अनुभव- कोमल वाणी
अनुभव २०११ साल चा आहे जेव्हा मी हॉस्टेल मध्ये राहत होते. मला एका कॉलेज मध्ये एडमिशन मिळाले होते. राहायची काही सोय नसल्याने मला हॉस्टेल मध्ये राहावे लागले. हॉस्टेल अगदी प्रशस्त, भरपूर सुख सोयी असलेले होते. सगळ्या रूम्स देखील मोठ्या आणि हवेशीर होत्या. एका रूम मध्ये ३ मुलींना राहायची सोय होती. मला जी रूम मिळाली होती ती खूप छान होती पण सामान्य शौचालय असल्यामुळे शौचालय माझ्या रूम पासून बरेच लांब होते. म्हणजे त्या मजल्यावर १०-११ रूम ओलांडून गेल्यावर तिथे जाता येत होते. पण तसे बघायला गेले तर हॉस्टेल मला खूपच आवडले होते.
मी राहायला गेल्यावर तिथे रुळायला थोडा वेळ लागला पण हळु हळू घरची आठवण कमी झाली. तिथे बऱ्याच मैत्रिणी ही झाल्या. आमचा ६ जणांचा ग्रुप होता. आमच्या रूम्स पहिल्या मजल्यावर होत्या. त्या वर्षी परीक्षा जवळ आल्या होत्या. रात्री जेवण वैगरे आटोपून मी आणि माझ्या दोन मैत्रिणी आम्ही रूम समोरच्या पेसेज मध्ये अभ्यास करत बसलो होतो. तिथे तशी बसायला व्यवस्था होती. तसे आम्ही नेहमीच तिथे बसायचो. पण परीक्षा असल्यामुळे रात्री एकत्र जागरण करून अभ्यास करायचे ठरवले होते. मध्य रात्र उलटली होती. जवळपास सगळे झोपले असावेत किंवा आप आपल्या रूम मध्ये अभ्यास करत बसले असावेत.
हॉस्टेल मधले वातावरण अगदी शांत झाले होते. आम्ही ही अभ्यासात अगदी मग्न झालो होतो. तितक्यात मला कसलासा आवाज येऊ लागला. सुरुवातीला मी दुर्लक्ष केले पण तो आवाज हळु हळू स्पष्ट होऊ लागला. तो पैंजणांचा आवाज होता. मी माझ्या जवळ बसलेल्या २ मैत्रीणीना विचारले “किंजू , मधू तुम्हाला कसला आवाज येतोय का”. तसे त्या नाही म्हणाल्या. आवाज हळु हळू वाढतच चालला होता पण तरीही त्या दोघींना ऐकू येत नव्हता. मी त्या आवाजाच्या दिशेने पाहू लागले. तो आवाज खालच्या मजल्यावरून हळु हळू पुढे सरकत आमच्या मजल्यावर येत असल्याचे भासू लागले.
पण संपूर्ण होस्टेल मध्ये कोणीही नजरेस पडत नव्हते. तितक्यात त्या दोघींनी माझ्या कडे पाहिले. आता मात्र त्यांना ही तो आवाज ऐकू येऊ लागला. आम्ही तिघी ही जणी खूप घाबरलो कारण तो आवाज माच्या दिशेने सरकत येत वाढत होता. आम्ही पुस्तके आवरली. आमच्या पैकी ऐकीची म्हणजे किंजु ची रूम दुसऱ्या मजल्यावर होती. ती आम्हाला म्हणाली “तुम्ही मला माझ्या रूम पर्यंत सोडायला चला”. घाबरतच मी आणि मधू तिला सोडायला गेलो आणि आमच्या रूम कडे परत येताना धावतच आलो. ती भीती, तो प्रसंग मी कधीही विसरू शकणार नाही.
नंतर आमच्या परीक्षा आटोपल्या आणि सुट्ट्या लागल्या. माझ्या दोन्ही मैत्रिणी हॉस्टेल वर नव्हत्या. एक गावाला गेली होती तर दुसरी नाईट आऊट लिहून नातेवाईकांकडे एक दिवसा साठी राहायला गेली होती. त्यामुळे रूम मध्ये मला एकटीलाच रहावे लागणार होते. टेंशन तर आलेच होते पण दुसरा काहीही पर्याय नव्हता. मी जेवण वैगरे आटोपून लवकरच झोपले. अगदी गाढ झोप लागली होती. माहीत नाही किती वाजले होते पण रात्र बरीच झाली होती. माझ्या रुमच्या दरवाजा वाजण्याच्या आवाजाने माझी झोपमोड झाली.
मला वाटले की माझी मैत्रीण गावावरून परत आली असेल. म्हणून मी गाढ झोपेतून डोळे चोळत च उठले आणि दार उघडायला गेले. पण दार उघडण्यासाठी आधी माझ्या मनात एक शंका डोकावून गेली आणि मी घड्याळात पाहिले. रात्रीचे २ वाजून गेले होते. माझी मैत्रीण इतक्या रात्री येणे तर शक्य नाही. मी हळूच चालत येऊन दरवाज्याजवळ उभी राहिले आणि दरवाजा न उघडता कानोसा घेऊ लागले. तसे पुढच्या क्षणी कोणीतरी बाहेरून दरवाजा अतिशय जोरात वाजवू लागले. असे वाटू लागले की मी दार उघडले नाही तर ते तोडून कोणीतरी आत येईल. मी जीव मुठीत धरून आत बेड वर तशीच बसून राहिले. झोप तर कुठच्या कुठे निघून गेली होती.
बऱ्याच वेळ दरवाज्यावर प्रहार होत राहिले आणि नंतर सगळे शांत झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी मी मैत्रिणीला फोन केला आणि विचारले तसे ती म्हणाली “एवढ्या रात्री मी कशी येईन. आणि आले असते तर तुला फोन करून कळवले नसते का?”. मला तिचे बोलणे पटले आणि जाणवले की हॉस्टेल मधले कोणी असते तर मी दरवाजा उघडत नाही म्हंटल्यावर मला फोन तर नक्कीच केला असता. त्या विचारांनी माझ्या मनात भीतीने घर करायला सुरुवात केली. एकच प्रश्न पुन्हा पुन्हा सतावत होता. कोण आल होत काल रात्री..? पुढचे काही दिवस मी भीती च्याच सावटाखाली घालवले. काही दिवसांनी माझी मैत्रीण मधू आली.
ती असताना एका रात्री अगदी तसाच प्रकार घडला. आम्ही दोघेही गाढ झोपलो होतो. आणि रात्री २ च्याच सुमारास पुन्हा दरवाजा वाजू लागला. मधू उठून दार उघडायला गेली पण मी तिला अडवत म्हणाले “दार उघडू नकोस”. मी तिला काही दिवसांपूर्वी माझ्या सोबत घडलेला प्रकार सांगितला. तो ऐकुन ती देखील बरीच घाबरली. दिवसेंदिवस हे प्रकार वाढतच चालले होते. मला एकदा रात्री वॉश रूम ला जायला म्हणून मी उठले आणि मला जाणवले की पॅसेज मधून चालताना माझ्या मागून कोणी तरी चालत येतंय. मी कशी ब शी वॉश रूम ला जाऊन आले आणि येताना धावतच रूम मध्ये शिरले. या सगळ्या गोष्टी थांबायचे नावच घेत नव्हत्या.
कधी कधी तर मला संपूर्ण बेड कोणी तरी हलवत असल्यासारखे वाटायचे आणि मी मध्यरात्री दचकून उठायचे. नंतर मला अतिशय वाईट स्वप्न पडू लागली आणि माझी झोपायची इच्छाच निघून गेली होती. माझ्या मैत्रिणीबरोबर ही या विचित्र गोष्टी घडत असल्या तरी सगळ्यात भयानक प्रसंग माझ्यावरच ओढवत होते. असे का होतंय तेच कळत नव्हत. पण त्या रात्री जे घडले ते मी उभ्या आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही. मी त्या रात्री बाथरूम ला जाण्यासाठी उठले आणि परत रूम मध्ये येताना पॅसेज मधून खालच्या मजल्यावर लक्ष गेल. तिथे कोणी तरी उभ होत.
मी थोडे पुढे जाऊन नीट निरखून पाहिले तर एक सडपातळ अंगाची मुलगी उभी होती. मला तिला पाहून धडकीच भरली कारण ती माझ्याकडेच पहात होती. केस विस्कटलेले वाटत होते. ती हॉस्टेल मधली वाटत नव्हती कारण तिला मी या आधी कधीच पाहिले नव्हते. मी जास्त विचार न करता सरळ रूम मध्ये आले. दुसऱ्या दिवशी जेव्हा माझी मैत्रीण कींजू माझ्या रूम मध्ये आली तेव्हा मी विषय काढला आणि त्या मुली बद्दल विचारले. तेव्हा ती म्हणाली “आपण या बद्दल माहिती मिळवली पाहिजे, मला हा प्रकार काही तरी वेगळाच दिसतोय. मी विचारून बघते कोणाला काही माहितीये का..?”. साधारण २ दिवसांनी ती माझ्या जवळ माझ्या बेड वर येऊन बसली आणि मला म्हणाली “कोमल मला तुला काही तरी सांगायचे आहे”.
तसे मी म्हणाले “हो बोल ना..” त्यावर ती सांगू लागली. मी चौकशी केली आपल्या हॉस्टेल च्या मेस मध्ये. त्या माऊशी आहेत ना. खूप वर्षांपासून स्वयंपाक करतात मेस मध्ये मी त्यांनाच विचारले. त्या म्हणाल्या की तुम्हाला जे अनुभव येत आहेत ते या पूर्वी त्या रूम नंबर २४ मध्ये राहणाऱ्या बऱ्याच मुलींना आले आहेत. विशेष म्हणजे मधला बेड जो मुलगी वापरते तिला सगळ्यात जास्त जाणवतात. त्या रूम मध्ये एकीने आत्महत्या केली होती. त्या रूम मध्ये राहणाऱ्या मुलींना आणि तो मधला बेड वापरणाऱ्या मुलीला ती अशीच त्रास देते. तो बेड ती मुलगी वापरायची. तिचे बोलणे ऐकून माझी तर वाचाच बंद झाली होती. सगळ्यात भयंकर गोष्ट म्हणजे ती मला या सगळ्या गोष्टी सांगताना आम्ही दोघीही त्याच बेड वर बसून बोलत होतो.
त्या माउशी च्याच सांगण्यावरून आम्ही तिघींनी ती रूम त्याच दिवशी बदलून घेतली होती.