अनुभव – रोहिणी
प्रसंग माझ्या लहान भावासोबत २०१८ मध्ये घडला होता. लातूर पासून साधारण 20 किलोमीटर अंतरावर आमचं एक गाव आहे. तिथे आमच्या जुन्या घराचे बांधकाम सुरू होते. त्यामुळे मदत करायला, काही हवे नको ते पाहायला आणि काम नीट चालू आहे की नाही यावर देखरेख ठेवायला तो दररोज येणे जाणे करायचा. आमच्या घरा शेजारी एक जुना पडका वाडा होता. जिथे एक आजोबा राहायचे. आमचे जास्त काही बोलणे व्हायचे नाही पण त्या मोठ्या वाड्यात ते एकटेच राहत आहेत आणि त्यांना कोणी पाहायला सुद्धा येत नाही इतकचं माहीत होत. काही महिन्यांनी बांधकाम पूर्ण होत आलं. रंगकाम थोड राहील होत पण तो पर्यंत आम्ही सगळे म्हणजे माझे आई वडील, मी आणि माझा भाऊ आम्ही सगळे तिथे शिफ्ट झालो. माझा भाऊ काही दिवसांसाठी मित्रांसोबत बाहेर फिरायला गेला होता. ४-५ दिवसांची ट्रिप काढली होती त्याच्या मित्रांनी.
ज्या दिवशी घरी आला त्या रात्री साधारण ११ वाजून गेले होते. घरा बाहेर गाडी पार्क करतच होता तितक्यात बाजूच्या त्या पडक्या वाड्यातून कण्हत असल्याचा, रडत असल्याचा आवाज येऊ लागला. काही क्षण थांबून त्याने आवाजाचा कानोसा घेतला आणि नक्की केलं की तो आवाज त्या वाड्याच्या दिशेने किंबहुना त्या वाड्यातून येतोय. त्याने अगदी स्पष्ट ऐकले पण त्याकडे फारसे लक्ष न देता तो घरामध्ये निघून आला. आई आणि मी त्याची वाट बघत बसलो होतो. आल्यावर फ्रेश वैगरे होऊन तो जेवायला बसला. ट्रिप कशी झाली वैगरे सांगत होता. जेवण आटोपल्यावर झोपायला जाताना त्याने आई ला सहज विचारले “ अग आई.. आपल्या बाजूच्या वाड्यामध्ये काही झाले आहे का..?” त्यावर आई ने त्याला विचारले “ का, काय झालं, तू अचानक अस का विचारतोय..?
त्यावर तो म्हणाला, मी गाडी घराबाहेर पार्क करून येत असताना, मला त्या वाड्यातून रडण्याचा आवाज येत होता…! जस कोणी तरी वेदनेने कण्हत आहे. हे ऐकून, आई थोडी शांत झाली आणि त्याला खात्री करत पुन्हा विचारलं “ तू नीट ऐकलं होतं का…? तो आवाज रडण्याचाच होता का आणि तिथूनच त्या वाड्यातून च येत होता का..? “
यावर माझा भाऊ म्हणाला, “ अग हो…!तो आवाज मला स्पष्ट येत होता म्हणून तर मी तुला विचारलं ना..!”
त्यावर आई म्हणाली “त्या वाड्यामध्ये जे आजोबा राहत होते ना त्यांचे चार दिवसांपूर्वी आजाराने निधन झाले…!आणि गेले तीन दिवस झाले त्या वाड्यामध्ये कोणीही राहत नाहीये…!मग तुला आवाज कसा आला …m.”
असे बोलताच माझी आई आणि माझा भाऊ शांतपणे एकमेकांकडे पाहत तसेच उभे राहिले….!