अनुभव माझ्या सोबत बरोबर १ वर्षापूर्वी एप्रिल महिन्यात घडला होता. तारीख मला खूप नीट लक्षात आहे. २० एप्रिल. मी नुकतीच १० वी बोर्डाची ची परीक्षा दिली होती. सुट्ट्या लागल्या होत्या. वर्षभर बरीच मेहनत केली होती त्यामुळे काही दिवस सुट्टीचा आनंद अनुभवत होतो. पण मला जे. ई. ई ची परीक्षा द्यायची होती आणि त्या साठी चांगले कोचिंग क्लासेस ही लावायचे होते. पण आर्थिक परिस्थिती चांगली नसल्या कारणाने मी त्या एका कोचिंग क्लास ची स्कॉलरशिप द्यायचे ठरवले. माझी स्कॉलरशिप ची परीक्षा १० वीच्या एन सी आर टी वर होती. मी स्टेट बोर्ड चा विद्यार्थी असल्याने माझे गणित आणि विज्ञान हे विषय मी एन सी आर टी प्रमाणे शिकू लागलो, अभ्यास करू लागलो. परीक्षा २० एप्रिल ला होती.
माझ्या सोबत च एका चुलत भावाने ही त्या परीक्षेचा फॉर्म भरला होता. काही दिवसांनी हॉल तिकीट मिळाले तेव्हा परीक्षेचे सेंटर माझ्या काकांच्या गावी आले होते. त्यामुळे २ आठवड्यापूर्वी च मी तिथे जाण्याचे ठरवले. सगळी पुस्तकं आणि इतर आवश्यक ते सामान घेऊन मी काकांच्या गावी पोहोचलो. मी आणि माझा चुलत भाऊ दोघं मिळून अभ्यास करायचो. म्हणजे त्याला काही अडले की तो मला विचारायचा आणि मला काही अडले की तो मला मदत करायचा. घरी अभ्यास नीट होत नव्हता म्हणून आम्ही जवळच्या अभ्यासिकेत जाऊ लागलो. ग्रंथालय वजा अभ्यासिका होती ती. एका जुन्या पडक्या घरात. घराची थोडीशी डागडुजी करून आत अभ्यासिका तयार केली होती. तिथे माझा खूप चांगला अभ्यास होत असे कारण आजू बाजूचे वातावरण खूप च शांत असायचे. मी आणि माझा चुलत भाऊ सकाळी लवकर म्हणजे ६ च्या च दरम्यान उठायची आणि ७ वाजे पर्यंत सगळे आटोपून अभ्यासिकेत जायचो.
काकांच्या घरापासून ती अभ्यासिका जवळपास अर्धा किलोमीटर वर होती. सकाळी गेलो की फक्त जेवण करण्यासाठी घरी यायचो आणि पुन्हा मग तिथे जायचो जे थेट संध्याकाळी घरी यायचो. संध्याकाळी ७ ला ती अभ्यासिका बंद होत असे त्यामुळे नंतर घरी येऊन आम्ही अभ्यास करायचो. आधी म्हंटल्याप्रमाणे अभ्यासिका एका जुन्या घरात होती जिथे पूर्वी सार्वजनिक ग्रंथालय होत. परीक्षेला अवघे १० दिवस राहिले होते त्यामुळे मी माझ्या भावाला म्हणालो की आपण अभ्यासिकेत रात्री उशिरा पर्यंत थांबून अभ्यास करू म्हणजे नीट अभ्यास होईल. त्या दादा ला विनंती करून बघू की तो चावी देतो का. त्यावर तो म्हणाला की काही गरज नाही आपण घरीच अभ्यास करू. कशाला कुठे रात्री अपरात्री थांबायचे.
