अनुभव – रोहित राठोड
घटना साधारणतः २ वर्षांपूर्वीची आहे. नुकताच परीक्षा झाली होती त्यामुळे गावी जायचा बेत ठरला होता. ट्रेन रात्री ८.३५ ची असायची. नेहमी प्रमाणे रिझर्व्हेशन आधीच करून ठेवले होते त्यामुळे कसली चिंता नव्हती. आम्ही वेळेच्या बऱ्याच आधी ट्रेन मध्ये येऊन बसलो होतो. ठरलेल्या वेळेवर गाडी सुटली. मुंबई हून ठाणे , कल्याण क्रॉस करत साधारण पावणे अकरा च्या सुमारास कासाऱ्या ला गाडी अर्ध्या तासा साठी थांबली. समोर घाट होता आणि रेल्वे इंजिन बदलण्यासाठी वेळ लागणार होता. मला ट्रेन मध्ये बसून कंटाळा आला होता म्हणून मी वडिलांना सांगून खाली उतरलो आणि प्लॅटफॉर्म वरच्या बाकावर जाऊन बसलो.
रात्र असल्यामुळे प्लॅटफॉर्म वर शुकशुकाट होता. अधून मधून थंडगार वाऱ्याची झुळूक अंगाला चाटून जात होती. प्लॅटफॉर्म पासून काही अंतरावरच कुत्रे ही भुंकत होते. मी सहज म्हणून एक दगड त्यांच्या दिशेने भिरकावला. तसे तो कुत्र्यांचा घोळका भुंकत च तिथून लांब निघून वेळा. आता त्या परिसरात शांतता वाटत होती. गाडीतून लोकांच्या बोलण्याचा हलकासा आवाज कानावर पडत होता. तितक्यात माझ लक्ष बाजूला गेलं. प्लॅटफॉर्म च काम चालू असल्याने प्लॅटफॉर्म खोदला होता. त्या भागात वर शेड आणि लाईटस ही नव्हते. संपूर्ण प्लॅटफॉर्म वर लाईट्स असले तरी त्या भागात बराच अंधार होता.
मी तिथेच बाकावर बसून समोर उभ्या असलेल्या ट्रेन ला न्याहाळत होतो. १०-१५ मिनिट झाली असतील, मला कसला तरी विचित्र आवाज येऊ लागला. आवाज खूप कमी ऐकू येत होता पण अगदी स्पष्ट होता. कोणी तरी काही तरी कुर्तडण्याचा. मी कानोसा घेऊ लागलो आणि तितक्यात ट्रेन ने हॉर्न दिला. मी झटकन उठून गाडीत शिरलो. आई आणि बहिण गाढ झोपले होते तर वडील पुस्तक वाचत बसले होते. ते मला पाहून म्हणाले “आता बाहेर जाऊ नकोस, गाडी इथे फक्त अर्धा तासच थांबते”. मी मान डोलावून होकार दिला. २ मिनिट झाल्यावर गाडी चालू झाली. घाट असल्यामुळे वेग अतिशय कमी होता.
काही वेळानंतर वडील ही पुस्तक ठेवून झोपायची तयारी करू लागले. झोपायच्या आधी मला लघवी करायची सवय असल्यामुळे मी आत टॉयलेट मध्ये गेलो. दरवाजा बंद केला आणि तितक्यात बाहेरून जोरात कोणी तरी दार वाजवले. मी दचकलो च. मी पटकन दार उघडले आणि बाहेर येऊन पाहू लागलो. पण माझ्या डब्या मध्ये सगळे लोक झोपले होते. तसे ही कोणी मस्करी करेल असे वाटले नाही. दरवाज्यातून थंडगार वारा अंगाला स्पर्श करून गेला तसे अंगावर सर्रकन काटा येऊन गेला. अगदी विचित्र वाटत होत. कोणीतरी असून नसल्यासारखे. मनात एक अनामिक भीती दाटून आली होती.
