मी सध्या उच्च शिक्षण घेत आहे आणि माझ्या कोणत्याच गूढ गोष्टींवर कधी विश्वास नव्हता. इतकेच काय तर कधी कोणी विषय काढला की मला हसू यायचे. पण माझ्या मावशी सोबत एक घटना घडली आणि तिने मला सांगितली.. मी त्यावर विश्वास तर नाही ठेवला पण या सगळ्या गोष्टींवर प्रश्नचिन्ह उभ राहील एवढं मात्र नक्की.. माझी मावशी, तिचे मिस्टर, आई आणि मावशीच्या सासू असे सगळे एकत्र एका ट्रिप ला गेले होते. एक गाडी आणि ड्रायव्हर बुक केला होता. खर तर सकाळी नाश्ता उरकून निघणार होते पण काही कारणास्तव त्यांना निघायला दुपार झाली. आता उशिरा निघाल्यामुळे पोहोचायला बराच उशीर होणार होता. माझ्या मावशीला गाडी लागते, जरा जास्त प्रवास झाला की तिला लगेच त्रास होती.
पाच साडे पास तासांच्या प्रवासानंतर मावशीला त्रास होऊ लागला, मळमळ जाणवू लागली, चक्कर सारखी येऊ लागली. म्हणून काकांनी ड्रायव्हर ला एखादे हॉटेल बघून गाडी थांबवायला सांगितली. ते ज्या भागात होते तिथे खर तर एकही हॉटेल नजरेस पडत नव्हते. ड्रायव्हर आणि माझे काका दोघे ही रस्त्याच्या आजूबाजूला पाहत होते. बऱ्याच वेळा नंतर एका निर्मनुष्य ठिकाणी एक हॉटेल नजरेस पडले तसे ड्रायव्हर ने लगेच गाडी थांबवली. सगळ्यांनी उतरून थोडा वेळ विश्रांती घेतली. बरीच रात्र झाली होती त्यामुळे थोडे खाऊन ही घेतले. मावशीला पुढच्या प्रवासात त्रास होईल म्हणून तिने जेवण ही केले नाही. सगळे उरकल्यावर ती आई सोबत वॉश रूम मध्ये गेली जे हॉटेल च्या बाहेर मागच्या बाजूला होते.
शक्यतो हाय वे असणारे हॉटेल किंवा ढाब्याचे वॉश रूम बाहेरच्या बाजूला असते. मागच्या बाजूला खूप गार्ड झाडी होती, जंगलाचा भाग असेल असे वाटले. त्या भागात लाईट स् ही मोजकेच होते त्यामुळे गडद अंधार पसरला होता. मावशी आत गेली आणि आई बाहेरच थांबली. मावशी ज्या वॉश रूम मध्ये गेली होती तिथे मागच्या बाजूला एक खिडकी होती जी खूप उंचावर होती, त्यामुळे मागचा परिसर दिसत नव्हता. जशी ती आत आली तिला एक वेगळाच गुर गुरण्याचा आवाज येऊ लागला. आणि तिथल्या भिंतीवर नखाने ओरबाडण्याचा आवाज येऊ लागला. आधी वाटले की प्राणी असेल पण ते गुर गुरणे काही वेगळेच वाटत होते. अमानवीय.
ती झटकन मागे वळली आणि दार उघडू लागली पण दाराची कडी इतकी घट्ट लागली होती की तिला उघडताच येत नव्हती. त्या खिडकी च्या पाठमोरी उभी राहून ती दार उघडण्याचा प्रयत्न करत होती. तितक्यात मागून एक धपकन काही तरी पडण्याचा आवाज आला आणि तिच्या अंगावरून सर्रकन काटा येऊन गेला. बहुतेक बाहेर जे काही होत ते आता आत आल होत. आता गुर गुरण्या सोबतच जोरात श्वास घेण्याचा आवाज येऊ लागला. तिची मागे वळून पहायची हिम्मत होत नव्हती. आई ला जोरात हाक मारायला गेली पण भीती मुळे तिची वाचाच बसली होती. इथे बाहेर आई विचार करू लागली की मावशीला इतका वेळ का लागतोय. म्हणून तिने येऊन दार वाजवले आणि तेवढ्यात तो आवाज एकदम कमी झाला. मावशीने सगळी ताकद एकवटून जोरात कडी खेचली तसे दार उघडले गेले. आई समोर च उभी होती पण मावशी इतकी घाबरली होती की ती सरळ बाहेरच्या दिशेला धावतच सुटली.
बाहेर येऊन सगळा प्रकार सांगितला. काका आणि त्या हॉटेल मधले एक दोन जण जाऊन तिथे पाहून आले पण त्यांना काहीच दिसले नाही. दुसऱ्या दिवशी ते रूम वर पोहोचले तेव्हा मावशी ने पाहिले की तिच्या ड्रेस वर मागून नखाने ओराबडल्याच्या खुणा होत्या. त्या रात्री मावशी च्या मागे काय होते हे तिला कळले नाही. एखादा प्राणी असता तर त्याने कधीच झडप घातली असती पण कदाचित ते काही तरी वेगळेच होते. या प्रसंगाबद्दल सांगताना ती अजूनही खूप घाबरते.