अनुभव – अभिजित परांजपे

माझ्या जवळच्या गावात एक गृहस्थ वाडीकामगार आहेत, जंगलात राहिल्यामुळे, त्यांना औषधी वनस्पतींचीसुद्धा चांगली माहिती आहे. उसण भरणे, चमक भरणे यावर जरासेच पैसे घेवून ते लेप लावून देतात, सध्या ते नविन वाडी वजा बंगल्यात काम करतात. ते ज्या बंगल्यात काम करतात,  तो खुप जुना होता. मालक तिथे रहात नसल्याने गरज नसेल तर तो उघडलाही जात नव्हता. एकदा माझा मित्र बाईकवरुन पडल्याने तो जोरात जमिनीवर आपटला गेला. मुका मार असल्याने मी त्याला संध्याकाळी, त्या व्यक्ती कडे घेवून गेलो. पाय सुजला असल्याने त्याला विशिष्ट पानांचा लेप लावावा लागेल असे त्याने सांगितले. ते लेप तयार करत होते, तोवर मी वाडीत फिरत होतो. अंधार पडायला नुकताच सुरुवात झाली होती. मी त्याच भागात फर फटका मारत होतो. तेवढ्यात मला कोणीतरी धावत गेल्यासारखे वाटले. आमच्या गावात माकड वैगरे आहेत, त्यामुळे एखादे माकड वैगरे मागून गेले असेल असे मला वाटले. मी तसाच उभा राहिलो,  व परत मागे फिरलो पण मला पुन्हा वाळलेल्या पानांवरुन कोणीतरी चालत आहे असे जाणवले. काही तरी आहे हे कळत होत पण दिसत नव्हत. मी जरा घाबरलो आणि वेगाने चालत त्या दोघांजवळ आलो व सुटकेचा श्वास सोडला. माझी चलबिचल पाहून ते बोलले, काही दिसलं का दादा?..

मी शहारलो आणि म्हणालो “दिसलं??  काय दिसतं येथे??  मी घाबरतच विचारलं..”

ते हसून बोलले “नाही दिसलं ना.. चला लेप लावूया.. आणि इथे बाहेर नको आपण बंगल्यात जाऊ.. अंधार गडद होत चालला आहे आणि येथे डास खुप आहेत, चावून जीव घेतली. मला प्रश्न पडला “गुडघ्याला लेप लावायला आत कशाला??” जरा विचित्र वाटलं पण उपाय नव्हता. आम्ही आत गेलो.. दार जुने असल्याने जोरात आवाज झाला… व त्या आवाजाने त्याचा पाळीव कुत्रा विव्हळायला लागला. माहीत नाही त्याला अचानक काय झाले. तो आवाज ऐकून आसपासचे कुत्रेही भुंकू लागले. एका वेगळ्याच आवाजात. तोवर त्या काकांनी लेप लावायला सुरुवात केली.  मला काहीच काम नसल्याने मी इकडे तिकडे पहात राहिलो. सहजच माझं लक्ष समोरच्या जिन्यावर गेलं आणि तिथे एक आकृती दिसली.. मी घाबरत थरथरत म्हणालो काका.. ते…  तिथे…  काहीतरी… 

काका पाठमोरेच होते तरी बोलले अहो घोंगडी आहे ती.. मी पाहिलं तर घोंगडीच होती.. पण पांघरली कोणी होती? मी त्यांना विचारले पण ते काहीच बोलले नाहीत. तेवढ्यात वरच्या मजल्याच्या खिडकीत कोणीतरी उभे असल्याचे स्पष्ट दिसले.. भितीने मी घामाघूम झालो होतो..  मी काकांकडे पाहिलं तर काका डोळ्यांच्या कोनातून माझ्याकडेच पहात सुचक हसत होते,  मला त्यांचा चेहरा बदलत असल्यासारखे दिसले..  मित्राच्या पायाला जोरात झटका देवून ते बोलले पळा शक्य तेवढ्या वेगात आणि गडगडाटी हसले.. पाय जोरात खेचल्याने मित्र जोरात ओरडला पण मी पळ रे दिपू म्हटल्यावर तो खरंच जोरात पळू लागला.. मागुन काकांच्या हसण्याचा आवाज आला पळा पळा.. जोरात पळा.  हाहाहाहीही.. 

कसेबसे आम्ही लोखंडी गेटच्या बाहेर पडलो..  आणि जोरात आवाज करत गेट आपोआप बंद झालं.  गेट बंद होताच मित्र जीवाच्या आकांताने ओरडू लागला..  काय झालं विचारल्यावर तो बोलला माझा पाय दुखतोय..  पाय दुखतोय?.  मग तू धावलास कसा? 

माहिती नाही पण आता दुखतोय.. पाहीलं तर पाय होता तसाच सुजला होता.. आम्ही खुप घाबरलो. 

चार दिवसांनी आम्ही चौकशी केली तेव्हा समजलं की लेप लावणाऱ्या त्या काकांचा..  वाडीतच दिड महिन्यापुर्वी साप चावून , उपचाराअभावी मृत्यू झाला होता..  जर काका दिड महिन्यापुर्वी गेले होते तर आम्हांला वाडीत कोण भेटलं होतं, बंगल्यात ते घोंगडी पांघरुन कोण होतं?  मित्राचा पाय धावण्यापुरता बरा कसा झाला ? मी न राहवून परत त्या गेटवर गेलो..  गेटवरच एक चाळीशीचा माणूस काम करत होता.. तो म्हणाला की मी गेल्याच आठवड्यात कामाला लागलोय तुम्ही म्हणताय तसे काका दीड महिन्यापूर्वीच वारले.. तो माणूस घाबरेल किंवा हसेल म्हणून मी त्याला काहीच सांगितलं नाही.. पण आज तो प्रसंग आठवला की शहारे येतात.

Leave a Reply