अनुभव – दत्ता
अनुभव माझ्या गावातला आहे. जो मला लॉक डाऊन मध्ये आला होता. माझे गाव कोकणातले. शिमग्यासाठी आम्ही सगळे गावाला आलो होतो. ५ दिवस शिमगा झाल्या नंतर २ दिवसांनी बहिणीचा साखरपुडा होता. त्यामुळे गावात अजुन काही दिवस राहणार होतो. साखरपुड्याची तयारी नीट झाली होती त्यामुळे सगळे काही अगदी सुरळीत पार पडले. गावातले बरेच लोक आणि मित्र मंडळी आली होती. साखरपुडा झाला आणि लॉक डाऊन जाहीर झाले. आम्ही गावातच अडकून पडलो. तेव्हा काही पर्याय नव्हता. आमच्या सारखी इतरही लोक जी शिमग्यासाठी गावात आली होती ती सुद्धा गावातच अडकून पडली. पुन्हा शहरात जाण्यासाठी, प्रवास करण्यासाठी परवानगी नव्हती. मग काय.. गावात नुसती धमाल. दिवसभर घरा शेजारी खेळायचो आणि मग संध्याकाळी मोबाईल नेटवर्क मिळवण्यासाठी सगळे मित्र चौकात यायचो. काही वेळ मोबाईल वर गेम्स आणि चॅटिंग करून झाले की घरी जेवायला जायचो. आणि जेऊन झाल्यावर पुन्हा कट्ट्यावर जमायचो. मग १-२ वाजे पर्यंत तिथेच बसून असायचो. तेव्हा मुंबई हून ही बरेच जण आले होते.
त्या मध्येच वाडीतल्या कांकासोबत एक राजू नावाचा मुलगा आला होता. त्याला ही घरी करमायचे नाही म्हणून तो आमच्या सोबत च असायचा. त्या दिवशी संध्याकाळी क्रिकेट खेळून झाले आणि मग जेऊन सगळे चौकात कट्ट्यावर जमलो. त्या दिवशी अमावस्या होती. पण आम्ही पोरं कोणाचे काय ऐकणार. आम्ही सगळ्यांनी ठरवले की मोबाईल बाजूला ठेऊन भुता खेतांच्या गोष्टी करायच्या. मध्य रात्री असे मित्रांसोबत एकत्र बसून गोष्टी करण्याची मजा काही औ रच असते. गावाकडचे असल्यामुळे आम्ही भूतांचे अस्तित्व असते वैगरे या बद्दल बोलत होतो. पण तो नवीन मुलगा राजू जरा चिडून च बोलायला लागला की अस काही नसते, आपण नको त्या गोष्टीला उगाचच घाबरतो. आम्ही त्याला जुन्या माणसांकडून ऐकेलेले अनुभव सांगितले पण तरीही त्याचा विश्वास बसेना. त्याचे एकच म्हणणे होते, या सगळ्या ऐकीव गोष्टी आहेत, याचा कसलाही पुरावा नाही. त्या मुलाला किती समजावले तरी तो ऐकण्या रातला नाही हे सगळ्यांना कळून चुकले. म्हणून मग आम्ही तो विषय संपवून आप आपल्या घरी निघून आलो. तो मुलगा ज्या काकांकडे थांबला होता, त्यांचे घर चौकातून थोडे आतल्या भागात होते. तो मुलगा त्या दिशेने निघून गेला.
मी घरी आलो. बराच वेळ झोप लागत नव्हती. म्हणून मग मोबाईल वर पिक्चर बघत बसलो होतो. लॉक डाऊन असल्यामुळे लवकर उठायची गरज नव्हती त्यामुळे रोज रात्री जागरण व्हायचे. ही रात्र ही वेगळी नाही असे वाटले आणि तितक्यात दारावर जोरात थापा पडल्या. माझ्या वडिलांच्या नावाने हाक ऐकू आली. आवाज ओळखीचा वाटला. मी लगेच उठलो, माझे वडील ही उठून दार उघडायला गेले. तेच काका होते ज्यांच्याकडे तो नवीन मुलगा राहायला आला होता. माझ्या वडिलांना त्यांची विचारले.. “काय झाले, एवढ्या रात्री घरी आलात.. सगळे ठीक आहे ना..?” तर ते सांगू लागले “माझ्या घरी थांबलेला मुलगा अचानक विचित्र वागतोय. माझ्या कडे रागाने बघत होता, नजर बदललेली वाटतेय. त्याला काही विचारायला गेलो तर माझ्या अंगावर धावून येतोय मला मारायला’. त्या नवीन मुलाचे वर्णन केल्यावर माझ्या वडिलांना लगेच कळले की नक्की काय प्रकार आहे. काकांना लहान मुलगा होता. त्याला आणि घरच्या लोकांना त्यांनी शेजारी थांबायला सांगितले. हा सगळा विचित्र प्रकार पाहून तो घाबरून गेला होता. मी, माझे वडील आणि ते काका धावतच त्यांच्या घराकडे गेलो. काका आमच्याकडे येताना त्यांच्या घराला कुलूप लावून आले होते. आम्ही बाहेर उभे राहून काय करायचे याची चर्चा करत होतो तितक्यात घरातून ओरडण्याचा आवाज येऊ लागला.
