अनुभव – निरंजन जाधव

मी व माझे दोन मित्र दीपक व आकाश आम्हा तिघांना रात्री चा प्रवास करायला खूप आवडते. आम्ही नेहमी काही ना काही बेत आखून नाईट ड्राईव्ह ला आवर्जून जात असतो. माझे गाव कोकणात आहे. त्या वर्षी आम्ही माझ्या गावी जायचा बेत आखला होता. नुकताच पावसाळा सुरू झाला होता आणि अश्या वेळी कोकण ट्रीप करणे म्हणजे स्वर्ग सुख. अगदी प्रसन्न, हिरवेगार वातावरण आणि त्यात मित्रांसोबत नाईट ड्राईव्ह म्हणजे पर्वणीच. आम्हा तिघांना ही शनिवार आणि रविवार सुट्टी असते त्यामुळे शुक्रवारी काम वैगरे आटोपून रात्री १० वाजता निघायचं असं ठरलं. जाण्यासाठी दीपक ची कार होती त्यामुळे दुसऱ्या वाहनाची सोय करायची गरज नव्हती.

मी आणि आकाश आम्ही दोघं एकाच एरिया मध्ये राहायला होतो. दीपक च घर आम्ही राहत होतो तिथून जवळपास ३-४ किलोमिटर अंतरावर होत. ठरवलेल्या वेळे प्रमाणे दीपक त्याची स्विफ्ट कार घेऊन आमच्या इथे आला. त्याने आम्हाला फोन करून बाहेर बोलावून घेतल. आम्ही आधीच सगळी तयारी करून बसलो होतो म्हणून लगेच घरा बाहेर पडलो. आमच्या पैकी मला आणि दीपक ला ड्रायव्हिंग येत होती पण आकाश ला नाही. त्यामुळे मग आम्ही दोघांनी आलटून पालटून ड्राईव्ह करायचे पक्के केले. कारण रात्री चा प्रवास होता. त्यात दिवसभर काम करून आम्ही निघणार होतो. रस्त्यात एकाला झोप वैगरे आली, दमायला झाले तर लगेच दुसरा ड्राईव्ह करेल या उद्देशाने. आम्ही जसे निघालो तसे मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सुरुवातीला वरांधा घाटातून जायचे नक्की केले होते पण तिथे पावसाळ्याच्या दिवसात दरड कोसळण्याची भीती असते. त्यामुळे मग आम्ही ताम्हिणी घाटातून जायचं ठरवलं.

गप्पा गोष्टी करत चांदणी चौक, पौड , मुळाशी अशी सगळी गावे क्रॉस करून आम्ही ताम्हिणी घाटात येऊन पोहोचलो. गाडी दीपक चालवत होता. तेवढ्यात आकाश ला लघवी आली म्हणून त्याने दीपक ला गाडी रस्त्याकडे ला घेऊन थांबवायला सांगितली. तसे त्याने कार थांबवली. आकाश उतरून रस्त्या पासून थोडे आतल्या बाजूला उतरून झाडीत गेला. काही वेळानंतर तो आला आम्ही पुन्हा पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. आमची मस्ती चालली होती. तितक्यात दीपक अचानक म्हणाला ” मला समोर एक बाई रस्त्यात उभी दिसली.. ”  आधीच आमची मजा मस्करी चालली असल्यामुळे मला आणि आकाश ला वाटले की दीपक आम्हाला घाबरावयला बोलतोय.

म्हणून आम्ही उलट त्याचीच थट्टा करू लागलो आणि त्याचे बोलणे हसण्यावारी नेले. काही अंतर पुढे आलो असू आणि दीपक ने जोरात ब्रेक मारला. आम्ही त्याच्याकडे पाहिले तर तो एकच वाक्य म्हणाला ” ती बाई गाडी समोर आली “. आता मात्र दोघं ही सुन्न झालो. दीपक अशी मस्करी करणार नाही याची आम्हाला खात्री होती आणि त्याच्या चेहऱ्याकडे पाहून ते नक्की झाले. कारण त्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट जाणवत होती. मी त्याच्या खांद्यावर हात ठेवत त्याला धीर देत म्हणालो ” तुला बहुतेक भास झाला असेल.. गाडी सुरू कर.. ” तो काही क्षण शून्यात गेला होता पण नंतर भानावर येत त्याने कर स्टार्ट केली आणि आम्ही निघालो. माझ्या मनात नको नको ते विचार येऊ लागले. 

मी त्या विचारात असतानाच नकळत माझे लक्ष साईड मिरर मध्ये गेले. आणि मागचे दृश्य पाहून माझी बोबडीच वळली. मी प्रचंड घाबरलो आणि फक्त दीपक कडे पाहिले. त्याची ही अवस्था माझ्या सारखीच किंबहुना माझ्याहून बिकट झाली होती. कारण त्याने ही तेच पाहिले होते जे मी पाहत होतो. कार चा वेग ताशी ७० किलोमिटर होता. एक बाई आमच्या कार मागे अतिशय वेगात येत होती. धावत होती असे म्हणता येणार नाही पण अतिशय वेगात जणू हवेत तरंगत येत होती. आम्ही दोघं इतके घाबरलो होतो की काहीच बोलू शकलो नाही. दीपक ने एकसीलरेटर वरचा जोर वाढवला होता आणि गाडी अजुन वेगात घेतली. तशी ७०, ८०, ९० असा गाडी चा वेग वाढतच चालला होता. काळीज भीती ने धड धडत होत. समोर एक मोठं वळण दिसलं.

मी दीपक कडे पाहिले, काही बोललो नाही पण यासाठी पाहिलं की समोर वळण आहे , आपल्या गाडीचा वेग इतका आहे की गाडी वरच नियंत्रण जाऊ शकत. त्याने गाडीचा वेग थोडा कमी केला जेणेकरून नीट वळण घेत येईल. पण जसे वळण घ्यायला सुरुवात केली आम्हाला दिसले की तीच बाई समोरच्या झाडावर बसून आम्हालाच पाहत हसत होती. तो भयाण प्रकार आम्ही तिघांनी ही श्वास रोखून पाहिला. आम्ही त्या परिसरातून थोड पुढे आलो पण घाट संपला नव्हता. पण ती बाई नंतर दिसली नाही. आम्हाला वाटले की आम्ही तिच्या हद्दीतून बाहेर आलो पण तस झालं नव्हत. साधारण १० मिनिट उलटली असतील आणि तितक्यात जोरात कार वर काही तरी आपटण्याचा आवाज आला. आम्ही घाबरून मागे पाहिले तर तिचं बाई पुन्हा गाडी मागे लागली होती. 

आता मात्र आम्ही देवाचा धावा सुरू केला आणि त्या भागातून कसे बसे बाहेर पडलो. १५-२० मिनिटांनंतर वस्तीचा परिसर लागला तसे आम्ही सुटकेचा निःश्वास सोडला. तिथून पुढे मी दीपक ला म्हणालो की मी चालवतो गाडी आणि मी चालवायला घेतली. मध्ये कुठे ही न थांबता थेट माझ्या गावी घरी आलो. या सगळ्या विचित्र प्रकरामुळे नाईट ड्राईव्ह ची सगळी मजाच निघून गेली होती. या घटनेला काही वर्ष उलटली असतील. त्या नंतर पुन्हा रात्री अपरात्री आम्ही त्या घाटातून कधीच प्रवास केला नाही. 

Leave a Reply