अनुभव माझ्या सोबत मागच्या वर्षी घडला होता. माझे गावाला घर आहे आणि गावाच्या वेशीवर आमचे शेत आहे. बारावी ची परीक्षा संपल्यावर मी गावात आलो होतो. मला अगदी लहान पणापासून म्हणजे वयाच्या १०-१२ वर्षांपासून शेतात झोपायला जायची सवय आहे. मी गावी गेलो की बऱ्याचदा शेतात झोपायला जायचो. तो ही एकटा.. कधी मित्रांसोबत गेल्याचे आठवत ही नाही. भीती वैगरे हा प्रकार मला सुरुवातीपासून जास्त माहीत ही नव्हता. पण त्या एका घटनेमुळे माझे विचारच नाही पण काही गोष्टींकडे बघण्याचा दृष्टीकोन च बदलला. तो दिवस, ती रात्र मला अजूनही आठवतेय. रात्री जेवण वैगरे आटोपून शेतात झोपण्यासाठी मी मोटार सायकल घेऊन निघालो.

वेळ नेमकी लक्षात नाही पण साडे नऊ दहा झाले असतील. गावाचा परिसर असल्यामुळे एव्हाना रस्ता अगदी सामसूम झाला होता. संपूर्ण गाव निद्रेच्या आहारी गेल होत. आमच्या शेताकडे जाताना वाटेत एक मोठा ओढा लागतो. आता प्रत्येक गावात जश्या ऐकीव किंवा भाकड कथा असतात तश्या साहजिक च आमच्या गावात ही बोलल्या जायच्या. मी अश्या गोष्टींकडे कधीच लक्ष द्यायचो नाही. पण तरीही सगळ्या ऐकून होतो ते ही अगदी लहानपणापासून. गावातली लोकं म्हणायची की त्या ओढ्यावर भुताटकी आहे. रात्री अपरात्री तिथून जाताना भयानक अनुभव येतात. आता इतक्या वर्षापासून मी तिथून ये जा करायचो पण एकदाही मला तसे जाणवले नव्हते. पण त्या दिवशी जे घडायला नको होते तेच नेमके घडले. 

गावाच्या वेशीवर येऊन पोहोचलो आणि त्या ओढ्याजवळ आलो आणि तितक्यात गाडी रिसर्व वर आली. आणि काही कळायच्या आत बरोबर त्या ओढ्यावरून जाताना बंद पडली. मी खाली वाकून रीसर्व चा कॉक फिरवला तितक्यात मला मागे गाडीवर कसलीशी हालचाल जाणवली. जसे कोणी तरी मागच्या सीट वर माझ्या अगदी जवळ येऊन बसलंय. अगदी या क्षणापर्यंत माझ्या मनात तसू भर ही भीती नव्हती. कोण आहे म्हणून पाहायला मी झटकन मागे पाहिले आणि माझ्या हृदयाचा ठोकाच चुकला.

मागे एक बाई बसली होती. माझ्या अगदी जवळ.. तिला डोळे नव्हते.. होत्या त्या फक्त रिकाम्या खोबण्या.. ज्या अगदी खोलवर गेल्यासारख्या भासत होत्या. ती काहीच हालचाल करत नव्हती फक्त बसून होती एखाद्या जिवंत पुतळ्यासारखी.. काही क्षण मी काय पाहतोय तेच कळत नव्हतं. पण मी कसाबसा भानावर आलो. इतक्या वर्षांपासून फक्त ऐकून असलेला भयानक प्रकार आज मी धड धडत्या काळजाने पाहत होतो. खरी भीती मी त्या रात्री अनुभवली. जेव्हा सताड उघड्या डोळ्यांनी पाहत असलेला प्रकार लक्षात आला तसे मी गाडी तशीच टाकून गावाच्या दिशेने धावत सुटलो. धापा टाकतच घरी आलो. कोणाला काहीच न सांगता झोपून गेलो. सकाळी उठल्यावर मात्र सगळा प्रकार सांगितला तसे एक दोघं जण गाडी आणायला ओढ्यावर गेले. मला नंतर कळले की काल रात्री अमावस्या होती आणि त्या वेळेस तिथे फेरा असतो त्या बाईचा. या प्रसंगामुळे मी इतका धसका घेतला होता की या बद्दल मी पुन्हा विषयच काढला नाही. आणि आता मी कधीच एकटा शेतात जात नाही..

Leave a Reply