अनुभव क्रमांक – १ – शिवम पाटील

त्या दिवशी मी आणि माझा मित्र बाईक घेऊन सहज फिरायला बाहेर गेलो होतो. घरी यायला बराच उशीर झाला. आमच्या घराकडच्या रस्त्याला वर्दळ अगदी कमी असते त्यामुळे आम्ही बाईक अगदी सुसाट पळवत होतो. पण अचानक एक आजोबा सायकल वरून आमच्या बाईक समोर आले आणि त्यांना वाचवायच्या नादात माझा बाईकवरचा ताबा सुटला. बाईक त्यांच्या पायावरून गेली आणि आम्ही पुढे फरफटत जाऊन रस्त्यावर आदळलो. 

ते आजोबा तिथेच रस्त्यावर पडून वेदनेने कळवळत होते. मदतीच्या आशेने हाका मारत होते. तिथे लगेच आजूबाजूचे लोक जमा झाले. अपघात इतका भिषण होता की माझ्या डोक्याला जबर मार लागून मी जागच्या जागीच बेशुद्ध झालो. आम्हाला अँब्युलन्स ने दवाखान्यात घेऊन गेले. थोड्या वेळाने शुध्द आली तेव्हा तिथे काही लोकांना बोलताना ऐकले. जिथे आमचा अपघात झाला होता त्याच ठिकाणी काही वर्षांपूर्वी असाच भिषण अपघात झाला होता आणि त्यात एक व्यक्ती मरण पावली होती. 

सगळ्यात विचित्र गोष्ट म्हणजे तिथले लोक म्हणतात की त्या जागेत ती व्यक्ती अजुन ही वास करते आणि प्रत्येक वर्षी एकाला घेऊन जाते. त्यांचे बोलणे ऐकून मी मात्र सुन्न च झालो होतो. कारण आम्ही थोडक्यात वाचलो होतो. नंतर अजुन एक गोष्ट कळली की त्या रात्री अमावस्या होती. देवाच्या कृपेने आम्ही वाचू शकलो. असे म्हणतात ना काळ आला होता पण वेळ आली नव्हती. त्या नंतर मात्र मी रात्री अपरात्री बाहेर फिरायला जाणं शक्यतो टाळतो. 

अनुभव क्रमांक – २ – शुभम धुमाळ

रविवार असल्यामुळे मी माझ्या मित्रा सोबत ड्रिंक करायला गेलो होतो. संध्याकाळ चे ५ वाजले होते. तास २ तास ड्रिंक केल्यावर आम्ही जोमात आलो. माझा मित्र म्हणाला की चल आपण ट्रेन ने जाऊन फिरून येऊ. मी ही धुंदीत होतो म्हणून त्याला हो म्हणालो. आम्ही कोणती तरी एक ट्रेन पकडली आणि काही स्टेशन नंतर आम्ही प्लॅटफॉर्म वर उतरलो. सगळ्यात आधी हॉटेल मध्ये जाऊन पोट भर जेवलो आणि नंतर तिथल्याच भागात फेरफटका मारून पुन्हा ट्रेन पकडली. 

नशेत असल्यामुळे वेळेचं भान नव्हतं आम्ही साधारण १२ वाजता परतीची ट्रेन पकडली आणि १ ते दीड च्या सुमारास आमच्या स्टेशन वर उतरलो. स्टेशन पासून जवळपास १५ किलोमीटर चालत जावे लागणार होते. कारण इतक्या रात्री कोणते वाहन मिळणे जवळ जवळ अशक्य होते. तरीही आम्ही रिक्षा वैगरे मिळतेय का ते पाहत होतो. पण शेवटी पायपीट करत जाण्याशिवाय दुसरा मार्ग नाही हे लक्षात आले. तसे मित्र वैतागत म्हणाला चल आता चालत जाऊ नाही तर अजुन उशीर होईल. 

स्टेशन पासून साधारण २ किलोमीटर चालत आलो असू. रस्त्यावर अमच्याशिवा य एक चिटपाखरूही दिसत नव्हते. सगळे अगदी सामसूम होते. रस्त्यालगत असलेले हेड लाईट असून नसल्यासारखे होते. म्हणजे त्या लाईट स चा प्रकाश अजिबात पडत नव्हता. त्यामुळे सगळी कडे गडद अंधार पसरला होता. माझ्या मित्राने सहज म्हणून मागे वळून पाहिले आणि तो प्रचंड घाबरला. कारण आम्ही फक्त दोघे चालत होतो पण आमच्या मागे तीन सावल्या होत्या. माझ्या मित्राने मला हे सांगितल्यावर मी ही घाबरलो. जास्त काही विचार न करता आम्ही तिथून धावत सुटलो. 

काही वेळा नंतर आम्ही एका पुलाजवळ आलो आणि मागून एक कर्णकर्कश्श आवाज कानावर पडला “वाचलात तुम्ही”. आमच्यासोबत ते जे काही होते त्याची हद्द ओलांडून आम्ही बाहेर आलो होतो बहुतेक. आम्ही ती संपूर्ण रात्र त्याच पुलावर बसून काढली. पहाटे एक रिक्षा दिसली तेव्हा कुठे आम्हाला आमच्या रूम वर जाता आले. हा विचित्र प्रसंग आम्ही कधीही विसरू शकणार नाही..

