अनुभव – मन्या शार्दूल
काही दिवसांपूर्वी घरी असेच फॅमिली गेट टुगेदर ठेवण्याचे नक्की झाले. आमच्या सगळ्या नातेवाईकांना घरी बोलावण्यात आले. सुट्टीचा दिवस होता त्यामुळे जवळपास सगळे नातलग घरी यायला तयार झाले. त्या दिवशी संध्याकाळी 6 ते 7 च्या दरम्यान सगळे घरी जमले. गप्पा सुरु झाल्या आणि बघता बघता जेवणाची वेळ झाली. दहा साडे दहा ला सगळी जेवण आटोपली आणि मग आम्ही सगळे जण बाहेर अंगणात गोष्टी करत बसलो. रात्र झाली होती त्यामुळे भूतांच्या गोष्टी सुरु झाल्या. एक एक करत सगळे आपला अनुभव सांगू लागले. मीच नाही पण इतरही खूप मन लावून ऐकत होते. पण जेव्हा माझ्या वडिलांनी त्यांचा अनुभव सांगायला सुरुवात केली तेव्हा मात्र सगळे च गप्प झाले. ते एके दिवशी रात्री उशिरा पर्यंत काम करत होते त्यामुळे निघायला उशीर झाला. रात्रीचा एक वाजून गेला होता.
आमच्या गावात येताना वेशी वर नदी लागते आणि अगदी नदी काठाहून रस्ता जातो. त्या भागातून येत असताना त्यांना कसलासा आवाज ऐकू आला. त्या रात्री नदीच्या काठावर एक प्रेत जळत होत. बहुतेक आमच्या किंवा शेजारच्या गावात मयत झालं होत. सगळा परिसर शांत होता त्यामुळे चितेच्या जळण्याचा आवाज त्यांना अगदी स्पष्ट येत होता. आश्चर्य म्हणजे त्या जळणाऱ्या चितेजवळ कोणीही माणसे दिसत नव्हती. कदाचित कोणी थांबलं नसावं असा विचार करून ते जास्त लक्ष न देता पुढे जाऊ लागले. तितक्यात त्यांना जाणवले कि त्या पेटत्या चितेवर कसलीशी हालचाल जाणवतेय. तसे ते त्या दिशेला निरखून पाहू लागले आणि त्यांना दिसले कि त्या जळत्या चितेवर जे कोणी होत ते आता उठून बसलय. ते दृष्य पाहून त्यांची पावलं जागीच खिळली.
बघता बघता ते प्रेत चिते वरून खाली उतरलं आणि थेट त्यांच्या दिशेने चालत येऊ लागलं. ते काळीज पिळवटून टाकणारे भयाण दृष्य पाहून बाबा भीती ने थरथरु लागले. त्यांनी मदती साठी आजू बाजूला नजर फिरवली पण त्या परिसरात त्यांच्या शिवाय दुसरे कोणीही नव्हते. त्यांनी पुन्हा त्या चितेच्या दिशेने पहिले तर या वेळेस तिथे कोणीही नव्हते. फक्त चिता पेटत होती. क्षणाचाही विलंब न करता ते थेट घरी निघून आले. ते प्रचंड घाबरले होते. आजीने वडिलांना देवाचा अंगारा लावला आणि तेव्हा कुठे वडिलांना बरे वाटले. हा भयानक प्रसंग त्यांच्या तोंडून ऐकल्यावर माझ्या सोबत आमचे अनेक नातेवाईक निशब्द झाले होते. त्या नंतर कोणीही कोणताही अनुभव सांगायची हिम्मत केली नाही. कारण बहुतेक सगळेच हा प्रसंग ऐकून अस्वस्थ झाले होते.