शहरातून नुकताच आम्ही गावी शिफ्ट झालो होतो. २-३ दिवस झाले असतील. आमच्या शेजारी थोड्याच अंतरावर शशी नावाची एक मुलगी राहत होती. २-३ वर्षापूर्वीच तिचे लग्न होऊन ती आमच्या गावात राहायला आली होती. माहेरची व सासरची परिस्थिती तशी नाजुकच. तिने नुकताच छान गोंडस बाळाला जन्म ही दिला होता. ती नेहमी नदी काठी कपडे धुण्यासाठी जात असे. तिला घरचे बजा वायचे की तू नुकताच बाळंतीण झाली आहेस असे नदी काठी एकटी जात जाऊ नकोस. पण घरातल्या मोठ्यांच न ऐकता ती नदीकाठी कपडे धुवायला जायची. त्या दिवशी ही ती अशीच नदी काठी गेली आणि तिच्या जीवनाला पूर्णपणे कलाटणी देणारा प्रसंग ठरला. भर उन्हात जाऊन ती जेव्हा घरी परतली तेव्हा एक वेगळेच रूप घेऊन.

घरी आल्यावर तिने बाहेर कपडे सुकत टाकले आणि घरात तिच्या खोलीत जाऊन दार बंद करून घेतले. खूप वेळ उलटून गेला तरी ती काही दार उघडेना. शेवटी शेजाऱ्यापाजाऱ्याना बोलावून तिला भरुपुर हाका मारल्या तेव्हा कुठे तिने दार उघडले. पण आटले दृश्य पाहून सगळ्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला. तिचे बाळ रक्ताच्या थारोळ्यात पडून जिवाच्या आकांताने रडत होते. तिने स्वतःच्याच तान्ह्या बाळावर ब्लेड ने वार केले होते. करपलेल्या तव्याचे काळे स्वतःच्या अंगाला फासले होते. आणि कोपऱ्यात बसून आपल्या बाळाकडे अतिशय क्रूर नजरेने एक टक पाहत होती. तिने हे जे काही केले होते ते अतिशय क्रूर आणि भयानक होते.

तिच्या सासूने धाव घेऊन बाळाला तिच्या पासून दूर केले. त्यावर उपचार करण्या साठी ती शेजाऱ्यांची मदत मागू लागली. तसे काहींनी त्याला घेऊन इस्पितळात धाव घेतली. तो पर्यंत शशी अगदी साधी वागायला लागली होती. जसे काही झालेच नाही. आपण काय केले आहे याची तिला पुसटशी ही कल्पना नव्हती. 

दिवसा मागून दिवस जात होते आणि अश्या किती तरी विचित्र घटना घरच्यांचं मन विचलित करत होत्या. शेवटी नाईलाजाने तिच्या सासरच्यांनी तिला माहेरी पाठवले. माहेरी आल्यावर ही तिचे विक्षिप्त वागणे चालूच होते. ती अशी का वागतेय हे त्यांच्याही लक्षात येईना. शेवटी बाहेरच्या बघणाऱ्या एका व्यक्तीला बोलावले आणि नदी काठच्या प्रसंगाचा उलगडा झाला. शशी ला लगिर झालं होत. एका अतृप्त आत्म्याच्या तावडीत ती सापडली होती. त्यामुळे जागेपणी ती काय करेल काय नाही याचा नेम नसायचा. 

काही दिवसातच ही गोष्ट वाऱ्या प्रमाणे सगळी कडे पसरली. सगळे लोक तिला घाबरु लागले. तिचे विक्षिप्त वागणे हा एक चमत्कार च वाटू लागला. कारण ती रस्त्याने चालत असताना मागून कोण येतय, त्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे हे न बघता अचूक सांगायची. कधी कधी तर वाईट प्रवृतीच्या लोकांच्या मागे लागायची. पण ती हे असे नेहमी करत नव्हती. कधी कधी मंदिरा बाहेरून जाताना धाय मोकलून रडायची. गावातल्या लोकांनी तर तिला वेड्यातच काढले होते.  