अनुभव क्रमांक – ३ – दीपा पाटील

ही घटना माझ्या लहानपणीची आहे. मी साधारण ३-४ वर्षांची असेन. ही घटना माझ्या वडिलांसोबत घडली होती जी मला आईने बऱ्याच वर्ष नंतर सांगितली. माझे वडील एका कंपनीत कामाला होते. त्यांना रोज पहिली शिफ्ट असायची. पण एके दिवशी अचानक दुसऱ्या शिफ्ट ला बोलावले. आणि दुसरी शिफ्ट म्हटली की रात्री यायला हमखास उशीर व्हायचा आणि तसेच झाले. त्यांना कंपनीतून निघायला रात्री २ वाजले. 

घरा कडे येताना रेल्वे चे ट्रॅक ओलांडून यावे लागायचे. म्हणजे १०-१५ मिनिट चालून नंतर थोडे आत आमचे घर होते. त्या रात्री ही ते ट्रॅक वरून चालत येत होते. सगळा परिसर निद्रेच्या आहारी गेला होता. पण त्यांना असे वाटू लागले की त्यांच्या मागून अजुन कोणी तरी चालत येतय. भास समजून त्यांनी दुर्लक्ष करायचा प्रयत्न केला. पण काही वेळानंतर ती चाहूल त्यांना अधिकच स्पष्ट जाणवू लागली.

ते एका क्षणी जागीच थांबले आणि त्यांनी मागे वळून पाहिले. त्यांच्या मागून एक बाई चालत येत होती. अंधार असल्यामुळे त्यांना नीटसे काही दिसले नाही पण साडी नेसलेली असल्याचे त्यांना वाटले. इतक्या रात्री आपल्या भागात नक्की कोण फिरते य हे ते पाहू लागले. जशी ती बाई त्यांच्या जवळ येऊ लागली तसे त्यांना दिसले की त्या बाईला मुंडके च नाहीये. तिच्या हातात कसला तरी डबा होता. ते भयाण दृश्य पाहून माझे वडील प्रचंड घाबरले. 

इतक्या रात्री कोणाला बोलवणार म्हणून ते वळले आणि झापझप पावले टाकत घराकडे निघाले. अचानक त्यांचा १ मित्र त्यांना समोरून येताना दिसला तसा त्यांचा जीव भांड्यात पडला. त्याने माझ्या वडिलांना विचारले की इतक्या रात्री कुठे चालला आहेस. तसे ते म्हणाले की आज माझी दुसरी शिफ्ट होती म्हणून कामावरून यायला उशीर झाला. माझे वडील त्याला घाबरत म्हणाले “तुला एक सांगू का रे..” तसे तो त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहतच म्हणाला “हो.. काय झालं “. तसे ते म्हणाले की माझ्या मागे कोण आहे पाहशील का..?

त्याने पटकन वडिलांच्या मागे पाहिले आणि त्यांना म्हणाला “कोणी नाहीये रे.. तुला घाबरायला इतकं काय झालं..?”. तसे ते जरा अडखळत म्हणाले “माझ्या मागून एक बाई चालत येत होती आणि तिला मुंडके नव्हते रे.. फक्त तिचे धड दिसत होते. तिने हातात डब्या सारखे काही तरी धरलेले वाटत होते. मी जशी वाट बदलत होतो ती ही माझ्या मागे वाट बदलत येत होती.” तसे तो म्हणाला “हे बघ घाबरु नकोस.. मी येतो तुला घरी सोडायला.” 

माझ्या वडिलांचा मित्र एका मशिदीमध्ये साफ सफाईचे काम करायचा. आणि तिथून सगळे काम आटोपल्यावर रात्री घरी यायला निघायचा. ते दोघेही घरी आले. वडिलांनी त्याचे आभार मानले आणि म्हणाले मी तर पोहोचलो पण तू कसे जाणार एकटा. तुला पुन्हा त्याच वाटेने जावे लागणार आहे. तसे तो म्हणाला की तू काळजी नको करुस रे माझी. मी जाईन. माझ्या वडिलांनी ठीक आहे नीट जा असे सांगून त्याचा निरोप घेतला. 

वडील घरात आले. माझी आई त्यांची वाट बघत बसली होती. त्यांनी घडलेला सगळा प्रकार सांगितला. तेव्हा आई सांगू लागली. अहो मी तुम्हाला सांगितले नाही कारण तुम्हाला या गोष्टी पटत नाही आणि ऐकायला आवडत ही नाहीत. पण आता सांगते. ४ दिवसांपूर्वी एक बाई त्याच ठिकाणी ट्रेन खाली येऊन गेली. त्या नंतर आपल्या भागातल्या लोकांना ही ती दिसली आहे. हे ऐकुन माझे वडील सुन्न च झाले. त्या घटने नंतर साधारण २ महिन्यांनी आम्ही ती जागा सोडून दुसरी कडे राहायला गेलो. 

Leave a Reply