अनुभव – अपूर्वा बापट

साधारण 2 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी graduation च्या 2nd year ला होते. भूत वैगरे या गोष्टींवर विश्वास असा नव्हता पण कुतूहल मात्र लहानपणा पासूनच होते. माझ्या मित्र-मैत्रिणींनाही माझ्यासारखेच खूप कुतूहल वाटायचे. आम्ही कुठेही गेलो किव्हा कधीही एकत्र night out ला असलो की आमच्यात भुतांच्या गोष्टी रंगायच्या. 

एकदा असाच आमचा केळवे बीच ला जायचा प्लॅन झाला. दिवस भर बीच वर मजा मस्ती करून आम्ही रात्री पालघर ला एका मैत्रिणी च्या नातेवाईकांकडे थांबलो. आम्ही एकुण 9 जण होतो म्हणून त्यांनी आम्हाला जवळची च गेस्ट रूम रहायला दिली. रात्री जेवणं आटपून आम्ही साधारण 11 वाजता रूम मध्ये आलो. सगळे दमले असूनही कोणालाच झोप येत नव्हती कारण मित्र जमले की मजा मस्ती सुचणारच.

नेहमीप्रमाणे अंताक्षरी आणि पत्ते खेळत बसलो पण काही वेळाने सगळेच कंटाळले. तितक्यात एका मित्राने सुचवले की चला नेहमी प्रमाणे आपण भुतांच्या गोष्टी करू.. लगेचच माझी मैत्रीण जिच्या घरी आम्ही रहायला गेलो होतो ती म्हणाली की इकडेच मागे एक जुनी शाळा आहे आणि तिथे भुताचा वावर आहे असे बरेच लोक म्हणतात.

आम्ही सगळे लगेचच म्हणालो “चला जाऊया मग तिकडे”.. सगळ्यांचे एकमत झाले होते त्यामुळे सर्व जण पटकन तयार झाले. निघताना सहज घडाळ्याकडे लक्ष गेले तर 2 वाजून गेले होते. आम्ही रूमबाहेर पडलो आणि त्या जुन्या शाळेच्या दिशेने चालायला सुरुवात केली. रस्त्यावर खूपच काळोख होता म्हणून आम्ही सगळ्यांनी मोबाईल च्या टॉर्च चालू केल्या. सगळे अतिशय गपचूप आवाज न करता चालत होतो. साधारण 10 मिनिटानंतर आम्ही त्या शाळेजवळ येऊन पोहोचलो. 

अंधार असल्यामुळे जास्त काही दृष्टीस पडत नव्हते पण ती शाळा खूपच जुनी आणि मोडकळीस आली होती. इमारतीचा काहीसा भाग तुटून खाली पडला होता. शाळेला एक गेट होता पण तो पूर्ण बंद होता. शाळेच्या अर्धवट तुटलेल्या भिंती त्या रात्री अतिशय भयाण वाटत होत्या. आम्हाला गेट मधून आत शिरणे शक्य नव्हते म्हणून आम्ही भिंत चढून आत जायचे ठरवले. पण भिंत अपेक्षेपेक्षा जरा जास्तच उंच होती आणि आम्हा मुलींना चढणं अशक्य होतं. 

बरेच प्रयत्न करून शेवटी आम्ही आत जायचा नाद सोडला आणि पुन्हा रूम वर जायचे ठरवले. सगळे जण काहीसे हताश झालो होतो पण एकमेकांची मस्ती करत आम्ही रूम जवळ येऊन पोहोचलो. रूमच्या बाहेर येऊन आम्ही सगळे थांबलो आणि आता सगळ्यांची झोप उडाली होती. सगळे जण एक गोल करून उभे होतो आणि त्या मोडकळीस आलेल्या शाळे बद्दल बोलू लागलो. 

इतक्यात आमच्यातला एक मुलगा अचानक शांत झाला आणि त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले. त्याला पाहून आम्ही विचारले “काय झाले ?”. त्याने माझ्याकडे बोट दाखवले. मी आणि माझ्या बाजूला उभ्या असलेल्या मित्र मागे वळून पाहू लागलो. मागे वळून पाहताच आमची दातखीळ च बसली आणि अंगावर सर्रकन काटा येऊन गेला. आमच्या मागे एक अतिशय वृद्ध बाई उभी होती. जुनी साडी, हातात एक काठी, तिच्या पायाला बहुतेक खूप जखम झाली होती आणि त्यातून सतत रक्त वाहत होत. 

आम्हाला कळत नव्हते की हा नक्की काय प्रकार आहे. इतक्या रात्री ही म्हातारी बाई इथे आमच्या मागावर येऊन काय करतेय. आम्ही खुपच घाबरलो होतो. इतक्यात एका मित्राने विचारले “अहो आजी, तुम्ही इतक्या रात्री इकडे कश्या” हे ऐकताच ती म्हातारी मित्रावर जोरात काठी घेऊन धावून गेली. आम्ही खूप च थरारलो. ती अतिशय रागात कण्हत म्हणाली ” तुम्ही इकडे का आलात, मला माहितीये तुम्ही काय करत आहात, जा इकडून, निघून जा, नाहीतर मी सोडणार नाही कुणालाच”. 

तिचा तो विचित्र आवाज ऐकून आणि तिचे भयाण रूप पाहून आम्ही सगळे जोरात ओरडलो. आमच्या ओरडण्याने आजू बाजूचे कुत्रे अचानक भुंकयला लागले. ते कुत्रे त्या म्हातारी वर धाव घेऊ लागले. ती म्हातारी पाउल मागे टाकत कुत्र्यांचा प्रतिकार करत होती आणि काही अंतरावर गेल्यावर ती अचानक नाहीशी झाली. आम्ही घाबरलेल्या अवस्थेत एका बाजूला थांबून एकमेकांचा हात पकडून घडत असलेला सर्व प्रकार पाहत होतो. 

आम्ही सर्व फक्त त्या दिशेने बघतच राहिलो. घडलेला प्रकाराने सगळ्यांनाच मोठा झटका बसला होता. काही वेळानंतर आम्ही काहीही न बोलता रूम मध्ये आलो आणि सरळ झोपून गेलो. सकाळ झाली आणि आम्ही आपआपल्या घरी जायला निघालो. कोणीही कोणाशी काहीच बोलायला तयार नव्हते. आजही आम्ही एकत्र कधी भेटलो तरी तो घडलेला भानायक प्रसंग आठवतो, त्या बाईचे ते भयाण रूप आठवते आणि आमच्या अंगावर शहारे येतात. आज पर्यंत घडलेला प्रकार आम्ही आमच्या ग्रुप पुरताच ठेवला होता आणि कोणालाही सांगितला नव्हता. या जगात अश्या काही विचित्र गोष्टी ही अस्तित्वात आहेत यावर मात्र माझा विश्वास बसला.

Leave a Reply