अनुभव – वैभव खरात

ही घटना माझ्या एका मित्राच्या मामा सोबत घडली होती. त्याच्या मामा ला ट्रेकिंग ची खूप आवड आहे. त्याने आजपर्यंत बरेच ट्रेक केले आहेत. त्यात त्याला बरीच पारितोषिके ही मिळाली आहेत. नेहमी प्रमाणे तो या वेळी हिमालयाच्या उंच रांगांमध्ये त्याच्या ग्रुप सोबत ट्रेकिंग करायला गेला होता. ट्रेक खूपच कठीण होता. बर्फाळ परिसर त्यात उंचावर गेल्यावर ओक्सिजन चा पुरवठा ही नीट मिळत नाही. ठरल्या प्रमाणे ट्रेकिंग करून ते एका पॉइंट वर पोहोचले. आणि त्यांनी पुन्हा खाली उतरायला सुरुवात केली. उतरत असताना वाटेत एके ठिकाणी त्यांना बर्फाच्या खाली काही तरी असल्याचे जाणवले. तसे त्यांनी खड्डा खणून नक्की काय आहे ते पहायचे ठरवले. 

तो बर्फ उकरून काढल्यावर त्यांना आत एक बॉडी सापडली. अर्थात ती त्यांच्या सारख्याच एका ट्रेकर ची होती. त्याच्या वॉलेट मध्ये त्याचे नाव, पत्ता वैगरे सगळे सापडले. मामाच्या ग्रुप ने ती बॉडी खाली पायथ्याशी आणली. नंतर त्यावर अंत्य संस्कार केले. मामाने ठरवले होते की त्याच्या घरच्या पत्त्यावर जाऊन त्याची अस्थी त्याच्या कुटुंबाकडे सुपूर्त करायची. त्यामुळे सगळे विधी झाल्यावर तो अस्थी कलश घेऊन घरी यायला निघाला. मामा ने आधीच १ आठवडा सुट्टी घेतली होती त्यामुळे त्याला लगेच सुट्टी मिळणार नव्हती. म्हणून त्याने अस्थी कलश बॅग मध्ये तसाच ठेवून दिला होता. एक दिवस सुट्टी काढून त्या पत्त्यावर जाऊन अस्थी देऊन येऊन असा विचार केला होता. 

पण जेव्हा पासून मामा घरी आला होता तेव्हा पासून आजीला म्हणजे माझ्या मामा च्या आई ला घरात खूप अस्वस्थ वाटू लागलं होतं. त्या दिवशी रात्री ती टिव्ही पाहत बसली होती. तर अचानक तिला आपल्या बाजूला कोणी तरी येऊन बसले आहे असे जाणवले. दुसऱ्या दिवशी रात्री ती पाणी प्यायला म्हणून स्वयंपाक घरात गेली आणि तिथे तिला एका काळपट सावली दिसली. ती वाऱ्याच्या वेगाने दिसेनाशी झाली. दिवसेंदिवस असे भास वाढतच चालले होते. शेवटी न राहवून आजीने हा प्रकार शेजाऱ्यांच्या कानावर घातला. ते म्हणाले की आपण मांत्रिकाला बोलवून एकदा विचारून घेऊ. तसे त्या काकू आणि आजी एका मांत्रिकाला कडे गेल्या. तो म्हणाला की मी तुमच्या घरी येऊन मगच काही सांगू शकतो. 

मामा चा या सगळ्या गोष्टींवर विश्वास नव्हता म्हणून आजीने मुद्दामून सकाळी मामा कामावर गेल्या नंतर ची वेळ सांगितली. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे ते मांत्रिक आले आणि दारात पाय ठेवल्या ठेवल्या म्हणाले “घरात एक अमानवीय शक्ती वावरते य”. आजी आणि काकू त्यांच्याकडे पाहतच राहिल्या. त्याने पुढे विचारले “तुमच्याकडे कोणी लहान मुलगा आहे का..? त्याने बाहेरून एखादी गोष्ट आणली आहे का? “. तसे आजी जरा विचारात पडली की हा माणूस असले प्रश्न का विचारतोय. पण तिने उत्तर दिले की नाही. आमच्या घरी लहान मुल कोणीच नाही. 

माझा मोठा मुलगा आहे आणि त्याला फिरायचा, ट्रेकिंग चा खूप छंद आहे. तो नेहमी जात असतो. तसे ते मांत्रिक म्हणाले “काय आणले आहे का त्याने”. त्यावर आजी म्हणाली “मला माहित नाही आणि तसे ही मी त्याला असे काही विचारत नाही पण आपण त्याची बॅग चेक करून घेऊ एकदा. त्यांचे बोलणे चालू असतानाच त्या दिवशी नेमका मामा काही कामानिमित्त दुपारी घरी आला. मांत्रिकाला वैगरे बघून तो जरा चिडत च म्हणाला “हा सगळा काय प्रकार आहे”. तेव्हा आजीने त्याला विचारले की खर सांग तू येताना काय आणले आहेस. तुला माहितीये का मला किती दिवस झाले नको नको ते भास होत आहेत. तुला सांगायचे म्हंटले तर तू तुझ्या कामात इतका व्यस्त असतोस की माझ्याशी बोलायला तुला जराही वेळ नसतो. 

तसे मामाने बॅग मधून तो अस्थी कलश बाहेर काढला आणि ते पाहून आजी ला धक्काच बसला. आजी म्हणाली “तू काय वेडा आहेस का? असे कोणी घरी घेऊन येत का?. कोणाच्या अस्थी आहेत या?.” मामाने तिला सगळे सांगितले आणि म्हणाला की मी या अस्थी त्या पत्त्यावर जाऊन त्यांच्या सुपूर्त करणार होतो पण मला सुट्टी मिळणार नव्हती म्हणून मी बॅगेत च हा कलश ठेवला होता. पण असे इतके काही घडेल असेल मला कधीच वाटले नव्हते. मामाने त्याच दिवशी गाडी वैगरे करून त्या व्यक्तीचे घर गाठले आणि तो कलश त्यांच्या सुपूर्त केला. मामा ला एक चांगलाच धडा मिळाला होता की या पुढे अशी कोणतीही गोष्ट घरी आणायची नाही. त्या नंतर आजीला पुन्हा घरात कसलीच चाहूल कोणताच भास जाणवला नाही. बहुतेक त्या व्यक्तीच्या आत्म्याला मुक्ती मिळाली असावी.

This Post Has One Comment

Leave a Reply