अनुभव – प्रतीक राजेश कांबळे
अनुभव माझा मामे भाऊ यश याचा आहे. त्याने मला सांगितला होता. आम्ही मुंबईत राहतो. मागच्या वर्षी लॉक डाऊन होण्या पूर्वी त्याच्या कॉलेजची सहल म्हणजे इंडस्ट्रियल विझिट निघणार होती. ते चंदिगढ, मनाली आणि शेवटी पंजाब करून मुंबई ला परतणार होते. सगळी तयारी तशी आधीच झाली होती. पण तरीही तिथे गेल्यावर हॉटेल रूम्स चा घोळ झाला. त्यांना हव्या तश्या रूम्स मिळाल्या नाहीत. त्यामुळे माझ्या भावाला आणि त्याच्या बरोबर अजुन ५ जणांना त्याच हॉटेल शेजारी एका दुसऱ्या हॉटेल मध्ये रूम्स अरेंज करून दिल्या. नाईलाजाने आपला सगळा ग्रुप सोडून त्यांना तिथे जावे लागले. ते हॉटेल कम लॉज एखाद्या पंचतारांकित हॉटेल सारखे च होते. अगदी प्रशस्त. तो व त्याचे दोन मित्र एका रूममध्ये व बाकीचे तिघे दुसऱ्या रूममध्ये झोपायला गेले. आता मित्र मंडळी एकत्र असतील तर लवकर झोपायचा प्रश्नच कुठे येतो. त्यांच्या गप्पा मजा मस्ती सुरू होती. आणि असे करत करत रात्रीचे १२ वाजून गेले.
त्यांना अचानक भूक लागली. घड्याळात वेळ पाहिली तर सव्वा बारा व्हायला आले होते. त्यांना माहीत होते की आता बराच उशीर झालाय पण तरीही त्यांनी हॉटेल च्याच फोन वरून मॅनेजर ला फोन लावला. बऱ्याच रिंग झाल्या पण तरीही कोणी फोन उचलत नव्हते. त्याचा मित्र सतत फोन करतच राहिला. शेवटी बऱ्याच प्रयत्नानंतर त्याने फोन उचलला. लगेच मित्राने जेवणा बद्दल विचारपूस केली. तसे ती मॅनेजर जरा चिडत च म्हणाला “११ वाजता सर्वजण झोपायला जातात म्हणून आता काही मिळणार नाही. उद्या सकाळी च मिळेल..” त्यांना हे थोडे विचित्रच वाटले. कारण अश्या मोठ्या हॉटेल मध्ये रात्री ही सगळे मिळते. त्या मॅनेजर च्याच बोलण्याकडे लक्ष न देता यश ने मोबाईल काढला. आणि ऑनलाईन फूड डिलिव्हरी ॲप ओपन करून त्यावर काही मिळतंय का ते पाहू लागला. तसे अश्या ॲप ची डिलिव्हरी जास्त उशिरा पर्यंत नसते. पण ते मुख्य शहरात असल्यामुळे अजुन एक अर्धा तास ऑर्डर करणे शक्य होते.
मित्रांना विचारून त्याने पटापट ऑर्डर प्ले स केली आणि फोन खाली ठेवला. अवघ्या काही सेकंदात त्यांच्या रूम चे दार वाजले. उघडण्याआधी त्यांनी कोण आहे असे विचारले पण कसलाच प्रतिसाद आला नाही. काही सेकंदाने पुन्हा दारावर थाप पडली आणि या वेळी पलीकडून फूड डिलिव्हरी असे कोणी तरी म्हणाले. त्यांना आश्चर्य वाटले कारण ऑर्डर प्लेस करून ५ मिनिट ही झाले नव्हते. यश ने जाऊन दार उघडले पण बाहेर कोणीही नव्हते. त्यातला एक मित्र म्हणाला की मी खाली जाऊन बघून येतो. तो लिफ्ट जवळ आला तर लिफ्ट त्याच मजल्यावर उभी होती. पण बटन दाबण्या आधीच लिफ्ट चे दार आपोआप उघडले. तो जरा गोंधळला. त्याला कळले नाही की त्याने लिफ्ट चे बटण नक्की दाबले की नाही. पण तो जास्त विचार न करता लिफ्ट मध्ये शिरला आणि खाली आला. मेन गेट जवळ जाऊन तो पाहू लागला. तिथेच गाढ झोपलेल्या वॉचमन ला उठुवून विचारू लागला की कोणी डिलिव्हरी बॉय आला होता का..? तसे त्या वॉचमन ने गेट कडे इशारा करत सांगितले “गेट लॉक है.. कोई नाही आया था..?”
