लेखक – तेजस देशपांडे

ही साधारण २ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा मी शिक्षणासाठी बाहेरगावी होतो. आमच्या परीक्षा नुकत्याच संपल्या होत्या म्हणून मी घरी जाण्याचे ठरवले. कॉलेज सुटल्यावर मी सामान वैगरे पॅक केले आणि एस टि बस ने घरी जायला निघालो. माझ्या येण्याबद्दल मी आई बाबांना तसे काही कळवले नव्हते. काही तरी बिघाड झाल्यावर वाटेत बस बंद पडली. त्यात जवळपास दीड तास वाया गेला. त्यामुळे माझ्या गावी पोहो चायला बरीच रात्र झाली. मी बस स्थानकावर उतरलो तेव्हा साडे दहा वाजून गेले होते. बस स्थानकापासून घरा पर्यंत जायला एकही वाहन मिळत नव्हते.

मोबाईल ला नेटवर्क नसल्याने मी आई बाबांना फोन ही लावू शकत नव्हतो. रस्ता अगदी निर्मनुष्य. रात्र झाल्यामुळे वाहनांची वर्दळ ही नव्हती. रस्त्याने चालत जायचे म्हंटले तर ६ किलोमीटर पायपीट करून जावे लागणार. पण घरी जायला टेकडीवरून दुसरा शॉर्ट कट होता. तिथून गेलो तर फक्त २ किलोमीटर आणि तसे ही मी तिथून खूप वेळा गेलो होतो म्हणून मी त्या शॉर्ट कट नेच जायचे ठरवले. रस्ता सोडून टेकडी चढू लागलो. त्यात अमावस्या असल्याने सगळी कडे अगदी गडद अंधार पसरला होता. मोबाईल टॉर्च च्या प्रकाशात वाट काढत मी पुढे जात होतो. 

काही वेळानंतर मला जाणवले की अर्धा तास झाला तरी मला माझ्या ओळखीचा परिसर दिसत नाहीये. बहुतेक मी वाट चुकलोय. मी काही ओळखीच्या खुणा दिसत आहेत का ते शोधू लागलो. हळु हळु वातावरणातला बदल मला जाणवू लागला होता. थंडी वाढत होती. त्या निरव शांततेत रातकिड्यांचा आवाज तेवढाच काय तो येत होता. आता जवळपास एक तास उलटून गेला होता. मला मात्र काही वाट सापडत नव्हती. माझ्या मनात भीतीने घर करायला सुरुवात केली होती. तितक्यात एकदम सगळे शांत झाले आणि अतिशय थंड वाऱ्याची झुळूक माझ्या शरीराला मागून स्पर्श करून गेली. मी जागीच स्तब्ध झालो.

मागे वळून पाहणार तितक्यात मागून पैजणाचा आवाज येऊ लागला. मला आजीने सांगितलेले आठवले की “अश्या वेळेस मागे वळून पहायचे नसते” म्हणून मी सरळ चालायला सुरुवात केली. मला आधीच थंडीने कापर भरायला सुरुवात झाली होती आणि त्यात या आवाजाने तर माझ्या हातापायाला कंप सुटू लागला होता. तितक्यात मला मागून एका बाईचा आवाज कानावर पडला “काय रे पोरा.. कुठे निघालाय?”.. पुन्हा आजीचे शब्द आठवले की अश्या वेळेस तोंडातून एक शब्दही काढायचा नसतो. माझ्या हृदयाची धड धड वाढू लागली होती. मी माझे चालणे थांबवले नव्हते. पण प्रत्येक पाऊल माझ्या मनात एक नवीन भीती निर्माण करत होते. त्यात माझ्या घशाला कोरड पडली होती.

पुन्हा एकदा त्या बाईचा आवाज कानावर पडला पण यावेळेस तिच्या आवाजातून अतिशय राग जाणवला “मी काय विचारतेय?.. कोण तू..? कुठे चाललास?..” आता मात्र माझा धीर संपत चालला होता. मी प्रचंड घाबरलो होतो. मला चित्र विचित्र आवाज ऐकू येऊ लागले. मला वाटू लागले की मी एका घेऱ्यात अडकलो आहे आणि त्यातून सुटायचा कोणताही मार्ग दिसत नाहीये. पण मी चालणे थांबवले नाही. मला मध्येच बाजूच्या झुडपातून अचानक सळसळ ऐकू यायची आणि अंगावर सर्रकन काटा यायचा. मी मनातल्या मनात मारुती स्तोत्र म्हणू लागलो. मी १०-१५ मिनिटांनी एका विहिरपाशी येऊन पोहोचलो. 

तिथे आल्यावर माझी पावलं आपोआप जड झाली. मी त्या विहिरीकडे पाहू लागलो तसे मला लहान मुलीच्या रडण्याचा आवाज येऊ लागला. मी त्या विहिरीच्या दिशेने चालत थोडे पुढे गेलो तर तिथे एक मुलगी विहिरीपाशी बसून रडत होती. मला कळून चुकले की हा फक्त एक भास आहे. माझे स्तोत्र पठण चालूच होते. मी त्या लहान मुलीकडे बघून न बघितल्या सारखे केले आणि तिथून पुढे जाऊ लागलो पण तितक्यात तिच्या मागून एक बाई आली. आणि पुन्हा माझे लक्ष तिथे गेले. तिच्या गळ्यात मोठा दोरखंड असलेला गळफास लावल्या सारखा वाटत होता. कपाळावर मळवट होत. मला काही कळणार तितक्यात तिने त्या मुलीला उचलून विहिरीत फेकून दिले. समोर घडत असलेला प्रकार पाहून माझ्या शरीरातला त्राण च संपला होता. 

