अनुभव – निलेश इंगवले.
अनुभव माझी मैत्रीण शिल्पा च्या वडिलांना आला होता.
१९६८-६९ चा काळ असावा. माझे वडील सिव्हिल इंजिनिअरिंग करून नुकताच सरकारी नोकरीत रुजू झाले होते. अतिशय रुबाबदार , मनमिळाऊ व्यक्तिमत्व. ते शाळेत असतानाच आई -वडील देवा घरी गेलेले. मोठ्या जिददी्ने व कष्टाने शिकलेले. त्या काळी लवकर नोकरी मिळत असे. एका डँम च्या म्हणजे धरण बांधण्यासाठी च्याच project मध्ये Asst.Civil Engg. ची नोकरी मिळाली. तो project म्हणजे डँम च अतिशय सुरुवातीचं काम.. उंच डोंगरावर, किर्र जंगलात, साधी पायवाटही नसलेल्या ठिकाणी जाव लागायचं. कुणीही या नोकरीत 7-8 दिवसा पेक्षा जास्त टिकत नव्हत. पण तरी ही ती नोकरी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
नोकरीत रुजु झाले. त्यांच्या सोबत त्यांचा एक सहकारी होता जो त्यांच्या सोबत त्यांच्या खोलीत राहायचा. तो जुलै महिना होता. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे त्या भागात सतत मुसळधार पाऊस असायचा. सतत कोसळणारा पाऊस ,पाय रुतुन बसेल एव्हढ्या चिखला चे पायवाट सद्रु्श रस्ते…. रस्त्याच्या दोन्ही बाजुला पावसाळ्या मुळे वाढलेले उंच गवत. गर्द झाडी असलेल्या एका डोंगरावर डँमच काम सुरु होतं. तिथे पोहोचण्यासाठी जाणारा रस्ता खुप निमुळता होता. घनदाट जंगलातुन जावे लागे. आजुबाजुला कित्येक कि.मी.पर्यंत लोकवस्ती नव्हती . कुणी माणुस बघायला पण मिळत नसे. project च्या माणसां व्यतिरिक्त कुणालाही तिथे यायची परवानगी नव्हती. अश्या परिस्थितीत वडील व त्यांचे मित्र रोजच्या अनेक अडचणींना तोंड देण्यास तयार होते.
नोकरीत रुजु होउन 4-5 दिवस झाले असतील. वडील व त्यांचे सहकारी मित्र यांना Night shift होती. आज त्यांना घ्यायला व सोडायला येणारी जिप नेमकी बंद पडल्यामुळे त्या दोघांनी work station पर्यंत चालत जाण्याचे ठरवले. त्या रात्री मुसळधार पावसाने कहर च केला होता. रात्रीचे जेवण आवरुन या दोघांनी शिफ्ट ची तयारी सुरु केली. लांब रेनकोट ,गमबुट , हँट,टॉर्च सगळे सोबत घेतले. प्रचंड पाऊस आणि work station ला पोहोचण्या साठी लागणारा वेळ लक्षात घेता दोघेही 10:30 वाजता निघाले. त्यांना तिथे 1.00 वाजता पोहोचायचे होते.
दोघांच्या ही हातात मोठी टॉर्च होती..
गडद अंधार…सतत च्या पावसामुळे झालेला रबरबीत चिक्खल.. रस्त्याच्या दोन्हीबाजुला असलेले किरर् घनदाट जंगल,, डोंगरवाट .. जंगली जनावराचे भयानक आवाज.. दुरदुर पर्यंत कुठेही light दिसत नव्हती कारण आजुबाजुला मनुष्य वस्तीच नव्हती. त्यात जोरात वाहणारा वारा गर्द झाडी मधुन वाहताना होणारा आवाज वातावरण गूढ बनवत होता. अश्या भयाण वातावरणात हे दोघे वाट काढत चालत होते. त्यांचा मित्र बराच घाबरला होता. म्हणुन ते मोठ्याने गप्पा मारत चालले होते. अर्ध अंतर संपल असेल. रात्री चे 12 वाजायला आले होते. ते दोघे त्या डोंगराच्या रस्त्यावर अश्या ठिकाणी पोहोचले जिथे एका बाजुला उंच कडा होता आणि दुसऱ्या बाजुला घनदाट जंगलाने दाटलेली सरळ खोल दरी होती.
अचानक त्यांना दरी च्या खालच्या बाजुच्या झाडीतुन एक व्यक्ती सदृश काहीतरी त्याच्या दिशेने चालत येताना दिसले. वडीलांनी त्या दिशेने टॉर्च फिरवली. तर तो 6 फुट उंच , पिळदार शरीरयष्टीचा, मोठ्या मिशा असलेला तगडा माणुस होता. त्याने पांढरा शुभ्र सदरा, त्यावर कमरेवर शेल्या सारख बांधलं होतं. पांढर शुभ्र आखुड धोतर घातलं होतं आणि फेटा बांधला होता. त्याच्या हातात एक कंदील ही होता. तो माणुस त्या दोघांच्या दिशेने येत होता. बहुतेक त्याने कोल्हापुरी चपला घातल्या होत्या कारण चालताना त्यांचा कर् कर् असा आवाज येत होता. त्याच्या हातात काठी होती. एव्हढ्या रात्री अश्या निर्जन ठिकाणी असा पोशाख परिधान केलेल्या माणसाला पाहून ते जरा बुचकळ्यात च पडले.
