हा अनुभव आपल्या चॅनल चे सबस्क्राइब र राजेश परदेशी यांनी पाठवला आहे. 

१० सप्टेंबर. गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी आम्ही सगळी भावंडं आप आपल्या कुटुंबासोबत २ दिवसांसाठी कोकणात गेलो होतो. १० तारखेला पौर्णिमा होती. सकाळी ७ च्या सुमारास आम्ही काही फोर व्हीलर घेऊन सगळे निघालो. वातावरण खूप सुंदर होत. हवेत छान गारवा जाणवत होता. दोन अडीच तासांच्या प्रवासानंतर आम्ही एका हॉटेल मध्ये चहा नाश्त्यासाठी थांबलो. तिथून पुढे ताम्हिणी घाट लागणार होता. नाश्ता उरकून जरा फ्रेश झालो आणि मग प्रवास सुरू केला. घाटातून जाताना निसर्गरम्य परिसर पाहून जणू स्वर्गात असल्याचा भास होत होता. पावसाळा होऊन गेल्यामुळे सगळा परिसर हिरवागार दिसत होता जणू डोंगराने हिरवा शालू पांघरला आहे. अक्षरशः ढग जमिनीवर उतरले होते. सगळा आसमंत धुक्याने आच्छादला होता. पुढे गेल्यावर आम्हाला डोंगरावर साचलेल्या पाण्यामुळे वाहणारे लहान धब धबे दिसले. आमच्या सोबत अजूनही गाड्या पुढे चालल्या होत्या. निसर्गाचे सौंदर्य पाहून मन अगदी प्रसन्न झाले होते. आम्हा भावांच्या गाड्या एका मागो माग होत्या. जणू काही गाड्यांची शर्यतच लागली होती. दुपारी २ ते अडीच च्या दरम्यान                      आम्ही गावात पोहोचलो. माझ्या भावाने १० रूम्स बुक करून ठेवल्या होत्या. पोहोचल्या पोहोचल्या फ्रेश होऊन आम्ही जेवण केले आणि आराम करण्यासाठी आप आपल्या खोल्यांकडे गेले. दुपारची झोप झाल्यावर संध्याकाळी पाच सव्वा पाच ला चहा पिण्यासाठी बाहेर आलो. 

सगळ्यांनी चहा घेतला आणि तिथून समुद्र किनाऱ्यावर वर पोहोचलो. आमच्यातले काही पाण्यात पोहायला गेले आणि मजा मस्ती करू लागले. बऱ्याच दिवसांनी असे एंजॉय करायला मिळाले होते त्यामुळे सगळे खूप खुश होते. समुद्राला भरती होती. अंधार पडायला सुरुवात झाली तसे आम्ही पाण्यातून बाहेर पडलो. काही वेळ किनाऱ्यावर बसुन गप्पा गोष्टी केल्या आणि मग हॉटेल कडे जायला वळलो. हॉटेल अगदी च किनाऱ्याला लागून होत. त्यामुळे समुद्राच्या लाटांचा आवाज तिथपर्यंत येत होता. तास बघायला गेलं तर खूप शांत वातावरण होत. आणि त्यात आवाज होता तो फक्त समुद्राच्या लाटांचा. आम्ही रूम वर गेलो आणि काही वेळात जेवायला बाहेर आलो. जेवता जेवता पुन्हा आमच्या गप्पा सुरू झाल्या ज्या चांगल्याच रंगल्या. घड्याळाचा काटा पुढे सरकत असला तरी ही रात्र संपूच नये असे वाटत होते. तेवढ्यात माझ्या दोन भावांना म्हणजे महेश आणि नितीन ला पान खाण्याची हुक्की आली. आम्ही राहत होतो तिथे विचारले पण ते म्हणाले की या भागात एकही पान टपरी नाही. पण इथून दापोली च्या दिशेने गेलात की एखादी पान टपरी नक्की दिसेल. तितक्यात सिद्धार्थ म्हणाला “तुम्ही पान आणायला जात असाल तर औषध पण घेऊन या.” नितीन ने गाडीची चावी घेतली आणि तो, मी आणि महेश आम्ही हॉटेल बाहेर पडलो. साधारण १४ किलोमिटर अंतरावर ते गाव होते आणि आम्हाला जाताना रस्त्यात टपरी ही दिसते का ते पहायचे होते. रात्रीचे १०.३० वाजले असतील. 

