अनुभव – रोहित
गेल्या वर्षीच्या डिसेंबरमध्ये ऑफिसमधला ताण इतका वाढला होता की मला अक्षरशः दमछाक वाटायला लागली होती. मी एका आयटी कंपनीत काम करतो, आणि रोज १०-१२ तासांचा ताण सहन करणे अशक्य होतं. नेमकं तेव्हाच माझा मित्र अमित – जो माझ्या कॉलेजपासूनचा जिवलग मित्र आहे तो भेटायला आला. त्याच्या डोळ्यातही तोच थकवा, तेच कंटाळवाण रुटीन दिसत होत. आम्ही दोघं बाल्कनीत बसून चहा घेत होतो आणि ट्रिपचा विषय निघाला.
“आपण कुठेतरी लांब जाऊया रे,” “एकदम शांत, अनोळखी, आणि शांतता मिळेल अशी जागा.” मी म्हटलं.
अमित हसला. “माझं गाव आहे ना कोकणात – लांजा जवळ. तिकडे फार लोक जात नाहीत. तिथं जाऊया. गावकडची हवा, भाकरी-चटणी आणि शांत समुद्र किनारा… परफेक्ट ब्रेक होईल.” मी लगेचच होकार दिला. काही दिवसांतच आम्ही दोघांनी सुट्ट्या टाकल्या. आमची बॅग वैगरे भरली, बॅगमध्ये कपडे, थोडंफार स्नॅक्स, टॉर्च, पॉवर बँक आणि माझा जुना कॅमेरा – कारण काहीतरी वेगळं दिसलं तर ते कॅप्चर करायचं, हा माझा नेहमीचा शौक. मुंबईहून रात्री गाडीतून निघालो. रात्रीचा प्रवास फारसा कंटाळवाणा नव्हता कारण गाडीत आम्ही आमच्या कॉलेजच्या आठवणी, जुन्या गोष्टी, आणि कॉलेजमधल्या मुलींच्या गप्पा मारत गेलो. कोकणात शिरताच वातावरण पूर्णपणे बदललं.
खिडकीतून येणारा वारा, पानांची सळसळ, आणि दूरवर दिसणाऱ्या डोंगररांगांनी मन एकदम शांत केलं. सकाळी आम्ही अमितच्या गावात पोचलो. तिथं त्याच्या जुन्या घरी आजीकडे मुक्काम होता. घर एकदम साधं कौलारू होतं आणि ते पाहूनच मला खूप बरं वाटचाल. त्याची आजी खूप साधी – लुगडं नेसलेली, केस पांढरे, पण डोळ्यांत चमक. आल्या आल्या तिने आमची विचारपूस केली, प्रवास कसा झाला वैगरे. आणि अवघ्या 20 मिनिटांत तिनं गरमागरम पोहे आणि चहा करून दिला. इतक बरं वाटल की सगळा थकवा, ताण कुठल्या कुठे निघून गेला. आम्ही सहज फेरफटका मारायला घराबाहेर पडलो. अमित चं काही लोकांशी बोलणं झालं. गावकऱ्यांची बोलकी संस्कृती, त्यांची मिश्कील भाषा, हे सगळं इतकं आपलंसं वाटत होतं की क्षणभर वाटलं – आपलं मूळ इथेच आहे.
त्या दिवशी काही लोकांशी बोलताना एक गोष्ट लक्षात आली – गावापासून दूर एक घाट आहे. नुकताच गावातल्या एका माणसाचा अपघात झाला होता तिथे. त्यामुळे त्याच्या बद्दल चर्चा माझ्या कानावर पडली. असच बोलता बोलता मी अमित ला विचारले तर तो म्हणाला “ अरे इथून काही किलोमीटर अंतरावर एक जुना घाट आहे, तिथे काही तरी झाले मागच्या आठवड्यात. तिथला रस्ता ही बंद केलाय आता. मी लहानपणी ऐकलं होतं की तिथे एक साधू राहत होता आणि त्याचं काही गूढ प्रकरण होतं. कोणीतरी त्याला जिवंत जाळलं… आणि त्याचा शाप आहे तिथे. या गावातलीच नाही तर आजूबाजूच्या गावातली लोकं ही तिथं जाणं टाळतात. जाऊदे ते सगळं. आपण इथे ज्यासाठी आलोय ते करूया…”
“पण आपण तिथं एकदा जाऊ या का? फोटोंसाठी छान असेल.” मी फक्त विचारून पाहिलं.
त्यावर तो म्हणाला “ तुला खरंच जायचंय का तिकडे? चल.. तू सांगतोय तर जाऊन येऊ.. शेवटी मित्र आहेस यार आपला.. “
दुसऱ्या दिवशी दुपारी जेवण वैगरे आटोपून आम्ही तिथं जायचं ठरवलं. पण घरातून निघताना आजीने सांगितले “संध्याकाळी ६ च्या आधी तिथून बाहेर या. सूर्यास्तानंतर तो जागा होतो.”
