल खूप मोठमोठ्याने हसू लागला, त्याचा चेहऱ्याचा रंग बदलून पांढराफटक झाला, आम्ही सर्वजण प्रचंड घाबरलो, तो आता मोठमोठ्याने ओरडू लागला आणि अखेरीस मोठी किंकाळी देऊन जमिनीवर पडला. 

मांत्रिक म्हणाले काळजी करू नका तो आत्मा आता मुक्त झाला आहे.

आम्ही सगळे धावत कुणालपाशी गेलो, पण…

तो अतृप्त आत्मा आमच्या कुणालचाही जीव घेऊन गेला होता… आमचा कुणाल अनंतात विलीन झाला…

This Post Has One Comment

  1. Omkar chitalkar patil

    अतिशय भयानक आहे.

Leave a Reply