मी जरा घाबरतच माझ्या सीट जवळ चालत जाऊ लागलो. मनात नको नको ते प्रश्न येत होते. दरवाजा कोणी वाजवला असेल, आणि वाजवून कुठे निघून गेले असेल, दार वाजल्या नंतर मी एका क्षणात दरवाजा उघडला तरी बाहेर कोणीच कसे दिसले नाही, नक्की काय प्रकार घडला. टॉयलेट पासून सीट पर्यंत च्याच निव्वळ १० पावलांच्या अंतरावर मनात असंख्य प्रश्न येऊन गेले. मी सीट जवळ पोहोचलो आणि समोर लक्ष गेले. तिथे कोणीतरी बसल होत. पाय सीट वर ठेऊन, पलीकडे तोंड करून. काही तरी कुरतडत होत. पाठमो रे बसल्यामुळे चेहरा नीट दिसत नव्हता. त्यात सगळे लाईट स् बंद होते. त्यामुळे जास्त काही कळायला मार्ग नव्हता.
मी तिथेच थांबलो आणि बाजूला वळलो तसे ते जे काही होते ते अचानक कुरत डण्याचे थांबले. बहुतेक माझी चाहूल जाणवली असावी. त्याने मागे वळून माझ्याकडे पाहिले आणि माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. माझे काळीज च थंड पडले. मला कळत नव्हते की मी नक्की काय पाहतोय. चेहरा संपूर्ण जळल्यासारखा वाटत होता कारण त्याच्या चेहऱ्यावरून त्वचा अक्षरशः गळून खाली पडत होती. त्या अंधारात ही डोळे पांढरे शुभ्र भासत होते. त्याच्या हातात मांसाचे तुकडे होते. तेच इतक्या वेळ कुरतडणे चालू होते. त्याचे दोन्ही हात पूर्णपणे रक्ताने माखले होते.
एका क्षणी वाटले इथून पळून जावे पण पाय जड झाले होते. पाहता पाहता त्यांनी तोंडाचा जबडा मोठा करत एक विचित्र आवाज केला. तो भयाण प्रकार पाहून माझ्या तोंडून एक आर्त किंचाळी निघाली. माझ्या आवाजासोबत च समोर जे काही होते ते क्षणार्धात दिसेनासे झाले. डब्यामध्ये सगळे लोक जागे झाले. माझे आई वडील ही आवाजाचा माग काढत माझ्याजवळ आले. त्यांनी मला सीट वर नेऊन बसवले. काही वेळा पुरता तर मला काही ही बोलता येत नव्हते. त्यांनी मला पाणी प्यायला दिले. मी थोडा शांत झालो आणि जे पाहिले ते सगळे आई वडिलांना सांगितले. त्यांनी मला समजवायला सुरुवात केली की तू वाईट स्वप्न पाहिले असणार.
पण मला चांगलेच माहीत होते की ते स्वप्न नव्हते. कारण त्या सीट वर अजूनही काही रक्ताचे थेंब पडलेले भासत होते. मी भीती पोटी पाण्याची संपूर्ण बाटली रिकामी करत जवळ असलेली बॅग सरकवून सीट वर आडवा जलो. मी इतका घाबरलो होतो की झोप अजिबात येत नव्हती. आई नेहमी प्रवास करताना देव घरातील अंगारा बांधून आणत असे. तोच अंगारा आई ने माझ्या कपाळावर लावला. रात्री झोप कधी लागली कळले नाही पण सकाळी ६.३० ला वडिलांनी उठवले. मला रात्र भर ताप होता. गावी जातानाच मला डॉक्टर कडे दाखवले. त्यांनी गोळ्या आणि इंजेक्शन वैगरे दिले तसे मला थोडे बरे वाटले. पण तरीही पुढचे २ दिवस मला रात्री ताप यायचा आणि सकाळी उतरायचा.
आज या गोष्टी ला जवळपास २ वर्ष झाली पण तो प्रसंग आजही अगदी जसाच्या तसा डोळ्या समोर आहे. थोडक्यात वाचलो असे म्हणायला हरकत नाही कारण त्या रात्री काहीही विपरीत घडू शकले असते. असे म्हणतात ना काळ आला होता पण वेळ आली नव्हती.