अनुभव – वर्षा ठाकूर
अनुभव माझ्या बहिणी सोबत घडला होता. प्रसंग काही वर्षांपूर्वीचा आहे. माझ्या ताईचे तेव्हा नुकतेच लग्न झाले होते. आणि लग्नानंतर ताई आणि भाऊजी फिरायला कुलुमनाली येथे गेले होते. थोडी घाई झाल्यामुळे लॉज वैगरे तिथेच गेल्यावर बुक करू असे ठरले. प्रवास ट्रेन ने करणार असल्यामुळे त्यांना तिथे पोहोचायला रात्र झाली. स्टेशन वरून बाहेर आल्यावर त्यांनी आधी एका हॉटेल मध्ये जेवण केले. नंतर तिथेच विचारून एक लॉज बुक केले. आधीच उशीर झाल्यामुळे ते लॉज चांगले आहे की नाही हे बघायला त्यांना वेळ नव्हता. सामान घेऊन ते त्या लॉज वर पोहोचले, चेक इन केले आणि रूम मध्ये आले. ते लॉज खूप जुने होते आणि तिथे जास्त रूम बुक असतील असे ही वाटत नव्हते.
कारण त्यांना त्यांच्याशिवाय दुसरे कोणीच दिसले नाही. पण कदाचित खूप रात्र झाली होती म्हणून असेल असे त्यांना वाटले. ट्रेन चा कंटाळवाणा प्रवास करून ते दोघे ही थकून गेले होते म्हणून पडल्या पडल्या त्यांना गाढ झोप लागली. तो परिसर शांत झाला होता. वेळेचं माहीत नाही पण ३ वाजून गेले असावेत. रूम मध्ये आवाज होता तो फक्त घड्याळाच्या पडणाऱ्या सेकंद काट्याचा. तितक्यात अचानक ताई ला जाग आली. नकळत तिची नजर बेड च्या खालच्या बाजूला तिच्या पायांकडे गेली. आणि ती खाडकन उठून बसली. कारण तिच्या पायांजवळ एक लहान मुलगी बसली होती. हिरवं परकर पोलक घालून. मान खाली घालून बसल्यामुळे तिचा चेहरा नीट दिसत नव्हता. तिने भाऊजी ना उठवायचा प्रयत्न केला पण भीती मुळे तिची वाचाच गेली होती.
ती भाऊजी ना उठवायचा अतोनात प्रयत्न करू लागली. ते ही प्रवास झाल्यामुळे खूप थकले होते त्यामुळे अगदी गाढ झोपेत होते. ताई इतकी घाबरली होती की तिला खूप जोरात ओरडा वेसे वाटत होते पण तिच्या तोंडातून शब्द च फुटत नव्हता. ती बराच वेळ प्रयत्न करत राहिली पण काहीच फायदा झाला नाही. शेवटी भाऊजी ना कसे बसे हलवून तिने उठवले आणि समोर इशारा करून सांगू लागली की तिथे कोणी तरी बसलं आहे. भाऊजी ना काही कळलं नाही म्हणून ते तिला विचारू लागले की काय झालं, तू बोलत का नाहीये फक्त हातवारे का करत आहेस. पण भीती मुळे ताई ला बोलतच येत नव्हत. तसे भाऊजी नी उठून रूम मधला लाईट लावला. तसे अचानक ती मुलगी दिसेनाशी झाली.
तेव्हा कुठे ताई च्या तोंडून शब्द बाहेर पडला. भाऊजी नी तिला कसे बसे शांत केले, पाणी प्यायला दिले. काही वेळा नंतर ताई ने घडलेला सगळा प्रसंग सांगितला. पण भाऊजी ना तिच्यावर विश्वास बसला नाही, ते तिला समजावू लागले की तुला भास झाला असेल. पण ताई काही ऐकायला तयार नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळीच त्यांनी ते लॉज सोडले आणि चेक आऊट करताना ताई ने न राहवून त्या स्टाफ ला सगळे सांगितले. पण त्यांनी ही तिच्यावर विश्वास ठेवला नाही. ताई ने ही तो विषय सोडून गेला. पण आज ही तिला तो प्रसंग आठवला की भीतीने अंगावर काटा येतो. अजूनही त्या रात्री काय घडले ते तिला समजले नाही, तिथे तिच्या पायांजवळ खरंच कोणी मुलगी बसली होती की तो फक्त तिचा एक भास होता..?