पण मला त्याच काही ऐकायचं नव्हत कारण ती अभ्यासिका मला खूप आवडली होती, तिथले शांत वातावरण वेगळेच वाटायचे. मागच्या बाजूला एक छोटीशी बाग आणि त्या मागे घनदाट झाडी होती. माझ्या हट्टापुढे माझ्या चुलत भावाने ही माघार घेतली. पण मला पुसटशी कल्पनाही नव्हती की या हट्टाची किती मोठी किंमत चुकवावी लागणार होती. दुसऱ्याच दिवशी संध्याकाळी निघताना माझ्या चुलत भावाने त्या दादाकडे चावी साठी विनंती केली. पण त्यावर तो म्हणाला की माझे ऐका इथे रात्री थांबणं जरा धोकादायक ठरू शकत. मी जरा कोड्यात च पडलो की त्याने असे का सांगितले असावे. कसला धोका असेल इथे ? मी त्याला विचारण्याचा प्रयत्न केला पण त्याने सांगायला टाळाटाळ केली. मी सुद्धा त्या गोष्टीकडे जास्त लक्ष न देता चावी द्यायला त्याला मनवू लागलो आणि शेवटी बऱ्याच वेळानंतर तो तयार झाला.
त्याने आम्हाला चावी दिली आणि जाताना अचानक थांबून सांगितले “ रात्री अभ्यासिके च्या मागच्या दरवाज्याजवळ अभ्यासाला बसू नका..” त्याच्या बोलण्यावर आम्हा दोघांनीही होकारार्थी मान डोलावली. मी पुन्हा विचारात पडलो की दादा असे का बोलला असावा. पण नंतर वाटले की मागच्या बाजूला गार्ड झाडी आहे आणि तिथून साप वैगरे आत येत असेल म्हणून तसे म्हणाला असावा. आम्ही काही वेळ थांबून रात्रीचे जेवण करायला घरी आलो. जेवण उरकून पुन्हा तिथे अभ्यासाला जायचे होते. आणि आज पहिल्यांदा रात्री तिथे जाणार होतो. पण जाण्याआधी काकांची परवानगी घ्यावी लागणार होती. सुरुवातीला त्यांनी आम्हाला तिथे जायला साफ नकार दिला. पण मी काकांचा लाडका होतो म्हणून माझ्या हट्टापायी ते जास्त काही बोलले नाहीत.
पण त्यांनी ही दादा सारखी एक ताकीद दिली की मागच्या दरवाज्या जवळ बसू नका, आणि उघडायला वैगरे जाऊ नका. मी त्यांच्या बोलण्याकडे जरा दुर्लक्ष च केलं. जेवण झाल्यावर आम्ही अंगणात शतपावली करत होतो तेव्हा मी सहज भावाला विचारले की सगळे आपल्याला अभ्यासिकेत रात्री जायला विरोध का करत आहेत.? पण त्याच्याकडे उत्तर नव्हते किंवा कदाचित त्याने उत्तर देणे आवर्जून टाळले. काही वेळ अंगणात शतापवली करून झाल्यावर आम्ही तिथे जायला निघालो. १०-१५ मिनिटात तिथे पोहोचलो, कुलूप उघडले. अभियासिके ची वेळ ७ असल्याने साहजिक च आमच्या दोघांशिवाय कोणीही नव्हत आणि येणार ही नव्हत. त्या रात्री अगदी मनासारखा अभ्यास झाला आणि मी खूप खुश होतो. पुढचे ८ दिवस रात्री १ पर्यंत अभ्यास करायचो अभ्यासिकेत आणि मग झोपायला घरी यायचो.
इतर दिवसां प्रमाणे आम्ही त्या दिवशी ही अभ्यासिकेत गेलो. २ अडीच तास अभ्यास झाल्यावर मला ५ मिनिट ब्रेक घेऊन गाणी ऐकायची सवय आहे. त्यामुळे ११.३० च्या दरम्यान मी जागेवरून उठलो आणि असाच फिरत गाणी ऐकू लागलो. फिरत फिरत नकळतपणे मी मागच्या दरवाज्याकडे गेलो आणि तिथे एका खुर्चीवर बसलो. मोबाईल वर मंद आवाजात गाणं सुरू होत. काही वेळ तसाच बसून राहिलो. १० मिनिट झाल्यावर मी उठलो आणि गाणं बंद केलं. तसे मागच्या दारावर थाप पडली. मला वाटले की वाऱ्यामुळे दरवाजा हलला असावा म्हणून तसे जाणवले असेल. कारण तो लाकडी जुन्या काळातला दरवाजा होता. मी लक्ष न देता तिथून जाऊ लागलो तसे पुन्हा एक जोरात थाप पडली.
