लेखक – हर्षराज

“दाबून जेव नील, पुन्हा माझ्यासोबत डिनर करण्याचा योग केव्हा जुळून येईल काही सांगता यायच नाही” राज नीलला म्हणाला. नीलने राजच्या चेहऱ्यावरील बदललेले हावभाव लगेच हेरले, व राज ला म्हणाला “अरे वेड्या तू तर हे अस बोलतोयस जशी ही आपली शेवटचीच भेट आणि शेवटचेच डिनर आहे, अरे कॉलेजच्या प्रवेश- प्रक्रियेला देखील अजून बराच अवकाश आहे, शिवाय प्रवेशपरीक्षेचा निकालही लागायचा आहे. जरी आपल्या हातात दिवस कमी राहिले असतील तरी ते आपण एन्जॉय करतोच आहोत ना, आणि जरी लांब राहत असलो तरी निदान महिन्यातून एकदातरी सुट्टीच्या दिवशी भेटून असच छान डिनर करूच की !!!” नील राजची समजूत काढतच बोलला. त्याचे समजुतीचे बोल ऐकून राजच्या चेहऱ्यावर एक समाधानाने स्मितहास्य फुलले असले तरीही त्याच्या मनातली चलबिचल नीलला अजूनही जाणवत होती. एक शेवटचा उपाय म्हणून नीलने मालवणी भाषेतून एक चांगलाच विनोद केला, “जास्ती विचार करा नको राज, तसोय आपलो परिक्षेदिवशीच निकाल लागलोहा” हे ऐकून राज खळखळून हसू लागला. त्याला हसताना पाहून नीललाही आपले हसू आवरेना. त्याला असे खूप वेळाने हसताना पाहून नीलही खूप खुश झाला. होणारच, राजचा मूड ठीक करण्याचा त्याचा मनसुबा जो यशस्वी झाला. त्यानंतर दोघेही हसत-खेळत मनमुरादपणे गप्पा मारत बसलेले. पटापट जेवण आटोपून त्यांनी बाहेरच्या फुटपाथवर शतपावली करण्याचा निर्णय घेतला. बोलण्यात एवढे गुंतलेले की आठचे बारा कधी वाजले त्यांचे त्यांना कळले नाही. राजच्या दुचाकीचे चाक पंक्चर असल्या कारणाने दोघेही नीलच्या दुचाकीवरून उणगत होते. रात्रही खुप झालेली, राजला घरी चालत पाठवण बरोबर दिसत नाही, म्हणून नीलने राजला त्याच्या घरापर्यंत सोडण्याचा निर्णय घेतला. 

सुरुवातीला राजचं नाही-नकोच चाललेलं, पण नंतर नीलने २-४ चांगल्याच शिव्या घातल्यावर गुमान तयार झाला. रात्रही जास्त झाल्या कारणाने रस्त्यावरची वाहनांची वर्दळही कमी झालेली. रस्त्यावरच्या भयाण शांततेत दुचाकीचा आवाज तीच शांतता भंग करीत पुढे जात होता. त्या किर्रकाळोख्या रस्त्यावरही त्यांना एकेक विनोद कसे काय सुचत होते देव जाणे. दोघेही त्या सूनसान रस्त्यावरून जोरजोरात हसत खिदळत जात होते. राजचे घर जवळ येताच नीलने घरासमोरच्या गेटसमोर आपली दुचाकी थांबवली. तसा राज दुचाकीवरून उतरताच नीलला म्हणाला, सावकाश जा, घरी पोचल्यावर call करून कळव, नील फक्त “हो, करतो, येतो” एवढंच बोलून परतीच्या प्रवासाला लागला. चेहऱ्यावर एक वेगळीच गंभीरता होती त्याच्या. पल्ला तसा लांबचा, शिवाय वेळही रात्रीची, म्हणून राजला नीलची काळजी वाटणे स्वाभाविकच होत. खिशातला चाव्यांचा जुडगा काढत घराचे कुलूप उघडता उघडता सहज त्याने आपल्या घड्याळाकडे पाहिले तर मध्यरात्रीचा १ वाजलेला. जसा राजने घराचा दरवाजा उघडत आत प्रवेश केला, तसा त्याला घरात एक वेगळाच जळकट कूबट वास येऊ लागला. उंबाऱ्यावरच स्तब्ध उभा राहून “हा वास कुठून येत असेल” याचा मनातल्यामनात अंदाज वर्तवू लागला. तेवढ्यात स्वयंपाकघरामध्ये कसल्याश्या कारणाने पेला जमीनीवर पडला. दचकून राजने अंग काढले व आपल्या रूमच्या दिशेने धूम ठोकली. तो आता घरी एकटाच होता. कारण घरातील बाकीची मंडळी फॅमिली ट्रीप काढून इतर नातेवाइकांसह तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेण्यासाठी म्हणून शहराबाहेर होती. राज ला या सर्व गोष्टीत नाममात्रही रस नव्हता. म्हणून घरच्यांनी देखील त्याच्यावर बळजबरी केली नाही. 

राजचे घर तसे दुमजली होते व दुसऱ्या मजल्यावर राजची बेडरुम होती. हातपाय धुवून राजने लगेच बेडवर पाठ टेकवली, एवढ्यात नीलचा त्याला कॉल आला मी घरी पोहचलो हे कळवण्यासाठी. पण एवढं बोलून दोघांचं बोलून होईल तर शप्पथ !!! काळ वेळेचे भान न ठेवता त्यांची चर्चा पुन्हा बराच वेळ रंगली. उताण राहून बोलता बोलता राजच्या घश्याला कोरड पडली, म्हणून बेड शेजारच्याच टेबलावर ठेवलेली पाण्याची बाटली घेऊन फोन कानाला लावला आणि तो रूम बाहेर पडला. रुमच्या बाहेरच दुसऱ्या मजल्यावरचे स्वयंपाकघर असल्याने, पिंपाच्या नळाला बाटली लाऊनच त्याच नीलशी बोलण चालू होत. तेवढ्यात राजच्या बेडरुमलाच लागून असलेल्या बाजूच्या बेडरूममधून पावलांचा आवाज येऊ लागला. राजच लक्ष त्या आवाजाकडे गेलं, तसं त्याने लगेच कान टवकारून आवाजाचा कानोसा घेण्यासाठी म्हणून पिंपाचा नळ बंद करून नीलला थोडावेळ शांत राहण्यास सांगितले. सर्व काही शांत झाले पण तो आवाज पुन्हा ऐकू आला नाही. आपल्या ऐकण्यात काहीतरी गल्लत झाली असावी म्हणून त्याकडे दुर्लक्ष करत त्याने नळ चालू करून नीलला पुन्हा बोलायला सांगितले. तर पुन्हा तोच पावलांचा आवाज त्या रूम मधून यायला लागला. पण यावेळी मात्र तो आवाज जरा मोठ्यानेच येऊ लागला, जणू जमीनीवर कुणीतरी जोरजोरातच पाय आपटतय. राजने पुन्हा नळ बंद करत नीलला शांत राहण्यास सांगितले. पण यावेळीसुद्धा तो आवाज पुन्हा ऐकू आला नाही. सतर्क होऊन नीलशी बोलण आटोपून मागे वळून न पाहता आपल्या बेडरूम च्या दिशेने राज पळत सुटला. एक वेगळीच अनामिक भीती दाटून आलेली त्याच्या मनात. त्याला सतत वाटत होत की आपण आपल्या घरात एकटे नाही आहोत. कुणीतरी आहे, आपल्या सोबतच… 

घडल्या प्रसंगाला घाबरून त्याने ठरवलं की आजची रात्र लाईट लाऊनच झोपायच !!! बेडखालून अंथरूण काढण्यासाठी म्हणून राज खाली वाकला, इतक्यात रूम बाहेरून तोच पावलांचा आवाज आपल्या रूमच्या दिशेनेच येत आहे असे त्यास जाणवले. बाहेर जाऊन कोण आहे हे बघण्याची हिम्मत त्यात नव्हती, म्हणून त्याकडे लक्ष न देता आपल अंथरुण घालू लागला. इतक्यात बाहेरून येणाऱ्या त्या पावलांचा आवाज थांबला, तसा त्याने सुटकेचा श्वास सोडला. झीरो बल्बचा पिवळा मंद प्रकाश राजच्या बेडरूममधे सर्वत्र पसरला होता. त्या मंद प्रकशात आड दरवाज्यातून कुणीतरी आपल्यालाच डोकावून पाहत आहे असे राजला जाणवू लागले. पहिल पावलं जोरजोरात आपटण्याचा, त्यानंतर त्याच पावलांचा आवाज रुमच्या दिशेने येणं, आणि आता हे. आता मात्र अति झाल्याने बाहेर कोण आहे हे पाहावे तर लागणारच, म्हणून सर्व हिम्मत एकवटून राज ने दरवाजाबाहेर पाहिले तर बाहेर मिट्ट काळोखाशिवाय दुसरे काहीच दिसत नव्हते. काही वेळाने पुन्हा त्याला तसेच जाणवले. तिरक्या नजरेने त्याने आढावा घेतला आणि यावेळी मात्र राज चांगलाच घाबरला. शरीरातील सर्व बळ एकवटून जो उठला आणि त्याने ताडकन दरवाजा बंद केला, तेव्हा कुठे त्याला हायसे वाटू लागले. पण त्याला तरी कुठे माहित होत पुढे काय वाढून ठेवलंय ते. लाईट लाऊन झोपायची सवय नसल्या कारणाने राजला झोपही येत नव्हती. जरी प्रकाश मंद असला तरीही तो डोळ्यांना बसत होता, म्हणून कसे तरी झोपायचा प्रयत्न करू लागला. तरीही मगासचे एकामागोमाग एक घडलेले विचित्र प्रसंग काही त्याच्या डोक्यातून जात नव्हते. 