तिच्या घरच्यांनी खूप प्रयत्न केले पण शशी ला या सगळ्या प्रकारातून सोडवता येत नव्हते. शेवटी त्यांनी त्याच माणसाला बोलावले ज्याने शशी च्याच या अवस्थेचे खरे कारण उलगडून सांगितले होते. त्याने सांगितले की येत्या दुर्गाष्टामिला घात होण्याची शक्यता आहे मी एक उपाय सुचवतो तो नीट ऐकून घ्या. त्याने एक उपाय सुचवला आणि घरच्यांनी तो काटेकोरपणे पाळायचे निश्चित केले. त्या माणसाने शशी च्याच पदराला मंतरलेला एक नारळ आणि इतर वस्तु बांधून ठेवल्या ज्या तिचे रक्षण करणार होत्या.  

त्या रात्री शशी ला आतल्या खोलीत ठेवले नाही. ती रात्र वैऱ्याची होती. तिला पडवीत आणून तिचे दोन्ही हात एका खांबाला बांधून ठेवले आणि एका बाजूला आई आणि दुसऱ्या बाजूला वडील असे झोपले. जेणेकरून तिने रात्री उठायचा प्रयत्न केला तर ते तिला अडवू शकतील. पण त्या रात्री असे काहीच विपरीत घडले नाही. सकाळी वडिलांना जाग आली आणि बाजूचे दृश्य पाहून त्यांच्या काळजाचा ठोकाच चूक ला. शशी तिथे नव्हती. दोन्ही हातांची दोरी सोडून ती कुठे तरी निघून गेली होती.

ते घराबाहेर पडले आणि आपल्या मुलीला सगळी कडे शोधू लागले. त्यांनी पूर्ण शिवार शोधून काढले. आणि शोधत असतानाच घराकडून शेता कडे जाणाऱ्या पायवाटेने त्यांचे लक्ष वेधून घेतले. त्या रस्त्यावर त्यांना फरफटत नेल्याच्या खुणा दिसल्या, साडीला बांधेलेल्या वस्तू सर्वत्र पसरल्या होत्या. जसं जसे ते त्या वाटेने पुढे जाऊ लागले तसे काळजाची धडधड वाढत जात होती. काही पावलं पुढे चालत गेल्यावर तिची साडी आणि नारळ पडलेला दिसला. समोर असणाऱ्या विहिरीकडे लक्ष गेलं आणि उरला सुरला धिरच संपला.

त्यांनी विहिरीकडे धाव घेतली आणि आत डोकावून पाहू लागले. शशी आत एका दगडावर पाय मोकळे सोडून मागे भिंतीला टेकून बसली होती. तिला हाका मारायला सुरुवात केली तरी तिचा काहीच प्रतिसाद येत नव्हता. जसे तिला काही ऐकूच येत नव्हते. तो पर्यंत गावकरी जमले होते. त्यातल्या एका दोघांनी हिम्मत करून आत उतरायची तयारी केली. बघता बघता ते आत उतरले आणि शशी ला हात लाऊन भानावर आणण्याचा प्रयत्न केला. तसे पुढच्या क्षणी ती होती त्याच अवस्थेत खाली कोसळली. तिचा जीव कधीच अनंतात विलीन झाला होता. तिचा अंगावर कसल्याच खुणा नव्हत्या. तिच्या वर हावी झालेल्या त्या अतृप्त आत्म्याने तिला कायमचे संपवले होते. 

तिला बाहेर काढून तिच्यावर अंत्य संस्कार करण्यात आले आणि त्या विहिरीजवळ पूजा वैगरे करण्यात आली. पण आजही त्या विहिरी जवळ सहसा कोणी फिरकत नाही. 

Leave a Reply