अनुभव क्रमांक – १ – नीरजा पळसेकर

घटना आहे २०१५ साल ची. मी एका ट्रॅव्हल कंपनी मध्ये जॉब करते आणि कामानिमित्त माझी पोस्टिंग तेव्हा कन्याकुमारी मधल्या एका छोट्याश्या गावात झाली होती. आम्ही ३ मुली होतो, सोबतच राहत होतो. आमच्या कंपनी ने राहायला एक छोटेशे आऊट हाऊस दिले होते. खरे तर ते आमच्या कंपनी मालकाचे जुने घर होते. घराच्या मागच्या बाजूला खूप मोकळी जागा होती आणि तिथून काही अंतरावर रेल्वे ट्रॅक्स होते. अश्याच एके दिवशी आमच्यातल्या एका जणीला मुंबई ला जावे लागले तिच्या कुटुंबाला भेटायला त्यामुळे घरी आम्ही दोघेच होतो. ते घर, तिथला परिसर आम्हा दोघी साठी नवीन होता. त्या रात्री आम्ही जेवण वैगरे आटोपून झोपी गेलो. मध्यरात्र उलटुन गेली असावी. मी तसे गाढ झोपेत होते. पण मला कसल्याश्या आवाजाने जाग आली. घड्याळ्यात पाहिले तर २ वाजून गेले होते. आमच्या दारावर धापा पडत होत्या. 

आमच्या पैकी कोणीही उठले नाही. तसे पुन्हा दारावर धाप पडली. या वेळेस तो आवाज इतका भीषण होता की आम्ही दोघीही घाबरून अंथरुणात उठून बसलो. विचार करू लागलो की अश्या अवेळी दारावर कोण आले असेल. आधीच खूप झोपेत होतो आणि त्यात आळस आल्यामुळे आम्ही दुर्लक्ष केले आणि दार उघडायला उठलोच नाही. काही मिनिट झाले असतील आणि तितक्यात एक अतिशय घोगरा आणि कानठळ्या बसवणारा आवाज बाहेरून ऐकू आला. ” या वेळी वाचलात पण पुढच्या वेळी सोडणार नाही तुम्हाला”. तो आवाज इतका भयानक आणि जीवघेणा वाटला की त्या रात्री आम्ही झोपू शकलो नाही. सकाळ झाली तसे आम्ही शेजारी काही घरात जाऊन विचारपूस केली पण ते म्हणाले की त्यांना असा कोणताही आवाज आला नाही. 

त्या दिवशी मी माझ्या घरी फोन केला आणि घडलेला सगळा प्रसंग आई ला सांगितला. आई म्हणाली की काल अमावस्या होती आणि जर तसे काही त्या भागात असेल तर ते आत्मे अश्या वेळी सक्रिय होतात. या घटनेनंतर आम्ही आमच्या कंपनी ला दुसरे घर पाहायला सांगितले आणि ते तयार ही झाले. आता आम्ही घरी मुंबईत आहोत पण तो भयानक प्रसंग आजही अगदी जसाच्या तसा लक्षात आहे. 

हा त्यांना आलेला पहिला भयानक अनुभव. दुसरा अनुभव ही तितकाच विचित्र आणि अंगावर शहारे येण्यासारखा आहे. 

माझ्या सासू चे घर गावा कडे ३ मोठ्या खोल्या असलेले प्रशस्त घर आहे. त्या नेहमी आम्हाला त्या घरात घडलेल्या भुताटकी चे प्रसंग सांगायचे. कधी दारावर ऐकू येणाऱ्या धापा तर कधी बाहेरून येणारा ओरडण्याचा आवाज. कधी तर घराच्या कौलांवरून कोणी तरी चालत असल्याचे जाणवायचे. पण आजी तिथे राहत असल्यामुळे तिने पूजा वैगरे घालून या सगळ्यांवर नियंत्रण मिळवले होते. पण साधारण ६ वर्षांपूर्वी माझे पती आणि सासूबाई जत्रे साठी तिथे राहायला गेले होते आणि हा विचित्र प्रकार त्यांच्यासोबत घडला. 

ते मुंबई हून पहाटेच उठून गावाला जायला निघाले. तिथे पोहोचल्यावर माझे पती खूप थकले होते त्यामुळे ते एका खोलीत झोपायला गेले. दुपार झाली होती. मध्यान्ह झाल्यामुळे उष्णता जाणवत होती. पहाटे उठल्यामुळे त्यांना अगदी गाढ झोप लागली. पण तितक्यात त्यांना छातीत कसे तरी होऊ लागले आणि अतिशय जड वाटू लागले. असे वाटू लागले की आपल्या छातीवर कोणी तरी बसलेय आणि ती भार वाढतच जाऊ लागला. हळु हळु त्यांचा श्वास गुदमरून लागला. त्यांनी ओरडण्याचा प्रयत्न केला पण तोंडातून आवाजच फुटत नव्हता. त्यांनी हात हलवण्याचा प्रयत्न केला पण तो भार त्यांच्या हातावर ही जाणवू लागला. तितक्यात आईंची म्हणजे माझ्या सासूबाई ची नजर त्यांच्यावर गेली आणि पाहिले की त्यांचे डोळे सताड उघडे आहेत आणि ते बोलायचा प्रयत्न करत आहेत पण त्यांना बोलता येत नाहीये. 