मोठ्या मुश्किलीने डोळा लागणार एवढ्यात त्याला कुणाच्यातरी श्वाच्छोश्वासांचा आवाज कानी येऊ लागला.  रूममधील त्या तीव्र शांततेत फक्त घड्याळाच्या काट्यांच्या व त्या अज्ञात श्वाच्छोश्वासांचाच आवाज घुमत होता. साखरझोपेत असल्या कारणाने तो विचार करण्यास व सभोवतालचे ऐकण्यास सक्षम होता. स्वतःचीच समजूत काढत म्हणाला “माझ्याच श्र्वासांचा आवाज मलाच ऐकू येत असावा कदाचित” असा विचार करून पुन्हा झोपी जाऊ लागला. पण काही वेळानंतर येणारा आवाज हा आपल्याच श्र्वासांचा आहे हे पडताळून पाहण्यासाठी म्हणून त्याने आपला श्वास काही वेळासाठी रोखून धरला. अन् त्याच्या शरीरातून एक विजेची तीव्र लहर गेली. त्याला भीतीने सरसरून घाम फुटला. कारण येणाऱ्या श्वाच्छोश्वासांचा आवाज हा मुळी त्याच्या श्वासांचा नव्हताच. तो त्याच्या बेडच्या बाजूने येत होता. डोक्यावरून घेतलेली चादर सरकवून बाहेर कोण आहे हे पाहण्याची हिम्मत होत नव्हती. पण कितीवेळ असच घाबरून जीव मुठीत घेऊन बेडवर पडून राहणार, या उलट जर बाहेर पाहून परिस्थितीचा आढावा घेतला तर निदान प्रसंगावधान राखून पळून तरी जाता येईल. या विचाराने त्याने बाहेर कोण आहे हे पाहण्यासाठी म्हणून थरथरत्या हातांनी डोक्यावरील चादर वर उचलत बारीकश्या फटीतून बाहेर पाहिले. तर बाहेरचे दृश्य पाहून त्याची दातखिळीच बसली. त्याच्या शरीरातील उरला-सुरला त्राणही निघून गेला, एवढे भयावह व मन विचलित करणारे दृश्य होते ते. डाव्या कुशीवर झोपलेल्या राजच्या चेहऱ्यासमोरच एक बाई मांडी घालून बसली होती. चेहऱ्यावर एक कुत्सित हास्य व हलकासा क्रोधाचा भाव आणून राजकडेच एकटक पाहत होती. बाई, बाई कसली, कोणततरी पिशाच्चच होत ते. 

करड्या रंगाची सुरकुतलेली त्वचा जिच्यावर बऱ्याच ठिकाणी जखमा झालेल्या. चेहऱ्याचा उजवा भाग संपूर्ण जळालेला. मस्तकाच्या उजव्या बाजूला एक खोल खोच ज्यातून रक्त थेट चेहऱ्यावर येत होत. उजव्या बाजूचा जबडा तर तुटून लोंबकळत होता. अन् उजवा डोळा? डोळा नव्हताच, होती ती फक्त रिकामी खोबणी व रक्ताने माखलेली पांढरी साडी. समोरचे किळसवाणे व भयावह दृश्य पाहून राजची तर बोबडीच वळलेली. त्याला ओरडायचे होते पण तोंडातून शब्दच फुटत नव्हते. त्याला बाहेर पळून जावेसे वाटत होते पण तो हालचाल करू शकत नव्हता. जणू त्या स्त्रीने राजला नजरेनच जखडून ठेवलंय. शरीरातील सर्व ताकद एकवटून त्याने चादर पुन्हा डोक्यावर घेतली. हनुमान चालीसा म्हणायची तर ती ही आठवत नव्हती, जणू आपला मेंदू गोठलाय असेच वाटत होते त्याला. काही काळ शुन्यावस्तेत राहून झाल्यावर तो आवाज हळू हळू ऐकू येऊ लागला. असे का म्हणून पाहण्यासाठी त्याने बाहेर पाहिले, तर ती बाई त्या जागेवर नव्हतीच मुळी. ती आता त्याच्या पायाजवळ येऊन बसली होती. त्याला कळून चुकले की आपला काळ आलाय. पळायची किंवा ओरडायची इच्छा असली तरी तो तस दुर्दैवाने करू शकत नव्हता. हतबल झालेला राज काहीच करू शकत नव्हता, शिवाय जे काही होतंय ते पाहण्याशिवाय. काही वेळानंतर तो आवाज पूर्णतः बंद झाला. काही वेळ रूममध्ये फक्त घड्याळाच्या काट्यांचाच आवाज घुमत होता, आणि कश्याचाच नाही. त्याला वाटले की आपल्यावरचे संकट टळलेय. पण पुढे काय वाढून ठेवलंय याची त्याला कल्पनाही नव्हती. अचानक पुन्हा तोच श्वाच्छोश्वासांचा आवाज आता थेट त्याच्या चेहऱ्यासमोरून येत होता.

तिच्यामार्फत सोडलेला उच्छश्र्वास आता राजला जाणवत होता, इतक्या जवळ होती ती बाई त्याच्या. त्या चादरीच्या फटीतून रक्ताचा एक थेंब राजच्या गालावर पडला. त्याने झटकन चादर चेहऱ्यावरून बाजूला केली. पाहिलं तर ती बाई आता राजच्या छातीवरच बसलेली, कमालीची गोष्ट तर ही होती की राजला हे जाणवलं ही नाही. आता मात्र राज समोरचे दृश्य उघड्या डोळ्यांनी पाहण्यावाचून काहीच करू शकत नव्हता. ती आता किळसवाणा चेहरा करीत नाकाशी सुत धरून बसलेल्या राजचा गळा दाबायला लागली. राजने तर आता शरीर टाकलेलं, त्याच्याकडून काहीच प्रतिकार येत नव्हता, अगदी शब्दशः नांगीच टाकलेली जणू त्याने. हळूहळू सर्व काही अंधुक व अस्पष्ट दिसू लागलं. तीच्यामर्फत केल्या जाणाऱ्या आवाजाचा व घड्याळाच्या काट्यांच्या आवाजाचा राजला प्रतिध्वनी ऐकू येत होता. काही वेळाने सर्व काही शांत झालं. सर्वत्र तममय वातावरण झालं. कसलीच चेतना उरली नव्हती आता राजमधे. कोणत्यातरी वेगळ्याच आयामात गेल्यासारखे वाटत होते त्यास. जिथे काहीच नव्हते, अगदी तो स्वतः सुद्धा !!

(Knock Knock) “शिट यार !!! हा राज अजून बाहेर का नाही येत आहे. एव्हाना दररोज तयारीनिशी घराबाहेर गेटजवळ माझी वाट पाहत उभा असतो. जॉगिंगची नाही तेवढी आवड याला”. कालच्या जागरणामुळे कदाचित झोप पूर्ण झाली नसावी, ह्या विचाराने त्याने आणखीन १५ मिनिट वाट पाहायची ठरवली. १५ मिनिटांचा चा अर्धा तास झाला पण राज काही घराबाहेर आला नाही. आतामात्र राजच्या काळजीने नीलचा जीव कासावीस होउ लागला. शिवाय त्याचा फोन फोनही बंद लागत होता. अखेरचा उपाय म्हणून नीलने शेजारच्या दामूकाकांना मदतीस घेऊन दार तोडायचा निर्णय घेतला. नीलने सर्व काही दामूकाकांना सांगितले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता दामूकाकाही वेळेचा विलंब न करता लगेच नीलसोबत दार तोडायला लागले. काही वेळाच्या अतोनात प्रयत्नांती त्या दोघांना दार तोडण्यास यश आले. जसा दरवाजा उघडला, तशी एक गरम हवेची झुळूक त्या दोघांना स्पर्श करून गेली. नील लगोलगच राजच्या बेडरूमच्या दिशेने जाऊ लागला. जसा दरवाजा उघडला तसा एक कूबट वास नीलच्या नाकाला झोंबू लागला. समोरचे दृश्य पाहून नीलच्या पायाखालची जमीनच सरकली. राज स्वतःचा डावा हात बेडखाली टाकून बेशुद्धावस्थेत पडलेला होता. राजला त्या अवस्थेत पाहून नील जोरात ओरडला, “काका, लवकर वर या !!!” नीलची हाक कानावर पडताच पायऱ्यांवरून धडपडत दामुकाका राजच्या बेडरूममध्ये आले. समोरचे दृश्य पाहून त्यांचीही वाचा बसलेली. छातीवरून हात चोळतच दामुकाका म्हणाले “हिथच थांब, म्ह्या जाऊन ‘ॲंम्बुलंश’ ला बोलिवतो” असे म्हणत ते घराबाहेर पडले. नील राजचा हात चोळत त्याला हाक मारत त्याला शुद्धीत आणण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याला यश येत नव्हते. 

एवढ्यात त्याला रुग्णवाहिकेचा आवाज कानावर पडला. तेव्हा कुठे जाऊन नीलचा जीव भांड्यात पडला. ४-५ परिचारिकांचा गट राजला बेडवरून उचलून रुग्णशिबिकेवर ठेऊन रुग्णवाहिकेच्या दिशेने दौडू लागल्या. राजला रुग्णवाहिकेत सुखरूप ठेवून रुग्णवाहिका इस्पितळास निघाली. नील व दामुकाका ही दुचाकीवरून रुग्णवाहिकेच्या मागोमाग इस्पितळी पोहचले. दोघेही शेजारच्या बाकावर बसून डॉक्टरांची वाट पाहत बसलेले. नीलला तर राजच्या गळ्यावर दिसलेले व्रण काही डोळ्यासमोरून जाता जात नव्हते. समोरून डॉक्टर येत आहेत पाहून ताडकन बाकावरून उठून नीलने डॉक्टरांना सवाल केला. कसाय राज? कश्यामुळे त्याला अस झालं? गोंधळलेल्या नीलला पाहून त्याला शांत करतच डॉक्टर म्हणाले “घाबरण्याची वा काळजी करण्याची काही बाब नाहीये, तुम्ही संध्याकाळी किंवा दुपारीच राजला घरी घेऊन जाऊ शकता. हो फक्त कोणत्याही गोष्टीचा ताण येऊ नये याची मात्र दक्षता घ्यावी लागेल” असे बोलून नीलच्या खांद्यावर हात ठेऊन होकारार्थी मान हलवत निश्चिंत राहण्यास सांगितले. दामुकाकांनाही आपल्या कामावर जायचे असल्याने त्यांनीही नीलचा निरोप घेतला. नीलही त्यांचे आभार मानून स्वतःही आपल्या घरी निघाला. दुचाकी दारासमोर लाऊन दार उघडताच नीलच्या वडिलांनी त्याला सवाल केला. “काय रे, आज एवढा उशीर कसा झाला?” त्यावर नील म्हणाला “सांगतो, आधी हातपाय धुवून येतो” नीलच्या आवाजातील नरमता त्याच्या वडिलांनी लगेच ओळखली. बाथरूम मधून येताच पायपुसण्यावर पाय पुसून लगेच वडिलांच्या बाजूच्या खुर्चीवर जाऊन बसला व घडलेल्या प्रसंगाचे वर्णन करून सांगू लागला. 