आजीच हे वाक्य खूप विचित्र वाटलं. मी विचारलं, “तो.. तो कोण?”
ती म्हणाली “ सांगेन नंतर.. पण लवकर घरी या.. विषाची परीक्षा नको.. “
माझ्या अंगावर शहारे आले. मी तिथं जाण्याचा घेतलेला निर्णय बरोबर आहे की नाही यावर शंका आली. मनात विचार केला की काही वेळ थांबून अंधार पडायच्या आत गावात परत येऊ. फोटोस हीं काढता येतील. याच निर्धाराने मी त्या घाटाच्या दिशेने निघालो. साधारण तासाभराने आम्ही तिथे पोहोचलो. घाटाच्या सुरुवातीला एक जुने दगडी पायऱ्यांचे प्रवेशद्वार होते. प्रवेशद्वार ओलांडल्यावर जंगल सुरू झालं. रस्ता अरुंद, आणि आजूबाजूला दाट झाडी. पक्ष्यांचा आवाज, वाऱ्याची झुळूक… एक वेगळीच शांतता होती. आजूबाजूला मानवी वस्तीचा मागमूस ही नव्हता.
“हे, थोडं फिल्मी वाटतंय पण छान आहे,” मी म्हणालो.
आम्ही आत चालत जातं होतो. घाट असल्यामुळे डोंगराचा भाग होता आणि आम्ही वर चढत होतो.. मी कॅमेरा काढून फोटो घेत होतो. झाडांच्या बुंध्यांवर काळसर शेवाळ, जमिनीवर कोरडे गळलेले पानांचे थर. काही झाडं इतकी जाड होती की त्यांच्यामागे कुणी उभं राहिलं तर पूर्णपणे लपून जाईल इतकी. एक वेळ अशी आली की आजूबाजूचं वातावरण अगदी शांत झालं जणू निसर्ग आमच्याकडे पाहून थांबला होता. मोबाईलच नेटवर्क आधी दोन पट्ट्या, मग एक, आणि नंतर – काहीच नाही. संपूर्ण नेटवर्क गेलं. तोच क्षण होता जिथून गोष्टी गडद वळण घेऊ लागल्या. एक विचित्र कुबट वास अचानक दरवळू लागला – जळलेल्या कापडासारखा किंवा तरी मांस सडल्यासारखा. जणू एखादा प्राणी बरेच दिवस झाले मरून पडला आहे आणि त्याच शरीर सोडून त्यातून वास येतोय असा काहीसा. मी अमित ला काही विचारणार तेवढ्यात तो एकदम थांबला.
“तू ऐकलंस का…? कोणी तरी माझं नाव घेतलं.
मी घाबरत म्हणालो, “कुठे? नाही काही ऐकलं.”
पण खरं सांगायचं झालं तर, त्या क्षणी मला वाटलं होतं की कुणीतरी माझ्या डाव्या कानात हळूच कुजबुजलं…
“रोहित इकडे ये…”
कदाचित तसेच अमित ला ही ऐकू आलं असावं. मी त्याला म्हणालो “ अमित संध्याकाळ होतं आली आहे. आजीने सांगितलं होतं की सहाच्या आत गावात परत या असं. ६ कधीच वाजून गेलेत.. “ त्याने ही होकारार्थी मान हलवली आणि आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. पण चालत असताना अमितच्या नजरेत मला काहीतरी वेगळं दिसू लागलं – तो सतत इकडेतिकडे पाहत होता, जणू कुणीतरी त्याला बोलवत होतं. मी त्याला दोन तीन वेळा विचारून पहिले पण तो काही बोलला नाही. म्हणून मग मी तो जिथे पाहतोय तिथे पाहू लागलो. आणि एका झाडाच्या मागे कोणी तरी उभ दिसलं. ते दृश्य पाहून अंगावर भीतीने शहारे आले.
एक मानव सदृश्य आकृती झाडामागे उभी होती. पण ती माणूस नव्हती त्याची त्वचा जणू मातीसारखी होती. खरडलेली, सुकलेली.. अंगावरच्या वस्त्रातून एक घाणेरडा वास येत होता. त्याचे केस थेट खांद्यापर्यंत वाढलेले होते आणि त्याचे डोळे डोळे संपूर्ण पांढरे फटक पण त्याहून सगळ्यात विचित्र होती ती त्याची भेदक नजर जी आम्हाला त्या नजरेतून खेचत होती मी मागे सरकायला लागलो, पण अमित त्या दिशेने चालायला लागला.
