अनुभव – कुणाल रसाळ
हा बराच जुना प्रसंग आहे जो माझ्या मामा सोबत घडला होता. प्रसंग साधारण १९७० च्याच काळातला असावा माझ्या मामाच्या लहानपणीचा. त्याचा जन्म मुंबई चा जिथे तो मोठा झाला पण काही वर्षांसाठी त्याला आमच्या गावी म्हणजे कोकणात शिकायला पाठवले होते. मामा त्याच्या २ भावंडांबरोबर माझ्या काकांकडे राहायचा. मध्यमवर्गीय कुटुंब असल्याने अगदी साधी जीवनशैली होती. चैनीच्या गोष्टी जवळपास नव्हत्याच. नेहमीची दिनचर्या, घर, शाळा पुन्हा घर आणि अधून मधून खेळायला बाहेर पडायचे तेवढाच काहीसा विरंगुळा.
गावात जेव्हा एखादा लग्न समारंभ असायचा तेव्हाच काय ती मौज मजा वैगरे करायला मिळायची. त्यामुळे गावात कोणाकडून लग्नाचे आमंत्रण आले की जवळपास संपूर्ण गाव हजेरी लावायचे. लहान मूल तर अश्या समारंभाची वाट च पाहत असायचे. अश्याच एका संध्याकाळी शाळेतून आल्यानंतर माझा मामा आणि त्याची भावंड घराच्या मागच्या परिसरात खेळत होते. तेवढ्यात गावातला एक ओळखीचा व्यक्ती घरी आला. तो लग्नाचे आमंत्रण द्यायला आला होता जे गाडी थोड्याच दिवसानी गावातच होणार होत. आमंत्रण मिळाल्याचे कळल्या नंतर मामा आणि त्याची भावंड सगळी एकदम खुश झाली.
लग्नात कधी जायचे, कोणते कपडे घालून जायचे याची चर्चा सुरू झाली. पण माझा मामा मात्र शांत होता. त्याच्याकडे लग्नात घालून जाण्यासाठी असे कपडे नव्हते. त्या काळी गाव अगदीच मागासलेले होते. त्यामुळे नवीन कपडे खरेदी वैगरे करायचे असले तरी तालुक्याला जाऊन तिथल्या दुकानातून आणायला लागत. माझ्या मामा ने काकांना विनंती केली की मला लग्नासाठी कपडे आणायला जाऊया का, माझ्याकडे लग्नात घालण्यासाठी असे काही नाही. त्याचे काका अतिशय प्रेमळ होते आणि माझ्या मामा ला अगदी जीव लावायचे. त्यामुळे मामा ने जेव्हा त्यांना विचारले तेव्हा जास्त काही विचार न करता ते लगेच तयार झाले.
काका शेती करायचे म्हणून त्यांचा संपूर्ण दिवस शेतात जायचा. त्यामुळे शेतातली सगळी कामे आटोपल्यानंतर च त्यांना जाता येणार होते. येत्या शुक्रवारी संध्याकाळी सगळी कामं उरकून त्यांनी तालुक्याला जायचे ठरवले. थंडीच्या दिवसांना सुरुवात झाली होती त्यामुळे दिवसेंदिवस वातावरणात गारवा वाढत जात होता. त्या काळी प्रवास करण्याची साधनं अगदीच तुरळक होती. संध्याकाळी त्यांनी जरा लवकरच काम आटोपली. मामा ही शाळेतून घरी आला. दोघेही तयारी करून साधारण ७ ला जायला निघाले. काकांकडे दुचाकी होती त्यामुळे त्यावरच ते निघाले होते. तसे ही रात्रीच्या वेळी बस मिळेल याची शाश्वती नव्हती. त्यामुळे दुचाकीने गेलो तर केव्हा ही निघता येईल असा विचार केला.
साधारण ४५ मिनिटांचा रस्ता होता. त्यांना पोहोचायला जवळपास ८ वाजले. मामाने कपडे वैगरे खरेदी केली आणि ते जायला निघाले. पण तितक्यात मामा ने हॉटेल मध्ये जेवण्याचा हट्ट केला कारण मामाला त्या काळी खूप उत्सुकता होती. काकांनी त्याचा तो हट्ट ही पुरवला. हॉटेल मध्ये जेवत असताना काकांना त्यांचा एक जुना मित्र भेटला आणि त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. त्यांच्या गप्पा इतक्या रंगल्या की त्यांना वेळेचे भान च राहिले नाही. पण नंतर काकांना लक्षात आले बराच उशीर झालाय आणि आपल्याला अजुन तास भर प्रवास करून घरी जायचेय.
