अनुभव – रणजीत काळे

अनुभव २०१६ सालच्या पावसाळ्यातला आहे. मी माझ्या ऑफिस टीम सोबत एका रिसॉर्ट ल गेलो होतो. आमची २५-३० जणांची टीम होती. आमच्या टीम मध्ये आम्ही ७-८ मुले आहोत आणि बाकी सगळ्या मुली. घरातून आम्ही सकाळी साडे सात पावणे आठ ला निघालो. रिसॉर्ट ला जाताना आम्ही मध्ये एका डॉम च्या बॅक वॉटर स ला सगळे वॉटर स्पोर्ट्स खेळत होतो. आमची संपूर्ण दुपार या मध्येच गेली. वातावरण एकदम मस्त होत. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे मस्त थंडगार वारा वाहत होता. ओल्या मातीचा सुगंध दरवळत होता. तिथून आम्ही पुढे रिसॉर्ट ला जाण्यासाठी निघालो. वाटेत घाट लागला. माझ्या बुलेट च्या आवाजाचा आनंद घेत मी जात होतो. अधून मधून मंद पावसाच्या सरी आम्हाला भिजवून जात होत्या. संध्याकाळी साधारण पावणे सहा च्या दरम्यान आम्ही रिसॉर्ट ला पोहोचलो. वाटते पाऊस लागल्याने आम्ही जरा भिजलो ही होतो. आधीच रिसॉर्ट बुक करून ठेवल्यामुळे त्यांनी सगळी तयारी करून ठेवली होती. गेल्या गेल्या मस्त गरम गरम कांदा भाजी चा बेत झाला. नंतर सगळे फ्रेश होऊन एकत्र जमलो. 

एकत्र बसल्यावर थोडे कंपनी चे प्रेझेंटेशन झाले. मंथली रिव्ह्यू चालले होते. असे सगळे काम आटोपे पर्यंत १०.३० ते ११ वाजून गेले. त्यामुळे जेवणाला ही बराच उशीर झाला. रिसॉर्ट मधले जेवण चांगले असेल नसेल म्हणून आम्ही बाहेरून नॉन वेज जेवणाची ऑर्डर दिली होती. जसे आमचे प्रेझेंटेशन आणि रिव्ह्यू संपले तसे आम्ही सगळे जेवायला बसलो. त्या थंडगार वातावरणात असे सगळ्यांसोबत बसून गरम गरम नॉन वेज खाण्याचा आनंद वेगळाच होता. आमची जेवण चालू असतानाच पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे गारवा अजूनच वाढला. रिसॉर्ट वाल्यांनी बोन फायर ची सोय एका शेड खालीच केली होती. त्यामुळे जेवल्यानंतर आम्ही सगळे तिथे जाऊन बसलो. एका डोंगरावर असलेले ते रिसॉर्ट.. बाजूला ७-८ टेंट्स.. आणि बोन फायर भोवती आम्ही २५-३० जण.. मुलींच्या टेन्ट जवळच होत्या पण मुलांच्या २ टेन्ट तिथून काही पावलं चालत जाऊन वरच्या बाजूला लावल्या होत्या. २ च असल्या तरीही खूप मोठ्या होत्या म्हणजे एका मध्ये ४-५ जण सहज झोपू शकतील. दोन्ही टेन्ट मध्ये ३०-४० मीटर चे अंतर असेल. तिथून काही अंतर पुढे चालत गेले की एक खोल दरी होती. विशेष म्हणजे तिघे खास असे कंपाऊंड ही केले नव्हते. एखाद्याला माहीत नसेल आणि तो चालत गेला की थेट… असो.. हे सांगण्याचे तात्पर्य इतकेच की ते वातावरण, ती खोल दरी आणि तो परिसर पुढे सरकत असलेल्या रात्रीचे गूढ वाढवत चालला होता. 