त्या माणसाने लांबुनच हाक मारली ,
“काय पावन् ,येवड्या रातचं कुणीकडं चाललायसा?”
हे दोघे ही काही बोलले नाहीत. तर त्या व्यक्तीने पुन्हा विचारलं,
“आवं ,मि ईचारल हिकडं कुणिकडं जातासा?”
तसे ते दोघेही थांबले आणि वडिलांनी त्याच्याकडे पाहत उत्तर दिलं कि “आम्ही वरती work station ला जातोय. तुम्ही कुठे चाललाय” त्या इसमाने काहीच उत्तर दिलं नाही.थोड्या वेळाने तो बोलला ,”चला, मी येतो संगती”. तो त्यांच्या सोबत येऊन चालू लागला. वडिलांना त्याच्याकडे पाहिले पण त्याच्या चेहऱ्यावर कसलेही हावभाव नव्हते. ते तिघेही एकत्र चालू लागले. पण आता फक्त त्याच्या चपलांचा आवाज येत होता. जंगलातले बाकी सगळे आवाज यायचे बंद झाले होते. अचानक एक निरव शांतता पसरली होती. कोणीही काहीच बोलत नव्हते. तो आता या दोघांच्या मधुन चालू लागला. मित्र दरीच्या बाजुने व वडील कड्याच्या बाजुने आणि हा त्यांच्या मधुन तिरपा चालत होता.
वडिलांना जरा विचित्र वाटू लागलं. काही तर चुकत असल्यासारखे. त्यांनी त्या व्यक्तीकडे पुन्हा एक कटाक्ष टाकला. आणि त्यांना एक गोष्ट खटकली. हा एवढ्या पावसात चालत आला पण जरा ही पण भिजला नाहीये. जर तो दरीतुन वर चालत आला असेल तर चिखलाने कपडे थोडे तरी माखेलेले दिसायला हवे पण शुभ्र पांढरे धोतर? … हे कसं शक्य आहे….आणि तो अश्या या रात्री च्या वेळी अचानक दरी तुन वर कसा आला?.. तो ज्या भाषेत बोलला ती तर इथली बोली भाषा नाहीये. भाषा नव्हती, त्याचा असा हा जुन्या काळातील लोकांसारखा पोशाख ? .. अश्या असंख्य प्रश्नांनी त्याच्या डोक्यात काहूर माजवल होत.
मित्र व तो माणुस छान गप्पा मारत चालत होते. पण वडील अस्वस्थ होते कारण तो माणुस तिरपा चालत होता. ज्या बाजुला त्यांचा मित्र होता त्या बाजुला दरीच्या दिशेला नेण्याचा प्रयत्न करीत आहे असे वाटत होतं. तितक्यात वडीलांच्या पायाखाली काहीतरी आलं आणी ते थोडं थांबले. त्यांच्या पायाखाली एक जाडजुड कोल्हापुरी चप्पल आली होती. त्यांना आश्चर्य वाटले. या दरम्यान मित्र आणि तो माणुस थोडे पुढे निघुन गेले. वाट दिसावी म्हणून त्यांनी समोर टॉर्च मारली आणि मित्राला हाक दिली. त्यांनी समोरचे दृश्य पाहिले आणि त्यांचे काळीज भीतीने धडधडू लागले. त्यांचा मित्र एकटाच बडबडत चालला होता. तो त्या पायवाटेच्या अगदी कडेला लागून चालत होता.. ते शक्य होइल तितक्या जोरात धावत त्याच्या जवळ गेले आणि त्याला पटकन आपल्या दिशेला ओढले. त्याने एक पाउल पुढे टाकलं असतं तर तो दरीत कोसळला असता.
तेवढयात तो माणुस पुन्हा समोरच्या दरीतून वर आला आणि स्मित हास्य करत म्हणाला ” परत हिकडं येऊ नका. हा माझा इलाका हाय “
इतकं बोलून तो त्या सरळ खोल दरीत दिसेनासा झाला. यावेळी त्याच्या हातात तो कंदील ही नव्हता .
याप्रसंगा नंतर हे दोघे तिथे एक क्षण ही न थांबता होईल तितक्या वेगाने तिथुन निघुन work station ला पोहोचले. एवढ्या पावसात ते घामाने चिंब ओले झाले होते. वाँचमन ने विचारलं “काय झालं साहेब ?” पण ते दोघे काहीच बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. थोड्या वेळाने वडीलांनी त्याला कडक चहा बनवायला सांगितले .चहा प्यायल्यावर ते दोघे थोडे ठिक झाले. त्यांनी नाईट ड्युटी च्या लोकांना विचारलं कि “आजुबाजुला दरीत एखादं गाव आहे का ?” तर ते म्हणाले की इथे गाव काय आजुबाजुला कसलीही वस्ती नाही. त्या ऩंतर त्यांनी घडलेला सगळा प्रकार सांगीतला.
ड्युटी वरच्या वर्कर्स नी तर आश्चर्य व्यक्त केलं कि रात्री त्या ठिकाणाहुन चालत आलात आणि वाचलात?. त्यांनी या आधी ही त्या ठिकाणी खुप अपघात झाल्याचं आणि माणसं हरवल्याच सांगितल. या प्रसंगा नंतर त्यांचा मित्र इतका घाबरला की तो काम सोडुन गेला. वडीलांनी मात्र न घाबरता नोकरी करतच राहिले. रोज ते त्या ठिकाणा हुन ऑफिस जीप ने जायचे पण तो माणुस त्यांना परत कधीच दिसला नाही…