अनुभव – राज
गोष्ट आहे साधारण १९९६ -९७ ची.. त्या वेळी मी शाळेत दुसरी इयत्तेत शिकत होतो. तेव्हा माझा रोहित नावाचा खास मित्र होता. आमची मैत्री इतकी घट्ट होती आम्हाला जरी शिक्षकांनी वेगवेगळं बसायला सांगितलं तरी आम्ही एकाच बाकावर बसायचो. एकत्र डब्बा खायचो आणि भरपूर मस्ती सुध्दा करायचो. आमचं इतर कोणाशी फारस काही पटायचं सुध्दा नाही. त्या दिवशी आम्ही नेहमी प्रमाणे शाळेत सकाळी 7 वाजता पोहचलो. शाळा सुरू झाल्या झाल्या सर्वात आधी प्रार्थना आणि राष्ट्रगीत मैदानात म्हटले जायचे. ते झाल्यावर आम्ही आमच्या वर्गात गेलो. फक्त दुसरी चा वर्ग शाळेच्या एका बाजूला पहिल्या मजल्यावर होता बाकी सगळे वर्ग तळ मजल्यावर होते. आम्ही वर्गात गेलो आणि नेहमी प्रमाणे एकाच बाकावर बसलो. वर्ग सुरू झाला. ३-४ विषयांचे तास झाले आणि 10:30 वाजता मधली सुट्टी झाली. जशी मधली सुट्टी झाली की सगळी पोरं लगेच वर्ग रिकामा करून मैदानात डब्बा खायला निघून गेली. आम्ही सुध्दा तेच करायचो. पण त्या दिवशी आम्ही वर्गात च बसून डब्बा खायचं ठरवलं.
संपूर्ण वर्ग रिकामा झाला होता. फक्त आम्ही दोघच त्या वर्गात होतो. आम्ही डब्बा खायला सुरवात केली आणि गप्पा सुध्दा सुरू झाल्या. त्यावेळी आमच्या वर्गाला 2 खिडक्या होत्या. त्या खिडक्या शक्यतो बंदच असायच्या. त्या दोन्ही खिडक्या जिथे होत्या त्याच्या पलीकडे साधारण पणे 10-12 फूट मोकळी जागा होती आणि त्याच्या पुढे भरपूर झाड होती. तिकडे कोणालाच जायची परवानगी नव्हती. तिथे कोणी जाऊ नये म्हणून शाळेच्या उच्च अधिकाऱ्यांनी तिथे तारेचे कुंपण बांधून घेतलं होत. आम्ही डब्बा खात असताना आम्हाला अचानक त्यातल्या एका खिडकीतून कसला तरी विचित्र आवाज आला. जणू कोणी तरी त्या खिडकी वर दगड मारावा तसा. त्या भागात कोणी जाणे जवळजवळ अशक्य होते कारण तारेचे कुंपण चढता येण्यासारखे नव्हते. आम्ही दोघांनी तो आवाज स्पष्ट ऐकला. आणि नक्की कसला आवाज झाला म्हणून ते बघण्यासाठी मी त्या खिडकी पाशी गेलो. तितक्यात मित्र म्हणाला की अरे तिकडे जाऊ नकोस. पण त्याचे ऐकले नाही आणि त्या खिडकीचे दार उघडले. मी वाकून खिडकितून खाली बघू लागलो. पण मला तिथे काहीच दिसलं नाही.
