लेखिका – वसुंदरा सुतार

आज ११वीचा वार्षिक निकाल लागणार होता, त्यामुळे विधी आणि भूमी जरा लवकरच घरातून निघणार होत्या. विधी जरा जास्तच उत्साही वाटत होती, कारण शाळेमध्ये दरवर्षी तिचा पहिला क्रमांक यायचा. शिवाय १०वी मध्ये सुद्धा ती त्यांच्या पूर्ण एरिया मधून पहिली आली होती. यावर्षीसुद्धा तिने सगळ्या परीक्षा अतिशय उत्तम दिल्या होत्या. विधी पहिल्यापासूनच हुशार, जिद्दी पण अतिशय रागीट स्वभावाची होती. याउलट भूमी अतिशय शांत आणि समजूतदार होती. विधी आणि भूमी लहानपाणीपासून खूप चांगल्या मैत्रिणी होत्या, दोघी एकाच कॉम्प्लेक्स मध्ये राहात होत्या, एकाच शाळेत शिकल्या होत्या आणि आता एकाच कॉलेज मध्ये सुद्धा! 

विधीप्रमाणे भूमीसुद्धा खूप हुशार होती. ती वर्गात नेहमी दुसरी यायची. विधी घाईघाईत घरातून निघाली आणि भूमीच्या इमारती खाली उभी राहून तिला आवाज देऊ लागली, “भूमी, लवकर चल.. सगळे आले असतील, आपल्याला उशीर होईल.” त्यावर भूमीने तिला खिडकीत येऊन आवाज दिला, “हो, आले आले.” थोड्याच वेळात ती खाली आली आणि दोघी कॉलेज मध्ये गेल्या. त्यांच्या वर्गशिक्षिका आधीच वर्गात आल्या होत्या, सगळे विद्यार्थी आल्यावर त्यांनी निकाल द्यायला सुरुवात केली. निकाल देऊन झाल्यावर त्या म्हणाल्या, “यावर्षी आपल्या वर्गातून प्रथम क्रमांक भूमीने मिळवला आहे!!” भूमीच नाव ऐकून विधीच्या पायाखालची जमीनच सरकली, ‘हे कसं झालं? मी तर इतका अभ्यास केलेला, हि पहिली कशी येऊ शकते?’ तिने बाजूला बसलेल्या भूमीच्या हातातून तिचे प्रगती पुस्तकं घेतले आणि पाहते तर.. खरचं भूमीला तिच्यापेक्षा सगळ्याच विषयात चांगले गुण मिळाले होते. 

ते पाहून तिला खूप राग आला, पण सगळा राग गिळत ती वरवरचं हसत म्हणली, “अभिनंदन भूमी, मला खूप आनंद होतोय!” त्या दोघी आपल्याला घरी गेल्या. विधीच्या आईने दार उघडलं, “तुझी आवडती खीर बनवली आहे, पहिलं आल्याचं सेलिब्रेशन!” तिने आईच्या हातातली खिरीची वाटी अक्षरश: उडवून लावली आणि रागात स्वतःच्या खोलीत गेली, दार जोरात आपटलं आणि खोलीतलं सगळं सामान फेकून द्यायला सुरुवात केली. तिची आई बाहेरून तिच्या खोलीचं दार वाजवत होती, “काय झालं बेटा, दार उघड बाळा! कोण काही बोलले का तुला? लवकर दरवाजा उघड.” आईचा आवाज ऐकून विधीला रडूच कोसळलं. रडत रडत तिने दरवाजा उघडला आणि आईला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली, “सॉरी, मी यावेळी नाही आले पहिली! भूमीला माझ्यापेक्षा जास्त गुण मिळाले.” 