घडा पिळ्यात पाहिले तर ११.३० वाजत आले होते. ते घाई करतच हॉटेल मधून बाहेर पडले. त्या रात्री तर थंडी ने कहरच केला होता. त्यात ते दोघे दुचाकी वर निघाले होते. बोचरी थंडी आणि त्यात लागणारा तो वारा अक्षरशः कापर भरायला लावत होता. साधारण १५ मिनिटात ते वेशीपासून बाहेर आले. तो समुद्र किनाऱ्या चा परिसर होता. डाव्या बाजूला सुरू ची झाडं आणि उजव्या बाजूला समुद्र किनारा. दिवसा तो परिसर अगदी निसर्ग रम्य वाटायचा त्यामुळे नेहमी तिथे पर्यटकांची गर्दी असायची. पण तोच परिसर रात्री गडद अंधारात अतिशय जीवघेणा वाटायचा.
थंडी असल्यामुळे काका अतिशय हळु गाडी चालवत होते जेणेकरून वाऱ्याचा त्रास कमी व्हावा. पण अचानक काकांनी दुचाकीचा वेग वाढवला. मामा लत ते पटकन जाणवले. होतो त्याच्या जवळपास दुप्पट वेगात काका गाडी चालवू लागले. मामाने त्यांना विचारले की काय झाले अचानक. तसे काका म्हणाले “डोळे बंद कर आणि मी जेव्हा सांगेन तेव्हाच डोळे उघड”. मामा ने डोळे बंद केले पण तो विचारात पडला होता की काकांनी असे अचानक डोळे बंद करायला का सांगितले. काका गाडी अतिशय वेगात चालवत होते. मामा ला उत्सुकता लागून राहिली होती म्हणून त्याने न राहवून डोळे उघडले आणि काय घडतंय ते पाहू लागला.
त्याला जे दृश्य दिसले ते पाहून त्याच्या डोळ्यांवर त्याचा विश्र्वासच बसला नाही. १०-१२ माणसं एका हातात कंदील आणि दुसऱ्या हातात काठी घेऊन रस्त्याकडे ला उभी होती. सगळ्यात भयंकर गोष्ट म्हणजे त्यांना मुंडकी नव्हती. त्यातल्या एकालाही नाही. त्याने रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला पहिले तर तिथेही तशीच माणसं उभी होती. आता ती माणसं होती की अजुन काही ते कळायला मार्ग नव्हता. त्यांची गाडी वेगात असली तरीही ती मुंडकी नसलेली माणसे त्यांना पुन्हा पुन्हा दिसत होती. ती सगळी माणसं काही तरी मागत होती. मामा तर प्रचंड घाबरला होता आणि तरीही तो काकांना विचारू लागला.
काकांना हा सगळा प्रकार माहीत होता कारण त्यांनी गावकऱ्यांकडून सगळे ऐकले होते पण बहुतेक ते सुद्धा हा प्रकार पहिल्यांदाच अनुभवत होते. ते मामा ला म्हणाले “गप्प बस, काहीही बोलू नकोस आणि त्यांना काहीही उत्तर देऊ नकोस नाही तर ते आपल्याला धरतील”. काकांचे बोलणे ऐकून मामाने घाबरून डोळे अगदी घट्ट बंद केले आणि त्यांना घट्ट मिठी मारली. पुढच्या काही मिनिटात ते त्या परिसरातून बाहेर पडले. तसे काकांनी मामा ला सांगितले की आपण आता त्यांच्यापासून लांब आलो आहोत. जेव्हा ते घरी पोहोचले तेव्हा बराच उशीर झाला होता. घरी सगळे त्यांची वाट पाहत काळजी करत बसले होते.
घरात शिरल्यावर मामाच्या आजीला लगेच कळले की मामा ला ताप भरलाय आणि तो विचारलेल्या प्रश्नाची कसलीच उत्तर देत नाहीये. काकांनी घरच्यांना सांगितले की शांत व्हा आणि त्याला झोपू द्या. आणि काय विचारायचे ते उद्या सकाळी विचारा. दुसऱ्या दिवशी सकाळी ते दोघेही उठले तेव्हा ही मामा ला खूप ताप होता. काकांनी रात्री घडलेला भयानक प्रकार सांगितला आणि ते त्यातून बाहेर कसे पडले ते ही सांगितले. तेव्हा आजीने सांगायला सुरुवात केली. तुम्ही ज्यांना पाहिले ते मान कापे होते. ते अतृप्त आत्मे होते ज्यांचे मुंडक छाटून त्यांना मारण्यात आल होत. ते वाट सरूना काही तरी विचारून अडवतात. आणि आपण त्यांना उत्तर दिले तर ते आपल्याला ही तश्याच भयानक प्रकारे मारून टाकतात. ९० च्याच शतकात असे मानले जायचे की तो परिसर त्या आत्म्यानी झपाटला आहे आणि रात्री त्या भागातून प्रवास करणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण.