अनुभव – हरिओम खडतरे

प्रसंग गेल्या वर्षीचा आहे. माझ्या मामाचे लग्न ठरले होते. आम्ही सगळे एक दिवस अगोदर च गेलो होतो. माझे आणि माझ्या मावस भावाचे खूप पटायचे म्हणून आम्ही दिवस असो की रात्र खूप फिरायचो. आम्ही पोहोचलो त्या रात्री जेवण आटोपल्यावर भाऊ म्हणाला की चल आपण बाजूच्या गावात फिरून येऊ. तसे मी आधी नाही म्हणालो पण नंतर तयार झालो. आम्ही गाडी घेऊन निघालो तर खरे पण अर्ध्या रस्त्यात त्याला काय वाटले काय माहीत. तो म्हणाला की पुढे एकही गाडी दिसत नाहीये आपण परत घरी जाऊ. रस्ता तसा सामसूम वाटत होता. म्हणून मी ही जास्त विचार न करता गाडी वळवली. तेव्हा मला कुठे माहित होते की काळ आला होता पण वेळ आली नव्हती. आणि कदाचित म्हणूनच मला गाडी वळवायची बुद्धी सुचली. 

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मामा ची हळद होती. तारीख ३१ मे. तशी सगळी तयारी आणि व्यवस्था झाली होती. संध्याकाळी साधारण ७ वाजता सगळे निघाले आणि रात्री १०.३० वाजता अगदी वाजत गाजत हॉल वर जाऊन पोहोचले. सगळ्यांमध्ये माझा थाट अगदी वेगळाच होता. पांढरी शुभ्र पँट, तसाच कडक इस्त्री केलेले पांढरे शुभ्र शर्ट, गळ्यात सोन्याच्या चैन, हातात तसेच उठून दिसणारे गोल्डन वॉच.. अगदी सिनेमातल्या हीरो सारखा लुक. हळदीचा कार्यक्रम उरकला तसे नवरा नवरी अंघोळीला गेले. मी कोणालाही न सांगता जेवणाच्या हॉल मध्ये गेलो आणि अगदी पोटभर जेवून घेतले. जेवण अगदी छान होते म्हणून नेहमीपेक्षा जरा जास्तच जेवलो. सहज म्हणून मी तिथून फेरफटका मारायला बाहेर पडलो. तेव्हा साधारण ११.१५ झाले होते. हॉल तसा मुख्य रस्त्यापासून बराच आत होता. मी बाहेर पडल्यावर मुख्य रस्त्याच्या दिशेने सरळ चालत गेलो. साधारण अर्धा एक किलोमीटर चालत आलो असेन. 

काही वेळानंतर वाटले की आता मागे फिरून पुन्हा हॉल वर जावे म्हणून मागे वळलो आणि थोड गोंधळलो. मी अगदी सरळ चालत आलो पण आता हा रस्ता वेगळा का वाटतोय.. मी पुन्हा हॉल च्याच दिशेने चालायला सुरुवात केली. मी जवळपास अर्धा पाऊण तास चालत राहिलो पण तो हॉल काही दृष्टीस पडत नव्हता. मनात एक अनामिक भीती दाटत चालली होती. माझ्या पावलांचा वेग नकळत वाढला होता. आता जवळपास ४-५ किलोमीटर चालून झाले असावे पण तो हॉल. काही वेळा नंतर मला एक गोष्ट लक्षात आली की मी कितीही चालून पुढे आलो तरी पुन्हा त्याच ठिकाणी येतोय. सर्वांगाला घाम फुटायला सुरुवात झाली. चकवा.. इतके दिवस फक्त ऐकुन होतो पण आज प्रत्यक्षात अनुभवत होतो. किती तरी वेळ अगदी सरळ दिशेने चालून सुद्धा मी त्याच एका जागेवर येत होतो.

मी महादेवाचे नाव घ्यायला सुरुवात केली. आणि पुन्हा हॉल च्या दिशेने झपाझप पावले टाकत निघालो. तितक्यात पुढून एक ट्रक येताना दिसला. त्याच्या हेड लाईट च्या पडणाऱ्या प्रकाशात माझ्या मागच्या बाजूला कसलीशी हालचाल जाणवली आणि अंगावर सर्रकन काटा येऊन गेला. मी तिरक्या नजरेने मागे पाहण्याचा प्रयत्न केला आणि एक पांढरट आकृती वाऱ्याच्या वेगाने अंधारात जात दिसेनाशी झाली. माझे काळीज भीतीने धडधडू लागले होते. काय करावे काही सुचत नव्हते. पण एक गोष्ट मला कळली की आपण आता कितीही प्रयत्न केले तरी आपल्याला हॉल सापडणार नाही. तेवढ्यात समोरून एक बाईक येताना दिसली तसा जीवात जीव आला. 

