मी चौथीत शिकत होतो. प्रत्येक मे महिन्याच्या सुट्टी प्रमाणे या सुट्टी तही मी गावी जाणार होतो. त्यामुळे खूप खुश होतो. २ महिने पूर्ण धमाल करणार होतो.
माझे गाव खूप सुंदर आहे. माझे घर म्हणजे आम्ही ज्याला वाडा म्हणतो तो खूप मोठा आहे. ८ खोल्या, मोठा वरांडा आणि वाड्या मागे मोठा बगीचा. वाडा नेहमी भरलेला असायचा. माझी आजी आजोबा, ३ काका काकू आणि ३ भावंडं. त्यामुळे सुट्टीत गेल्यावर अगदी मजा यायची. वाड्या भोवती बरीच लहान लहान घर होती. त्यातलेच एक घर होते तुकाराम या व्यक्तीचे. मातीने शिंपलेल्या त्या घरात तो, त्याची बायको आणि त्याची २ मुलं राहायची. जेव्हा ही मी गावी जायचो त्यांच्याकडे नेहमी खेळायला जायचो. तो एक व्यक्ती म्हणून मनाने खूप चांगला होता.
त्या सुट्टीत मला गावी येऊन १ आठवडा झाला होता. त्या रात्री अमावस्या होती. माझ्या आजीने मला बजावून सांगितले होते की वाड्या पासून लांब खेळायला जायचे नाही. म्हणून मी वाड्या जवळच मित्रांसोबत क्रिकेट खेळत होतो. सगळे जवळपास माझ्याच वयाचे होते. संध्याकाळ होऊन गेली होती आणि अंधार पडायला सुरुवात झाली होती. माझे काका जवळच कोणाशी तरी गप्पा करत उभे होते. तितक्यात अचानक त्यानी ओरडायला सुरुवात केली आणि तुकारामच्या घराकडे धाव घेतली. काय झाले हे बघण्यासाठी मी आणि माझे मित्रही त्यांच्या मागे धावत गेलो.
त्याच्या घरा जवळ येताच लोकांची गर्दी पहिली. त्याच्या घरातून धूर निघत होता. बघता बघता संपूर्ण गाव गोळा झाले. मला आणि माझ्या मित्रांना काही कळायला मार्ग नव्हता की नक्की काय झालेय. तिथली काही मोठी लोक आमच्यावर ओरडू लागली आणि आम्हाला घरी पाठवू लागली. तसे आम्ही तिथून धावत वाड्यात आलो. पण माझा एक मित्र उत्सुकतेपोटी वाड्याच्या भिंतीवर चढला आणि गप चूप घडत असलेला प्रकार पाहू लागला. त्याला पाहून त्याच्या मागोमाग आम्ही ही भिंतीवर चढून ते दृश्य पाहू लागलो.
अतिशय भयानक प्रसंग होता तो. आग विझवण्यासाठी सगळी लोक धावाधाव करून पाणी आणत होते आणि त्याच्या घरावर टाकत होते. पण पुढे मी जे पाहिले ते उभ्या आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही. मी तुकाराम ला घरात धावताना पाहिले. त्याच्या शरीराने संपूर्ण पेट घेतला होता आणि वेदनेने कळवळत किंचाळत तो घरात सैरावैरा धावत होता. ते इतके भयानक आणि काळीज पिळवटून टाकणारे दृश्य होते जे पाहत असताना माझे हात पाय च गळून गेले होते.
बघता बघता अचानक तो घराच्या बाहेर आला आणि माझ्या दिशेने धावत येऊन खाली पडला. लोकांचा त्याच्या अंगावर पाणी टाकून, गोधडी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न चालूच होता. पण एक अतिशय विचित्र गोष्ट मला जाणवली. जेव्हा तो घरातून बाहेर निघाला तेव्हा त्याचे वेदनेने किंचाळणे पूर्णपणे बंद झाले होते. त्याचा प्राण गेला होता का ते माहीत नाही पण डोळे सत्ताड उघडे आणि माझ्या वर रोखले होते. ती जीवघेणी नजर आजही माझ्या अगदी डोळ्यासमोर आहे.
मी प्रचंड घाबरलो होतो. याआधी मी असे काही कधीच पहिले नव्हते. अश्या घटने बद्दल कधी ऐकलेही नव्हते. पण या सगळ्याचा हा शेवट नव्हता. पुढच्या गोष्टी अजून वेगळ्याच वळण घेणार होत्या. आजीला कळल्यावर तिने मला तिथून खेचत च घरी आणले. तिला कळून चुकले होते की घडलेल्या प्रसंगामुळे माझ्या मनावर किती मोठा आघात झाला आहे. त्या रात्री तिने मला जेवण वाढले पण जेवायची इच्छा च होत नव्हती. तो प्रसंग नजरेसमोरून जातच नव्हता.
