अनुभव – दीक्षा दहरे
ही घटना मला माझ्या आई ने सांगितली होती. ती एका महानगर पालिकेच्या एरिया झोनल कार्यालयात जल बिल देयक विभागात कार्यरत आहे. तिच्या ऑफिस मधल्या एका चापराश्याला आलेला हा भयानक अनुभव. त्या कार्यालयात खूप जण उशिरापर्यंत काम करतात. त्या दिवशी त्याची नाईट शिफ्ट होती. त्यामुळे तो त्याच्या नेहमीच्या ठिकाणी बसला होता. त्या ऑफिस च्या बाहेर थंब प्रिंट असलेले बायो मेट्रिक्स मशीन आहे जे हजेरी लावायला वापरले जाते. अंगठ्याचा ठसा नीट मिळाला नाही की ते मशीन व्हॉईस कमांड चा आवाज येतो. त्या रात्री त्याला त्या मशीन मधून “your print is not matching, please try again” असा आवाज ऐकू आला. त्याला वाटले की कोणी तरी आले असेल म्हणून त्याने दुर्लक्ष केलं. पण तसाच आवाज पुन्हा काही वेळाने आला. आणि तो एक दोन वेळा नाही तर बऱ्याच वेळ येऊ लागला. म्हणून शेवटी तो उठला आणि कोण आहे ते पाहायला गेला. पण त्याला कोणीही दिसले नाही. बहुतेक त्याला भास झाला असेल असा विचार करून तो पुन्हा आपल्या जागेवर येऊन बसला. पण काही मिनिट होत नाही तितक्यात तो आवाज पुन्हा येऊ लागला. आणि या वेळेस एका लहान मुलाच्या हसण्याचा आवाज आला. त्याला वाटले की एखादा लहान मुलगा त्या मशीन सोबत मस्ती करतोय.
म्हणून तो पुन्हा उठला आणि पाहायला गेला. या वेळेस मुद्दामून आडोसा घेऊन उभा राहिला. जसा त्याला आवाज आला पटकन तो त्या मशीन जवळ पाहायला गेला पण तिथे कोणीही नव्हते. आता मात्र तो इतका घाबरला की नाईट शिफ्ट तशीच सोडून घरी निघून आला. त्याने काही दिवस सुट्टीचा अर्ज दिला आणि नंतर ही तो कामावर हजर झालाच नाही. पण त्याने या प्रकाराची चौकशी करायची ठरवली. त्याने बरीच माहिती मिळवली तेव्हा कळले की हे कार्यालय होण्या आधी तिथे महानगर पालिकेची शाळा होती. एके संध्याकाळी शाळा सुटल्यावर काही मुलं गच्चीवर जमली आणि पतंग उडवू लागली. तेव्हा एकाचा तोल जाऊन तो गच्चीवरून थेट खाली पडला आणि डोक्यावर आपटून जागीच मरण पावला. तेव्हापासून शाळेत काही जणांना भास होऊ लागले. एक वेळ तर अशी आली की लोकांनी आपल्या मुलांना त्या शाळेत पाठवणे बंद केले, काहींनी दुसऱ्या शाळेत नाव घातले. कालांतराने ती शाळा बंद पडली. आणि आज त्याच जागेवर महानगर पालिकेचे कार्यालय आहे.