अनुभव – आकाश धामणस्कर

अनुभव तेव्हाचा आहे जेव्हा मी १० वी त शिकत होतो. मी तेव्हा आमच्या जुन्या वाड्यात राहायचो. तो वाडा खूप जुना आहे म्हणजे जवळ जवळ ७० ते ८० वर्षांपूर्वीचा. माझे संपूर्ण बालपण तिथेच त्याच वाड्यात गेले. आमच्या वाड्या समोरच एक चार मजली बिल्डिंग होती. आणि तेव्हा तिथे माझे २ मित्र सौरभ आणि विशाल राहायचे. उन्हाळ्याचे दिवस सुरू होते त्यामुळे खूप उकडायचे. म्हणून मग ते कधी कधी रात्री ते टेरेस वर झोपायला जायचे. मित्र मला सारखे सांगायचे की आमच्या सोबत एक दिवस टेरेस वर झोपायला ये, मस्त गप्पा करू. आमच्या दोघांच्या घरचे ही असतात मग अंताक्षरी वैगरे खेळतो, खूप मजा करतो आणि मग झोपही छान लागते तिकडे. पण मला तेव्हा रात्री जास्त कुठे बाहेर पाठवत नसत त्यामुळे मी वाड्यातच असायचो. तरीही मित्रांच्या सांगण्यामुळे मला ही तिथे जाण्याची ओढ लागू लागली. पण लहानपणी इतरांसारखा मी ही खूप खोडकर होतो, खूप मस्ती करायचो म्हणून मला एकट्याला घरचे कुठे पाठवायचे नाहीत. पण मित्रांमुळे मी कसं तरी घरच्यांना मनवल, सांगितले की तिथे मित्राच्या घरचे ही असतात वैगरे. शेवटी ते तयार झाले आणि मला परवानगी मिळाली. एक दोन वेळा गेलो तेव्हा मस्त झोप लागली. त्यामुळे मी अधून मधून तिथे झोपायला जाऊ लागलो. घरचे ही जास्त काही बोलायचे नाही. एके दिवशी मित्र मला म्हणाले की आज लवकर झोपायला ये आम्ही लवकरच जाणार आहोत सगळे टेरेस वर.

ठरल्याप्रमाणे मी त्या रात्री लवकर जेवण आटोपले आणि मित्राकडे गेलो. तो त्या बिल्डिंग च्या पहिल्या मजल्यावर राहायचा. त्याच जेवण झालं होत पण सौरभ च बाकी होत म्हणून मग आम्ही दोघच टेरेस वर आलो. अंथरूण केलं आणि असच लोळत पडलो. उंचावर असल्यामुळे गार वारा लागत होता म्हणून आम्ही दोघं ही अंगावर पांघरूण घेऊन झोपलो होतो. खरं तर झोपलो नव्हतो पण मोबाईल वर टाईमपास करत गप्पा करत होतो. बराच वेळ उलटून गेला. तितक्यात माझ्या बाजूला सौरभ येऊन झोपला कारण मला त्याचा हात लागला. मी त्याला विचारले “का रे आज इतका उशीर..?” पण तो काहीच बोलला नाही. मी आणि विशाल मोबाईल मध्ये असल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष केलं. काही वेळा नंतर त्याने कुस बदलली तसा मला त्याचा हात पुन्हा लागला आणि माझ्या हातातून मोबाईल पडता पडता राहिला. म्हणून मी जरा रागात बोललो ” ए सौरभ सरक ना थोडे तिकडे.. आता हात लागला परत तुझा आणि माझा मोबाईल पडता पडता राहिला.” पण तरीही त्याचे काहीच उत्तर आले नाही म्हणून मी त्याच्या अंगावरचे ब्लँकेट ओढले. माझ्या बाजूला कोणीही नव्हते. भीती ने अंगावरून सरसरून काटा येऊन गेला. मनात विचार आला की जर बाजूला कोणी नव्हते तर मग मला जो स्पर्श झाला तो कोणाचा होता..? मी विशाल ला म्हणालो ” अरे इथे सौरभ होता ना..? पण कोणीच नाहीये इथे..” तो सुद्धा खाडकन उठून बसला.

आम्ही दोघांनी एकमेकांकडे पाहिले आणि सरळ तिथून खाली धावत सुटलो. पायऱ्यांवरून खाली येत असतानाच सौरभ भेटला. त्याला घडलेला प्रसंग सांगितला तर तो म्हणाला की जेवण तयार नव्हत म्हणून मी आत्ताच जेवून वर यायला म्हणून घरा बाहेर आलो, मी एकदाही आलो नाही वर..” त्या नंतर मात्र आम्ही कोणीही वर झोपायला गेलो नाही. मी थेट माझी घरी वाड्यावर निघून आलो. दुसऱ्या दिवशी मित्रांनी त्याच्या घरी हा प्रसंग सांगितला त्यावर त्यांची प्रतिक्रिया होती की काल मोठी अमावस्या होती त्यामुळे कदाचित अस घडले असावे. त्या एका भयाण प्रसंगानंतर रात्री काय मी दिवसा ही कधी त्या बिल्डिंग च्या टेरेस वर फिरकलो सुद्धा नाही. 

Leave a Reply