वडीलही सर्वकाही अगदी लक्षपूर्वक ऐकत होते. सांगता सांगता नीलची आई गरमागरम कांद्या-पोह्यांची डिश घेऊन त्या दोघांकडे आली. स्वयंपाकघर जवळ असल्या कारणाने तिलाही सर्वकाही स्पष्टपणे ऐकू येत होते. बाजूच्या देवघरात पूजा करत बसलेली आजी पूजा आटोपून तुलसी मातेला पाणी वहायला म्हणून उठली, तिही सर्वकाही ऐकत होती. आजीने आणि आईने नीलच्या पाठीवर एक कौतुकाची थाप दिली. शिवाय नीललाही खूप छान वाटत होते. आपण कोणाच्यातरी कामी आलो या विचाराने. पण त्याच्या वडिलांच्या चेहऱ्यावरून मात्र पुरता रंग उडाला होता. कारण विचारल्यास “काही नाही” सांगून वर्तमानपत्र वाचण्यास पुनःमग्न झाले. चहाचा कप ओठांना लावणार, एवढ्यात नीलला मागील रात्री घडलेला प्रसंग एका सेकंदाच्या अंशात डोळ्यासमोरून येऊन गेला. पायाच्या अंगठयापासून ते मस्तकापर्यंत विजेची एक तीव्र लहर नीलच्या शरीरातून गेल्यासारखी झाली. जोरदार ठसकाच लागला नीलला. त्याचे वडील त्याची पाठ थोपटू लागले. काही वेळानंतर नील पूर्वस्थितीत आला. वडिलांनी विचारलं, “काय रे, अचानक कसा काय ठसका लागला?” त्यावर फक्त “असाच” बोलून खुर्चीत मागे टेकून कुठेतरी शून्यात हरवला. त्याला मागची रात्र आठवू लागली, मागच्या रात्री घडलेला तो भयाण प्रसंग आठवू लागला. मांसाहारचे ते तामसी जेवण आटोपून केलेली ती शतपावली आठवू लागली. त्या स्ट्रीटलाईटच्या पिवळ्या प्रकाशात उजळून गेलेला तिठा आठवला. शतपावली करायचा निर्णय हा त्या दोघांच्या जीवावर बेतणार आहे हे त्या बिचाऱ्याना तरी कुठे ठाऊक होते. 

शतपावली करताना नील व राज बोलण्यात एवढे गुंतलेले की त्यांना वेळेकाळेचेही भान उरले नव्हते. राज तर बोलण्यात एवढा गुंतलेला की त्याचा उजवा पाय केव्हा कुणावरून ओवाळून टाकलेल्या उताऱ्यावर पडला हे त्याचे त्यालाच कळले नाही, आणि जेव्हा कळले तेव्हा फारच उशीर झालेला. होय, राजने नकळतपणे आपल्या पायाखालून उतारा तुडविला होता. घाबरून दोघांनी एकमेकांकडे पाहत आवंढा गिळला. दोघांच्याही चेहऱ्यावर भीती दाटून आलेली. राजच्या चेहऱ्यावरचा रंगच उडालेला. पण स्वतःच्या चेहऱ्यावरील भयभाव लपवीत फक्त नीलला हसविण्यासाठी म्हणून खाली पडलेल्या नारळाला फुटबॉल समजून जोरदार लाथ मारण्याचा मूर्खपणा केला. पण झालं उलटच, ते पाहून नीलला अजून धक्का बसला. तो ओरडूनच बोलला “अरे हे काय केलेस राज !!!!” आपली भीती लपवतच राज नीलला म्हणाला “चल रे भावा, कोणत्या जगात जगतोयस तू अजून. हे तू जसं समजतोस तस्स काहीच नसत. सगळी अंधश्रद्धा असते” नीलला समजावतच म्हणाला. तरीही नीलची नजर राजच्या नजरेत खिळून होती. राज दाखवून देत नसला तरी पुरता घाबरलेला. तरीही थरथरत्या आवाजात दुचाकीवर चढतच तो नीलला म्हणाला “भित्यापाठी ब्रम्हराक्षस” व खांद्यावर हात ठेऊन चल म्हणत दुचाकी सुरू करण्याचा इशारा केला. एवढ्यात काल रात्रीच्या विचारात तंद्री लाऊन बसलेला नील, आईची हाक ऐकून एकाकी दचकून उठला. “अरे कोणत्या विचारात हरवलायस?” त्यावर फक्त “कश्याच्याच नाही” एवढंच उत्तरून शांत बसला. कालचा घडला प्रसंग घरात सांगू की नको, या विचारात पडला. द्विधेतच अडकलेला जणू. शेवटी त्याने घडला प्रसंग घरी सांगायचा निर्णय घेतलाच. 

पण सरळ मुद्द्यावर येऊन चालणार नव्हते, म्हणून शक्कल लढ्वत सर्वप्रथम त्याने राजला त्याच्या घरचे येईपर्यंत काही दिवस आपल्या घरीच ठेवण्याची परवानगी मागायचे ठरवले. व त्याने विषय काढला. त्याच्या वडिलांनी त्याला विचारले “आधी राजच्या घरच्यांना कळवलयस का तू? त्यावर नील म्हणाला, “हो सकाळीच, लगोलगच कळवले, तिथून इथे येण्यास निघाले आहेत ते, इथ पोहोचायला त्यांना वेळ लागेल. आजूबाजूला इतर नातंलगही नसल्या कारणाने त्यांनी मलाच काही दिवस राजची काळजी घ्यायला सांगितलीय, ते येईपर्यंत”. बाजूच्या पायऱ्यांवर बसलेल्या आजीनेही त्यास परवानगी दिली. आजीच्या हो ला हो देत वडिलांनीही परवानगी दिली. आईची तर काहीच हरकत नव्हती. थोड्यावेळच्या शांततेनंतर नीलने मुख्य विषय काढायचा ठरावला. आजी आणि बाबा तर हॉल मध्येच होते. आई स्वयंपाकघरात स्वयंपाक करण्यात व्यस्त होती. नीलने हाक मारता क्षणाचाही विलंब न करता ती देखील हाकेस ओ देत हॉल मध्ये हजर झाली. नीलला विचारू लागली “काय रे? काय झालं?” आई, बाबा, आजी या सगळ्यांच्या चेहऱ्याकडे पाहतच हताश होऊन म्हणाला “मला तुम्हा सर्वांना काहीतरी सांगायचंय”. नीलच्या तोंडून हे शब्द ऐकताच घरच्यांना कळून चुकले की विषय नक्कीच गंभीर असणार, त्याशिवाय नीलसारखा धीट अन हुशार मुलगा ह्या स्वरात काही सांगणे शक्यच नाही. त्याची आई म्हणाली “बोल ना बाळा, काय झालंय? बाबाही हातातील वर्तमानपत्र बाजूला ठेऊन नीलकडे चिंताजनक नजरेने पाहू लागले. तस एकेक करून नीलने काल रात्री घडलेला प्रसंग दबक्या स्वराताच सांगण्यास सुरुवात केली. 

जसजसा नील घडला प्रसंग पुढे सांगत जात होता, तसतसे सगळ्यांच्या चेहऱ्यावरील हावभावही बदलत जात होते. प्रसंग सांगता सांगता मध्येच आई तर डोक्यावर हात घेऊन पायऱ्यांवर बसली. आजीच्या चेहऱ्यावरील क्रोधाचे भाव तर नीलला स्पष्ट दिसत होते. बाबामात्र एक भुवई वर करून सर्वकाही शांतपणे ऐकत होते. सर्व काही सांगून झाल्यावर हॉलमध्ये थोडावेळ शांतता पसरली. आईतर डोक्यावर हात घेऊनच शून्यात हरवलेली. शांतता भंग करीत आजी नीलवर रागाने जोरात ओरडली व म्हणाली, “शिरा पडली त्याच्या तोंडार, अरे झक माराक गेलेल्यात त्या तिठयार? माहित हा मा त्या तिठयार रात्रीचा कोणीयेक फिरकना सुद्धा नाय, अरे काळो कुत्रोसुद्धा गावाचो नाय तुका त्या तिठयार रात्रीचो. आणि तुम्ही थय डोंबलाची शतपावली कराक गेल्लात. अरे भल्याभल्यांका पोचवलान हा तिना. कश्याक गेलेल्यात तुम्ही थय कश्याक गेलेलात?” एवढं बोलून हुंदके देऊन रडू लागली. शेजारच्या खोलीत घरातील कामवाली बाई घडला सर्व प्रकार लक्षपूर्वक ऐकत होती. म्हणजे कसं, गावभर या गोष्टीचा बोभाटा करायला मोकळी !!! बाबांच्या मनात शंकेची पाल आधीच चुकचुकली होती, त्यांना कळून चुकलेल की काहीतरी गौडबंगाल नक्कीच असणार. ते तसेच एक भुवई वर करून नीलकडे एकटक पाहत होते. घडला प्रकार सांगतसांगता रडकुंडीला आलेला नीलदेखील बाबांकडे केविलवाण्या नजरेने पाहू लागला. त्यांच्याकडे पाहून त्याला रडू आवरेनाच. पूर्णपणे खचून गेलेल्या नीलच्या डोक्यावरून हात फिरवीत म्हणाले, “भुतप्रेत, भूतबाधा, यांसारख्या गोष्टी मुळात अस्तित्वातच नसतात. सर्वकाही अंधश्रद्धा असते”. खरतर त्यांचा ह्या गोष्टींवर विश्वास होता आणि नव्हता ही. कारण व्यवसायाने शिक्षक असल्याने भरपूर शिकलेले होते, पण बालपण हे ग्रामीण भागात गेल्यामुळे भूताखेतांच्या गोष्टी वा प्रसंग हे फक्त ऐकण्यात नसून बघण्यात देखील होत्या. म्हणून त्यांची स्थिती या बाबतीत तळ्यात-मळ्यात अशी काहीशी होती. 

