हि गोष्ट माझ्या वडिलांनी मला काही दिवसांपूर्वी सांगितली जी माझ्या पणजोबांबरोबर घडली होती. साताऱ्याजवळ माझे गाव आहे. त्या काळी असे म्हणायचे कि गावातल्या एका विहिरीजवळ अमावास्येच्या  रात्री भुतांची पंगत बसते. गावात हे खूप कमी जणांना माहित होते. एके दिवशी हि गोष्ट पणजोबांना कळली. ते अगदी धीट होते आणि अश्या गोष्टींना महत्व देत नसत. त्यामुळे त्यांनी या गोष्टीचा सोक्ष मोक्ष लावायचे ठरवले. 

घरी जेव्हा कळले कि पणजोबा ती पंगत बघायला जायचा विचार करत आहेत तेव्हा सगळ्यांनी विरोध केला. त्यांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण ते काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अमावस्या जस जशी जवळ येत होती तसे घरच्यांची चिंता अजून वाढू लागली.. कारण त्यांना जाण्यापासून रोखणे कोणाच्या हि हातात नव्हते. त्या दिवशी ते कोणाशीही जास्त बोलले नाहीत. रात्रीची तयारी करू लागले. त्यांनी एक वेगळाच विचित्र असा पोशाख परिधान केला होता.. फाटके कपडे, विस्कटलेले केस आणि पायात उलट्या चपला. 

मध्यरात्र उलटली आणि ते घरातून बाहेर पडले. एका हातात काठी होती आणि दुसऱ्या हातात कंदील. बाहेर गडद अंधार दाटला होता. संपूर्ण गाव निद्रेच्या आहारी गेले होते. कंदिलाच्या प्रकाशात वाट काढत ते विहिरीजवळ येऊन पोहोचले. कंदील विझवला आणि काठी तिथल्याच एका झाडामागे लपवून विहिरीशेजारी बसून राहिले. साधारण अर्धा तास उलटून गेला असेल. कसलीच चाहूल जाणवत नव्हती. शेवटी कंटाळून ते उठले आणि घराकडे जायचा निर्णय घेतला. कंदील हातात घेऊन पेटवू लागले.

अचानक आजूबाजूचे वातावरण बदलू लागले. एक थंडगार हवा पसरली. तिचा ओघ हळू हळू वाढत गेला आणि ती थंडी आता गारठवुन टाकणारी वाटू लागली. अचानक १५-२० आकृत्या अंधारातून बाहेर येत मानवी आकार घेऊ लागल्या. त्यांनी मागे वळून पहिले तर त्यांच्यासाठी आधीच कोणी तरी जेवणाची पंगत तयार करून ठेवली होती. पणजोबा विचारात पडले कि इतक्या वेळ मी इथे बसून होतो आणि या भागात कोणी फिरकले सुद्धा नाही आणि आता अचानक हि जेवणाची ताट वैगरे कुठून आली. 

पण पुढच्या क्षणी ते भानावर आले. त्या सगळ्या आकृत्या त्यांच्याकडे एक टक पाहत होत्या. त्या आकृत्यांना डोळे नव्हते होत्या त्या फक्त रिकाम्या खोबण्या अगदी खोलवर गेलेल्या. ते सगळे पणजोबांच्या बसण्याची वाट पाहत होते. तसे जाणवताच पणजोबा झटकन त्यांच्या पंगतीत जाऊन बसले. त्यांनी तिरक्या नजरेने पाहण्याचा प्रयत्न केला. आपण हिम्मत करून इथे आलो तर खरे पण आता इथून निसटणार कसे या विचाराने पणजोबा भलतेच घाबरले. एक न एक क्षण त्यांच्या अंगावर शहारे उभे करत होता. एक चूक आणि त्यांचा जीव गेलाच म्हणून समजा. 

त्यांनी ताटात होते ते खायला सुरुवात केली. पण काही वेळात एक विचित्र गोष्ट लक्षात आली कि ताटातले किती हि अन्न संपवले तरी ते संपत च नाहीये. हा प्रकार खूप भयंकर आहे याची त्यांना प्रचिती आली होती. त्यांनी जवळपास २-३ वेळा भरलेले ताट संपवले पण नजरेसमोरच पुन्हा ते ताट अन्नाने भरून जायचे. आता त्यांना सगळे अनावर झाले. आपण भर पंगतीत उठलो तर सगळ्यांना कळेल कि मी त्यांच्यातला नाही आणि मग माझे काही खरे नाही. 

त्यांना एक युक्ती सुचली. त्यांच्या सदऱ्यात एक मोठी कापडी पिशवी होती. जसे ताट भरले जायचे ते हळूच सगळे अन्न मुठीत घेऊन त्यांच्या नकळत पिशवीत भरायचे. साधारण १ तास हाच प्रकार चालू होता. आता तर पिशवी सुद्धा भरत आली होती. तितक्यात हळू हळू त्या आकृत्या उठून विहिरीकडे जाऊ लागल्या तसे पणजोबांनी सुटकेचा निश्वास सोडला. ते त्यांच्या मागोमाग उठले आणि विहिरीकडे जाऊ लागले.

पण समोर पाहतात तर काय त्या आकृत्या एक एक करत विहिरीत उडी घेत होत्या. त्यांना कळून चुकले कि आता आपण जर इथून निसटलो नाही तर आपण जीवानिशी जाऊ. दबक्या पावलांनी ते विहिरी जवळ जाऊ लागले. पण मनात सतत एकच विचार होता कि यातून बाहेर पडायचे कसे. विहिरीजवळ येताच त्यांना एक मोठा दगड दृष्टीस पडला. त्यांनी तो उचलला आणि विहिरीत टाकला असे भासवायला कि त्यांनीच विहिरीत उडी टाकली. पुढच्या क्षणी ते तिथून जिवाच्या आकांताने धावत सुटले. 

त्यांना मागून चित्र विचित्र आवाज आणि किंचाळ्या ऐकू येऊ लागल्या. पण त्यातला एक आवाज ओळखीचा होता. त्यांनी त्या आवाजावर लक्ष केंद्रित केलं आणि जाणवले कि हा आवाज दुसरा तिसरा कोणाचा नसून आपल्या नातवाचा आहे. पण अश्या वेळी मागे वळून पाहणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण हे त्यांना माहित होते. ते जीव मुठीत घेऊन पळत राहिले आणि कसे बसे घर गाठले. समोर पहिले तर त्यांचा नातू म्हणजेच माझे वडील गाढ झोपेत होते. 

या गोष्टीला जवळपास १०० वर्ष उलटली असतील. पण आजही मी गावी त्या विहिरीजवळ गेलो कि अगदी वेगळेच जाणवते. जसे ती भुतं त्या विहिरीतून मला बोलवत आहेत. 

Leave a Reply