अनुभव क्रमांक – स्वरूप खांबे

मी मूळचा कोकणातला आहे त्यामुळे माझा भूता खेतांवर विश्वास आहेच. पण ही घटना माझ्या सोबत नवी मुंबई मध्ये राहत असताना घडली आहे. त्या वेळी आम्ही तिघे भाड्याने खोली घेऊन राहत होतो. आम्ही चार भावंडं म्हणजे मी, माझी सख्खी बहीण, माझी चुलत बहीण आणि चुलत भाऊ असे एकत्र राहत होतो. सुरुवातीला आम्ही दुसऱ्या ठिकाणी राहत होतो पण तिथे काही अडचण असल्यामुळे आम्ही खोली बदलली. जिथे राहायला आलो ते घर २ मजली होते. पहिल्या मजल्यावर घर मालकांचा छोटा भाऊ व त्याचे कुटुंब राहत होते. दुसऱ्या मजल्यावर स्वतः घर मालक आणि त्यांचे कुटुंब राहत होत आणि खाली तळ मजल्यावर आम्ही. त्या तळ मजल्यावर दोन खोल्या होत्या. एक खोली आम्हाला राहायला दिली होती आणि बाजूच्या खोलीत एक पर प्रांतीय जोडपं राहत होत. आमच्या मजल्या समोर एक व्हरांडा होता जो संपूर्ण लोखंडी गजाने पॅक होता. ज्याला एक फाटक होते. सुरक्षे साठी आम्ही रात्री झोपण्यापूर्वी त्या फटकला न चुकता कुलूप लाऊन झोपायचो. एके रात्री आम्ही गाढ झोपेत होतो. मला तहान लागली म्हणून मी पाणी प्यायला उठलो. तसे मला जाणवले की बाहेर वरांड्यामध्ये कोणी तरी चालतय. मी विचार केला की मालक किंवा त्यांच्या घरचे कोणी खाली आले असेल. मी जास्त विचार न करता झोपून गेलो. या प्रसंगांनंतर काही दिवस उलटले. एके रात्री माझा भाऊ मोबाईल वर गेम खेळत बसला होता. त्याला ही कोणी तरी वरांड्यातून चालत असल्याचे जाणवू लागले. त्याने वेळ पाहिली तर मध्य रात्र उलटून २ वाजून गेले होते. त्याला ही गोष्ट जरा विचित्र वाटली म्हणून त्याने मला झोपेतून उठवलं आणि म्हणाला ” अरे बाहेर कोणीतरी चालताना चा आवाज येतोय..”

मी त्याला थोड चिडून च म्हणालो ” अरे वरून माणसं आली असतील.. काय काम असेल तू पण ना यार.. ” त्यावर तो मला बोलला ” अरे वेड्या वेळ बघ जरा.. ” मी डोळे चोळत मोबाईल घेतला आणि वेळ पाहिली तर खरंच २ वाजून गेले होते. आम्ही एकमेकांकडे पाहिले आणि पुढच्याच क्षणी आमच्या खोली चा दरवाजा वाजला. आम्हा दोघांचं भीती ने सर्वांग शहारल. बहुतेक बाहेर जे कोणी जे काही होत त्याला आमची चाहूल लागली असावी. इतक्या रात्री कोण असेल, फाटक ही कुलूप लाऊन बंद केलय त्यामुळे बाहेरून खोलीच्या दारा पर्यंत कोणाला ही शक्य नाही. मी घाबरतच विचारलं ” कोण आहे ? ” ती स्मशान शांतता सगळ काही सांगून गेली कारण बाहेरून काहीच प्रतिसाद आला नाही. आम्ही श्वास रोखून बाहेरून कसला आवाज येतोय का ते कानोसा घेऊन ऐकू लागलो. आणि तितक्यात दरवाज्यावर पुन्हा एकदा जोरात थाप पडली. आधी पेक्षा ती आवाज जोरात होता त्यामुळे आता आम्ही पुरते घाबरून गेलो होतो. एव्हाना आवाजामुळे माझ्या दोन्ही बहिणी ही उठल्या होत्या. त्या आम्हाला विचारू लागल्या की काय झाले, कोण आहे बाहेर..? भावाने त्यांना हातवारे करून शांत राहण्याचा इशारा केला आणि आम्ही काही सांगणार तितक्यात तिसऱ्यांदा जोरात आवाज आला. या वेळेला ती एक थाप नव्हती तर दरवाजा जोर जोरात बडवू जाऊ लागला. एके क्षणी तर वाटलं की बाहेर जे काही आहे ते दरवाजा तोडून आत येईल. आम्ही चार ही जण एकमेकांना जवळ घेऊन बसलो होतो. माझी एक बहिण तर घाबरून रडूच लागली होती. पण तितक्यात अचानक सगळ काही बंद झालं. पुन्हा एकदा एक स्मशान शांतता पसरली. 

आम्ही सुटकेचा निःश्वास सोडला च होता तेवढ्यात स्वयंपाक घरातील खिडकी वर थाप पडली. आता मात्र आम्ही पुरते हादरून गेलो. तो आवाज कधी दाराबाहेरून यायचा तर कधी किचन च्या खिडकी बाहेरून. संपूर्ण रात्र भर हाच भयानक प्रकार चालू होता त्यामुळे ती रात्र आम्ही तशीच जागून काढली. भीती मुळे आमची झोप कुठच्या कुठे उडून गेली होती. पहाट झाली, जसे उजाडायला सुरुवात झाली तसे तडक आम्ही मालकांना या बद्दल विचारले. पण त्यांनी या प्रकारा बद्दल काहीच माहिती नसल्याचे सांगितले. शेवटी न राहवून आम्ही हा प्रकार आमच्या घरच्यांना सांगितला. माझ्या बाबांनी आम्हाला समजावले आणि आधार दिला. ते म्हणाले की मी उद्या सकाळ पर्यंत तिथे पोहोचतो. दुसऱ्या दिवशी सकाळी ते आले आणि सोबत कोणाला तरी घेऊन आले. त्यांनी घरी एक छोटीशी पूजा केली आणि दारावर एक रक्षा धागा बांधला. त्या नंतर आम्हाला असा अनुभव पुन्हा कधीच आला नाही. हा भयाण प्रसंग अनुभवल्यानंतर ते काय होते हे जाणून घ्यायचा आम्ही कधीच प्रयत्न केला नाही. 

Leave a Reply