नीलच्या काळजीने व्याकूळ झालेल्या आई व आज्जीची समजूत काढण्याचा असफल प्रयत्नानंतर बाबांनी आईला पुन्हा स्वयंपाकाच्या तयारीस लागायला सांगितले. हॉल मध्ये यायच्या आधी टाकलेली फोडणी आता पार करपून गेली होती. त्यामुळे पुन्हा फोडणी टाकायचा डबल उद्योग आईला करावा लागला. आता एवढे सगळे घडल्यावर आजी राजला आपल्या घरी ठेऊन घ्यायच्या सख्त विरोधात होती. तिने बाबांना बजाऊन सांगितल “ह्या बघ वसंता, मी सांगतय ता ऐक, तू तेका घरी ठेवन् घेवच्या फंदात पडा नको, महागात पडतला बघ तुका” तिचे कटू बोलणे शांतपणे ऐकून घेऊन नीलला घराबाहेर अंगणात बोलावून घेतले, व त्याला म्हणाले “या सगळ्याचा विचार मनातून काढून टाक बाळा, सगळी काही अंधश्रद्धा असते. आणि जर भविष्यात परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली तर अश्या गोष्टींवर सतराशे साठ उपाय असतात, आणि उपाय करणारेही. काळजी नको करुस, राजला घरी घेऊन ये, असे म्हणत नीलच्या हातावर २००० ची नोट ठेऊन म्हणाले, “राजच्या इलाजासाठी व औषधांसाठी लागतील, ठेवून घे” अश्रू अनावर झालेल्या राजने वडिलांना घट्ट मिठी मारली. वडिलांनीही त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत “ये आता” बोलून राजला घरी आणण्याची परवानगी दिली. दुपारी ३ च्या दरम्यान राजला डिस्चार्ज मिळाला. डॉक्टरांनी नीलला बजावून सांगितले की राजच्या मेंदूवर ताण येईल असे कोणते कृत्य वा प्रश्न त्याला त्यास विचारू नका. अश्याने त्याची तब्यत पुन्हा बिघडेल. अगदी रात्री काय झाले? कसे झाले? हे ही विचारू नये अशी सख्त ताकिदच् देऊन ठेवली नीलला. 

राजच्या तब्यतीतही तसा सुधार होता, पण डॉक्टरनी संपूर्ण बेडरेस्ट घेण्यास सांगितलेली. शिवाय पथ्यही होतेच. राज जरा शांतशांतच होता, प्रचंड थकवा आलेला त्याला, हे त्याच्या डोळ्यांखाली आलेली गडद वर्तुळे सांगत होती. चेहरा तर फिका पडलेला त्याचा. रिक्षेतही चिडी चाप बसून होता. रिक्षेतच नील राजला धीर देत म्हणाला, “घाबरु नकोस वा कसली काळजीही करू नकोस, आम्ही आहोत तुझ्यासोबत. हे तुझच घर आहे असं समज”. यावर काहीच न उत्तरता राज रिक्षेबाहेर पाहू लागला. मुळात राज काही बोलण्याच्या मनस्थितीतच नव्हता, हे नीलला ठाऊक होते. पण आपल्या सोबत असलेला तो राज होता की अजुन कोणी हे मात्र त्याला माहित नव्हत… 

रिक्षेतून उतरून दोघांनीही घरात प्रवेश केला. त्या दोघांना पाहून नील चे वडील खुश झाले. “या कशी आहे आता तब्यत? येताना काही त्रास तर नाही ना झाला? सुमे पाणी आण ग जरा” नीलच्या आईला म्हणाले. बाहेरच्या गजबजाटाने खाटीवर झोपलेल्या आजीला देखील जाग आली. हातात पाण्याचा ग्लास घेऊन आई व आजीने एकत्रच हॉल मध्ये प्रवेश केला. आईने राजला विचारल “कसं वाटतंय आता?” त्यावर फक्त “बर वाटतंय” एवढंच बोलून पाणी पिऊ लागला. स्वभावाने मितभाषी असलेल्या राजला खळखळून बोलायची सवय नव्हती. एवढ्यात नीलचे वडील म्हणाले “तुझच घर आहे अस समज, आणि रहा” समोरचे एवढ्या आपुलकीने आपली काळजी करताहेत हे पाहून राजलाही बर वाटलं. शिवाय घरी एकट राहावं लागणार नाही आणि आपण एका सुरक्षित ठिकाणी आहोत या विचाराने त्याला खूप हायसे वाटत होते. घरात गप्पागोष्टी रंगल्या असतानाच दरवाज्यावर कुणीतरी थाप मारली “सूमे जरा बघ ग कोण आलंय” वडिलांनी नीलच्या आईला सांगितले. दारावर मोरपिसांचा गुच्छा घेऊन एक फकीर बाबा भिक्षेसाठी आले होते. वयाने वयस्क, पांढरी दाढी, डोक्यावर टोपी, अंगात पांढरा सदरा व डाव्या खांद्याला झोळी, असा काहीसा वेश होता त्यांचा. डोळ्यात वेगळेच तेज होते त्यांच्या. उंबऱ्यावरच उभे राहून ते घरात सर्वत्र वाकून पाहत होते. नीलच्या वडिलांनी त्याला घरात येऊन बसायला सांगितले, तर त्यास त्यांनी साफ नकार दिला. एवढं की त्यांनी देऊ केलेली भिक्षासुद्धा नाकारली. 

ते उंबऱ्यावर उभे राहून राजकडे एकटक पाहू लागले, व नीलच्या आईकडे पाहून म्हणले “शैतानी कुवते इस घर मे दाखील हो चुकी है. ये जो भी है, बहोत खौफनाक है. जितना जल्द हो सके उतना जल्द इसपर हल निकाले. वरना एकनाएकदिन यकिनन ये आप सबपर हावी हो जाएगा”  अस बोलून त्या फकीर बाबांनी आपल्या बटव्यातून २ ताविज काढून नील व राजच्या गळ्यात बांधायला सांगितले. व म्हणाले “ये ताविज इन दोनोंको उन शैतानी कुवतोंसे मेहफूज रखेगा. खुदा आपकी हिफाजत करे”, असे बोलून ते फकीर बाबा आपल्या परतीच्या प्रवासाला लागले. दिलेले ताविज नीलच्या आईने लगेचच दोघांना बांधला. थोडावेळ आणि गप्पा मारल्यावर नीलच्या वडिलांनी नीलला राजला घेऊन गेस्ट रूम मध्ये जाण्यास सांगितले. नीलच्या आईने तर राज येणार म्हणून आधीच रूम साफ करून ठेवलेली. बाबांनी नीलला सांगितले आज तू त्याच्याचसोबत झोप. तेवढीच त्याला तुझी सोबत राहील. “ठीक आहे” म्हणत दोघेही रूमच्या दिशेने निघाले. हातपाय धुवून जेवण आटोपून वामकुक्षी घेण्यासाठी म्हणून पुन्हा बेडरूम मध्ये गेले. पाठ टेकवल्या टेकवल्या त्यांना केव्हा झोप लागली कळलेच नाही. नीलची तर या सगळ्यात खूपच दगदग झालेली. एका सच्या मित्राची भूमिका अगदी चोखपणे पार पाडत होता तो. त्या दोघांचे डोळे उघडले ते थेट रात्री ८ वाजता. संध्याकाळी एवढ्या वेळ झोप झाली म्हणजे रात्री काही झोप लागायची नाही हे त्या दोघानाही कळून चुकले. फ्रेश होऊन लगेचच रात्रीच्या जेवणाला हजर झाले. नीलचे वडील वाटच पाहत होते त्या दोघांची. जेवण आटोपून घरातील सर्वजण टीव्ही वर लागलेली मालिका पाहत बसलेले. सर्वत्र कसं, सकारात्मक वातावरण होत, हे पाहून राजलाही बर वाटल. त्यालाही थोडा बदल मिळत होता. 

सर्वकाही सुरळीत सुरू होत. बघता बघता ११ वाजले. सर्वजण आपापल्या बेडरूममध्ये जाऊ लागले. नील व राजही आपल्या बेडरूमच्या दिशेने जाऊ लागले. दार बंद करणार एवढ्यात नीलचे वडील आले, व म्हणाले “काहीही त्रास झाला किंवा कशाचीही भीती वाटली किवा कशाचीही गरज भासली तर लगेच हाक दे” त्यावर “हो नक्की” एवढंच बोलून नीलने दार बंद केले. त्यांना किंचित देखील कल्पना नव्हती की त्यांच्यासोबत काय अघटीत घडणार आहे. रूमच्या अगदी मधोमध त्यांच्यासाठी २ बेड होते. नीलच्या बेडपासून ४-५ फुटांच्या अंतरावर खिडकी होती व राजच्या बेडपासून तेवढ्याच अंतरावर दरवाजा होता. अशी काहीशी गेस्टरूम होती. बेडवर पाठ टेकवल्या टेकवल्या राज नीलला म्हणाला, “भावा मला तुला काहीतरी सांगायचंय..” राजला काय सांगायचं होत ते नीलने एका मनकवड्याप्रमाणे लगेच ओळखले. जर राजला घडलेला प्रकार सांगू दिल असता तर त्याच्या मेंदूवर ताण येईल म्हणून तो काही सांगणार एवढ्यात विषय बदलत राजला विचारल “अरे होता कोण?” जसं नीलने त्याला हे विचारलं तसा तो हसू लागला. हा एक त्यांच्या त्यांच्यातच भूतकाळात घडलेला एक विनोद होता. काही वेळ अश्याच इकडच्या तिकडच्या गप्पा मारून राजला झोप येऊ लागली. त्यामुळे “झोपतो मी आता” एवढं बोलून डोक्यावरून चादर घेऊन झोपी गेला. नील अजूनही जागाच होता, आपल्या फोनवर इंस्टाग्रामच्या रिल्स पाहत. दीड वाजला. सर्वकाही शांत होते. पण अचानक कुठूनतरी तसाच जळकट खूबट वास त्याला येऊ लागला जसा त्याला आज सकाळी राजच्या बेडरूम मध्ये आलेला. अचानक येत असणारा तो वास मनाला खटकत जरी असला तरी त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. पण वासाची तीव्रता हळूहळू वाढतच होती. 