त्यावर आई म्हणाली, “अरे व्वा! हि तर खूप छान गोष्ट आहे. तुझ्यासोबत राहून तुझी मैत्रीण सुद्धा हुशार झाली बघ! तू किती छान आहेस. अस रडायचं नाही बाळा, क्रमांक वैगेरे हे सगळं तेवढ्या पुरत असतं गं. आपण माणूस म्हणून चांगलं असलं की त्यातचं सगळं आलं. आणि मला माहितीये माझी लेक व्यक्ती म्हणून खूप छान आहे. अगदी नंबर १ ! आणि आता रडत नाही बसायचं १२वीला गेलीस ना आता मस्त मन लावून अभ्यास कर..” आईने समजवल्यानंतर ती थोडी शांत झाली. आणि पुन्हा सगळं नीट झालं.थोड्या दिवसानंतर त्यांचं कॉलेज सुरु झालं, विधीच्या मनात आता भूमीबद्दल राग नव्हता. त्या दोघी एकत्र कॉलेज ला जाऊ येऊ लागल्या. पूर्वीसारख्याच मस्ती करत, गप्पा मारत, अभ्यास करत.. बघता बघता अर्ध वर्ष संपलं. सेमिस्टर एक्साम सुरु झाल्या. दोघीही जोमाने अभ्यास करत होत्या. परीक्षा झाल्या! दिवाळीची सुट्टीदेखील संपली. आज कॉलेज मध्ये पुन्हा तोच दिवस आला.. निकालाचा! 

पण आज सगळ्यांच्या पालकांना देखील सोबत बोलवलं होत. विधी, भूमी सगळे विद्यार्थी आपापल्या पालकांसोबत आले होते. त्यांचे वर्गशिक्षिक वर्गात आले. आणि त्यांनी सगळ्या विद्यार्थ्यांना निकाल दिले. नंतर ते म्हणाले, “या सत्रांत परीक्षेत प्रथम आलेली विद्यार्थिनी आहे भूमी! आणि द्वितीय क्रमांक मिळवला आहे विधीने! मला खात्री आहे या दोघी पुढेही असाच मन लावून अभ्यास करतील आणि आपल्या कॉलेज च नाव काढतील! ऑल द बेस्ट फॉर युअर बोर्ड एक्साम्स!” हे ऐकून भूमी आणि विधी दोघींचे आईवडील खूप खुश झाले. पण यावेळी मात्र विधीचा राग इतका अनावर झाला की तिने आपल्या हातातला निकाल चुरगळला आणि फेकून दिला, आणि रागारागाने ती कॉलेज च्या बाहेर पडली. तीच हे वागणं पाहून तिचे आईवडील दोघेही तिच्या मागे गेले. 

घरी गेल्यावर दोघांनीही तिला खूप समजवलं, “हे, बघ विधी अस निराश होऊ नकोस. अगं हि मार्क सिस्टिम काही मुलांमध्ये फूट पाडण्यासाठी बनवली नाहीये. तू हुशार होतीस आणि आहेस! त्यामुळे वाईट वाटून घेऊ नकोस आणि तुला अभ्यासात काही मदत हवी असेल तर भूमीला सांग ती करेल.”हे ऐकल्यानंतर तर तिचा पारा अजूनच चढला. रागाने ती तिच्या खोलीत गेली आणि बेडवर जाऊन बसली. तिचा राग अनावर झाला होता, तिने स्वतःच्या मुठी घट्ट आवळल्या होत्या, ‘आता ती मला शिकवणार का? काय येत होत का तिला आधी! सगळं मी सांगितलं तिला मी शिकवलं आणि आता हीच माझ्या पुढे जाते, आणि त्यात सर पण म्हणाले अशीच मेहनत कर, मला माहित आहे सगळ्यांचा डाव आहे मला कमी लेखायचा.. पण नाही भूमी, मी अस नाही होऊ देणार!! मी पण बघते आता कशी येते तू पहिली.’ 

असा विचार करून ती घाईघाईत आपल्या कॉम्पुटरजवळ जाऊन बसली आणि रागात तिने सर्च केलं ‘how to kill someone?’ त्याच्यासोबत संबंधित तिला खूप विचित्र माहिती मिळत गेली. खूप विचित्र वेबसाईट चाळल्या.आणि अस करत असताना चुकून तिच्याकडून एका वेबसाईट वर क्लिक झालं, ती वेबसाईट खूप विचित्र होती. त्याच पाहिलं पेज सुद्धा नीट दिसत नव्हतं. शेवटी कंटाळून तिने कॉम्पुटर बंद केला आणि ती झोपून गेली. तिच्या रूम मध्ये नेहमीसारखी शांतता होती. रागाच्या भरात ती आज खिडक्या बंद करायला सुद्धा विसरली होती. खिडकीमधून येणार मंद वारा तिच्या चेहऱ्यावरील केस अलगद उडवत होता. रात्रीचे बारा वाजले असतील आणि अचानक तिचा कॉम्पुटर आपोआप चालू झाला.

