अनुभव – मयूर बाराते

घटना २०१८ सालची आहे. मी ११ वित शिकत होतो. त्या वेळी माझ्या वडिलांचा अपघात झाल्यामुळे हात फ्रॅक्चर झाला होता त्यामुळे त्यांना हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले होते. त्यांना पूर्ववत व्हायला काही आठवडे लागले. हॉस्पिटल घरा पासून तस बरच लांब होत आणि रोज ये जा करणे शक्य व्हायचे नाही. म्हणून मग आई आणि माझी बहीण वडिलांसोबत हॉस्पिटल मध्ये च थांबायच्या. मी ते काही दिवस घरी एकटाच राहत होतो. आई ३-४ दिवसातून एकदा येऊन मला जेवणाचे व कॉलेज ला बस ने जाण्या येण्या साठी चे पैसे एकदाच देऊन जायची. तो दिवस मला अजूनही आठवतोय. मला कॉलेज वरून यायला उशीर झाला होता. घरी आल्यावर मी फ्रेश होऊन मग सायकल ने लगेच क्लास ला जायचो. पण आज त्यालाही उशीर झाला. त्यात माझी बुक कंप्लीट नसल्याने सरांचा ओरडा खावा लागला. काय बिनसले होते माहीत नाही पण त्या दिवशी सरांनी मला क्लास मध्येच बसून सगळ लिहायला सांगितल आणि बजावल की बुक कंप्लीट केल्या शिवाय घरी जायचे नाही. जवळपास एक दीड तास बसून सगळ पूर्ण केलं. क्लास मधून बाहेर पडलो तेव्हा ११ वाजले होते. पटकन सायकल काढली आणि जवळच्या हॉटेल मध्ये गेलो पण ते बंद करायला घेतले होते. मी जवळपास च्या २-३ हॉटेल्स मध्ये जेवण मिळतय का ते पाहायला गेलो पण ती हॉटेल्स कधीच बंद झाली होती. खरतर मला च उशीर झाला होता. तितक्यात मला एक ठिकाण आठवले जिथले हॉटेल रात्री उशिरा पर्यंत चालू असते. 

जास्त विचार न करता मी सायकल घेऊन त्या रस्त्याला लागलो. अर्ध्या तासात तिथे पोहोचलो आणि बिर्याणी पार्सल घेतली. तिथून बाहेर पडतच होतो तितक्यात पावसाला सुरुवात झाली. आणि कदाचित त्यामुळेच त्या परिसरातली वीजही गेली. जेवण तर मिळाले पण आता पावसात भिजत जावे लागणार होते आणि त्यात वीज नसल्यामुळे आधारलेला रस्ता. पण माझ्याकडे घरी जाण्याशिवाय दुसरा काही मार्ग नव्हता. बिर्याणी बॅग मध्ये ठेऊन चेन लावली आणि बॅग पाठीला अडकवली आणि मोबाईल फ्लॅश लाईट च्या प्रकाशात तसाच भिजत निघालो. आल्या मार्गी पुन्हा अर्धा तास लागणार होता म्हणून मी एक शॉर्ट कट निवडला. त्या रस्त्यावर लागल्यावर आठवले की वाटेत एक स्मशान लागते. आणि आज अमावस्या आहे. पावसाचा जोर वाढतच चालला होता. मी त्या स्मशाभूमी जवळ येऊ लागलो तसे मला माझ्या बॅग ची चेन उघडल्या सारखे वाटले. मी पटकन मागे वळुन पाहिले पण कोणी दिसल नाही. काही अंतर पुढे गेलो आणि पुन्हा तसेच जाणवले. मी सायकल थांबवली आणि बॅग पुढ्यात घेतली. पाहतो तर बॅग ची चेन खरंच उघडली होती. मला वाटले की वारा आणि पावसामुळे कदाचित उघडली असेल. मी चेन बंद केली आणि सायकल वर बसून पुढे निघालो. जसे पायडल मारले मला मागून माझ्या नावाने हाक ऐकू आली. ज्याची भीती वाटत होती तसेच काही से माझ्या बाबतीत घडू लागले. त्या भागात कोणीही ओळखीचे राहत नव्हते. आणि जरी असते तरी इतक्या रात्री भर पावसात या रस्त्यावर का असेल..?

मी सायकल चा वेग वाढवला. तितक्यात मला जाणवू लागले की मागून कोणी तरी माझी बॅग खेचतय. मी प्रचंड घाबरलो. अजुन जोरात पाय डल मारायला सुरुवात केली. त्या भागातून पुढे एक ब्रीज लागायचा. जसे मी त्या ब्रीज वर आलो तसे बॅग ची चेन जोरात उघडली आणि बिर्याणी ची पिशवी खाली पडली. जणू कोणी तरी खेचून काढली माझ्या बॅगेतून. मी मागे वळून पाहिले तर ती पिशवी खाली रस्त्यावर पडली होती. आजी बाजूला खूप अंधार होता त्यामुळे काही दिसायला मार्ग नव्हता. तितक्यात एक विचित्र आवाज येऊ लागला. नंतर मात्र मी कसल्याच फंदात पडलो नाही. सायकल घेऊन अतिशय वेगात घराच्या दिशेने निघालो. मागून चित्र विचित्र आवाज येत होते आणि त्या भागापासून लांब आल्यावर ते आवाज आपोआप बंद झाले. घरी आलो आणि सुटकेचा निःश्वास सोडला. तितक्यात आजीने सांगितलेले वाक्य आठवले ” कधी निर्मनुष्य रस्त्यावर रात्री चा प्रवास करावा लागला तर आपल्या सोबत मांस वैगरे बाळगू नकोस.. चांगल नसत ते.. परिसरातल्या वाईट शक्ती त्या कडे आकर्षित होतात..”. मला माहित नव्हत ते काय होत पण माझ्या बॅगेत नॉन वेज होत जे त्याला हवं होत बहुतेक..

Leave a Reply