त्यानंतर काही वेळाने त्याला कोणाच्यातरी पूटपुटण्याचा आवाज येऊ लागला. लक्ष देऊन ऐकल्यास तो आवाज राजच्या बेडकडून येत होता. होय, तो आवाज राजचाच होता. हातपाय झटकत, मानही जोरजोरात हलवू लागलेल्या राजकडे पाहून नीलला भीती वाटण्या ऐवजी हसू च आले. फारच विनोदी वाटत होत्या त्याला राजच्या हालचाली. त्यात त्याला एक भन्नाट कल्पना सुचली ती अशी, की तो विनोदी क्षण कॅमेऱ्यात टिपून दुसऱ्या दिवशी राजला दाखवायचा व त्यावरून त्याची थट्टा करायची. अस ठरवून त्याने फोनचा कॅमेरा उघडला व गुडघ्यावर उभा राहून एक गुडघा आपल्या बेडवर व दुसरा गुडघा राजच्या बेडवर असा राहून व्हिडिओ शूट करण्यास सुरुवात केली. त्याचे हातपाय हलवणे, पुटपुटने सर्वकाही कॅमेऱ्यात रेकॉर्ड होत होते. राजकडून केल्या जाणाऱ्या कृतींना पाहून नील हसून लोटपोट होत होता. एकाच जागी उभ राहिल्याने नीलचा गुडघा वळला. म्हणून गुडघा वर उचलून थोडी हालचाल करू लागला. यामुळे फोनच्या कॅमेऱ्याची फ्रेम हलून किंचित बेडच्या उजव्या बाजूला सरकली. तेव्हा फोनच्या उजव्या कडेला कोपऱ्यात एका मानवी पायांच्या बोटांचा भाग दिसला. त्याचे हसणे अचानक थांबले. नील त्या पायांच्या बोटांकडे कॅमेरा स्थिरावून त्या विचित्र गोष्टीचा अंदाज घेऊ लागला, की हे नक्की काय असावे? हळूहळू त्याने फ्रेम पायाच्या बोटांच्या बाजूने सरकविण्यास सुरुवात केली. जशी फ्रेम पायानुसार वळवू लागला तसे त्याला दोन पसरलेले पाय दिसले. त्याने झटकन मोबाईल बाजूला करून तिथे नजर फिरवली पण त्याच्या डोळ्यांना तिथे कोणीच बसलेल दिसत नव्हतं. त्याने पुन्हा मोबाईल कॅमेऱ्यातून पाहायला सुरुवात केली. फ्रेम जशी त्याने पायांवरून धडावर आणली तशी त्याची दातखिळीच बसली. 

समोरचे दृश्य पाहून त्याने अक्षरशः मुठच गिळली. आपण हे समोर काय पाहत आहोत, हा मनात विचार येऊ लागला. होय !!! ही तीच बाई होती जी आदल्यादिवशी राजच्या बेडशेजारी अशीच बसलेली. तोच विद्रूप चेहरा व तेच विक्षिप्त हास्य पाहून नील हातात कॅमेरा घेऊन जागीच खिळला. जणू त्याला तिने नजरेनेच जखडून ठेवलंय. असंच काहीसं मागच्या रात्री राजसोबतही झालेलं. एव्हाना राजही शांत झालेला. पाय सोडून बसलेलं ते पिशाच्च आता उठून ओणव चालत नील व राजच्या बेडभोवती किळसवाण्या चालीत चालू लागल. ते जे काही होते ते फक्त कॅमेऱ्यात दिसायचं, उघड्या डोळ्यांनी नाही. ते पिशाच्च ओणव चालत आता नीलच्या बेडशेजारी आल. जशी अवस्था राजची त्या रात्री झालेली तशीच आता नीलची होणार होती. त्याला वडिलांना हाक मारायची होती, पण तो मारू शकत नव्हता. कॅमेरा हातात धरून कॅमेऱ्यातून ते पाहण्याशिवाय तो आणखी काही करू शकत नव्हता. एवढं असलं तरी विचार करण्यास सक्षम होता. तो बिचारा वाटच पाहत होता, कधी आपल्यावर हे पिशाच्च झडप घालेल आणि राजसारखाच आपलाही गळा दाबेल. एवढ्यात त्याचे लक्ष दुपारी आलेल्या फकिरबाबानी दिलेल्या ताविजावर गेले, जे त्याच्या व राजच्या गळ्यातच होत. त्याला कळून चुकले की ह्या ताविजमुळे हे पिशाच्च आम्हाला इजा पोहचवू शकत नाही, म्हणून मागासपासून ते बेडभोवती फिरतय. चेहऱ्यावर क्रोधाचे भाव आणत नीलच्या नजरेत नजर घालून पुन्हा धिम्या किळसवाण्या चालीत राजच्या बेडसमोर जाऊन पुन्हा नीलच्या बेडसमोर आले. आता काही वेळापूर्वी चेहऱ्यावर असणारे क्रोधाचे भाव एका कुत्सित हास्यात रूपांतरित झाले व त्याच चालीत पुन्हा राजच्या बेडच्या दिशेला चालू लागली. 

पण..पण राज त्याच्या बेडवर दिसत नव्हता. राज, राज? एवढ्यात त्याला त्याच्या मागून कुणाच्यातरी श्र्वाच्चोश्वासांनाचा आवाज येऊ लागला. त्याने मागे वळून पाहिले तर त्याच्याच बेडवर राज मांडी घालून घालून डोळे मिटूनच नीलकडे पाहून असुरी हास्यात हसू लागला. आता मात्र निलची इकडे आड अन् तिकडे विहीर अशी गत झालेली. नीलचं नशीब बलवत्तर म्हणून समोर ओणव्या चालीत चालणारं ते पिशाच्च नील व राजकडे पाहून रागाने गुरगुरत कुठेतरी हवेतच गायब झालं. गायब होताच मांडी घालून बसलेला राजही बेडवर कोसळला. पण यावेळी मात्र त्याला जाग आली होती. इतकं सगळं होऊनही घडला प्रकार त्याला अजिबात आठवत नव्हता. राजला त्याच्या बेडवर झोपवून स्वतःही झोपण्याचा प्रयत्न करत होता. ते ताविज देणाऱ्या फकीरबाबांचे नीलने मनातल्या मनात आभार मानले. त्याला माहिती होते की जो पर्यंत हे ताविज आपल्याकडे आहे, तो पर्यंत कोणतंही भुतप्रेत वा पिशाच्च आपलं काहीही वाकड करू शकणार नाही. झोप काही लागत नव्हती आणि तो विद्रूप चेहरा काही डोळ्यासमोरून जात नव्हता. विचारात हरवलेल्या नीलचा काही वेळाने डोळा लागला. “चला उठा आता, सूर्य डोक्यावर आलाय” असे म्हणत नीलच्या आईने दरवाज्यातून आत प्रवेश केला. जाग करूनही दोघे उठत नाही म्हटल्यावर नीलला उठवण्यासाठी म्हणून जसा तिने त्याला स्पर्श केला तसे तिच्या लक्षात आले की नील तापाने फणफणतोय.  काळजीने नीलच्या गालावर हळुवार हात फिरवून नीलला जागे केले. डोळे जड झाल्या कारणाने उघडता उघडत नव्हते. सर्वकाही अंधुकसे दिसत होते. लालबुंद झालेले निळचे डोळे पाहून ती त्याच्या काळजीने व्याकूळ झाली. क्षणाचाही विलंब न करता तीने थंड पाण्याच्या पट्ट्या निलच्या कपाळी घालायला सुरुवात केली. ताप काही उतरण्याचे नाव घेत नव्हता. 

ताप वाढतच जात असल्या कारणाने तिने आजीला व नीलच्या वडिलांना लगेच बोलावून घेतले. बाजूला चालू असलेल्या गजबजाटाने राजलाही जाग आली. वडिलांनी त्याला तापाची गोळी देत आराम करायला सांगितले. राजही नीलच्या बाजूला मांडी घालून त्याला पट्ट्या घालीत बसलेला. थोड्याच वेळात गोळ्यांना असर येऊन नीलचा ताप मोठ्या मुश्किलीने उतरत होता.  “बगलय वसंता, मी तुका सांगी होतंय, तेका ह्या घरात आणा नको. पण ह्या म्हातारीचा कोण ऐकता. अजूनय वेळ जावक नाय हा. खयच्यातरी बऱ्याश्या ह्या सगळा बघणाऱ्याक दाखय, मी सांगतय ता ऐक, नंतर पश्चात्तापाची वेळ येवक् देव नको” आजीचे म्हणणे नीलच्या वडिलांना पटले. त्यांच्या गावात हे सर्व पाहणारा त्यांच्या ओळखीत होता. सर्व विधी व बाधा उतरविण्यात तो पटाईत होता. शिवाय अनुभवाची जोड म्हटल्यावर काही प्रश्नच उरत नव्हता. ठरलं, ह्या दोघांना आता त्यांनाच दाखवायचं. त्यांनाच कॉल करायला म्हणून अंगणात बाहेर जाणार एवढ्यात त्यांना “थांबा” असा आवाज आला. तो आवाज पायऱ्या उतरत येणाऱ्या नीलचा होता. त्यांच्यासोबतच राज होता. “थांबा, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय” असे म्हणताच नीलची आई स्वयंपाकघरातून लगोलग हॉलमध्ये आली. वडिलांनी विचारल “आता काय सांगायचंय?” “सांगतो” असे म्हणत पायऱ्यांवर बसून काल मध्यरात्री घडलेला प्रसंग सांगू लागला. घरातील सर्व मंडळी तो प्रसंग स्तब्ध होऊन ऐकत होती. आजी डोक्यावर हात मारत वडिलांना म्हणाली “बघलय मा, सांगू होतंय तुका, तेका हय आणाच्या फंदात पडा नको म्हणान. बगलय मा आता ह्या काय ओढवन बसला ता”. नीलचे वडील मात्र पाठीमागे हातावर हात ठेवून दरवाज्याबाहेर पाहत बसलेले. विचारात हरवलेले. आजीचे म्हणणे पटू लागले होते त्यांना. आणि राजला इथे ठेऊन घेतल ह्या गोष्टीचा थोडा का होईना पण पश्चात्ताप ही होत होता. या सगळ्यात मात्र राजला स्वतःच दोषी असल्यासारखे वाटत होते. त्याची परिस्थिती एवढी बिकट होती की त्याला आधाराशिवाय चालताही येत नव्हते. 

