अनुभव – सचिन

मी मूळचा साताऱ्याचा आहे. हा प्रसंग माझ्या गावाकडचा आहे. माझे आजोळ डोंगराच्या पायथ्याला आहे पण थोडे उंचावर आहे. त्यामुळे गावातून जाणारा एकमेव रस्ता खूप लांब पर्यंत दिसतो. साधारण १५ वर्षांपूर्वीची घटना आहे. प्रसंग माझे चुलत मामा यांच्या सोबत घडला होता. ते वडाप म्हणजे मोठी रिक्षा चालवायचे. एका गावातून दुसऱ्या गावात प्रवाश्यांना सोडायला जायचे. त्याला रात्री यायला नेहमी उशीर व्हायचा. दुर्गम खेडेगाव असल्याने साधारण ९ नंतर सगळे काही शांत व्हायचे. एके दिवशी ते लांबचे भाडे घेऊन दुसऱ्या गावी गेले होते. त्यांना यायला उशीर होईल हे मामी ला माहीत होते. म्हणून तिने मुलांना जेवण देऊन आणि स्वतः ही जेऊन सगळे आटोपून घेतले. मुलांना ही झोपवले आणि मामा ची वाट पाहू लागली. ९ वाजून गेले तसे गाव सामसूम झालं. अधून मधून भटक्या कुत्र्यांच्या भूंकण्याचा आवाज यायचा. त्या दिवशी त्यांना अपे क्षे पेक्षा जरा जास्त च उशीर झाला होता. मामी ला त्यांची काळजी वाटू लागली म्हणून ती घरातल्या घरात च फेऱ्या मारत होती. त्या दिवशी तिला खूप अस्वस्थ वाटू लागलं. वातावरणात ही वेगळाच बदल झाला. 

अचानक सर्व काही शांत झालं. कुत्र्यांच्या भुंकण्या चा आवाजही येईनासा झाला. मामी दारातच बसली होती. आणि तिथेच तिचा डोळा लागला. काही वेळ उलटला असेल. तिला अचानक जाग आली. नकळत घड्याळाकडे लक्ष गेले तर १२ वाजून गेले होते. मामा अजुन आले नव्हते. आता मात्र तिला चैन पडत नव्हते. तिने हळूच दरवाजा लोटून घेतला आणि बाहेर रस्त्याच्या दिशेने आली. त्यांची वडाप येताना दिसतेय का ते टक लाऊन पाहू लागली. बराच वेळ बाहेर थांबली पण नंतर कंटाळून घरात आली. इतका उशीर का झाला हे कळायला मार्ग नव्हता. मनात नको नको ते विचार येऊ लागले. काही वेळानंतर ती पुन्हा बाहेर येऊन पाहू लागली. तितक्यात तिची नजर घरा पासून काही अंतरावर असलेल्या एका विहिरी जवळ गेली. कारण तिथून वेगळाच प्रकाश येत होता. त्या विहिरी बद्दल आधीच गावात खूप बोलले जायचे. ती विहीर पडीक होती कारण त्या विहिरीत बऱ्याच लोकांनी जीव दिल्या मुळे तिथे कोणी सहसा फिरकत नसे. त्या दिशेला असा वेगळाच प्रकाश पाहून ती जरा दचकली आणि नीट निरखून पाहू लागली..

पुढचे दृश्य पाहून तिची भीती ने गाळण च उडाली. एक मध्यम वयाची बाई त्या विहिरीतून बाहेर येऊ लागली. तिचे केस मोकळे होते, उंची असामान्य वाटत होती. बघता बघता ती विहिरीतून संपूर्ण पणे बाहेर आली. तिच्या हातात एक टोपली होती जी तिने आपल्या डोक्यावर घेतली आणि मामी च्या दिशेने चालत येऊ लागली. हे असे भयाण दृश्य पाहून मामीची वाचाच बंद झाली. पावलं जागीच थिजली होती. ती जस जशी जवळ येऊ लागली तस तशी स्पष्ट दिसू लागली. मामी ने सगळी ताकद एकवटून तिथून पळ काढला आणि धावत घरात आली. आणि थेट आपल्या मला शेजारी येऊन बसली. ती भीती ने थर थर कापत होती. काय करावं काही सुचत नव्हत म्हणून देवाचा धावा करू लागली. काही वेळानंतर तिने हळूच दाराजवळ जाऊन कानोसा घेण्याचा प्रयत्न केला. पण तिला काहीच जाणवले नाही. तसे तिने एका हाताने खिडकी हळूच उघडली आणि जरा लपतच ती बाहेरून कोणाला दिसणार नाही अश्या रीतीने पाहू लागली. पण तिने बाहेरचे दृश्य पाहिले आणि तिला तीव्र झटकाच बसला. तिचे काळीज भीतीने धड धडू लागले. कारण ती बाई खिडकीच्या अगदी जवळ येऊन उभी होती. तिचे मोकळे केस आणि त्यातून दिसणारे पांढरे शुभ्र डोळे पाहून मामी ची शुद्ध हरपली आणि ती जागीच बेशुध्द पडली. 

सकाळी मामी ला जाग आली तेव्हा घरातले सगळे, शेजारचे जमा झाले होते. पण ते भयानक दृश्य पाहून तिला एवढा मोठा मानसिक धक्का बसला होता की तिने स्वतः वरचा ताबाच गमावला. ती फक्त एकच वाक्य बोलायची.. आली.. आली ती.. वाचवा मला.. ती अधून मधून नीट असायची त्यामुळे ती हे सगळे सांगू शकली पण ती पूर्ण बरी कधीच झाली नाही. जवळपास २० वर्ष होत आली पण तरीही तिची मानसिक अवस्था अजूनही नीट नाही. खूप डॉक्टर केले पण काही फरक पडला नाही. तेव्हा पासून घरातले कोणीही, मी सुद्धा त्या विहिरी जवळ कधी गेलो नाही.

Leave a Reply