आणि हो.. अजुन एक.. तिथल्याच मधल्या भागात लहान मुलांना खेळण्यासाठी एक छोटेसे गार्ड न केले होते. तिथे दोन झोके होते. विचित्र गोष्ट म्हणजे त्यावरून जर प्रमाणाच्या बाहेर जोरात झोका घेतला तर थेट दरीच्या वरपर्यंत जाईल. दिवसा हे सगळे छान जरी वाटत असले तरी रात्री मात्र सगळे भयाण भासू लागले. मी हे सगळे बोन फायर भोवती बसूनच न्हायाळत होतो. आम्हाला बसायला सिमेंट चे लहान कट्टे केले होते. डोक्यावरती एक शेड होती आणि त्यात एक छोटासा बल्ब ही होता. आमच्या गप्पा, गोष्टी, मजा, मस्करी सुरू होती पण मी मात्र आजू बाजूचा परिसर न्याहाळण्यात गुंग झालो होतो. गप्पांमध्ये १ वाजून गेला. तितक्यात आमच्यातले एक सर म्हणाले “चला.. रात्र बरीच झाली आहे.. भुतांच्या गोष्टी करण्याची त्या अनुभवण्याची हीच ती वेळ..” तसे एक एक करत सगळे आपले अनुभव सांगू लागले. सुरुवाती चे ४-५ अनुभव तर अगदीच पाणचट होते. कारण मी अश्या भरुपुर गोष्टी ऐकल्या होत्या त्यामुळे मला या सगळ्या कथा खूप कंटाळवाण्या वाटत होत्या. पण आमच्या टीम मधल्या शशांक नावाच्या मुलाने एक कथा सांगायला सुरुवात केली. तो उत्तर भारतीय आहे आणि त्याने त्याच्या भागातल्या गोष्टी सांगायला सुरुवात केली. 

मी तिकडच्या गोष्टी, भूतांचे प्रकार आणि त्यांची नावं पहिल्यांदाच ऐकत होतो त्यामुळे मी खूप कुतूहल आणि रस घेऊन ऐकू लागलो. मला नंतर लक्षात आले की मीच नाही तर इतरांना ही त्याच्या गोष्टी आवडत आहेत. जवळपास तासभर आम्ही ऐकत होतो. उशीर झाल्यामुळे काही जण टेन्ट मध्ये झोपायला गेले पण बाकीच्यांना इतका इंटरेस्ट आला होता की तिथून उठायची इच्छाच होत नव्हती. थंडगार हवा, जोरात पाऊस आणि शेड खाली बोन फायर भोवती बसून त्याची ऊब घेत गोष्टी ऐकत होतो. अगदी मस्त वाटत होते. तितक्यात आमच्यात ली एक मुलगी म्हणाली “आता मी एक गोष्ट सांगते..” ती मुलगी नवीन च आमच्या टीम मध्ये जॉईन झाली होती त्यामुळे इतर तिला खास ओळखत नव्हते. आणि बोलणे ही जास्त होत नव्हते. तिने सांगायला सुरुवात केली. ” गोव्याला एक जागा आहे. मी जेव्हा गोव्याला गेले होते तेव्हा त्या जागेवर जाण्याचा योग आला. जे लोक अपंग असतात, ज्यांचे हात किंवा पाय असूनही निकामी होतात त्यांच्यावर तिथे तंत्र मंत्र केले जातात आणि त्यांना बरे करतात. मी अश्या काही गोष्टी तिथे पाहिल्या ज्यावर कोणालाही विश्वास बसणार नाही.” आम्ही तिचे बोलणे ऐकत होतो आणि ते सांगताना ती इतकी घाबरत होती की तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. आमच्यातले काही जण तिला पाहून हसू लागले. एकाने तर तिची मस्करी करायला सुरुवात केली. 

तसे ती मुलगी जरा चिडली आणि सांगू लागली “तुम्हाला कळत नाही का  आपण कुठे आहोत, वेळ काय आहे.. कोणत्या गोष्टी ची मस्करी करायची

.” ज्या मुलाने तिची मस्करी केली होती त्याच्या सोबत तिची बाचा बाची झाली. आणि रागा रागात ती एक वाक्य म्हणाली “भूत असल्याचा पुरावा हवाय का..?”. तिचे हे एक वाक्य सगळ्यांनी नीट ऐकले आणि तितक्यात शेड मधला बल्ब फुटला. पुढच्या क्षणी वाऱ्याचा एक मोठा झोत आला आणि बोन फायर विझला. हा सगळा प्रकार अवघ्या २ ते ३ सेकंदात घडला. आणि तितक्यात सगळे ओरडू लागले. बऱ्यापैकी अंधार असला तरी रिसॉर्ट मधून येणाऱ्या अंधुक प्रकाशा त तो परिसर दिसत होता. तितक्यात मला त्या गार्डन मध्ये झोक्या जवळ एक लहान मुलगा दिसला आणि विशेष म्हणजे इतरांच्या ओरडण्याचा आवाजात ही त्याच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. जसे तो हरवलाय आणि कोणाला तरी शोधतोय. पण मला वाटले की फक्त मलाच तो आवाज ऐकू आला आणि मला नक्कीच भास झालाय. जेव्हा सगळे शांत झाले तेव्हा मी बाजूला बसलेल्या मुलीला विचारले. तू काही ऐकले का.. तसे ती म्हणाली “अरे हो.. त्या झोपाळ्या कडे एक लहान मुलगा दिसला आणि त्याच्या रडण्याचा आवाज आला..”. तिचे ते वाक्य ऐकून माझ्या अंगावर सर्रकन काटा येऊन गेला. म्हणजे तो भास नव्हता. तिथे खरंच…