वडिलांनी खिशातला फोन काढून लगेच त्या गावाकडच्या इसमाशी संपर्क साधला. काही मिनिटांचे संभाषण आटोपून मिलचे वडील घरात आले, दार बंद करून राज व नीलला आपल्या बेडरूमध्ये जायला सांगितले. व आजीला म्हणजे “तू म्हणा होतंय ता बरोबर होता. ही बाधा काय साधी सुधी नाय हा. तो फकीर बोललो ता पण बरोबर होता. उपाय बेगिन कराक नाय तर जीवार बेता शकता. तेका हय घराक बोलावलंय मी. २-३ तासात पोचतलो. म्हणा होतो आज अमावस्या आसा, आजच हेचो कायतो सोक्षमोश लावन टाकाया” वडिलांच्या तोंडून हे शब्द ऐकताच आजीच्या जीवात जीव आला. दुपारचे जेवण आटोपून सर्वजण त्या इसमाची वाट पाहू लागले. 

दुपारच्या रणरणत्या उन्हात m८० गाडीचा आवाज घराबाहेरून येऊ लागला. घराचं दार उघडुन एक वयस्क व्यक्ती घराच्या उंबऱ्यावर येऊन थांबला. “वसंत कदमांचा घर ह्याच काय?” हे ऐकताच नीलचे वडील त्यांना सामोरे गेले व त्यांनी त्यांचे स्वागत करून आत येण्यास सांगितले. बाजूची खुर्ची पंख्याखाली ओढून घेऊन त्यात त्यांना आसनस्थ होण्यास सांगितले. वर्ण सावळा, शरीरकाष्ठेनेही काटक, मध्यम उंची, साधा व मळलेला पांढरा चेक्सचा शर्ट, व काळी पँट, हातात कापडी पिशवी व पायात कोल्हापुरी पायतान. असा काहीसा पेहराव होता त्यांचा. त्यांना घरात आल्याआल्याच एक नकारात्मकता जाणवली वाटतं, म्हणून त्यांनी पिशवीत हात घालून करड्या रंगाचा राखेसारखा पदार्थ हॉलच्या चारही दिशांत उधळला. देऊ केलेले पाणी नाकारत म्हणाले “आज अमावस्येची रात्र आसा, ह्या जा काय हा त्याचो आजच कायतो सोक्षमोक्ष लावून टाकाया, पुढच्या अमावास्येची वाट बघाक तुम्ही असश्यात नसश्यात”. त्यांचे हे कटू बोल ऐकून सर्वानाच धडकी भरली. काही सामानाची यादी नीलच्या वडिलांच्या हातावर ठेऊन म्हणाले, “ह्या सामान लवकरात लवकर जाऊन आणा. आज सांजच्याकच विधिक सुरुवात कराया. आणि वसंता, घाबरा नको, जो पर्यंत मी हयात हय तोपर्यंत कोणाच्या केसाकय धकको लागुक दिवचय नाय मी. निश्चिंत जा”. त्यांना धीर देऊन त्यांनी बाबांना सामान आणावयास पाठवले. त्यांना जेवणाचे विचारले तर त्यासाठी त्यांनी साफ नकार दिला. पायरीवर बसलेला राज आणि नीलकडे एकटक पाहत बसलेले ते. व म्हणाले “चुकान पाय पडलो ह्या ठीक होता, हेच्यार छोटोमोठो उपाय कराक इलो असतो. अरे पण लाथ माराची काय गरज होती? कितीक पडला आता ह्या सगळा?” राजला दम देतच बोलले. 

स्वभावाने हळवा असलेल्या राजने त्यांचे बोलणे मनाला लाऊन घेतले. तो रडवेला चेहरा करत मान खाली घालून बसला. राजला त्यांनी त्याची जन्मतारीख, जन्मवेळ व जन्मठिकाण विचारले, जे राजने लगेच सांगितले. थोडावेळ विचार करून ते म्हणाले “तुझ्या कुंडलीत नक्षत्रांचो असो कायसो मेळ हा जेच्यामुळे तुका भुताखेता लवकर दिसतत. आणि नील, म्हणान तुका त्या रात्री निस्त्या डोळ्यांन ता दिसाक नव्हता. त्यांचे हे बोल ऐकून सर्वजण अचंबित झाले, घडलेला प्रकार यांना न सांगता कसा काय कळला, तो ही एवढ्या तपशीलवार. नीलला कळून चुकले की आपल्यासमोर जो व्यक्ती बसलाय तो सर्वसाधारण मनुष्य नसून एक सिद्धपुरुष आहे. जेव्हा त्यास हे कळले तेव्हा त्याला खूपच हायसे वाटत होते. आपण सुरक्षित हातात आहोत याची त्यास खात्री पटली. थोडावेळ आजीसोबत इकडच्या तिकडच्या गोष्टी करू लागले, काही अनुभव सांगू लागले. व बरोब्बर साडे पाचच्या सुमारास नीलच्या वडिलांच्या बुलेटचा आवाज लांबून येऊ लागला. विधीचे सर्व सामान घेऊन ते घरी येत होते. घरी येताच त्यांनी सर्व सामान त्या इसमाकडे सुपूर्त केले. ज्या घटिकेची घरातील सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते, ती घटिका अखेर आलीच. त्या इसमाने सुद्धा आपला पारंपरिक काळया वस्त्रांचा वेश परिधान करून सर्व सामान जागेवर लाऊन क्रियेस प्रारंभ केला. वर्तुळाकार रांगोळीच्या परिघेस चिकटूनच आतल्याबाजूने काढलेला तारा व त्याच ताऱ्याच्या प्रत्येक कोनांवर एक मेणबत्ती. व त्याच वर्तुळाच्या मधोमध एक अग्निकुंड. अशी काहीशी रचना केली. तो इसम एका पाटावर बसून व नील आणि राजला आपल्या समोर बसवून मंत्रांचे उच्चारण करू लागला. 

त्या अग्निकुंडात तो इसम कोणतातरी रखेसरखा पदार्थ मूठ भरून भरून टाकायचा, ज्यामुळे आगीची एक लपट उठून वर हवेत विरून जायची. क्रिया तब्बल पुढचे ३ तास चालली. ते ३ तास सर्वजण आपल्या जागेवर बसून होते. क्रिया आटोपून बरोब्बर रात्री ९ वाजता त्यांनी राज व नील यांवरून कोणतीतरी वस्तू ओवाळून काढली ज्यात फुल व आणखी काहीतरी होत जे तो इसम राज, नील व घरातील इतरांपासूनसुद्धा लपवत होता. त्यांनी ते सर्वकाही एका पुडीत बांधले व म्हणाले “तुमच्यावरचा संकट अजून संपूर्णपणे टळाक नाय हां. मी जा सांगतंय ता घेवन बाधा झालेल्या एकान कोणीतरी उताऱ्यावर पाय पडलेल्या जागेर त्याच वेळी न्हेवन अनवाणी पायान एकट्यान ठेऊन यायचा. हा पण एक गोष्ट लक्षात ठेय, घरी परतताना मात्र एकदाय मागे वळान बघा नको. ती शक्ती तुका मागे वळून बघाक प्रवुत्त करात, तुका तुझ्या घरातल्यांच्या सुद्धा आवाजात हाक मारात, पण तू मागे वळून बघायचा नाय. जर तू मागे वळान बघलस तर मग तुमचा दोघांचाय थयल्याथय राम नाम सत्य. ह्या मी तुका ताट भाषेतच सांगतंय. मग तुका मी पण वाचव शकनय नाय” हे त्यांचे बोल ऐकून नी आई तिळपापड झाली. “अस कस बोलताय तुम्ही, अहो तुम्ही तरी समजावा ना ह्यांना. तुम्ही सांगाल तेवढे पैसे द्यायला आम्ही तयार आहोत”. नीलच्या वडिलांनी त्यांना सवाल केला “आणि काही उपाय नाहीये का?” त्यावर फक्त “नाय” असे एका शब्दात बोलून आपले सामान आवरायला घेतले. “बाधा खूप वाईट पद्धतीने झाली हा, म्हणान ह्यो शेवटचो उपाय. नायतर मी कधीचा हकलवून लावलय असतय”.ते आपल सामान पिशवीत टाकतच म्हणाले. 