तसे मी ती खिडकी बंद केली आणि मित्राला म्हणालो कदाचित झाडाची फांदी वगैरे पडली असेल. मी पुन्हा जागेवर येऊन डब्बा खायला सूरवात केली. अगदीच 10-12 सेकंद च झाले असतील आणि पुन्हा तोच आवाज झाला. ह्यावेळी मात्र आम्ही दोघं थोडे दचकलो. कारण ह्या वेळी जो आवाज झाला तो आधी पेक्षा थोडा मोठा होता. मग आम्ही दोघांनी ठरवलं की खिडकी पाशी जाऊन बघायचं की नक्की कोणतरी आपली मस्करी तर करत नसेल ना. आम्ही दोघेही उठलो आणि खिडकी पाशी जायला लागलो. जसं जसे आम्ही खिडकीच्या जवळ जात होतो तस आजुबाजूच वातावरण अचानक थंड व्हायला सुरुवात झाली. आम्ही खिडकी पाशी पोहोचलो आणि खिडकीचे दार उघडुन खाली नक्की कोण आहे का ते बघितलं. तिथे कोणीच नव्हत. पण त्या खिडकीच्या वर एका झाडाची फांदी होती. तिथूनच आम्हाला एक विचित्र आवाज आला, “खाली काय बघताय आम्ही इथे आहोत”. आम्ही दोघांनी घाबरून त्या फांदिकडे बघीतले आणि अंगावर सर्रकन काटा आला. त्या फांदीवर २ विचित्र चेहऱ्याची तळ हाता एवढ्या उंची ची (बुटकी) पोरं होती. आणि ती दोघीही आमच्या कडे बघून विचित्र हास्य करत होती.
आम्ही दोघं प्रचंड घाबरलो. आमच्या दोघांच्याही तोंडातून आवाज बाहेर पडत नव्हता आणि आम्ही जागेवरून हलू ही शकत नव्हतो. ते दोघं आमच्या कडे बघून विचित्र आवाजात हसत होते आणि हसता हसता त्या दोघांनीही फांदीवरून खाली उडी मारली. उडी मारताना ते दोघेही भरड्या आवाजात हसले आणि म्हणाले, “पुन्हा ह्या खिडकीत यायचं नाही”. आणि ते दोघं खाली त्या मोकळ्या जागेवर उडी मारून पळत पळत त्या झाडांमध्ये गेले आणि क्षणात दिसेनासे झाले. जसे ते दोघं गायब झाले तसे आम्ही दोघंही लगेच घाबरून वर्गा बाहेर पळत सुटलो. तो पर्यंत मधली सुट्टी संपल्याची घंटा झाली आणि सगळी मुलं पुन्हा वर्गात यायला लागली. पण आम्ही दोघं पण वार्गा बाहेर च थांबलो जो पर्यंत वर्गात शिक्षक येत नाही तो पर्यंत. शिक्षकांनी वर्गात येताच सगळ्यांना विचारलं ही खिडकी कोणी उघडली? पण कोणीच काही बोललं नाही. शिक्षकांनी खिडकीचे दार बंद करत सगळ्यांना सांगितल की पुन्हा ही खिडकी उघडायची नाही. आम्ही दोघांनी एकमेकांनकडे बघितले आणि एकमेकांना इशाऱ्यातच शांत बसायला सांगितलं. त्या दिवशी आम्ही दोघांनीही डब्बे अर्धवट च खाल्ले होते आणि कसेबसे बाकीचे तास पूर्ण केले.
पण आमच्या दोघांचही लक्ष सतत त्या खिडकीकडेच होत. 1:30 वाजता शाळा संपली आणि आम्ही दोघांनीही पटकन आमचे दप्तर भरले आणि सर्वात आधी वर्गा बाहेर पडलो. आम्ही घडलेली गोष्ट कोणालाही सांगितली नाही. कारण आम्ही दोघेही खूप घाबरलो होतो. आम्ही रिक्षात जाऊन बसलो आणि घरी गेलो. त्या नंतर 5-6 दिवस आम्ही दोघेही तापानी फणफणलो होतो. पण त्या दिवसा नंतर आम्हाला पुन्हा तसा अनुभव कधीच आला नाही. त्या वर्षी दोघेही चांगल्या मारकांनी पास होऊन तिसरीत गेलो तेव्हा आमचा “वर्ग” बदलला.
शाळेच्या उच्च अधिकाऱ्यांनी तारेचे कुंपण बांधले…….शाळेत हे पद असते का ?
दुसरी ची शाळा ७ ते १:३० ते ही १९९६-९७ साली जरा जास्तच होतंय हे.
अनुभव – राज