मी थोड रस्त्याच्या मधोमध जाऊन त्या बाईक वाल्याला हात केला. त्याने ही बाईक थांबवली. तसे मी त्याला जरा अडखळत च विचारले “काका मला इथल्या जवळच्या हॉल वर सोडता का”. त्याने माझ्याकडे काही क्षण पाहिले आणि मला गाडीवर बसायला सांगितले. त्यांनी मला १००-१५० मिटर अंतरावर नेऊन सोडले. आणि एका दिशेला इशारा करत म्हणाले की हे हॉल चे गेट आहे. इथून आत बल्ब दिसतोय त्या दिशेने सरळ चालत जा. मी त्यांना पुढे काही विचारणार इतक्यात ते तिथून निघूनही गेले. मला जरा विचित्र वाटले कारण तो हॉल चा परिसर मुळीच वाटत नव्हता. बहुतेक हॉल ची मागची बाजू असावी असा विचार करत मी त्या गेट मधून आत शिरलो आणि पुढे चालू लागलो. 

पण मला वाटले तेच झाले. माझ्या अंगावर भीती ने शहारे येऊ लागले. तो मिट्ट काळोख आता मला असह्य होत होता. तिथे कोणताही हॉल नव्हता. तिथे एक विहीर होती. पडकी, जीर्ण झालेली विहीर. आत डोकावून पहायची तर अजिबात हिम्मत होत नव्हती. मी मागे वळलो आणि थेट धावत सुटलो. मी प्रचंड घाबरलो होतो. पण जसे मी धावायला सुरुवात केली तसे मला जाणवू लागले की मला मागून कोणी तरी खेचते य. समोरून मला पुन्हा एक ट्रक येताना दिसला. त्याचा वेग बऱ्यापैकी कमी होता. मदत मागण्याच्या उद्देशाने हात करू लागलो पण त्याने माझ्या समोरून कट मारत ट्रक वेगात घेतला. बहुतेक त्याने काही तरी असे पाहिले होते जे मला दिसत नव्हते पण माझ्या बरोबर होते. 

बऱ्याच वेळ धावल्या नंतर मला समोर एक देऊळ दिसले. मी धावत थेट त्या देवळात शिरलो आणि तिथल्या दानपेटी जवळ आडवा झालो. माझे अंग अगदी गार पडले होते. तिथे २-३ जण उभे होते. सोबत तिथले पुजारी ही होते असे वाटले. तसे मी त्यांना म्हणालो की मला चकवा लागला आहे मला यातून बाहेर काढा. त्यांनी माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाले की ते बूट बाहेर काढ, तसे मी बूट बाहेर भिरकावले. ते मला म्हणाले की इथेच शांत पणे झोप थोड्या वेळ. साधारण एक दीड तासाने मला जाग आली. देवळा बाहेर माझ्याच वयाची चार मुलं उभी दिसली. मी बोलायचा प्रयत्न करत होतो पण माझ्या अंगात जे होते ते बहुतेक मला बोलू देत नव्हते. 

अथक प्रयत्नानंतर मी त्यांना म्हणालो “भावांनो.. मला इथल्या जवळच्या हॉल वर नेऊन सोडा”. त्यातल्या एकाने माझी अवस्था पाहून लगेच ओळखले की माझ्यावर कोणता प्रसंग ओढवलाय. तो सांगू लागला “भाऊ.. तुझ्या सोबत काय घडले य ते मला माहितीये. हा रस्ताच खूप खराब आहे”. त्याने मला मोबाईल काढून दिला. मला कोणाचाही नंबर आठवत नव्हता म्हणून मी थेट माझ्या घरी वडिलांना फोन लावला. पण नेमके ते ही फोन उचलत नव्हते. बऱ्याचदा प्रयत्न केल्यानंतर शेवटी त्यांनी फोन उचलला. मी त्यांना सगळे सांगितले आणि म्हणालो की तुम्ही कोणाला तरी हॉल वरून मला इथे घ्यायला बोलवा. 

थोड्याच वेळात माझा दुसरा मामा आणि बंडू मला घ्यायला आले. मी त्या मुलांचे आभार मानून गाडी वर बसलो आणि तिथून निघालो. पण जाताना मला सगळे फिरताना दिसत होते. हॉल वर गेल्यावर मी सगळ्यांना घाण शिव्या देऊ लागलो. माझ्या मावशीने लगेच ओळखले की मी आजची रात्र तरी असाच वागणार. तेवढ्यात माझा मामा म्हणाला “पडक्या विहिरीजवळ गेलता का?..” मी काही समजण्याच्या अवस्थेत नव्हतो. पण सगळ्यांना कळून चुकले होते. दुसऱ्या दिवशी मला घेऊन सगळे घरी परत आलो. माझ्यावर उतारा करून ती बाधा काढण्यात आली. त्या रात्री नंतर मी ११ च्या आत घरी असतो आणि रात्री अपरात्री बाहेर जाणे आवर्जून टाळतो. 

https://www.youtube.com/watch?v=bjpon8t7z-k

Leave a Reply