तो मित्र धावतच वर आला आणि इतर मित्रांना सांगू लागला की मेन गेट ला कुलूप लावले आहे आणि तो वॉचमन म्हणाला की कोणीच आले नव्हते. यश ने पटकन त्या ॲप वरून नंबर काढून फोन केला तर कळले की डिलिव्हरी बॉय अजुन तिथून निघालाच नाहीये. त्याने फोन ठेवताच दारावर पुन्हा एक थाप पडली. आता मात्र ते जरा घाबरले. पण तितक्यात एक मित्र म्हणाला “अरे बाजूच्या रूम मधले क्लासमेट्स आपली मस्ती तर करत नसतील, आपल्या घाबरवत तर नसतील ना..? यश त्याचे ऐकून दार उघडायला गेला पण दरवाजा काही उघडत नव्हता. त्या तिघांनीही प्रयत्न केला पण दार उघडायचे काही नाव घेत नव्हते. ते प्रयत्न करतच राहिले आणि शेवटी दार उघडले. बाहेर पाहिले पण पुन्हा कोणीही नाही. त्यांनी बाजूलाच असलेल्या मित्रांच्या रूम वर जायचे ठरवले. त्यांनी त्यांच्या रूम चा दरवाजा लॉक केला आणि ते बाहेर पडले.. बाजूच्या रूम मध्ये येऊन त्यांनी मित्रांना घडलेला प्रकार सांगितला. तसे त्यांच्यातला एक मित्र मोठ मोठ्याने हसू लागला. यश त्याला जरा चिडून च म्हणाला “तुला काय झाले दात काढायला..?”
तसे तो म्हणाला की अरे मला झोप येत नव्हती म्हणून तुम्ही जागे आहात का ते पाहायला आलो. तर आतून तुम्ही काही तरी खायला ऑर्डर करत आहात हे ऐकू आले म्हणून मीच मस्करी केली. मुद्दामून दार वाजवले आणि फूड डिलिव्हरी सांगून माझ्या रूम मध्ये म्हणजे इथे पळून आलो. ते तिघे ही त्याच्यावर चिडले आणि त्याला ओरडू लागले. ते त्याला म्हणाले की एकदा ठीक आहे, पुन्हा येऊन दार का वाजवले. त्यांचे असे बोलणे ऐकून तो मित्र एकदम शांत झाला. पण त्याला ओरडणे चालूच होते. त्यांचा आवाज ऐकून वॉचमन वर त्यांच्या रूम मध्ये आला. त्यांना जरा दम देत म्हणाला की आवाज करू नका, शांत झोपा. तुमच्यामुळे माझी दोन वेळा झोपमोड झाली आहे. एवढे बोलून ती खाली निघून गेला. जवळपास अर्ध्या तासाने डिलिव्हरी बॉय चा फोन आला. तसे त्यांचे दोन मित्र खाली गेले. वॉचमन झोपला होता म्हणून त्यांनी हळूच टेबल वरची चावी घेतली.
गेट उघडला नी बाहेर जाऊन पार्सल घेतले. जाता जाता त्या डिलिव्हरी बॉय ने त्यांना विचारले “तुम्ही रेहने के लिये और कोई जगह नही मिली क्या??..” त्यावर त्याने का असे विचारले तसे त्या डिलिव्हरी वाल्याने जे सांगितले ते ऐकून ते प्रचंड घाबरले. धावतच ते रूम वर आले आणि इतर मित्रांना सांगू लागले. ” तो डिलिव्हरी वाला सांगत होता की या हॉटेल मध्ये जास्त कोणी राहत नाही. साधारण ५ वर्षांपूर्वी इथे एका मुलीचा खून झाला होता. तेव्हापासून रात्री इथे कोणीच थांबत नाही.. तसे ज्या मित्राने आमची मस्करी केली होती तो म्हणाला ” मी तुम्हाला पूर्ण गोष्ट सांगितली नाही.. मी तुमचे दार फक्त एकदाच वाजवून पळालो होतो..” त्याचे हे वाक्य ऐकल्यानंतर मात्र कोणाला ही त्या रात्री झोप लागली नाही. संपूर्ण रात्र त्यांनी जागून च काढली.