अनुभव – हर्षल पांडे

अनुभव साधारण ३-४ वर्षांपूर्वीचा आहे. आम्ही सर्व कुटुंबीयांनी माहूर – जेजुरी कुलदैवतेचे दर्शन करण्यासाठी बेत आखला होता. माझे आणि माझ्या भावाचे लग्न झाल्यावर आम्ही पहिल्यांदाच देव दर्शनाला जाणार होतो. प्रवास तसा लांबचा होता पण मला त्याची चिंता नव्हती. कारण माझ्या एका मित्राचा म्हणजे स्वप्नील चा ट्रॅव्हल चा बिझिनेस आहे त्यामुळे आम्ही सर्व ट्रीप साठी त्यालाच घेऊन जातो. सगळी तयारी करून आम्ही संध्याकाळी ७.३० ला त्याची वाट बघत थांबलो होतो. ठरल्या प्रमाणे ती वेळेत गाडी घेऊन आला. आम्ही पटापट आमचे सामान गाडीच्या डिकीत ठेवले. मी त्याच्या सोबत पुढे बसलो आणि बाकी सगळे पटापट मागे एडजेस्ट झाले. देवाचे नाव घेऊन आमची प्रवासाला सुरुवात झाली. गाडीत मंद आवाजात गाणी सुरू होती. सगळ्यांच्या गप्पा चालल्या होत्या. कुटुंबासोबत असा प्रवास म्हणजे एक वेगळच सुख असते. काही वेळात आम्ही हाय वे ला लागलो तसे स्वप्नील ने गाडीचा वेग वाढवला. वेगात असल्याने थंडगार वारा आत येऊ लागला तसे गप्पा करता करता एक एक जण निद्रेच्या आहारी जाऊ लागले. माझ्या आणि स्वप्नील च्या गोष्टी मात्र सुरूच होत्या. तसे ही ड्रायव्हर च्या बाजूला बसलेले असताना कधी झोपायचे नसते. कारण जर ड्रायव्हर ला ग्लानी यायला लागली आणि एका क्षणासाठी जरी नजर चुकली तर खूप मोठा अपघात होण्याची शक्यता असते.. वाऱ्याचा वेग वाढल्याने गाडीच्या काचा वर करून घेतल्या. आता बाजूचा आवाज जास्त येत नव्हता, फक्त गाण्याचा मंद आवाज कानावर पडत होता.. औरंगाबाद , जालना पार करून आम्ही पुढच्या रस्त्याला लागलो होतो. गप्पांच्या नादात माहूर चे वळण सोडून पुढे निघून गेलो. आणि आम्हाला जराही लक्षात आले नाही.

तब्बल दीड दोन तास निघून गेल्या नंतर लक्षात आले की माहूर किंवा आजू बाजूच्या कोणत्या ही गावाची पाटी दृष्टीस पडत नाहीये. मी स्वप्नील ला म्हणालो की आपण बहुतेक खूप पुढे आलो आहोत, मला हा रस्ता ओळखीचा वाटत नाहीये. माझ्या अश्या बोलण्याने तो ही जरा विचारत पडला आणि त्याने गाडीचा वेग कमी केला. त्याच्या अश्या लाँग टूर, नाईट ड्राईव्ह होतच असायच्या त्यामुळे त्याला सवय होती. पण या वेळी तो ही जरा अस्वस्थ वाटला मला. गाडीचा वेग अतिशय कमी होता. आणि बघता बघता आम्ही एका घाटाच्या रस्त्याला लागलो. आम्हाला काही लक्षात येणार तितक्यात जाणवू लागले की गाडी च्या खिडक्या बंद असून ही आम्हाला थंडी वाजतेय. आम्ही लगेच सगळ्यांनी स्वेटर घातले पण तो थंडावा असह्य होऊ लागला. घरचे झोपेत असल्यामुळे त्यांना जास्त काही कळले नाही पण मला मात्र खूप त्रास होऊ लागला. जणू काही ती थंडी माझे रक्त गोठवतेय. मी बाहेर पाहिले तर आम्हाला काहीच कळत नव्हते की आम्ही कोणत्या भागात आलो आहोत. गर्द झाडी चा परिसर त्यात मिट्ट अंधार त्यामुळे नीट काही दिसत ही नव्हते. हेड लाईट च्या प्रकाशात जे काही दृष्टीस पडत होते तितकेच. मित्राने गाडीचा वेग कमी केला आणि आम्ही आजू बाजूला वस्ती दिसतेय का ते पाहू लागलो. तितक्यात आम्हाला एक माणूस रस्त्या कडेला चालताना दिसला. कुठून आला, कधी आला काही कळले नाही. पण जस जशी गाडी त्याच्या जवळ येऊ लागली तसे जाणवले की त्या माणसाच्या पाठीवर बऱ्याच जखमा आहेत. ही आमच्या साठी खर तर धोक्याची पाहिली घंटा होती.

मित्राला काय वाटले काय माहीत त्याने झटकन गाडी चा वेग वाढवला. तसे तो माणूस गाडी ला हातवारे करू लागला. अंधार असल्यामुळे त्याचा चेहरा नीट दिसू शकला नाही कारण गाडीचा हेड लाईट पुढच्या भागातच पडत होता. त्याला ओलांडून आम्ही पुढे आलो आणि माझे लक्ष साईड मिरर मध्ये गेले. तेव्हा तो माणूस आणि त्याच्या सोबत अजुन ७-८ जण आमच्या गाडीचा पाठलाग करत होते. माहीत नाही काय प्रकार होता. एकदा वाटले की एखादी लुटमार करणारी टोळी असावी पण मग असे गाडी मागे का धावतील कारण गाडीच्या वेगाची तर ते बरोबरी करू शकणार नव्हते. बराच वेळ गाडीचा पाठलाग करत राहिले. आमची तर चांगलीच तांतरली होती. आम्ही दोघंही देवाकडे प्रार्थना करू लागलो. तितक्यात सुदैवाने आम्हाला पोलिसांची एक बाईक दिसली. आम्ही त्यांना विनंती केली की आम्हाला माहूर ला जायचे आहे, आम्ही रस्ता चुकलो आहोत. त्यावर त्यांनी व्यवस्थित मार्ग सांगितला. आम्ही त्यांचे आभार मानून तिथून निघालो आणि मी सहज मागे वळून पाहिले तर ते पोलीस देखील दिसेनासे झाले. त्या भागात कुठे जायला देखील जागा नव्हती. कारण एका बाजूला खोल दरी आणि दुसऱ्या बाजूला उंच डोंगर. त्यांनी सांगितल्या प्रमाणे आम्ही त्या मार्गाने जाऊ लागलो. काही वेळानंतर आम्हाला माहूर ची पाटी दिसली जी झुडुपात लपली होती. आम्ही अनुभवलेला प्रकार नक्की काय होता हे मात्र आम्हाला आज पर्यंत नीट कळू शकले नाही.

Leave a Reply