अनुभव – अभिषेक कवरासे
मी सध्या एका शहरात राहतो. पण माझं पूर्ण लहानपण खेडेगावात व्यतीत झालं आहे. खेडेगावात राहायची मजाच वेगळी होती. कोणी पाहुणे वैगरे आले की त्यांना मनोरंजनासाठी पिक्चर बघायला घेऊन जायचं. आमच्या गावाला लागूनच नदी होती ज्याच्या पलीकडे एक थोडे मोठे गाव होते. त्यामुळे जेव्हा कधी आम्ही पिक्चर बघायला जाय चो तेव्हा आम्हाला नदी ओलांडून जावे लागायचे. माझ्या भाऊजी चा किरणामालाचा व्यवसाय असल्याने ते नेहमी खरेदी साठी आमच्या गावी येत. दिवसभर बाजूच्या गावात खरेदी वैगरे आटोपुन संध्याकाळी आमच्याकडेच रात्री थांबायचे. त्या दिवशी त्यांना खरेदीला जरा उशीर झाल्याने ते रात्री ८ चा सुमारास घरी आले. हात पाय धुवून जेवण वगेरे आटोपलं. मला म्हणाले,” चल आज पिक्चर बघून येऊया. खूप जबरदस्त पिक्चर लागलाय असा गावातले लोक सांगत होते.” त्यावर मी म्हणालो,” अहो पण भाऊजी आता रात्र झाली आहे. रात्रीचा शो संपवून परत यायला बराच वेळ होऊन जाईल. त्यात आज जरा गारठा आहे. नदी कशी ओलांडायची?” पण कसबस त्यांनी मला व माझ्या आई ला मनवल आणि आम्ही निघालो.
वेळेवर निघून ही जास्त उशीर झाला नाही. तिकीट ही पटकन मिळाली. ९ ते १२ चा शो संपला. आम्ही सिनेमा गृहाच्या बाहेर पडलो. गारठा बराच वाढला होता. तितक्यात भाऊ जी म्हणाले “छान होता रे पिक्चर!” मी ही होकारार्थी मान हलवत म्हणालो “हो ना. वेळ कसा गेला समजलंच नाही.” आम्ही घराच्या वाटेने निघालो, आमच्या गप्पा रंगल्या. पण माझ्या ध्यानात आले की सहसा पिक्चर संपल्यावर काही लोक तर हमखास सोबत असायचे, पण आज मात्र गावात जायला आमच्या सोबत कोणी नव्हते. मी भाऊजी ना सांगितलं तर त्यांनी दुर्लक्ष केलं. गप्पा मारत मारत आम्ही नदीकाठी येऊन पोहोचलो. भाऊजी नी नदी ओलांडायला सुरुवात केली. त्यांच्या पाठोपाठ मी पण गेलो. नदीच्या त्या दुसऱ्या कडेला मिट्ट काळोख होता. गारवा असल्याने पाणी अतिशय थंडगार झालं होत. नदितच हातपाय धुवून आम्ही बाहेर पडलो. पण त्या थंड पाण्याने मी अक्षरशः गारठलो होतो. जसं आम्ही घराकडे जायला निघालो, तसे मला काही लोक नदी किनारी कंदिलाच्या मंद प्रकाशात बसलेले दिसले.. मला जरा आश्चर्य वाटले कारण नदीच्या दुसऱ्या काठावरून बघितल्यावर इथे कोणीही दिसले नव्हते. नुसता काळोख होता. कंदील आहे म्हंटल्यावर थोडा तरी प्रकाश जाणवायला हवा होता.
पण दुर्लक्ष करून मी भाऊजी सोबत बोलू लागलो. गप्पा मारत आम्ही पुढे निघालो. जसं आम्ही त्या लोकांजवळ पोहोचलो तसं माझ्या ध्यानात आलं की ते आपलं डोकं आपल्या दोन्ही गुडघ्याच्या मध्ये घुसवून बसले आहेत. कोणीच काहीच बोलत नव्हतं. अश्या विचित्र प्रकारे त्यांना बसलेलं बघून मला पोटात खड्डा पडल्यासारखं वाटलं. जसं जसं आम्ही त्यांच्या जवळ जाऊ लागलो मला हवेत वेगळीच शांतता जाणवू लागली. आम्ही जेव्हा त्यांच्या अगदी बाजूला पोहोचलो तेवढ्यात त्यातल्या एका माणसाने माझा पाय घट्ट पकडला. मी फारच दचकलो. तो माणूस म्हणाला,”कसा वाटला रे सिनेमा?” एवढं म्हणून ते तिघेपण हसू लागले. भाऊजी म्हणाले ,”काय झालं रे? चल ना उशीर झालाय.” मी कसाबसा त्याच्या हातातून माझा पाय झटकून सोडवला आणि तिथून निसटलो. झपाझप पावले टाकत घराकडे जाऊ लागलो. भाऊ जी बोलत होते पण मला कधी एकदा घरी पोहोचतो असे झाले होते. त्यांनी माझा चेहरा पहिला की नाही ते कळले नाही. काही वेळात आम्ही घरी पोहोचलो. मी जसा गेट लावायला मागे वळलो, मला धक्काच बसला. ते तिघे माझ्या घरा जवळच्या पारावर बसून होते. तसेच, गुडघ्यात डोकं खुपसून. मी पटकन तिथून घराकडे पळालो आणि भाऊजी ना घडलेला प्रकार सांगितला.
त्यावर त्यांचे उत्तर ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. ते म्हणाले, “अरे कोणती माणसं? नदीजवळ तर कोणीच नव्हतं.” त्यांना मी पारावर बसलेली माणस दाखवायला बाहेर घेऊन आलो. समोरचे दृश्य पाहून माझ्या भीती मध्ये आणखीनच भर पडली. तिथे विचित्र अवस्थेत बसलेली माणसे नव्हती तर तीन बायका होता. भाऊजी नी मला धीर देत म्हटलं,”तू पिक्चर बघून आला आहेस म्हणून तुला भास झालं असेल. बघ, इथे फक्त ३ बाया बसल्या आहेत आपल्याच गावातल्या.. उगाच घाबरतोस तू..” दुसऱ्या दिवशी जेव्हा मी घराबाहेर पडलो तेव्हा मला कळले, की नदीजवळ काल रात्री ३ लोकांचा बुडून मृत्यू झाला आहे. मी पळतच घरी आलो आणि आई ला सगळा प्रकार सांगितला. आई मला तेव्हाच गावातल्या मांत्रिका कडे घेऊन गेली. तो म्हणाला,” ३० वर्षांपूर्वी असाच प्रसंग गावात घडला होता. पण तेव्हा जो पण त्या रात्री त्या नदी जवळून गेला, तो परतला नाही. तुमचा मुलगा थोडक्यात वाचला.”. त्याचे असे बोलणे ऐकून मी धसकाच घेतला होता. त्या प्रसंगानंतर मी रात्री अपरात्री नदीजवळ जाणे कायमचे बंद करून टाकले..