“अमित! थांब!” मी ओरडलो.
तो वळला नाही. त्याचं चालणं एका लयीत होतं – जणू मोहिनी घातल्या सारखा तो खेचला जात होता. मी अमितच्या मागे धावलो आणि काही मी बोलणार, तेवढ्यात…
त्या माणसाने डोकं हलवून एका दिशेने इशारा केला. जो अमित साठी होता.
त्या झाडांमागून एक अरुंद पायवाट खाली उतरत होती – दाट झाडीतून, जिथं प्रकाशाचा एक किरणसुद्धा पोचत नव्हता. अमित त्या वाटेकडे वळला. मी त्याचा हात पकडला, पण त्याचा हात बर्फासारखा थंड झाला होता. तेवढ्यात माझ्या कानाजवळ कुजबुज ऐकू आली. आवाज अतिशय हळू… पण अनेक जण बोलत असल्यासारखा. “त्याला घेऊन ये… पायरीखालचा दरवाजा उघडायचा आहे…”
मी दचकून मागे वळलो. पण तिथं कोणी नव्हतं. परत समोर पाहिलं… आणि ते झाडामागच जे काही होतं ते नाहीस झालं होतं.
मी काही सेकंद तसाच उभा होतो. मन धडधड करत होतं, पण पाय जागेवरून हलत नव्हते. समोर अंधारात अमित त्या अरुंद पायवाटेने खाली उतरू लागला होता. मी त्याच्या मागे गेलो, पण पावलांचा आवाज फार वेगळा वाटत होता – एखाद्या गुहेतल्या घुमण्यासारखा. कुठेच मातीचा वास नव्हता, फक्त एक थंड गारवा आणि ओलसर दगडांचा स्पर्श. झाडं हळूहळू विरत गेली, आणि समोर एक चकाकणारं काळसर दगडाचं चौरस आकारात कोरलेलं काहीतरी दिसू लागलं. ती एक घसरगुंडी वाटावी अशी उतरती पायरी होती, जी एका पाणथळ भागा पर्यंत नेऊन सोडत होती. तिथेच बाजूला जुन्या काळातील वाटणारी एक नक्षीदार दगडी चौकट होती – जणू कधी काळी एखादं प्रवेशद्वार होतं. पण आत काहीच नव्हतं.
हाताच्या बोटांमध्ये कंप जाणवत होता. वाऱ्याचा वेग वाढला होता, पण आवाज नव्हता. एक विचित्र शांतता… इतकी की स्वतःच्या हृदयाचे ठोके वेदनादायक वाटावेत. अमित त्या चौकटीपाशी थांबला. त्याच्या पावलांखाली गळ्यापर्यंत ओलसर चिखल होता. मी त्याच्या जवळ गेलो, पण त्याचं लक्ष चौकटीकडे होतं. त्याचं शरीर अजूनही थंडच होतं, पण तो श्वास घेत होता – खोल, मंद, एकसंध.
काही क्षण आम्ही दोघं तिथेच शांत उभे होतो. तेवढ्यात दुरून कुठल्यातरी मंदिरातून घंटानाद ऐकू आला तसे अमित भानावर आला. त्याच्या चेहऱ्यावर शंभर विचार एकदम उमटलेले दिसले – भीती, विस्मय, एक शंका… आणि त्या सगळ्यांतून हळूहळू एक शांत भावना प्रकट होत होती – जणू त्याला समजलं होतं की, आपल्याला या ठिकाणापासून दूर जायचं आहे. काही न बोलता तो परत फिरला. मी त्याच्या मागे चालायला लागलो. ती पायवाट परत वर घेऊन जात होती – झाडांच्या पलिकडून दिसणाऱ्या उघड्या आकाशाच्या दिशेने. आणि जसजस आम्ही वर जात होतो, तसतसं मागून येणारा गारवा कमी होत होता. शेवटी घाटाच्या वरच्या पठारावर पोहोचलो. वर मोकळ आकाश होतं. थोडीशी उन्हाची किनार बाकी होती. अमित मागे वळून बघत होता. आणि मीसुद्धा…
घाट शांत होता.. पण रहस्यमय वाटत होता. आम्ही दोघ हीं घरी आलो. एकमेकांशी बोललो ही नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी आजीने विचारपूस केली तेव्हा सगळा प्रकार सांगितलं. ती फक्त एकच वाक्य म्हणाली “ दैवी शक्ती नेहमीच वाईट शक्तीवर भारी पडते.. तुमच्या आई वडिलांची पुण्याई असेल तुम्ही सुखरूप बाहेर पडलात.. “
त्या दिवसानंतर आम्ही दोघं पुन्हा तिथं गेलो नाही. कधी बोललोही नाही त्या घटनेविषयी.