अनुभव – शुभम घोडके

मी नाशिक मध्ये राहतो. हा अनुभव मला ९ जुलै २०१९ मध्ये आला होता. माझा ऑफिस टायमिंग १० ते ६ असा आहे. ऑफिस पासून माझे घर खूप लांब नाही पण साधारण अर्ध्या तासा वर आहे. त्या दिवशी पावसाचा जोर खूप होता. जसे ऑफिस मधून निघालो तसे जोरात पाऊस सुरू झाला. त्यामुळे मग ट्रॅफिक मधून घरी येता येता खूप उशीर झाला. घरी आल्यावर लक्षात आले की मी माझ्या मित्राला म्हणजे अक्षय ला आज सलून मध्ये जायचे असे सांगितले होते. म्हणून घरी आल्या आल्या त्याला फोन केला. तो म्हणाला की मी १० मिनिट झाले तुझ्या घरा बाहेर येऊन थांबलोय, ये पटकन आधीच उशीर झालाय.

मी पटकन कपडे वैगरे बदलून फ्रेश झालो आणि तसाच बाहेर पडलो. आम्ही दोघं बाईक वर होतो पण रात्र झाल्यामुळे सगळे सलून बंद झाले होते. तरीही आम्ही एखादे सलून उघडे दिसतेय का ते पाहत होतो. अर्धा पाऊण तास फिरून झाल्यावर आमच्या परिसरापासून बरेच लांब आम्हाला एक युनिसेक्स सलून उघडे दिसले. आम्ही बाईक पार्क करून आत गेलो. आम्ही आत जात असताना बाहेर एक कार येऊन थांबली आणि त्यातून एक बाई उतरली. तिचा चेहरा नीट दिसला नाही कारण तिची हेअर स्टाईल थोडी वेगळीच होती. जणू केसांमुळे चेहरा झाकला जाईल. ती आमच्या मागोमाग सलून मध्ये आली.

आत आम्ही ५ जण होतो – मी, माझा मित्र, दोन न्हावी आणि ती बाई. मी जाऊन खुर्ची वर बसलो आणि ती बाई माझ्या बाजूच्या खुर्चीवर येऊन बसली. आधीच उशीर झाल्या मुले त्यांनी लगेच कटिंग करायला सुरुवात केली. मी त्याला माझे केस कसे कापायचे हे सांगितले. पण त्या बाई ने काही सांगितले नाही. माझे लक्ष बाहेर गेले तर जाणवले की ती कार दिसत नाहीये. पावसाचा जोर ही अजिबात कमी झाला नव्हता. पुढच्या १५-२० मिनिटांत माझे केस कापून झाले आणि माझा मित्र माझ्या खुर्चीवर जाऊन बसला. त्याचे ही पुढच्या १५ मिनिटांत केस कापून झाले.

पण जो न्हावी त्या बाई चे केस कापत होता तो जणू बुचकळ्यात पडला होता. कारण तो बऱ्याच वेळेपासून केस कापत होता, त्याने त्या बाईचे बरेच केस ही कापले होते कारण ते जमिनीवर पडल्याचे आम्हाला दिसत होते. पण तिचे केस काही कमीच होत नव्हते. हे गोष्ट मला ही खूप उशिरा लक्षात आली. समोर बसलेल्या मित्राला मी फक्त आरश्या तून पाहिले. आणि आम्ही फक्त डोळ्यांच्या इशाऱ्याने समजून गेलो की हे काही तरी वेगळे प्रकरण आहे. मी त्या नाव्ह्याकडे पाहिले तसे तो ही जे समजायचे ते समजून गेला. आम्ही सगळेच घाबरलो होतो.

मी मित्राला इशारा केला की उठ आणि बाहेर ये पटकन. इतका इशारा करून मी त्या सलून च्या दरवाज्याजवळ चालत गेलो आणि तितक्यात बाहेर कुठे तरी शॉर्ट सर्किट होऊन लाईट गेली. माझ्या अंगावर सर्रकन काटा आला. मी फक्त अक्षय ला एक हाक दिली आणि अवघ्या १०-१५ सेकंदात लाईट पुन्हा आली. मी पटकन मागे वळून पाहिले. तर ती बाई त्या खुर्चीवर नव्हती. माझी नजर मागे असलेल्या सोफ्यावर गेली तर ती तिथे ही नाही. त्या सलून मध्ये आम्ही फक्त ४ जण होतो. मी जिथे उभ होतो तिथून एका पावलावर दरवाजा होता. म्हणजे बाहेर जाण्याच्या वाटेतच मी उभा होतो.

मग ती बाई त्या एका रूम मधून गेली कुठे..? सलून मधले ते दोघं ही प्रचंड घाबरले होते पण काहीच बोलत नव्हते. मी अक्षय ला म्हणालो की पैसे दे आणि चल इथून.. आम्ही घाबरत तिथून बाहेर पडलो आणि बाईक ने थेट घरी आलो. घडलेल्या प्रकारा मुळे मी इतका घाबरून गेलो होतो की दुसऱ्या दिवशी आजारी पडलो. पुढचे ३-४ दिवस तापाने फणफणत होतो. आमच्या सोबत घडलेला तो भयाण प्रकार काय होता याचे गूढ अजूनही आम्हाला उलगडले नाहीये. 

Leave a Reply