मी सगळ्यांना उद्देशून म्हणालो “कोणी काहीच बोलू नका.. शांत व्हा..”. तसे सगळे शांत झाले. वाऱ्या मुळे बोन फायर पुन्हा पेटू लागला आणि सगळं काही पूर्ववत झालं. पण हे सगळ इतक्यावरच थांबणार नव्हत. झालेला भयानक प्रकार पाहून सगळ्या मुली म्हणाल्या की बस झाले आता, खूप रात्र झाली आहे, आम्हाला आता झोपायचे आहे, अजुन नको असल्या काही गोष्टी..त्या इतक्या घाबरल्या होत्या की आम्हाला टेन्ट पर्यंत सोडायला यायला सांगितले. तरीही त्यांच्यात ३ मुली बिनधास्त होत्या त्या थांबल्या. मी आणि सोबत अजुन एक जण असे आम्ही दोघेच त्यांना सोडायला गेलो. तिथून पुन्हा परतताना मला खरंच भीती वाटत होती. कारण खूप अंधार होता आणि मी फोन ची फ्लॅश लाईट सुरू करून चालत होतो. आता आम्ही फक्त ७ च जण होतो.. ४ मुलं आणि ३ मुली. त्या तिघी भलत्याच डेरींगबाज होत्या. कारण एक मुलगी म्हणाली “या बाकीच्या मुली एवढ्याश्या गोष्टीला घाबरल्या.. आपण अजून गोष्टी करू..”. तसे शशांक आणि मी आलटून पालटून कथा सांगू लागलो. तितक्यात माझा एक कलिग मित्र सागर मला अचानक थांबवत म्हणाला ” शांत हो.. तुम्हाला कसला आवाज येतोय का…?” मी त्याला काही विचारणार तितक्यात तो उठला आणि अंधाराच्या दिशेने चालत गेला आणि काही तरी पाहू लागला.

काही सेकंदात तो आमच्याकडे यायला मागे वळला आणि एका मुलीकडे पाहून प्रचंड घाबरला. त्याचा चेहरा च भीती ने पांढराच पडला. त्याला पाहून मी पटकन विचारले “काय रे सागर काय झाले..”. तसे तो एकच वाक्य म्हणाला “पटकन उठा इथून आणि टेन्ट मध्ये चला..” त्याचे बोलणे ऐकून आम्ही सगळे टेन्ट मध्ये गेलो.. आम्ही दोघं एकाच टेन्ट मध्ये झोपलो. सगळे शांत झाल्यावर मी त्याला हळूच विचारलं “काय रे बाबा.. काय झाले अचानक तुला..?”. तसे तो म्हणाला “तू कथा सांगत होतास तेव्हा मला पैंजणंचा आवाज येत होता. आणि सगळ्यात भयाण म्हणजे तो आवाज आपण बसलो होतो त्या भोवती फिरत असल्या सारखे जाणवत होते म्हणून मी तुला थांबायला सांगत होतो. मी त्या आवाजाच्या माग काढत उठून चालत गेलो आणि वळलो तेव्हा मला त्या मुलीच्या मागे एक बाई उभी दिसली. त्याचे असे हे बोलणे ऐकून मी सुन्न च झालो होतो, माझ्याकडे बोलायला काहीही नव्हते. एक वेगळीच भीती मनात बसली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी कळले की आमच्या २५-३० जणांच्या ग्रुप शिवाय त्या रिसॉर्ट वर दुसरे कोणतेही गेस्ट नव्हते. नंतर काही कामासाठी मी मुलींच्या टेन्ट जवळ गेलो तर तिथे ती नवीन जॉईन झालेली मुलगी एका खुर्चीवर बसून लिंबा चा वास घेत होती. तिला असे पाहून मला विचित्र च वाटले. सकाळी बोलता बोलता समजले की काल अमावस्या होती. 

Leave a Reply