अनुभव – राहुल भोसले

प्रसंग २०१७ मधला आहे. मी आणि उदय एकत्र कामाला होतो. कामावरून निघायला जवळपास १२ वाजून जायचे कारण कामाचे स्वरूपच तसे होते. अश्याच एके रात्री आम्ही दोघं घरी जायला निघालो. रात्रीचा १ वाजून गेला होता. कंपनी च्या गेट वर नाव आऊट करून बाहेर पडलो. तस आमचं गाव जवळ होत त्यामुळे आम्ही पायीच प्रवास करायचो. दोघं जण असल्यामुळे कितीही उशीर झाला तरी काही वाटायचे नाही आणि आम्हाला तशी सवय होती. गावाच्या वेशीबाहेर एक ओढा होता आणि गावातल्या लोकांकडून आम्ही त्या ओढ्याबद्दल चे, तिथल्या भूताखेतांचे बरेच किस्से ऐकले होते. पण आम्ही तरणी ताठी पोर, अश्या गोष्टींवर आमचा अजिबात विश्वास नव्हता. त्या दिवशी आम्हाला काय सुचले काय माहीत आम्ही ओढ्याच्या रस्त्याने जायचे ठरवले. उन्हाळ्याचे दिवस होते त्यामुळे ओढ्याला जास्त पाणी नव्हते पण का कोणास ठाऊक खूप थंडी जाणवत होती. आणि खासकरून आम्ही जेव्हा त्या ओढ्याजवळून जाऊ लागलो तेव्हाच वातवरणातला बदल आम्हाला जाणवला. काही अंतर चालत गेल्यावर आम्हाला असे वाटले की कोणीतरी आपल्या मागून चालत येतय. उदय मागे पाहू लागला पण मागे कोणी दिसत नव्हते. मी त्याला विचारले ही पण तो काही बोलला नाही. तितक्यात मला मागून माझ्या नावाने हाक ऐकू आली आणि माझे पावले काही क्षणासाठी जागीच थिजली. 

भास झाला की खरंच मला कोणी मागून हाक मारली. मी उदय कडे पाहिले आणि तेवढ्यात उदय च्या नावाने ही हाक ऐकू आली. आम्ही दोघेही दचकलो. रात्रीचा १ वाजून गेला असताना अश्या वेळी आम्हाला कोण हाक मारेल. मी एका जाणकार व्यक्ती कडुन ऐकले होते कि अश्या रात्री अपरात्री हाका ऐकू आल्या तर त्या हाकेला कधीच प्रत्युत्तर द्यायचे नाही. मी उदय ला डोळ्यांनी च खुणावले की गप गुमान पुढे चालत रहा. पण त्या हाका काही थांबायचे नाव घेत नव्हत्या. दोघांच्या ही चालण्याचा वेग वाढला. उदय भीती ने कापू लागला होता. मी त्याला समजावत च पुढे चालत होतो. ओढ्याच्या पुलावर आल्यावर आम्हाला समोर कोणीतरी बसलेले दिसले. किती ही घाबरलो असलो तरी आता त्याच रस्त्याने पुढे जावे लागणार होते कारण मागून येणाऱ्या हाका आम्हाला पुन्हा वळू देणार नव्हत्या. हिम्मत करून आम्ही पुढे चालत राहिलो. तिथे एक १२ ते १४ वर्षांचा लहान मुलगा बसला होता. शाळेचा गणवेश घातला होता. इतक्या रात्री तो असा त्या पुलावर बसून काय करत होता काही कळले नाही. आम्ही त्याच्या जवळ आलो तसे त्याने आम्हाला विचारले “इतक्या रात्रीचे कुठून आलात..” मी त्याच्याकडे फक्त एकदा पाहिले पण काहीच बोललो नाही. तशीच थेट पुढे चाल मांडली. त्याच्या प्रश्नाला उत्तर दिले नाही म्हणून तो पुन्हा रागात म्हणाला ” कुठून आला आहात इतक्या रात्रीचे “. भीतीपोटी उदय ने त्याला उत्तर दिले ” कामावरून आलोय “. 

तसे त्याने पुढे विचारले “डब्यातून काय आणलय”. आम्ही नकारार्थी मान हलवली. तितक्यात मागून एक दुचाकी येत असल्याचे जाणवले. काही क्षणात ती दुचाकी जवळ आली तर दिसले की गावातले बैजू काका होते. त्यांनी आम्हाला पाहताच दुचाकी थांबवली आणि आमची विचारपूस करू लागले. “आरे शुभ्या ,उद्या ईतका रातीच हिकड काय करताय .

उदय म्हणाला ” कामावरून घरी चाललो होतो काका..”. 

तसे बैजुं काका रागात च म्हणाले ” आरे मग हिथे का थांबलाय .चला हिथुन पटकन” 

तसे आम्ही बोललो “अहो काका या मुलाला पण घेवुन जावु संघ”

तसे बैजुं काका अजुन चिडत म्हणाले “आरे बसा गाडीवर .सांगतो”

आम्ही दोघंही गाडीवर बसलो आणि मी मागे वळून त्या मुलाकडे पाहिले. पण मागे कोणी ही नव्हते. त्या पुलावर कोणताही मुलगा दिसला नाही. 

आम्ही दोघंही शांत बसून राहिलो. गावात पोहोचल्यावर काकांनी सांगितले कि तो मुलगा दर बुधवारी कोणाला ना कोणाला दिसतोच. कुठन आलाय, डब्यात काय आहे हे विचारतो. तो मुलगा कोण आहे,काय आहे, कुठे दिसेनासा होतो कुणालाच काही माहिती नाही.

काकांचे बोलणे ऐकून आम्ही एकमेकांकडे पाहतच राहिलो. आमचे नशीब चांगले होते म्हणून बैजू काका तिथे वेळेवर आले आणि आम्हाला तिथून घेऊन गेले. पुढचे काही दिवस आम्ही आजारी पडलो होतो. त्या जागेवर उतारा टाकल्यावर आम्हाला बरे वाटू लागले. या प्रसंगाला जवळपास ४ वर्ष उलटून गेली. त्या नंतर मात्र आम्ही पुन्हा त्या ओढ्याच्या रस्त्याने कधीच गेलो नाही. 

Leave a Reply