अनुभव – नील जाधव

ही कधी ही न विसरता येणारी घटना माझ्या मामा सोबत घडली होती. माझा मामा शहरात राहायचा. त्या वेळी गणेशोत्सवाचे दिवस होते. गणेशोत्सव म्हंटले की एक वेगळीच मजा असायची. सगळे नातेवाईक गावी एकत्र जमायचे. दर वर्षी मामा ही गणेशोत्सव साजरा करण्यासाठी गावी यायचा. पण त्या वर्षी त्याला नेमकी हवी तशी सुट्टी मिळाली नाही. त्याने मामी ला आणि मुलांना पुढे पाठवले. त्याची कामे वैगरे आटोपून एक दिवस आधी तो गावाला येणार होता. 

नेहमी प्रमाणे ऑफिस मधून निघायला अपेक्षेपेक्षा जरा जास्तच उशीर च झाला. पण स्वतःची गाडी असल्यामुळे तशी काळजी करण्याचे काही कारण नव्हते. ऑफिस मधून निघाल्यावर घरी जाण्या ऐवजी तो सरळ गाडी घेऊन गावी यायला निघाला. रात्री ड्राइव करणे त्याच्यासाठी तसे काही नवीन नव्हते. पण त्याला कुठे माहित होते की त्याच्या वाट्याला पुढे काय वाढून ठेवले आहे. साधारण ५-६ तासांचा प्रवास झाल्यावर रात्री १ च्या सुमारास मामा गावाच्या वेशी जवळ येऊन पोहोचला. तिथे जवळच एक नदी होती.

नदी ओलांडून दुसऱ्या बाजूला आले की तिथून काही मिनिटांवर आमचे गाव होते. नदीवरचा ब्रीज ओलांडून जात असताना नेमकी त्याची गाडी बंद पडली. गावाकडचा परिसर असल्यामुळे अंधार पडल्यावर लगेच शुकशुकाट व्हायचा. त्यात आता रात्रीचा १ वाजून गेला होता. त्या निर्मनुष्य रस्त्यावर त्याची गाडी उभी होती. इतक्या रात्री कोणा कडून मदत मिळणे जवळ जवळ अशक्य होते कारण त्या परिसरात कोणतीही वस्ती नव्हती. मामाने बाहेर येऊन गाडीचे बोनेट उघडले आणि नक्की काय बिघाड झालाय ते पाहण्याचा प्रयत्न करू लागला. पण गाडीत तसा काही बिघाड झाल्याचे दिसत नव्हते. 

तसे तो पुन्हा गाडीत जाऊन बसला आणि गाडी चालू करायचा प्रयत्न करू लागला. पण गाडी काही चालू व्हायची चिन्ह दिसत नव्हती. तसे तो पुन्हा बाहेर निघाला आणि बोने ट उघडून पाहू लागला. पण नक्की काय झालय हे कळायला काही मार्ग नव्हता. गाडी इथेच ठेऊन चालत जावे लागणार असा विचार करत त्याने गाडीचे बोने ट बंद करायला घेतले तितक्यात अचानक त्याला कसलीशी चाहूल जाणवली. त्याच्या मागून कोणी तरी चालत येत होते. त्याने थोडे वळून तिरक्या नजरेने मागे पाहण्याचा प्रयत्न केला. एक आकृती त्याच्या दिशेने चालत येत होती. वातावरणातला बदल ही प्रकर्षाने जाणवू लागला होता. त्याला कळून चुकले की या इथे थांबणे बरे नाही. 

