दर वर्षी प्रमाणे या वर्षी ही २४ मार्च ल गावदेवी ची यात्रा होती म्हणून आमचा गावी जायचा योग आला. खेड हून माझ्या गावाला जायला साधारण ४ तास लागतात. गाव खूप मागासलेले आहे आणि अजूनही तिथे लाईट नाही. वस्ती ही अगदी तुरळक आहे. 

मी, माझी आई आणि शेजारचे काका काकू असे आम्ही ४ जण गाडीने गावाला जायला निघालो. साधारण सकाळी ११ वाजता आम्ही गावदेवीच्या मंदिरात पोहोचलो. देवीची ओटी भरली आणि थोडा वेळ थांबून गावातल्या घरी जायला निघालो. गावातल्या मित्रांकडून कळले होते की गावी पहिल्यांदा डांबरी रस्ता होतोय म्हणून आम्ही दुसरा एखादा रस्ता मिळतोय का ते पाहत होतो. काही अंतर गेल्यावर तिथे एक गृहस्थ भेटले. त्यांना आम्ही गावातल्या रस्त्या बद्दल विचारले. ते म्हणाले की “रस्त्याचे काम अजून चालू आहे, तुम्ही रघुवीर घाटा मार्गे जा”. पण त्या घाटातून आमच्या गावी जायला कोणताच रस्ता नाही हे मला चांगलेच ठाऊक होते. मी त्यांना तसे म्हणालोही पण नंतर वाटले की कदाचित तात्पुरता एखादा रस्ता केला असेल म्हणून आम्ही जास्त विचार न करता त्या घाटा मार्गे जायला निघालो. 

तो रस्ता अगदी अरुंद आणि सूनसान होता. मी याआधी कधीच तो रस्ता पाहिला नव्हता. एका बाजूला उंच डोंगराचा भाग आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी. एखाद्या ४ व्हिलर ला टर्न घेणे ही शक्य झाले नसते इतका अरुंद रस्ता. आम्ही हळू हळू गाडी नेत साधारण १ तासाने गावात येऊन पोहोचलो. घरी आल्यावर आम्ही शेजारी विचारपूस केली की आपल्या मुख्य रस्त्याचे बांधकाम कधी होणार आहे, तो दुसरा रस्ता तर अगदी भयानक आहे. त्यावर ते म्हणाले की कोणता रस्ता? आपल्या रस्त्याचे काम महिन्याभरापूर्वी च संपले. आम्ही थोडे बुचकळ्यात च पडलो. त्या गृहस्थाने आम्हाला खोटं का सांगितले असेल याचा विचार करू लागलो. पण काही उत्तर मिळाले नाही. दुपारचे जेवण उरकून पुन्हा आम्ही यात्रेत फिरायला गेलो. आई ला दुसऱ्या दिवशी सुट्टी नव्हती म्हणून आम्ही रात्रीच परतीचा प्रवास करायचे ठरवले.

जेवण उरकून निघायला साधारण ११ वाजले. का कोण जाणे पण जाताना आम्ही त्याच रस्त्याने जायचे ठरवले. तासाभराने आम्ही त्या भयानक अरुंद रस्त्याला लागलो. माझे लक्ष अचानक रस्त्याच्या कडेला गेले आणि मी गाडी थांबवली. अतिशय मोहक असा पांढरा शुभ्र ससा आमच्या दिशेने पाहत होता. मी कसलाही विचार न करता सरळ खाली उतरून त्याला पकडायला त्याच्या मागे धावत गेलो. आई हाका मारत होती पण माझे तिच्या बोलण्याकडे लक्षच नव्हते. मला कसलेच भान राहिले नव्हते. तो ससा जंगलाच्या दिशेने आत जाऊ लागला तसे मी ही वाट काढत त्याच्या मागे धावू लागलो. शेवटी आम्ही एका झाडापाशी आलो. मी त्याला पकडणार तितक्यात २ इसम बाईक वर आले आणि मला अडवले. मी काही बोलणार तितक्यात त्यांनी मला विचारले “इतक्या रात्री इथे काय करताय” मी त्यांना एका सस्या मागे आल्याचे सांगितले त्यावर ते म्हणाले की तो ससा नाही, सस्याच्या रूपातील जखिण आहे. हे ऐकुन माझ्या पायाखालची जमीनच सरकली. 

ते पुढे सांगू लागले. इथेच काही अंतरावर आमची वाडी आहे. आम्हाला रात्री असे खूप काही दिसते पण आम्ही त्याच्या वाटेला कधीच जात नाही. जर तू त्याला पकडले असतेस तर तू वाचला नसतास. काही वर्षांपूर्वी इथे एका वाहनाचा अपघात होऊन पूर्ण कुटुंब मरण पावले होते. त्यात एक बाई वाचली होती पण जेव्हा तिला कळले की आपल्या कुटुंबातील कोणीच उरले नाही तेव्हा तिने ही प्राण सोडले. ती खूप लोकांना दिसते कधी तिच्या जखमी अवस्थेत तर कधी वेगवेगळ्या रूपात. जसे तुला आज सस्याच्या रूपात दिसली. आम्ही वेळेवर येऊन तुला सावध केले म्हणून तू वाचलास. काही दिवसांपूर्वी सुद्धा या ठिकाणी एका माणसाचा मृत्यू झाला होता.

मी घाबरलेल्या अवस्थेत च मागे फिरलो आणि गाडीत येऊन बसलो. आई खूप चिडली होती पण घडलेल्या प्रकाराबद्दल मी कोणालाच काही सांगितले नाही. आम्ही पहाटे घरी पोहोचलो. खरे सांगायचे तर ती दोन माणसे देवाच्या रूपाने तिथे आली होती. आईने देवीची ओटी भरली होती आणि तिनेच या संकटापासून रक्षा केली. 

Leave a Reply