ती विहिरी शेजारच्या एका झाडाकडे चालत जाऊ लागली. आणि जे घडायला नको होते तेच झाले. मी तिला पाहत असल्याचे तिला कळले. ती माझ्याकडे बघून अतिशय जोरात किंचाळली आणि माझ्या दिशेने धावत सुटली. मी तिचे असे रूप पाहून इतका घाबरलो की कसलाही विचार न करता मागे फिरून सैरा वैरा धावत सुटलो. मी शरीरात होता नव्हता तेवढा त्राण एकवटून जिवाच्या आकांताने धावत होतो. आज आपला जीव काही वाचत नाही असे वाटू लागले. मनात देवाचा धावा करू लागलो. मागे वळून पाहण्याची हिम्मत होत नव्हती. जवळपास १०-१५ मिनिट झाडी झुड पा तू न मी जीव मुठीत धरून धावत राहिलो. आणि तितक्यात मला समोर एक व्यक्ती कंदील घेऊन उभा दिसला. हाच माझा शेवट असे समजून मी जीव वाचवण्याची धडपड सोडून दिली. 

पण त्या व्यक्तीच्या जवळ गेल्यावर कळले की कोणीतरी वयस्कर गृहस्थ कंदील घेऊन उभे आहेत. ते मला थांबवत च म्हणाले “बाळा पळू नकोस, मी आहे, घाबरु नकोस. मी तुला टेकडीच्या पायथ्याशी सोडतो.” त्यांचे मदतीसाठी म्हंटले ले वाक्य ऐकून मला थोडा आधार वाटला. मी त्यांना घडलेला सगळा प्रकार सांगितला आणि विचारले की हे सगळे काय होते तुम्हाला या बद्दल काही माहिती आहे का.? तसे ते मला सांगू लागले “खूप वर्षांपूर्वी इथल्या एका जमीनदाराच्या बायकोने तिच्या मुलीबरोबर इथे आत्महत्या केली होती. ती रात्र अमावसायेची होती. त्या नंतरच्या प्रत्येक अमावस्येला तिचा फेरा असतो. सगळे पुन्हा दिसते. मला एक सांग “तू तिच्या प्रश्नांना उत्तरं दिलेस का?”. तसे मी म्हणालो “नाही.. मी मागे वळून ही पाहिले नाही. 

बरे केलेस नाही तर तू तिच्या फेऱ्यात इथे कायमचा अडकला असतास. एव्हाना आम्ही टेकडीच्या पायथ्याशी आलो होतो. मी बॅगेतून पाण्याची बाटली काढली आणि पाणी प्यायलो. घसा पूर्ण कोरडा पडला होता. पाणी प्यायल्यावर थोडा जीव आल्यासारखे वाटले. मी त्या गृहस्थाचे आभार मानायला म्हणून बाजूला पाहिले पण त्या परिसरात मी फक्त एकटा होतो. माझ्या बरोबरचे ते गृहस्थ दिसेनासे झाले होते. मला अंगावर काटा येऊन गेला की नक्की माझ्या सोबत कोणी होते की हा सुद्धा माझा फक्त भास होता. तिथून पुन्हा धावतच घरी आलो. अवेळी घरी आल्यामुळे बाबांनी विचारले तसे मी सगळ्या गोष्टी सविस्तर सांगितल्या.

बाबा मला खूप ओरडले. काय गरज होती इतक्या रात्री यायची आणि आलास तरी त्या टेकडीवरच्या वाटेने का आलास. मी निमुटपणे त्यांचे बोलणे ऐकून घेतले. त्या रात्री मला क्षणभरही झोप लागली नाही. सकाळी बॅगेतून कपडे काढून कपाटात ठेवत होतो. तितक्यात माझी नजर कपाटातल्या एका जुन्या फोटोवर गेली आणि धक्काच बसला. हा फोटो त्याच व्यक्तीचा होता ज्यांनी मला टेकडीच्या पायथ्या पर्यंत आणून सोडले होते. मी तो फोटो बाबांना दाखवत म्हंटले की बाबा हा फोटो कोणाचा आहे?. तसे ते म्हणाले की हा फोटो तुझ्या पणजोबांचा आहे. मी तुला काल ओरडलो त्याला कारणही तसेच होते. 

तू त्या टेकडी वरून रात्री चालत आलास. तुझे पणजोबा असेच एका रात्री त्या टेकडीच्या वाटेने चालत गेले आणि पुन्हा कधी आलेच नाहीत. त्यांचे काय झाले हे कोणालाही कळले नाही. वडिलांचे बोलणे ऐकून मला सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला होता. मी देवाचा धावा करत होतो आणि म्हणून च देवाने माझ्या पणजोबांना माझ्या मदतीसाठी पाठवले. त्यांनी मला अगदी सुखरूप यातून बाहेर काढले. पण याचा अर्थ ते इतक्या वर्षानंतर आजही तिच्या फेऱ्यात त्या टेकडीवर कायमचे अडकले आहेत

Leave a Reply