अनुभव – निनाद सावंत

ही घटना साधारण २००७-२००८ च्या मे महिन्यातली आहे. मी कोकणात माझ्या गावी गेलो होतो. माझ्या गावातील अनेक उत्सव जसे होळीच्या दिवशीचा हुडा, भवानीमातेचा गोंधळ, गावदेवीचा वाढदिवस हे खूप प्रसिद्ध आहेत. आणि त्यासाठी मुंबईवरून चाकरमानी गावात जातात. गोवा, कर्नाटक, कोल्हापूर इथूनही अनेक लोकं हे उत्सव बघण्यासाठी गर्दी करतात. असाच अजून एक उत्सव म्हणजे “देवपण”. हे देवपण दर ३ वर्षांनी एकदा होत असतं आणि खरंतर हा आमच्या कुटुंबाच्या गृहदैवताचा उत्सव आहे. हा देव नवसाला पावत असल्याने अनेक लोक या उत्सवाला दूरवरूनही येतात. बरीच गर्दी असते.

         हे देवस्थान गावापासून थोडसं आत, जंगलात आहे. तिथेच हा उत्सव होतो. दुपारपासून नवस बोलणे, नवस फेडणे हे कार्यक्रम सुरु होतात. एकीकडे जेवण बनवणे सुरू असते. ही सर्व कामे पुरूषमंडळीच करतात. तिथे बायकांना यायला मनाई असते. रात्री तिथेच जेवणाच्या पंगती बसतात. देवाचा प्रसाद म्हणून हे जेवण असतं. सगळ्यांचं जेवण उरकल्यावर हे जेवण गावात आणलं जातं आणि मग बायका जेवतात. त्यावर्षीही देवपणासाठी आम्ही गावी गेलो होतो. उत्सव झाला. रात्री साधारण १०-१०.३० च्या सुमारास आम्ही जेवलो. आमचे इतर नातेवाईक त्या रात्री गावातच थांबणार होते. पण आम्ही मात्र आमच्या घरी जायला निघालो. तिथून आमचे घर साधारण ४ ते ४.५ किमी आहे. आमच्याकडे स्वतःचे वाहन नव्हते. शेवटची बसही निघून गेलेली आणि रिक्षा वगैरेही मिळत नव्हती. म्हणून आम्ही चालत जायचं ठरवलं.

            मी, माझे वडिल, माझा धाकटा काका आणि माझ्या आत्तेचे मिस्टर असे आम्ही चौघे होतो. जंगलातून गावात आणि गावातून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर आम्ही आलो. तेव्हा साधारण ११.३० वाजले असतील. गप्पा मारत, मजामस्करी करत आम्ही चालत होतो. मे महिना असला तरी रात्रीची वेळ आणि निसर्गसंपन्न गाव असल्याने हवा आल्हाददायक होती. थोडासा चंद्रप्रकाशही होता. पण इतरत्र अंधार आणि आजूबाजूला मोठमोठे वृक्ष होते आणि त्यामधून जाणार्या त्या शांत डांबरी रस्त्यावरून आम्ही निघालो होतो. माझा काका आणि माझ्या आत्तेचे मिस्टर पुढे चालत होते आणि त्यांच्या मागे सुमारे ६ ते ८ फुटांवर मी आणि माझे वडील चालत होतो. रस्त्यावर लाईट नसल्यामुळे मी मोबाईलचा टाॅर्च लावला होता. आम्ही आपापसात अगदी हळू आवाजात गप्पा मारत होतो पण रस्त्यावरच्या त्या नीरव शांततेमुळे आमचे आवाज एकमेकांना अगदी स्पष्ट ऐकू येत होते.

           चालत चालत आम्ही अर्धे अंतर कापले असेल. आता आम्ही अशा एका ठिकाणी आलो होतो की जिथे रस्ता थोडासा उंचावर होता आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला ओसाड, मोकळा मैदानासारखा भाग होता. मी आणि माझे वडील शांतपणे चालत होतो. काका आणि आत्त्याच्या मिस्टरांच्या मात्र हळू आवाजात गप्पा सुरूच होत्या. त्यामुळे त्यांचाच काय तो आवाज कानावर पडत होता. बाकी सगळीकडे मिट्ट काळोख आणि स्मशानशांतता होती. इतक्यात अचानक….त्या रस्त्यावर अंधारातून एक बाई अचानक आमच्या दिशेने वेगात धावत आली आणि पुढे चालत असलेल्या माझ्या काकाच्या आणि आत्ता च्याच मिस्टरांच्या समोरून जवळजवळ २ फुटांवरुन रस्त्यावरून खाली उतरून अंधारात नाहीशी झाली. 

हा प्रकार काही क्षणातच घडला होता. काही क्षण आम्हाला कळलंच नाही की आपण नक्की कोणाला पाहिलं की आपल्याला भास झाला. पण तो आमचा भास नक्कीच नव्हता. आम्ही चौघांनीही तीला पाहिलं होतं. चेहरा दिसला नव्हता पण तीने केसांचा अंबाडा बांधला होता आणि मळकट पांढरी साडी नेसली होती आणि साडीचा पदर कमरेला खोचला होता. ती ज्या दिशेला गेली तिकडे मी टाॅर्च मारून बघितले पण तिथे कोणीही नव्हते.

तो संपूर्ण परिसर निर्जन होता. तिथे कुणाचही घर नव्हतं. अशा ठिकाणी ती बाई इतक्या रात्रीची काय करत असेल?? आणि ती अचानक गायब कुठे झाली ??नक्की बाईच होती की अजून काही ??. आम्ही जास्त वेळ न घालवता घर गाठलं. माझ्या मनात अनेक प्रश्नांचं काहूर माजलं होत. ती बाई आमच्या अगदी समोर येऊन अचानक वाट बदलून का निघून गेली असेल?? कदाचित ज्या देवाकडे आम्ही जेवून येत होतो त्यानेच आमचं रक्षण तर केलं नसेल ना????

Leave a Reply