आम्ही लहान असताना आम्हाला आमच्या मावशी आणि मामाकडून कधी गम्मतशीर तर कधी भूता-खेतांच्या गोष्टी ऐकायला मिळत. त्यातलीच ही एक गोष्ट. तेव्हा मी साधारण 5-6 वर्षांचा असेन बहुतेक. ही गोष्ट ऐकून माझी झोपच उडाली होती, पण तेवढच नवल ही वाटल होत, की जो माणूस एवढा साधा सरळ दिसतो, तेवढाच धीट ही असू शकतो.

बहुतेक २५-३० वर्षा अगोदरची घटना. माझी आजी आणि धाकटे मामा गावाच्या वेशीबाहेर रान नांगरायला जायची. दिवसा नांगरणी आणि रात्री शेतात नदीच पाणी सोडायच, हा त्यांचा दिनक्रम. त्यांच्या शेताला लागून मामांच्या मित्राच, म्हणजे महादेव मामाच शेत होत. ते दोघे दर रात्री उशिरा शेतात पाणी सोडायला जात. जेवण झाल, की थोडावेळ आराम करून, हातात कंदील आणि घोंगड घेऊन रानात जात. तिथ खोपीत सामान ठेऊन नदीवर पंप चालू करायला जायचे.

शेतापासून नदी जवळ जवळ 5-6 फर्लांग दूर होती. वाटेत भारदस्त अशी चिंचेची झाड होती, आणि भरपूर लहान लहान झुडूप. ह्या झुडपांच्या बाजूनी रोज चालल्यामुळे पायवाट तयार झाली होती. रात्रभर पाणी चालू ठेऊन सकाळी पाहिल्या उन्हाला पंप बंद करून घरी यायचे दोघ. कधी वेळ मिळाला तर रात्रीची हळूच ओली पार्टी पण व्हायची, पण एकदम गुपचुप. असे हे दोघे मित्र एकदम भावासारखेच रहायचे.

मे महिन्याच्या शेवटचे दिवस होते. पाऊस पडायला अजून थोडा अवधी होता. बिरोबाच्या कृपेने अजूनही नदीला पाणी खळखळत होत. त्या रात्री जेवण उरकून मामा बसलेच होते की म्हादू मामा घरी आले.
“काय जेवलास रे म्हादू?”
“आज दाजीन मटण आणल हूत. मस्त ताव मारून आलोय.” म्हादूमा डीवचतच बोलले.
“वाह रे पट्ट्या! एकटाच का? घसा वल्ला केलास काय नाही”
“नाही रे. घरात कुठ सोय आहे ती. तुझ्यासाठी पण आणले बघ मटण. उद्या खा मस्त.”
“उद्या कुणाला सवड हाय. डब्बा घेऊन चल शेतात. रात्री मस्त वेळ जाईल.” मामानी हळूच बाटलीची खूण केली आणि डोळा मारला.


“आईवू, पाणी सोडायला जातोय” अस म्हणत आजीला बाहेरूनच सांगून दोघे निघायला लागले. तोच आजी ताडकन बाहेर आली आणि विचारल,”बॅटरी आणि घोंगड घेतल्यासा काय नाही?” मामा गडबडीत बॅटरी घ्यायलाच विसरले. “बॅटरी आण आतली. घोंगड हाय एक खोपीत.” बॅटरी घेऊन दोघे निघाले. म्हादूमा हातात मटणाचा डब्बा घेऊन चालत होता.

“म्हादू, तू एक काम कर. ही बॅटरी घे आणि चल पुढ मी ‘सामान’ घेऊन येतो लगेच” वेशीवर पोहोचल्यावर माझ्या मामानी म्हादूमाला सांगितले. दोघे आपापल्या वाटेने पुढे निघाले. म्हादूमा रानात पोहोचणार तेवढ्यात मागून त्यांना कोणीतरी हाक दिली. “ए म्हादू, थांब जरा.” बघतो तर माझे धाकटे मामा होते.”एवढ्या लवकर आलास?”
“अरे त्यो सोमाप्पा तिथ मळ्यात आहे म्हणे. तिथूनच घेऊया सामान.” मामा म्हणाला.
ह्या सोमाप्पाचा मळा नदीच्या काठावरती होता.