मला कळले की कोणी तरी आहे मागच्या बाजूला. मी पुढे जाऊन ते दार उघडणार तितक्यात भावाची हाक ऐकू आली आणि मी त्याच्या डेस्क जवळ गेलो. त्याला एक गणित अडलं होत म्हणून त्याने मला हाक दिली होती. विचारल्यामुळे ते सोडवत बसलो आणि काय घडलं ते त्याला संगायचेच विसरलो. पुढचा एक सव्वा तास आम्ही अभ्यास करत बसलो. साधारण १.०५ ला आम्ही उठलो आणि घरी जायची तयारी करू लागलो. तिथून बाहेर निघालो आणि जसे कुलूप लावणार आत खुर्ची पडण्याचा आवाज आला. मी पटकन आत गेलो, लाईट लावले आणि कुठून आवाज आला ते पाहू लागलो. काही कळते ना कळते तोच मागच्या दारावर पुन्हा थापा पडू लागल्या. आणि जश्या त्या थापा थांबल्या तसे मांजर ओरडण्याचा आवाज येऊ लागला. जणू दरवज्या पलीकडे कोणी तरी आहे. माझा भाऊ बाहेर उभा होता म्हणून त्याने काही ऐकले नसावे. माझी पावलं नकळत त्या दरवाज्याकडे वळू लागली.
तितक्यात माझा भाऊ आत आला आणि मला हाक देत भानावर आणले. तसे पुन्हा त्या दरवाज्यावर थापा पडल्या. आम्ही दोघं ही एकमेकांकडे पाहू लागलो. माझा भाऊ फक्त एकच वाक्य म्हणाला “ चल इथून.. “. मला ही घडणाऱ्या गोष्टी साध्या वाटत नव्हत्या. आम्ही बाहेर जायला मागे वळलो तशी लाईट गेली. त्या अभ्यासिकेत गडद अंधार पसरला. आणि त्याच सोबत सगळ काही एकदम शांत झालं. मी खिशातून मोबाईल काढला आणि फ्लॅश लाईट सुरू केला. तितक्यात मागच्या दरवाज्यातून रडण्याचा आवाज येऊ लागला, जो एका बाईचा होता. भीती ने माझी पावलं जागीच खिळली.. आणि पुढच्या क्षणी एक वाक्य कानावर पडलं “ कुठे चाललात.. मला पण सोबत घेऊन चला.. “ आवाज ऐकून मी झटकन मागे वळलो आणि फ्लॅश लाईट त्या दरवाज्याकडे फिरवला. तसे जाणवले की त्या बाजूच्या खिडकीत एक बाई सदृश्य आकृती आम्हालाच पाहत आहे.
तो भयाण प्रकार पाहून माझा पायाखालची जमीनच सरकली. माझ्या भावाने माझा हात खेचत च मला बाहेर आणले आणि आम्ही दोघं ही जिवाच्या आकांताने घराकडे धावत सुटलो. तिथून वेदनेने भरलेल्या किंचाळ्या ऐकू येत होत्या. आम्ही कसे बसे घरी पोहोचलो, घाबरलो असल्यामुळे झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळीच जाऊन अभ्यासिकेची चावी त्या दादाला देऊन टाकली. त्याला आम्ही काहीच बोललो नाही आणि त्याने काही विचारले ही नाही. नंतर गावात विचारपूस केल्यावर कळले की त्या अभ्यासिके च्या मागे एक पडकी विहीर आहे. पूर्वी तिथे राहणाऱ्या कुटुंबातील एका स्त्री ने नवऱ्याच्या जाचाला कंटाळून त्या विहिरीत उडी मारून जीव दिला होता. घरच्यांना वाटले की ती घरातून निघून गेली पण नंतर काही दिवसांनी जेव्हा प्रेताचा वास यायला लागला तेव्हा कळले की ती विहिरीत मरून पडली आहे.
त्या दिवसापासून तो मागचा दरवाजा नेहमी बंद असतो, कोणी कधी उघडत नाही की कधी त्याच्या जवळ जात ही नाही. गावातली लोक म्हणतात की तिचा आत्मा तिथेच अडकून पडलाय..