गावाकडचा रस्ता असल्यामुळे स्ट्रीट लाईट असून सुद्धा नीट रस्ता दिसत नव्हता. अंधार खूपच गडद भासत होता. ११ वाजता आम्ही त्या गावात पोहोचलो. रस्त्यात एक दोघांना मेडिकल आणि टपरी कुठे उघडली मिळेल हे विचारून घेतले. पण कळले की एव्हाना दोन्हीही बंद झाले आहे. झालं. इतक्या लांब येऊन काही उपयोग नाही. फेरी आणि वेळ वाया गेला. निदान औषध तरी मिळाले असते तरी चालले असते असे वाटले. हताश होऊन नितीन गाडी चालवत होता. रस्ता अनोळखी असल्यामुळे त्रास होत होता. मोबाईल ला ही रेंज नसल्यामुळे मॅप वापरता येत नव्हता. परत येताना काही अंतर गेल्यावर कळले की आम्ही रस्ता चुकलो आहोत. गेल्या १५ मिनिटात रस्ता बदलून आम्ही कुठे भटकत होतो आमचे आम्हाला ही माहीत नव्हते. बऱ्याच वेळानंतर एक चौक दिसले आणि तिथं काही पोरं गप्पा मारताना दिसली. आम्ही त्यांच्या जवळ जाणार तितक्यात अचानक गाडी समोर एक व्यक्ती आली जी हातवारे करत आम्हाला काही सांगायचा प्रयत्न करत होती. आम्ही विचारले की “रस्ता चुकलो आहोत इथे पुढे कसे जायचे..” पण तितक्यात भावाने खांद्यावर हात ठेवला आणि मला कळायला वेळ लागला नाही की त्या व्यक्तीला बोलता येत नाहीये. तितक्यात चौकात असलेला एक मुलगा धावत आला. आम्ही त्या मुलाला रस्ता विचारून घेतला. तो म्हणाला की तुम्ही जवळ जवळ ५ किलोमिटर पुढे आला आहात. तुम्ही ज्या रस्त्याने आलात तिथून पुन्हा मागे जा आणि तिथे तुम्हाला एक पुल दिसेल तिथून उजवी कडे वळा. आम्ही त्या मुलाचे आभार मानले आणि नितीन ने गाडी वळवली. 

पुढच्या काही मिनिटांत आम्ही त्या पुला जवळ येऊन पोहोचलो. पण त्या परिसरात पाहतो तर काय.. त्या भागात एकही वळणाचा रस्ता नव्हता. त्या मुलाने सांगितल्या प्रमाणे आम्ही उजवीकडे पाहिले पण तिथे तसा कोणताही रस्ता नव्हता. त्या मुलाने आम्हाला चुकीचा मार्ग सांगितला. हळु हळु मनात भीती घर करू लागली होती पण आमच्यापैकी कोणीही चेहऱ्यावर ते दाखवत नव्हत. अधून मधून आम्हाला मोबाईल ची रेंज मिळत होती. हॉटेल मधून सगळ्यांचा फोन येत होता पण रेंज येत जात असल्यामुळे ना त्यांना आमचा आवाज येत होता ना त्यांचा आम्हाला. त्यात फक्त नितीन कडे फोन होता आणि आमचे दोन्ही फोन रूम मध्ये चार्जिंग ला ठेऊन आलो होतो. शेवटी बऱ्याच वेळाने आमचा फोन त्यांना लागला आणि आम्ही रस्ता चुकलो आहोत पण लवकरच येतो असे सांगितले. बरीच रात्र झाली होती म्हणून सगळे खूपच काळजी करू लागले. एवढ्या रात्री कशाला बाहेर जायचे, एक तर अनोळखी रस्ता. अशी चर्चा सुरू तिथे सुरू झाली होती. मी नितीन ला म्हणालो की जरा पुलाच्या पुढे जाऊन बघू, इथे असे थांबून काय करणार. रेंज मिळत नसल्याने लाईव्ह लोकेशन ही मिळत नव्हते. काय करावे काही च सुचत नव्हते. नितीन ने पुन्हा गाडी मागे वळवली. तितक्यात हलक्याशा पावसाच्या सरी सुरू झाल्या. वातावरणात गारवा जाणवू लागला. १०-१५ मिनिट झाली असतील. गाडीचा वेग कमीच होता. आम्ही आजू बाजूला पाहत होतो. गाडीच्या खिडक्या ही उघड्याच होत्या. तितक्यात कुठून तरी एक मोठा बेडूक समोरच्या काचेवर येऊन आपटला आणि आम्ही तिघेही दचकून मागे झालो. 