“आणि हा डब्बा?” म्हादू मामाने विचारलं.
“घेऊन जाऊया. परत कोण उलट जाणार?” माझा मामाचा म्हणाला
निघाले दोघे सोमाप्पाच्या मळ्यात.


“अस मधन जाऊया. लवकर पोचू.” मामा बोलला

.
“नको रे. तिथ झुडपात पायाला काय लागल म्हणजे? नको. आपल्या वाटेन जाऊया.” म्हादूमा म्हणाला.


“चल रे, काय नाही होत. चल. बॅटरी हाय की तुझ्याकडे.” अस म्हणत मामा झपाझप पावले टाकीत त्या गर्द झुडपात शिरला. मामा न बघता पावलं टाकत होता आणि तेवढ्यात पाय मुरगळून पडला.”आयायाया.. खूप दुखतोय रे पाय”


“अरे मग उगाच कशाला गडबड करत पळत होतास. एवढी काय हाव लागले प्यायची!”


“मला हलायला पण येईना. मला खांद्यावर घे की.” मामा म्हणाला.


“असू दे बाटली ती. चल परत आमच्या रानात”


“ए, चल की. हीतच हाय की जवळ. घे उचलून जरा. लवकर चल” मामा जरा रागातच बोलला.


मामा काय ऐकणार नाही, अस म्हणुन त्याला म्हादू मामाने खांद्यावर उचलले. काही वेळ चालून झाल्यांतर मामाच वजन थोड वाढतंय की काय, असा भास झाला म्हादूमाला. बराच वेळ चालून ही सोमाप्पाचा मळा येत नव्हता. आता वजन जरा जास्तच वाढायला लागलेल. मरगळ झटकून म्हादू मामा तसाच चालत राहीला. दोन तास झाले तरी ही मळा काय येत नव्हता आणि मामाच वजन वाढून वाढून खांदा आता दुखायला लागला होता.

अचानक वजन एवढ वाढल म्हादूमा एकदम खालीच बसला, आणि त्यांच्या हातातील बॅटरी आणि मटणाचा डब्बा खाली पडले. पण मामा काय खांद्यावरुन उतरायचं नाव घेत नव्हता. म्हादूमाने ओळखले की काही तरी गडबड आहे. त्यांनी मग एकदम गिरकी घेऊन “त्याला” खाली पाडलं. तोवर “तो” लगेच उडी मारून त्यांच्या छातीवर येऊन बसला!!


“मटान भारी आणल्यासा की पावन. आम्हास्नी बी द्या की थोड.” अस म्हणत त्याने एक बीभत्स हास्य केलं.


“जा बे! उठ माझ्या छातीवरून!” म्हादूमाने निडर होऊन त्याला सांगितले.


“तुझ मटान आणि रक्ती दे की, जातू मग मी” तो बोलला.


“मला सोड म्हंटलं ना भो***. मला सोड मग दावतो तुला काय करायच ते.”


त्याच वजन परत वाढायला लागल. आता म्हादूमाची छाती दुखायला लागली होती. कुठून तरी थंडगार हात येऊन त्यांची नख आपल्याला टोचताईत अस वाटायला लागल. कानावर पडणाऱ्या त्या किळसवाण्या आवाजामुळे कानातून रक्त येते की काय अस वाटू लागल. भोवताली काळोख एवढा की त्याच तोंड ही दिसत नव्हत. फक्त त्याचे डोळे काळोखात निखाऱ्या सारखे चमकत होते आणि सडलेल्या मृतदेहा सारखा उग्र वास नाकात भरत होता.

म्हादूमा झटापट करून जेवढा स्वतःला मोकळ करायचा प्रयत्न करत होता तेवढाच ‘त्याचा’ विळखा आणखी घट्ट होत चाललेला. म्हादूमाची शक्ति आता त्याचा निरोप घेत होती. एक दुर्दम्य अशी दुष्ट शक्ति त्याचा बळी घेऊ पाहत होती.


तेवढ्यात म्हादूमाच्या हातात बॅटरी लागली आणि त्याने लगेच तो उजेड “त्याच्या” तोंडावर मारला. एका क्षणात म्हादूमाने त्याला बाजूला सारले आणि त्याला खाली टाकले. उठण्याचा प्रयत्न करणार तेवढ्यात ते जे काही होत त्याने म्हादूमाचा पाय खेचून त्याला आडवा केला आणि त्याचा गळा दाबायला सुरुवात केली. म्हादूमा त्याच्या डोळ्यावर ठोसा मारत होते पण तरी ही त्याने आपली गळ्यावरची पकड सोडली नाही. म्हादूमाची धडपड चालली होती. वजन आता वाढत वाढत मणभर तरी झाल होत.