गाडी चालू करून पाहण्यासाठी शेवटचा प्रयत्न करू असा विचार करत तो झटकन गाडीत येऊन बसला. आता ती आकृती त्याच्या अगदी नजरेसमोर होती. आणि हळू हळू त्याच्या दिशेने पुढे सरकत होती. त्याने मान खाली घालूनच गाडी चालू करण्याचा प्रयत्न केला आणि काही वेळापूर्वी कारण नसताना बंद पडलेली गाडी अचानक सुरू झाली. त्याने जोरात गेअर टाकून गाडी चालू केली आणि स्टे अरींग वळवून त्या आकृतीच्या बाजूने घेत सुसाट वेगात निघाला. मागे नक्की काय होते हे त्याला पाहायचे नव्हते पण कुतूहलापोटी त्याने बाजूच्या आरशात पाहिले. तर मागे फक्त निर्मनुष्य रस्ता दिसत होता. ती आकृती कुठे तरी नाहीशी झाली होती. 

त्याने सुटकेचा निःश्वास सोडला आणि आपण थोडक्यात वाचलो असा विचार करत असताना त्याचे लक्ष समोरच्या आरशात गेले. आणि विजेचा झटका लागावा तसे त्याचे पूर्ण अंग शहारले, हाता पायाला कंप सुटला आणि काळीज छाती फाडून बाहेर येतंय की काय असे वाटू लागले. ती आकृती मागच्या सिट वर बसून एक विचित्र हास्य करत होती. तिच्या नजरेत पाहिले आणि त्याचा स्टे अरींग वरचा ताबा सुटला. तो गाडी आटोक्यात आणायचा प्रयत्न करत होता पण गाडी अतिशय वेगात असल्याने ते शक्य होत नव्हते. 

काही क्षणात गाडी रस्त्यावरून खाली उतरत झुडपात शिरली आणि एका मोठ्या झाडावर जाऊन आदळली. तो अपघात इतका भीषण होता की सीट बेल्ट लावला असूनही त्याचे डोके जोरात स्टे आरिंग वर आपटले आणि त्याच्या डोक्याला जबर दुखापत झाली. काही काळण्या आत त्याची शुध्द हरपली. इथे घरी सगळे चिंतेत होते. बराच वेळ झाला तरी मामा घरी परतला नव्हता. त्याचा फोन देखील लागत नव्हता. बराच वेळ वाट बघून शेवटी घरातले काही जण आणि गावातली काही जाणती लोक त्याला शोधायला बाहेर पडले. 

गावाच्या वेशीबाहेर चालत आल्यानंतर त्यांना मामाची गाडी नजरेस पडली. तसे धावत जाऊन त्यांनी मामा ला कसे बसे गाडी तून बाहेर काढले. सीट बेल्ट लावला असल्यामुळे त्याला बाहेर काढायला ही खूप त्रास होत होता. लागलीच त्याला दवाखान्यात नेऊन त्याच्यावर उपचार केले. दुसऱ्या दिवशी जेव्हा त्याला शुध्द आली तेव्हा तो एकच वाक्य बडबडत होता “मला वाचवा, ती मला घेऊन जाईल”. आम्ही त्याचे असे बोलणे ऐकून चक्रावून च गेलो होतो. आमच्यातल्या काही जणांनी त्याला विचारायचा प्रयत्न केला की नक्की काय झाले, असे अभद्र का बडबडतोय पण तो ऐकून न ऐकल्या सारखे करत होता आणि ते एकच वाक्य बोलत होता “मला वाचवा, ती मला घेऊन जाईल”. त्याचे असे हे बडबडणे आम्हाला कळण्यापलीकडे होते.

आजोबांनी मात्र ओळखले की हा काही तरी विचित्र प्रकार आहे. त्यांनी एका माणसाला बोलवून मामा च्या अंगावरून उतारा काढला. त्या नंतर काही तासांनी त्याची बडबड थांबली आणि तो शांत झाला. त्याला जेव्हा पूर्ण बरे वाटले तेव्हा त्याने आम्हाला सगळा घडलेला प्रकार सांगितला. आम्ही त्याचे बोलणे ऐकतच राहिलो. आजही मला त्याचा तो त्याचा चेहरा, त्याची ती अवस्था आठवते आणि अंगावर शहारा आल्याशिवाय राहत नाही. त्या घटनेनंतर मात्र मामा रात्रीचा प्रवास करायला आवर्जून टाळतो. 

Leave a Reply