आजी नेहमी मला जवळ घेऊन झोपायची. त्या रात्री स्त्रिया सोडून घरातले सगळे बाहेर होते. मला आजी ने जवळ घेऊन झोपवले. काही तासात मला अगदी गाढ झोप ही लागली. पण अचानक एका आवाजाने माझी झोपमोड झाली. कोणी तर माझ्या नावाने हाक मारत होते. मी बिछान्यातून उठलो आणि त्या आवाजाचा कानोसा घेत त्या दिशेने जाऊ लागलो. आजी गाढ झोपेत होती त्यामुळे तिला कसली चाहूल जाणवली नाही. मी घड्याळात पाहिले. २ वाजून गेले होते. सगळी कडे निरव शांतता पसरली होती. इतकी की मला माझा श्वास ही ऐकू येत होता.
तसे मला पुन्हा तो आवाज ऐकू आला “वैभव”.. कोणी तरी खिडकी च्या बाहेर उभ होत. पण बाहेर अगदी मिट्ट अंधार पसरला होता त्यामुळे काहीच दिसायला मार्ग नव्हता. म्हणून मी खिडकी च्याच अगदी जवळ गेलो आणि बाहेर डोकावून पाहू लागलो. तो तुकाराम होता. एक स्मित हास्य करून मला बोलवत होता. त्याचे शरीर संपूर्ण जळून त्वचेची अगदी लक्तर लोंबत होती. शरीरातून अजूनही धूर निघत होता. त्याचे ते भयानक रूप पाहून माझी शुध्द हरपली आणि मी खाली कोसळलो.
जेव्हा शुध्द आली तेव्हा आजी शेजारी बिछान्यावर होतो. डॉक्टर मला तपासत होते कारण मी तापाने अगदी फणफणत होतो. पण तेव्हा मला जाणवले की आजी ही माझ्या इतकीच घाबरली आहे. मी तिला विचारले पण तिने मला काहीच सांगितले नाही. तेवढ्यात तिने काकांना हाक मारली आणि माझ्या आई बाबांना बोलवून घ्यायला सांगितले. त्याच बरोबर एका मांत्रिकाला निरोप द्यायला सांगितले. आता मला शंका येऊ लागली होती की बेशुद्ध पडल्या पासून काही तरी विपरीत घडतेय.
मी आजीला सतत विचारात होतो की काय झालंय, आई बाबांना इथे का बोलावले आहे. माझ्या सुट्या अजुन संपल्या नाहीयेत. मला जायचे नाहीये. त्यावर ती म्हणाली की तू लहान आहेस तुला काही कळणार नाही फक्त एक लक्षात ठेव इथे तू सुरक्षित नाहीस त्यामुळे तुला लवकर घरी जावे लागेल. तसे मी विचारले “का आजी?”. त्यावर ती न राहवून म्हणाली. जेव्हा मला रात्री जाग आली तेव्हा तू खिडकीजवळ पडला होतास. तुला उचलायला आले आणि खिडकीत लक्ष गेले. तो अगदी खिडकीच्या जवळ उभा होता. तुलाच एक टक पाहत होता. हे बघ मी तुझ्या चांगल्या साठी सांगतेय तू आता घरी जा.
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तो मांत्रिक आला. आजीने सगळा घडलेला प्रकार त्याच्या समोर कथित केला. त्याने ही तेच सांगितले जे आजी म्हणाली होती की मी इथे सुरक्षित नाही. त्याने कसली तरी पूजा वैगरे केली आणि माझ्या हाताला एक गंडा बांधला. त्या रात्री आम्ही सगळे पहिल्या खोलीत एकत्र झोपलो होतो. सगळ्या खिडक्या दरवाजे बंद केले होते. माझा डोळा लागतो न लागतो तोच मला पुन्हा हाक ऐकू येऊ लागली. या वेळेस मात्र सगळ्यांना तो आवाज ऐकू आला. आम्ही कोणीच जागचे हललो नाही. आजी देवाचे नाव घेऊ लागली. काही मिनिटानंतर तो आवाज यायचा बंद झाला. तशी एक जीवघेणी शांतता पसरली पण पुढच्या क्षणी दरवाज्यावर धापा ऐकू येऊ लागल्या. असे वाटले की तो दरवाजा तोडून आत येतोय की काय. कधी खिडकीवर तर कधी दरवाज्यावर सतत धापा ऐकू येत होत्या. पहाटे ५ पर्यंत असेच चालू राहिले. ती रात्र आम्ही कशी काढली आमचे आम्हालाच माहीत.
दुसऱ्या दिवशी बाबा मला घ्यायला आले. दुपारीच आम्ही पुन्हा माझ्या घरी आलो. काही दिवसांनंतर मी बाबांचे बोलणे ऐकले की तो आम्हालाच नाही तर गावातल्या प्रत्येकाला त्रास देतोय. कालांतराने गावात महापूजा घालण्यात आली आणि त्या नंतर त्याच्या आत्म्याचे फिरणे बंद झाले.
पण गावातील लोक म्हणतात की दर वर्षी त्या रात्री त्याच्या घरातून आजही किंचाळ्या ऐकू येतात. इतका चांगला व्यक्ती पण मृत्यू नंतर त्याच्या आत्म्याचे असे भटकणे आणि सगळ्यांना त्रास देणे यामागचे कारण त्याच्या सोबतच कायमचे अनंतात विलीन झाले.
I think hi story old aahe khup