किंकाळ्या ऐकून डोक फुटायची पाळी आली होती. इतक्यात त्याला आठवल की आपल्या शेताच्या बाजूलाच एक लहानशी देवळी आहे. तिथ पर्यंत पोहोचलो तर आपला जीव वाचेल. त्याने अंगात होती नव्हती ती सगळी शक्ति एकत्र करून त्याला एक जोरदार धक्का दिला. तो धडपडला, तेव्हढ्यातच म्हादूमाने त्याला खाली टाकून पळ काढला. मागचे चित्र विचित्र आवाज ऐकुन ही त्याने मागे वळून पाहिले नाही. सरळ जाऊन त्या देवळीच्या आत बसला.


“ए म्हाद्या, भायेर येतोस काय नाय? तुझा मुडदा बशीवतो बघ! मला तुझ मटान खायला दे ****”
म्हादूमा मनातल्या मनात बिरोबाचा धावा करत होता. त्याने देवाकडची राख अंगाला लाऊन घेतली आणि हाथ जोडून बसला. बाहेरून अजून ही अधून मधून बीभत्स किंकाळ्या आणि घाणेरडा कुजकट वास येत होता. आता पहाटे पर्यंत आपल्याला सुटका नाही अस मनात म्हणतो तोवर बाहेरून पुन्हा माझ्या मामांचा आवाज त्याला आला.
“म्हाद्याऽऽ, ए म्हाद्याऽऽ…. कुठ आहेस?”


पण म्हादूमाला अजून विश्वास बसत नव्हता. त्याला वाटल “तोच” आवाज बदलून त्याला बोलावत असेल. म्हादूमाने त्याला सांगितले, “तू खरच माझा दोस्त असशील तर ह्या देवळी समोर डोक ठेऊन दाखव.”


“येडा झालास का काय म्हाद्या? तस का बोलतोईस खुळ्या सारख?”


“समोर येणार असशील तर बर, नायतर सोडून टाक. मी नाय येनार बाहेर.” म्हादूमा म्हणाला.


“थांब येतो” अस म्हणत गाभाऱ्यात एक अंधुकशी सावली पडली. वर बघतो तर खरच माझा मामा आणि सोमाप्पा बाहेर उभे होते. दोघे ही त्याच्या कडे कुतूहलाने बघत होते.


“काय झालय ह्या म्हाद्याला?” अस म्हणत मामाने गाभाऱ्यात येऊन म्हादूमाला बाहेर काढले.

पहाट झाली होती. पक्षी किलबिल करत आपापल्या घरट्यातून बाहेर येत होती. दुर कुठेतरी बौद्धवाड्यातून ‘बुद्ध शरणं गच्छामि’ ची ध्वनीफित ऐकू येत होती. थंड वाऱ्याची झुळूक हळूच अंगात कापरी भरत होती. धाकटा मामा आणि सोमाप्पा अजूनही बुचकळ्यात होते की हा म्हादू रात्र भर ह्या देवळीत का लपला होता. म्हादूमा काही न बोलता थेट घरी गेला, आंघोळ उरकून देवाच्या पाया पडला. चहा पिऊन सरळ मामाच्या घरी आला. रात्रभराच्या झटापटीत त्याचा जीव अर्धा झाला होता.


“रात्री शेतात जा म्हंटल तर कुठ गेल्तास? मला वाटल मी यायला वेळ केला म्हणुन तु एकटाच नदीवर गेलास का काय? पण तिथ बी नव्हतास. सकाळी पण पळत घरी आलास. काय झाल रातच्याला? कुठ गेल्तास?” मामा खेकसला. म्हादूमा ने सगळी हकिगत घडली तशी सांगितली. आमच्या घरी सगळेच अवाक् होऊन ऐकत होते. रोजच्या जागेत अस काही असेल ह्याची कल्पना सुद्धा केली नव्हती कुणी ही. त्या नंतर एकदा कोणाला तरी असाच अनुभव आलेला मी ऐकल पण नक्की अस का झाल हे आजतागायत कोणालाही माहिती नाही.

Leave a Reply