अनुभव – वैष्णवी तेलंग

माझे आजोबा ऑडिटर म्हणून बँकेत जॉब करायचे. त्यांना इतर ब्रांचेस मधल्या बँकेचे ऑडिट करण्यासाठी दुसऱ्या गावात तर कधी दुसऱ्या तालुक्याला जावे लागायचे. एकदा त्यांना असेच सातारा जिल्ह्यातील एका गावातल्या बँकेत ऑडिट ला जाण्याचा योग आला. त्यांची सगळी कामे आटोपून ते जायला निघाले. एस टी बस ने प्रवास करून ते साताऱ्याला पोहोचले. त्यांना तिथे राहायला बँकेतर्फे एक बंगला देण्यात आला होता. एस टी स्टँड पासून ते बंगल्या पर्यंत चे अंतर ही बरेच होते. वाहन नसल्यामुळे ते चालतच निघाले. पोहोचले तेव्हा खूप उशीर झाला होता. आणि प्रवास करून बराच थकवा आला होता. पण त्या रात्री त्यांच्या सोबत काही विपरीत घडणार आहे याची त्यांना पुसटशी कल्पना ही नव्हती. गेल्या गेल्या थोडे जेवण केले. काही वेळ शांत बसले. लांब चा प्रवास असल्यामुळे खूप थकले होते त्यामुळे त्यांना काही क्षणात गाढ झोप लागली. वेळेचा अंदाज नव्हता पण तास दीड तास झाला असेल. अचानक त्या रूम मधून किंवा कदाचित बाहेरून कसला तरी आवाज आला. त्यांना जाग आली. ते जागेवरून उठले आणि आवाज नक्की कुठून येतोय ते ऐकण्याचा प्रयत्न करू लागले. तसे त्यांना जाणवले की तो आवाज खिडकीतून येतोय. 

ते दबक्या पावलांनी त्या दिशेने पुढे जाऊ लागले. खिडकी समोर न जाता ते एक पाऊल अलीकडेच थांबले. आणि हळूच वाकून बाहेर कोण आहे ते पाहिले. तिथे खरंच कोणी तरी होत. एक माणूस सदृश्य आकृती. अचानक ते जे काही होत ते एका विचित्र आवाजात हसू लागलं. त्यानं त्याचा हात लांब केला तसा त्यांच्या खोलीत आला. सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे ते जे काही होत ते तिथेच बाहेर उभ होत पण फक्त हात मात्र आत खोलीत आला होता. हा विचित्र आणि जीवघेणा प्रकार पाहून त्यांची वाचाच बंद झाली होती. ते प्रचंड घाबरले. काय करावे काय नाही काहीच सुचत नव्हते. भीतीमुळे घामाने ओले चिंब झाले. कशी तरी हिम्मत करून दबक्या पावलांनी मागे सरकू लागले आणि बिछान्यावर येऊन बसले. ती रात्र त्यांनी तशीच जागून काढली. ते इतके घाबरले होते की त्यांची तिथून बाहेर जायची ही हिम्मत होत नव्हती. पहाट झाली आणि उजाडायला सुरुवात झाली तसे ते त्यांनी आपली बॅग उचलली आणि त्या ठिकाणावरून थेट बाहेर पडले. पण काही करून त्यांना एस टी स्टँड चा रस्ताच सापडत नव्हता. फिरून फिरून ते त्याच रस्त्याला यायचे. बऱ्याच वेळेच्या पायपिटी नंतर त्यांना एक व्यक्ती गाडीवरून येताना दिसली. त्याला रस्ता विचारला, तसे त्याने कुठून कसे जायचे ते सांगितले. आजोबा त्या वाटेने निघाले आणि अवघ्या ५ मिनटात त्यांना एस टी स्टँड दिसले. तसे सुटकेचा निःश्वास सोडला. अर्ध्या तासात बस ही आली आणि ते थेट घरी निघून आले. 

त्या जागी नक्की काय होत हे शोधून घेण्याच्या भान गडीत ते कधीच पडले नाहीत. इतकेच काय तर ते पुन्हा त्या बंगल्याच्या जवळपास फिरकले ही नाहीत. 

Leave a Reply