तो मुलगा आतून दरवाज्यावर लाथा मारत होता. रात्रीच्या त्या भयाण शांततेत तो आवाज अगदी काळीज चिरत होता. माझ्या वडिलांनी जास्त वेळ न दवडता वाडीतल्या एका जाणकार माणसाला बोलावून आणले. तो पर्यंत मी आणि ते काका बाहेरच उभे होतो आणि तो भयाण प्रकार अनुभवत होतो. गावातली शेजारपाजारची इतरही लोक जमा झाली. त्या जाणकार माणसासोबत एक मांत्रिक ही होता. आम्ही ३-४ जण त्या घराजवळ जाऊ लागलो. तर अचानक दारावर लाथा मारण्याचा आवाज येईनासा झाला. अचानक काय झाले मला ही काही कळले नाही. आत शिरलो आणि त्याला शोधू लागलो. तो माळ्यावर असल्याची चाहूल लागली कारण तिथूनच कसलातरी आवाज येत होता.. त्याला हाक दिली, तसा तो एकदम गप्प झाला. आमच्यातले २-३ जण त्याला आणायला गेले. त्यांच्यात भलतीच शक्ती संचारली होती जणू. त्यांनी जेमतेम खेचत त्याला खाली आणले आणि एका कोपऱ्यात बसवले. मी तर त्याचे रूप बघून प्रचंड घाबरलो होतो. विश्वास बसत नव्हता की ज्या मुलाशी काही वेळापूर्वी मी बोललो, जो आपल्याशी नीट बोलला त्याची अशी अवस्था अचानक कशी काय झाली. मांत्रिकाने वेळ न दवडता मंत्रोच्चार सुरू केले आणि विचारू लागले की कोण आहेस तू, काय हवंय तुला..?
तेव्हा तो मुलगा वेगळ्याच आवाजात बोलू लागला आणि घराच्या दरवाज्याकडे पाळायचा प्रयत्न करू लागला “आम्ही नदीवरून आलोय.. मी एकटा नाही, आम्ही दोघं जण आहोत. एक बाहेर उभा आहे, मला जाऊ द्या तो बोलावतो य मला..” त्याला जेमतेम लोकांनी धरून ठेवले होते. काकांना अचानक सुचले तसे त्यांनी जाऊन देवीचा अंगारा आणला आणि त्याच्या कपाळावर लावला तसे अगदी क्षणात तो निपचित होऊन पडला. तेव्हा मला अगदी साध्या वाटणाऱ्या देवीच्या अंगा ऱ्याची खरी किंमत कळली. त्यात किती शक्ती असते हे पहिल्यांदा समजले. त्याच्या अंगात जे काही होते ते बाहेर पडले. आमची गावदेवी भारी पडली त्या शक्तीवर. काही वेळानंतर त्या मुलाला शुद्ध आली. त्याला थोड फार आठवत होत म्हणून त्याला स्वतःलाच कळलं की काय झालं होत. दुसऱ्या दिवशी रात्री चौकात आला तेव्हा आम्हाला हात जोडून सांगू लागला की तुम्ही बोलत होता ते खरे बोलत होता. असे काही असते हे मी काल पहिल्यांदा अनुभवले. त्याला आम्ही समजावू लागलो की जगात अश्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या सिद्ध करणे तितकेसे सोपे नाही. पण एकदा अनुभव आला की त्याची प्रचिती मिळते, त्या गोष्टी या जगात कुठे तरी नक्की आहेत याची खात्री पटते.