त्यांची ती अवस्था पाहून त्या जोरात ओरडल्या. कारण हा अनुभव त्यांनीही याआधी घेतला होता. त्यांचा आवाज ऐकुन आजी बाजूच्या खोलीतून त्या खोलीत आली. येताना ती देवीचा अंगारा घेऊन आली आणि यांच्या अंगावर संपूर्ण शरीरावर शिंपडला. तसे ते झटकन अंथरुणात उठून बसले. त्यांना हालचाल करता येऊ लागली, बोलता येऊ लागले. या घटने नंतर आजीने पुन्हा घरात पूजा घातली आणि नारळ वाहिला. माझे पती आणि सासूबाई इतके घाबरले होते की दुसऱ्याच दिवशी ते घरी मुंबई ला परतले. 

अनुभव क्रमांक – २ – सचिन

मी ७ वर्षांचा असेन तेव्हा. उन्हाळ्याची सुट्टी लागली की आम्ही नेहमी दीड दोन महिन्यांसाठी गावी जायचो. आमच्या गावाला चारही बाजूने मोठे वाडे आहेत आणि मध्ये गाव वसले आहे. आता गावाबाहेर ही बरीच वस्ती झाली आहे पण त्या काळी फक्त मधल्या भागात वस्ती होती. काही मोजकी घर होती. आमचे कुटुंब मोठे असल्याने आम्ही एका भल्या मोठ्या वाड्यात राहायचो. त्या वाड्या शेजारी एक मोठा ओढा होता. म्हणजे चालत गेले की काही मिनिटांच्या अंतरावर असेल. माझ्या घरा शेजारी बरीच लहान लहान घर होती आणि तिथली सगळी मुलं आमच्या कडे खेळायला यायची. आम्ही खूप मजा मस्ती करायचो. 

रोज दिवसभर खेळून उनाडक्या करून झाले की संध्याकाळी ६-७ ला घरात असायचो. कारण त्या काळी गावात लाईट चा काही भरोसा नासाय चा. त्यामुळे मला घरच्यांनी बजावून ठेवले होते की अंधार पडायच्या आत घरी यायचे. त्या दिवशी ही नेहमी प्रमाणे आम्ही घरा समोर क्रिकेट खेळत होतो. दुपारची वेळ होती. २ वाजले असावेत. उन्हाळ्याचे दिवस असल्याने खूप कडक् उन पडले होते. खेळत असताना एकाने जोरात फटका मारल्याने बॉल ओढ्याच्या दिशेने गेला. त्यामुळे आमच्यातले दोघे जण राहुल आणि प्रवीण बॉल आणायला गेले. पण काही वेळात ते धावत आले आणि धापा टाकू लागले. त्यांनी बहुतेक काही तरी पाहिले होते कारण त्यांच्या चेहऱ्यावर मला भीती स्पष्ट जाणवत होती. आम्ही त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला पण ते काहीच बोलत नव्हते.

आम्ही त्यांना पाणी वैगरे दिले आणि विचारू लागले की तुम्हां दोघांना एवढे घाबरायला काय झाले. तसे ते म्हणाले ” ओढ्यावर कोणी तरी आहे..” आम्ही जवळपास १५-१६ जण होतो. आमच्यातील थोडी मोठी मुलं होती ती म्हणाली “चला आपण जाऊन बघू काय प्रकार आहे”. आम्ही सगळे ओढ्याच्या दिशेने जायला निघालो. ओढ्याच्या वाटेला बरीच झाडी वाढली होती. त्यातून वाट काढत आम्ही जाऊ लागलो. काही मिनिटात आम्ही ओढ्यावर पोहोचलो. ओढ्याच्या आतल्या बाजूला एक बाई केस मोकळे सोडून उभी होती. आम्ही तिच्या पासून बरेच लांब असल्याने तिचा चेहरा नीट दिसत नव्हता. आम्ही सगळे तिच्या दिशेने पाहू लागलो. आश्चर्य म्हणजे ती ज्या भागात उभी होती तिथली पाण्याची खोली बरीच होती. पण तरीही ती कमरेपासून वर दिसत होती. 

एका हाताने तिच्या साडीचा पदर पाण्यावर हळुवार पणे फिरवत होती. समोर नक्की कोण आहे हेच कळत नव्हत. कारण ओढ्याच्या त्या भागात गेल्यावर अस न हालता उभ राहण अशक्य होत. आमच्यातले काही जण म्हणू लागले की समोर कोणी नाहीये तुम्ही उगाच घाबरव ताय आम्हाला. पण मला मात्र ती बाई दिसत होती. नंतर मला जाणवले की फक्त आम्हा तिघांना ती बाई दिसतेय पण आमच्यापैकी बाकीचे तिला पाहू शकत नाहीयेत. आता मात्र मी खरच प्रचंड घाबरलो. मी त्यांना सांगू लागलो की आपण जाऊया इथून. तितक्यात तिला आमची चाहूल लागली बहुतेक. तशी ती अगदी जोरात कानठळ्या बसाव्यात असे ओरडली. आता मात्र आम्हा सगळ्यांची चांगलीच तंतारली. कारण ज्यांना ती दिसली नाही तरीही तिच्या किंचाळण्याचा आवाज मात्र त्यांना ऐकू आला. 

आम्हा सगळ्यांना नी घराकडे धाव ठोकली. मी कसलाही विचार न करता सरळ घरी धावत आलो आणि आम्ही जे काही पाहिले ते सांगितले. माझ्या घरातले आणि शेजारचे लगेच ओढ्यावर गेले पण त्यांना तिथे तसे काहीच दिसले नाही. काही दिवसांनी मला कळले की एका अपघातात त्या ओढ्यावर बरीच लोकं बुडून मेली होती. तेव्हा पासून मध्यान झाल्यावर असे भास होतात. 

Leave a Reply