बहुतेक पुढे घडणाऱ्या घटनेचा तो एक इशारा होता. नितीन ने गाडी चे वायपर चालू करून त्या बेडकाला हटवले आणि आम्ही पुढे जात राहिलो. थोड्या अंतरावर आम्हाला एक रिक्षा दिसली. मी त्या माणसाला रस्ता विचारला. त्याने सांगितले की पुलाच्या उजवीकडे एक रस्ता आहे. आम्ही विचारात पडलो की या बद्दल तर त्या मुलाने ही आम्हाला सांगितले होते. पण जेव्हा आम्ही त्या पुलाजवळ गेलो तेव्हा त्या भागात कोणताही रस्ता नव्हता. मी त्या रिक्षा वाल्याला विनंती केली की आम्हाला रस्ता दाखवा जरा. तर तो म्हणाला की मला उलट दिशेला जायचे आहे त्यामुळे जमणार नाही. आणि तो उलट दिशेने निघूनही गेला. आम्ही पुन्हा एकदा गाडी पुलाकडे वळवली. तीन साडे तीन किलोमीटर मागे आलो. या वेळी पुल क्रॉस केल्यावर उजवी कडे आम्हाला रस्ता दिसला. त्या रस्त्याला वळणार तोच आम्हाला एक रिक्षा दिसली. जस जसे जवळ जाऊ लागलो तसे दिसले की तो तोच रिक्षावाला आहे जो आम्हाला मागे दिसला होता. आता मात्र आमची चांगलीच तंतरली. नितीन ने तरीही हिम्मत करून त्याच्या जवळ गाडी नेली आणि मी काही विचारणार तितक्यात तोच रिक्षावाला म्हणाला ” अरे तुम्ही कुठे गेला होतात..? मी तुम्हाला माझ्या मागे यायला सांगितले होते..” त्याच्या या वाक्याने आम्हाला त्या थंड वातावरणात अक्षरशः घाम फुटला. कारण त्या परिसरात दुसरा कुठलाही रस्ता नव्हता. गेल्या १५-२० मिनिटात आम्हाला एकही रिक्षा ओलांडून पुढे गेली नव्हती. 

त्यामुळे तोच रिक्षावाला आमच्या पुढे कसा काय आले हे कळण्याच्या पलीकडचे होते. या सगळ्या विचित्र पण तेवढ्याच भयाण प्रकाराने भांबावून गेलो होतो. एव्हाना आम्हाला कळून चुकले होते की आम्ही एका भयानक चकव्यात अडकलो आहोत. आणि यातून बाहेर पडणे वाटते तितके सोपे नाही. तितक्यात माझी नजर साईड मिरर मध्ये गेली आणि मला दिसले की तो मुका व्यक्ती मागे उभा राहून उजव्या दिशेला बोट दाखवून उभा आहे. मला काय वाटले काय माहीत मी नितीन ला म्हणालो गाडी उजव्या रस्त्यावरून घे आणि जमेल तितक्या वेगात घे. काहीही झाले तरी थांबवू नकोस. नितीन ने सांगितल्या प्रमाणे गाडीचा वेग वाढवायला सुरुवात केली. बऱ्याच वेळा नंतर आम्ही हॉटेल वर पोहोचलो. सगळे काळजी करत आमची वाट पाहत बसले होते. आम्हाला बघून सगळ्यांचा जीवात जीव आला. आम्ही घडलेला प्रकार सांगितला तसे सगळेच घाबरले. आमच्या सोबत मामी ही होती. ती म्हणाली की या गोष्टीचा प्रभाव दुसऱ्या दिवसा पर्यंत राहतो. इतके दिवस अश्या कथा ऐकून होतो पण या वेळी आम्ही प्रत्यक्ष अनुभव घेतला होता. अजूनही हा प्रसंग आठवला की अंगावर शहारे येतात. हा अनुभव मी उभ्या आयुष्यात विसरू शकणार नाही.

Leave a Reply