राज सर्वकाही खिन्नतेने पाहत व ऐकत होता. त्याला धड चालताही येत नव्हते. त्यामुळे त्याला पाठवणे शक्य नव्हते. त्यामुळे नील स्वतःहून दृढनिश्चयाने तयार झाला. वडिलांना अश्रू अनावर झाले, पण ते लपवतच नीलच्या खांद्यावर हात ठेऊन घाबरु नकोस एवढंच बोलून शांत राहिले. नीलची आई मात्र तोंडचा पदर काढतच नव्हती. “ह्या बघ, घाबरा नको, सगळा ठीक होतला. मी जो पर्यंत हयात हय तोपर्यंत रस्त्यारसून जाताना तुझ्या केसाक सुद्धा धक्को लागाचो नाय, हेची जवाबदारी माझी. फक्त तू एक काम कर, चुकान सुद्धा मागे वळान बघा नको, तुझ्या पाया पडतंय व्हयातर”. ते नीलच्या जवळ आले अन् त्याला म्हणाले, “तो तुझा रक्षण करो” असं म्हणताच नीलने त्यांना वाकून नमस्कार केला. व घरातल्या इतरांचा निरोप घेऊन नीलच्या वडिलांना घराबाहेर अंगणात बोलावले. बाहेर उंबऱ्यावर चप्पल घालताना शून्यात हरवलेल्या राजकडे पाहून त्याला जोरदार टोंबणा मारतच म्हणाले “ह्म, कोणाचे म्हशी आणि कोनाक उटाबशी” बोलून दार आपटून बाहेर निघून गेले, व बाहेर नीलच्या वडिलांशी बोलत बसले. जसं बोलण आटोपल तस आपल्या m८० वर बसून तो इसम आपल्या परतीच्या प्रवासाला लागला. सर्व चर्चासत्र होईपर्यंत १०:३० वाजलेले. नील चे वडील आत येताच म्हणाले “सुमे ताट वाढायला घे, मुल उपाशी असतील” ताट वाढायला घेतली, पण जेवणाचा एक घास कोणाच्या घश्याखालून उतरेल तर शप्पथ !!! जेवण आटोपून वडिलांनी त्या इसमाने सांगितलेल्या गोष्टींची जमावाजमाव करण्यास सुरुवात केली. ज्यात एक नारळ, शिजवलेला भात, मटण, ठेवण्यासाठी पिशव्या. त्या दोघांवरून ओवाळून काढलेली ती पुडी, व त्यांनी स्वतकडची दिलेली भातावर टाकायला एक गुलालासारखी पावडर.

सर्वसामान एकत्र करून नीलला तयार होण्यास सांगितले. व त्याच्या आईला रडू नकोस अशी सख्त ताकीद दिली, पोराचं मनोबल खचायच म्हणून. नील तयार झाला. जाता जाता राजने नीलला घट्ट मिठी मारत “मला माफ कर नील, माझ्यामुळे तुम्हा सर्वांना खूप त्रास सहन करावा लागतोय, जमल्यास माफ कर” त्यावर नील काही न बोलता घरातल्या देवाला नमस्कार करून बाकीच्यांचाही निरोप घेत अनवाणीच घराबाहेर पडला. घराबाहेर गेटपर्यंत त्याचे वडील सोडायला आले. व म्हणाले “काहीही झालं तरी येताना मागे वळून पाहू नकोस हा बाळा”. हो म्हणत डाव्या हातात मटणाची पिशवी व उजव्या हातात नारळ, भात, व पुड्यांची पिशवी घेऊन त्या अमावस्येच्या काळरात्री जीव मुठीत घेऊन त्या तिठयाकडे निघाला. रात्रीचे ११:३० वाजलेले. रोजच्या धोपटमार्गे न जाता त्याने शॉर्टकट वाटेने जायचे ठरवले. काही अंतराचा कच्चा रस्ता पार केल्यानंतर वरदळीचा डांबरीकरण केलेला तिठ्याचा रस्ता लागणार होता. कच्च्या रस्त्यावर स्ट्रीटलाईट नसल्यामुळे काही अंतर नीलला टॉर्चच्या मंद प्रकाशातच पार करावे लागणार होते. अगदी घरातही चपला घालून वावरणाऱ्या नीलला अनवाणी चालण्याची सवय नसल्या कारणाने खूपच त्रास होत होता. पण उपाय नव्हता, त्याला हे करावेच लागणार होते. त्या किर्रकाळोख्या अमावस्येच्या रात्रीची भीषणता त्यास जाणवत होती. तो त्या जीवघेण्या भयाण शांततेत शेताच्या पाणंदी वरून चालतच होता.. चालता चालता कोणीतरी आपला पाठलाग करतय अशी त्याला चाहूल लागली. पण त्याने मागे वळून पाहण्यासाठी रचलेले एक मायाजाळ होते हे त्याला कळून चुकलेले, त्याकडे दुर्लक्ष करीत तो आपल्या मार्गाने चालत राहिला. पुढे चालता चालता एका मनमोहक सुगंधाने त्याचे मन मोहवून टाकले. होय, तो सुगंध होता रातराणीचा. तो रातराणीचा सुगंध नीलच्या मनात प्रसन्नता जागृत करवून गेला. 

कच्चा रस्ता संपवून तो पक्क्या रस्त्याला लागला. तेव्हा त्याच्या कानात आजीचे बोल घुमले. “काळो कुत्रोय नसता त्या रस्त्यावर, आणि तूम्ही थय डोंबलाची शतपावली कराक गेलेलात?” खरंच, चीटपाखरुही नव्हत त्या रस्त्यावर, अगदी शब्दशः कुत्रे सुद्द्धा फिरकत नव्हते.  एवढ्यात त्याला एक हाक ऐकू आली, “नील बाळा”. तो आवाज त्याच्या आईचा होता, अगदी हुबेहूब. त्या आवाजाने रडवेला नील मागे वळून पाहणार एवढ्यात त्याला त्याच्या वडिलांचे व त्या इसमाचे शब्द कानी घुमले, “काहीही झालं तरी मागे वळून पाहायचे नाही”, “कायय झाला तरी मागे वळून बघायचा नाय” त्या हाकेकडे दुर्लक्ष करून जरा पुढे गेल्यावर “नील” ही हाक ऐकू आली. यावेळी मात्र तो आवाज त्याच्या वडिलांचा होता. नीलला समजून चुकले की हेच ते मायाजाळ. तो सावध झाला, व लक्ष न देता जाऊ लागला. आता मात्र नीलला त्या हाका अक्षरशः सतावत होत्या. कसा देव जाणे, पण त्या आवाजाचा प्रतिध्वनी त्याच्या कानात घुमत होता. हाका थांबता थांबत नव्हत्या. सलगच्या अनवाणी पायपिटीमुळे व येणाऱ्या प्रतीध्वनीचा परिणाम असा काहीसा झाला की नीलला भोवळ येऊ लागली. तो चालता चालता एका जागी थांबला व गुडघ्यावर बसला. पण दोन्ही हातात धरलेले सामान मात्र काही टेकवू दिले नाही. त्याला वाटले की आता आपला खेळ संपला. अंगात जणू त्राणच उरला नव्हता. एवढ्यात त्या हाकेंचा प्रतिध्वनी चिरत एक भरड्या आवाजात फोडलेली किंचाळी नीलला ऐकू आली. नीलने मागे वळून पाहण्यासाठी खेळलेल्या एकेक चालिना यश मिळत नसल्याने संतापून फोडलेली किंचाळी होती ती. ती ऐकून शरीरातून विजेची एक तीव्र लहर गेल्यासारखी झाली अन् गुडघ्यावरून उठून उभा राहून तिठ्याच्या दिशेने वेगात पळत सुटला. 

काही क्षणापूर्वी त्राण गेलेल्या शरीरातून पळत सुटण्याची शक्ती कशी आणि कुठून संचारली हे नीललाही कळली नाही. मागून प्रतिध्वनीतून हाका ऐकू येणं ही येवाना बंद झालेलं. पळता पळता त्याला समोर तोच तिठा दिसू लागला. जसजसा तिठा जवळ येऊ लागला, तशी त्याने आपली धावण्याची गती कमी केली. त्याला त्या तिठयाच्या रस्त्याकडेचा तो फुटपाथ व ज्या ठिकाणी तो प्रसंग घडलेला ती जागा शोधू लागला. तो त्या फुटपाथकडे आला. गुडघ्यावर हात टेकवून धापा घालू लागला. नंतर स्वतःच्याच पाठीवर शाबासकीची थाप देत धापा टाकतच “शाब्बास नील” म्हणत उतारा ज्या ठिकाणी तुडवला ती जागा शोधू लागला. जशी त्याला ती जागा मिळाली, तसा लगेच त्या जागेकडे जात सर्वप्रथम त्या इसमाने दिलेली ती पुडी खिशातून काढून त्या ठिकाणी ठेवली. व उजव्या हातातील नारळ व भाताची पिशवी फुटपाथवर ठेवून “सुटलो बाबा एकदाचे” असे म्हणत त्याने सुटकेचा निःश्वास सोडला. मागे फिरला, ३-४ पाऊल पुढे गेला, तसा त्याला ती पिशवी सरकवल्यासारखा आवाज येऊ लागला, व आपल्या मागे कोणीतरी असल्याची त्याला चाहूल लागली. तशी झपाझप पावलं उचलत तो परतीच्या प्रवासाला लागला. पुढे १५-२० पावलं चालत गेल्यावर त्याला जाणवू लागलं की आपण काहीतरी विसरतोय. विचार करता करता त्याचे लक्ष आपल्या डाव्या हाताकडे गेले, व त्याच्या अंगावर भीतीने सर्रकन काटा उभा राहिला. तो चक्क मटणाची पिशवी भाताच्या भांड्यासोबत ठेवायला विसरूनच गेलेला.  त्याक्षणी त्याला मेंदू बधीर झाल्यासारखे वाटत होते. त्याला त्या अवस्थेत काय करू हेच सुचत नव्हते. आता परत मागे वळून जायचे म्हणजे मागे वळून पहावंच लागेल. आणि जर मागे वळून न पाहता तसाच जर घरी निघून गेलो तरीही राम नाम सत्यच !!! 

