अनुभव – आदर्श म्हात्रे

अनुभव मला साधारण २ वर्षांपूर्वी आला होता. मला हाय किंग ला जायची आवड आहे. कधी ग्रुप सोबत तर कधी एकट्याने ही मी हाय किंग करायला जात असतो. कारण प्रत्येक वेळी ग्रुप तयार असेलच असे नाही. तर मी एकदा हायकिंग साठी आमच्या गावातील द्रोणगिरी डोंगरावर गेलो होतो. पावसाळ्याचे दिवस होते. त्यामुळे पावसाची रीप रीप सुरूच होती. आणि अश्याच वातावरणात हाय किंग करायला जायची खरी मजा असते. मी जास्त विचार न करता आवश्यक ते सामान घेऊन एकटाच निघालो. काही वेळात मी डोंगराच्या माथ्यावर जाऊन पोहोचलो. उंचावरच वातावरण खूप आल्हाददायक होत. साहजिक च वाऱ्याचा प्रवाह जास्त जाणवत होता पण त्यामुळे सगळा परिसर खुलून निघाला होता. थोड्या वेळ निसर्गाच्या सानिध्यात तिथेच बसलो. सोबत आणलेले स्नॅक्स खाल्ले.  पण तो परिसर, ते वातावरण इतकं छान होत कि तिथून निघायची माझी इच्छा च होत नव्हती.

मी इतका मग्न झालो कि बरेच तास तिथेच बसून राहिलो. याच वेळात कधी तरी पाऊस ही थांबला. बघता बघता संध्याकाळ झाली. वेळ पाहिली तर साडे पाच झाले होते. मी आवरून तिथून निघण्याची तयारी करू लागलो. डोंगर उतारायला सुरुवात करतच होतो तितक्यात मला काही लोकांच्या बोलण्याचा आवाज येऊ लागला. वारा असल्यामुळे मला आवाजाची दिशा कळायला वेळ लागला नाही. उतारावर एका बाजूला 2-3 मोठी झाडे होती. आवाज त्याच्या मागून येत होता. कुतूहल म्हणून मी त्या आवाजाच्या दिशेने चालत गेलो कोण आहे ते पाहायला. मी जस जसे त्या आवाजाचा माग काढत पुढे जाऊ लागलो तसे तो आवाज नीट ऐकू येऊ लागला. तो आवाज साध्या बोलण्याचा नव्हता तर काही लोकांच्या एकत्र मंत्र पुट-पुटण्याचा होता. पण मला ती भाषा कळत नव्हती. मी अलीकडच्या एका मोठ्या दगडाचा आडोसा घेऊन त्या भागात डोकावून पाहू लागलो. 

मी जे दृष्य बघितले ते पाहून माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. जणू एखाद्या स्वप्नागात मला वाटू लागले. तिथे 2-3 नाही तर तब्बल 6 जण होते. ते सगळे एका वेगळ्याच भाषेत मंत्र पुतपुटत होते. त्यांनी पांढऱ्या रंगाची वस्त्र परिधान केली होती. गळ्यात हिरव्या मण्यांचा हार घातला होता. आणि या सगळ्यात भयंकर गोष्ट म्हणजे ते सहा जण जमिनीपासून साधारण एक फूट हवेत तरंगत होते. ते ज्या भागात होते तिथले गवत त्रिकोणी आकारात जळलेले होते. हा इतका विचित्र आणि भयाण प्रकार मी पहिल्यांदाच पाहत होतो.

त्यामुळे मी इतका घाबरलो कि तिथून पाळायला मी झटकन मागे वळलो तर त्यांच्यातला एक जण अचानक माझ्या समोर उभा दिसला. तो अगदी माझ्या जवळ उभा होता. कदाचित त्यांना माझी चाहूल लागली असावी. मला काही कळणार तितक्यात त्याने घट्ट आवळलेली हाताची मूठ माझ्या समोर धरली आणि उघडली. त्यात असलेली हिरव्या रंगाची राख माझ्या चेहऱ्यावर फुंकली आणि मी जागीच बेशुद्ध पडलो. जाग आली तेव्हा मी डोंगराच्या पायथ्याशी पडलो होतो. मी उठून तसाच घरी निघून आलो. आज पर्यंत मी ही गोष्ट कोणालाच सांगितली नव्हती. मी जो प्रसंग अनुभवला तो नक्की काय होता, ती लोकं कोण होती, तिथे काय करत होती या बद्दल मला काहीच माहित नही. आणि ते माहित करून घेण्याचा मी प्रयत्न ही कधी केला नाही. कदाचित तो एखाद्या रिच्युअल, काळ्या जादूच्या विधी असावा.. 

Leave a Reply