पुन्हापुन्हा त्याला त्याच्या वडिलांचे व त्या इसमाचे बोल प्रतिध्वनीत ऐकू येत होते. एवढ्यात त्याला एक कल्पना सुचली. ही कल्पना त्याचा घात करुन जीवावर बेतणार याची त्याला पुरेपूर कल्पना होती पण ती एकच मार्ग होता जो त्याला यातून बाहेर काढू शकणार होता कदाचित. मागे जाऊन पिशवी ठेऊन यायचंच, पण मागे वळून न पाहता उलट्या पाऊली. जेमतेम ३० पावलांच अंतर होत. ती जागा होती फुटपाथच्या उजव्या बाजूस, म्हणजे नीलच्या डाव्या बाजूस. कल्पनेवर अंमल आणत हळूहळू धिम्या पावलांनी मागच्या दिशेने मागे न पाहता पाऊल टाकायला सुरुवात केली. त्या शांततेत स्ट्रीटलाईटच्या पिवळ्या प्रकाशात नीलला स्वतःच्याच हृदयाचे ठोके व आपल्या श्वासांचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत होता. १०-१५ पावलं मागे चालून गेल्यावर त्याला कुणाच्यातरी श्वाच्छोश्वासांचा सूक्ष्म आवाज कानावर येत होता. नीलने विचार केला की त्याच्याच श्वाच्छोश्वासांचा आवाज असेल. जसजसा मागे जात होता तशी त्या आवाजाची तीव्रता वाढत जात होती. आता मात्र नीलच्या मनात शंकेची पाल चुकचुकली, व येणारा आवाज हा स्वतःच्याच श्वासांचा आहे हे पडताळून पाहण्यासाठी स्वतःचा श्वास रोखून धरला, व त्याच्या काळजात धस्स झालं. येणाऱ्या श्र्वासांचा आवाज हा त्याच्या श्वासांचा नव्हताच मुळी. ह्या भीतीने त्याचे पाय भीतीने कापू लागले. जाग्गेवर शरीर घामाने ओले चिंब झाले. काळजाची धडधड वाढू लागली होती. पळून जाणे शक्य नव्हते. तसे केल्यावर देखील मरणार असता व तिथे राहिला तरी मरणार. इकडे आड अन् तिकडे विहीर अशी गत झालेली नीलची. मन खंबीर करून अश्या बिकट परिस्थितीतही खचून न जाता त्याने धैर्याने पिशवी जागेवर ठेवून यायचे ठरवले व थरथरत्या पायांनी मागच्या दिशेने चालू लागला. 

जसा मागे जात होता तसा तो आवाज वाढतच होता. चेहऱ्यावरचा घाम पुसत-पुसत त्याला फक्त हृदयाच्या ठोक्यांचे व त्या अज्ञात श्वाच्छोश्वासांचा आवाज ऐकू येत होता. जशी ती जागा जवळ आली तसे नीलचे कान बसले. आजुबाजूच काहीच ऐकू येत नव्हत, शिवाय त्याच्या हृदयाचे ठोके. इथपर्यंत सुखरूप पोहचलो, “हुश्श” करता करता पिशवी खाली ठेवायला म्हणून खाली वाकला आणि एकाच जागी स्थिरावून ओणवा थांबला. आपल्या उजव्या बाजूला कुणीतरी बसलय अस उजव्या डोळ्याने अंधुक दिसू लागलं. तो तसाच त्या जागी ओणवा उभा होता, त्याला ती पिशवी टाकून मागे वळून न पाहता पळून जायचे होते. त्याचे दुर्भाग्य असं की त्याला हालचाल करण्यास जमत नव्हती, जणू कुणीतरी त्याला जखडूनच ठेवलं. आपल्या उजव्या बाजूला कोण बसले आहे, हे पाहण्याची इच्छा देखील नव्हती, पण त्याची मान आपोआप त्याच्या उजव्या बाजूला फिरली जणू त्याचा मेंदू त्याच्या नियंत्रणातच नव्हता. तो कुणी दुसराच नियंत्रित करत होता. जशी त्याची मान उजव्या बाजूला फिरली तसा तो गर्भगळीत होऊन दचकूनच खाली पडला. त्याच्या देहात आतामात्र त्राण नावाची गोष्टच उरली नव्हती. मृत्यू काय आणि कसा असतो याचा प्रत्यय त्याला आलेला. आजवर केलेली सर्व वाईट कर्म त्याच्या डोळ्यासमोरून एका सेकंदाच्या अंशात गेली. त्याच्या उजव्या बाजूला तेच पिशाच्च मांडी घालून बसलेलं. आपल्या जागेवरून उठून आता ते हळूहळू नीलच्याच दिशेने सरकत-सरकत किळसवाण्या चालीत येऊ लागलं. जागेवरून हलू न शकणाऱ्या नीलच्या जवळ येऊन छातीवर बसलं. व त्याचा गळा आवळू लागलं. असहाय्य झालेल्या नीलचे त्या पिशाच्या तावडीतून सुटण्याचे प्रयत्न असफल ठरत होते. नीलला सर्वकाही अंधुक दिसू लागले, येणाऱ्या ठोक्यांचा व श्वाच्छोश्वासांच्या आवाजाचा प्रतिध्वनी वाढतच जाऊ लागला, व काही वेळाने बंद झाला. जे काही अंधुक दिसत होते ते आता पूर्णच दिसायचे बंद झालेले. सर्वत्र काळोखाचेच राज्य. कोणतीच चेतना उरली नव्हती. कोणत्यातरी वेगळ्याच आयमात गेल्या सारखे वाटत होते त्याला. जिथे काहीच नव्हते, अगदी तो स्वतःही………

“आव, उठा की आता,  तांबड बी फुटलय !!!” अंगणात खाट टाकून झोपलेल्या दाम्याला उठवतच त्याची बायको म्हणाली. हिराच्या झाडूने केर काढताना होणाऱ्या कर्कश्श आवाजाला वैतागून दामू खाटीवर उठून बसला, एवढ्यात समोरून सदा म्हणजे त्याचा मोठा भाऊ त्याला समोरून येताना दिसला. धापा टाकतच म्हणतो “आर लेका, शेजारच्या निकमांची गाडी काल रातच्याला पिठीच्या घाटात पडली, गाडी बी मिळाली नाय बग अजून” सकाळी सकाळी एवढी दुःखद बातमी ऐकून दाम्यालाही फार वाईट वाटले. राजला ही गोष्ट कळवायला हवी म्हणून त्याने राज ला कॉल केला पण फोन बंद लागत होता. नीलचाही फोन बंद येत होता. म्हणून त्याने नीलच्या घरी जाऊन राजला ही बातमी देण्याचा निर्णय घेतला. आंघोळ न करता, चूळ मारून लगेचच नीलच्या घरी निघाला. सकाळ असल्याने वातावरणात दव होते. एवढ्यात समोरून आपल्या दिशेने अग्निशामक वाहन येत असल्याचे त्याला दिसले. मनात विचार केला ,लागली असावी कुठेतरी छोठी-मोठी आग, व पुढे चालू लागला. जसा घराच्या जवळ येत होता तसा काळया धुराचा मोठ्ठा लोट आकाशाच्या दिशेने त्यास जाताना दिसला. धुराचा लोट पाहून दाम्याला अंदाज आलेलाच की कुठेतरी भीषण आग लागली असणार. पुढे आणि काही अंतर गेल्यावर समोरचे दृश्य पाहून त्याची वाचाच बसली. होय, ती आग लागलेली नीलच्या घराला. भयंकर आग होती ती. सर्वकाही जळून बेचिराख झालेले. मोलकरणीने गावभर बोभाटा केल्यामुळे शेजारच्याना एकूण अंदाज आलेलाच, की नेमक काय झालं असावं. आग विजता विजत नव्हती. 

दाम्याने शेजारच्या घरात विचारल, “हे नेमकं झालं तरी कसं?” तस त्या शेजारच्या वयस्क माणसाने जे काही त्यांना ठाऊक होत ते सर्वकाही दाम्याला सांगितल. दाम्याही सर्वकाही लक्षपूर्वक ऐकत होता. जसा दाम्या त्यांचा निरोप घेऊन गाडीवर बसणार, एवढ्यात ते वयस्क म्हणाले “जो जो ह्या प्रकरणात सामील आसा, ती त्या सगळ्यांका घेऊन जातली”. त्यांचे हे शब्द ऐकताच दाम्या जागीच खिळला. आता मात्र त्याच्या मनात भीती तरळली. कारण त्याने स्वतः त्यादिवशी नील व राजला मदत केलेली. त्याला कळून चुकले की आपलीही काही खैर नाही. ह्याच विचारात हरवल्याने गाडी चालवीताना त्याचे गाडी चालवण्यावर अजिबात लक्ष नव्हते. दोनदा अपघात होता होता राहिला. घरी पोहचल्यावर जशी गाडी अंगणात लावायला म्हणून गाडीवरुन उठला, त्याला भोवळ येऊ लागली. कशी बशी गाडी लाऊन, बायकोला हाक मारत घरासमोरील अंगणातल्या खाटिवर जाऊन बसला. डोकं बधीर झाल्यासारखं वाटत होत. देऊ केलेले साखरपाणी घटाघटा पिऊन दीर्घश्वास घेऊन मान खाली टाकून बसला. पुन्हा मान वर करताच त्याची नजर घरातील एका काळोख्या खोलीकडे गेली, तसे त्याला त्या खोलीच्या उंबाऱ्यावर एक काळी आकृती मांडी घालून बसलेली दिसली. आणि बारकाईने पाहिल्यावर दाम्याला त्याचा मृत्यू दिसू लागला. होय, ही तीच बाई होती, जिच्यामुळे अनेकांची घर उध्वस्त झाली. आता तीच दाम्यालाही घेऊन जायला आलेली, हे तिच्या विक्षिप्त हास्यातून दाम्याला कळून चुकले. विचारांचे वादळ डोक्यात फिरत होते. हृदयाचे ठोके देखील वाढलेले. थरथरत्या हातांनी तो आपल्या बायकोला काही सुचवण्याचा प्रयत्न करत होता, बायकोच्या आक्रोशाने शेजारच्या घरातील लोक देखील अंगणात जमली. आजूबाजूच्या आवाजाचा प्रतिध्वनी ऐकू येत होता दाम्याला. सूर्यदेखील बरोब्बर माथ्यावर आल्या कारणाने अंगणात रणरणित उन पडलेले. त्या प्रखर उन्हात घामाने ओलाचिंब झालेल्या दाम्याला आता सर्वकाही अंधुक दिसू लागले व हळूहळू डोळ्यासमोर काळोख व्यापू लागला. कोणतीच चेतना उरली नव्हती. होय, आता दाम्या ह्या जगात नव्हताच, कुठल्यातरी वेगळ्याच आयामात प्रवेश केलेला त्याने. ज्यात काहीच नव्हते, अगदी तो स्वतःही…… 

Leave a Reply