त्यातून विचित्र आवाज येऊ लागला. त्या आवाजाने विधी जागी झाली. तिने आजुबाजुला पाहिले. तिला आवाजाची दिशा काळात नव्हती. काही वेळानंतर तिला कळले की कॉम्पुटर मधून कसला तरी आवाज येतोय. तिने सगळ्या फाईल्स चाळायला सुरुवात केली, शेवटी तिला एक अनओन ऑडिओ सापडला. आणि तोच ऑडिओ चालू झाला होता. तिने तो ऑडिओ बंद केला आणि कॉम्पुटर बंद करणार तेवढ्यात तो ऑडिओ पुन्हा सुरु झाला. तिने नीट लक्ष देऊन ऐकल्यावर तिच्या लक्षात आलं, कि त्यामध्ये एका लहान मुलीचा आवाज ऐकू येतोय, ‘माझी वेबसाईट का बंद केलीस? चालू कर ना आपण खेळ खेळू.. माझ्यासोबत खेळायला कोणीच नाही..चल ना लवकर..’ आणि अचानक तिच्या कॉम्पुटर वर पुन्हा तीच वेबसाईट ओपन झाली. त्यावर एका लहान मुलीचे खूप फोटो होते. ती स्क्रोल करत गेली. शेवटी तिला एक बॉक्स दिसला ज्यामध्ये लिहिलं होतं. ‘type the name of your enemy’ विधीला वाटलं हा कसला तरी खेळ आहे म्हणून तिने त्यात भूमीच नाव टाकलं, तेवढ्यात ती वेबसाईट आपोआप बंद झाली. 

विधीने सुद्धा फार काही लक्ष दिले नाही आणि ती पुन्हा झोपून गेली.

दुसऱ्या दिवशी विधी एकटीच कॉलेज ला गेली, जाताना तिने भूमीला हाकसुद्धा मारली नाही. कॉलेज मध्ये आल्यावर भूमीने तिच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला पण विधीने तिच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. भूमीला या गोष्टीच खूप वाईट वाटलं. पण तिने सुद्धा जास्त लक्ष न देता आपलं लक्ष अभ्यासाकडे वळवलं. २-३ दिवस झाले त्या दोघींमध्ये काहीच संभाषण झालं नाही. विधी तर अशी वागत होती जस काय ती भूमीला ओळ्खतच नाही. एके दिवशी भूमी तिच्या घरात सगळ्यांसोबत बसून जेवत होती. जेवता जेवता गप्पा सुरू होत्या. तितक्यात तिच्या आईच्या मागे एक लहान मुलगी उभी असल्याचा भास झाला, तिने नीट पाहिलं तर तिथे कोणीच नव्हतं. तिचे हावभाव पाहत आई ने म्हंटले “काय झालं भूमी, जेव लवकर.”.. तसे भानावर येत ती म्हणाली “हो, हो आई जेवतेय!” 

अस म्हणून तिने एक घास हातात घेतला आणि बघते तर तिच्या ताटात कसलेतरी विचित्र किडे वळवळत होते. ते पाहून भूमी जोरात किंचाळली आणि ताट भिरकावून दिलं. तिची कृती पाहून आई तिला चांगलीच ओरडली,”काय चाललंय तुझं? अस जेवण फेकून देतात का?” त्यावर भूमी घाबरत म्हणाली, “आई ते त्यात….” तिची आई पुन्हा रागात म्हणाली, “काय त्यात..आवडीच जेवण नाही म्हणून नाटक तुझी, जा जाऊन झोप जा.” भूमी काहीच न बोलता तिच्या रुम मध्ये गेली. तिला खरंच खूप वाईट वाटल. जाताना तिने त्या ताटाकडे पाहिलं सुद्धा नाही. रूममध्ये आल्यावर तिने आपला नाईट ड्रेस काढण्यासाठी कपाट उघडलं. आणि पाहते तर काय, तिच्या कपाटातील हँगरला एक लहान मुलगी उलटी लटकली होती. 

भूमी इतकी घाबरली कि तिच्या तोंडातून शब्द निघेना. तिने पटकन दरवाजा बंद केला आणि घाबरल्यामुळे तिथेच उभी राहिली. स्वतःच्या हृदयाची धड धड तिला स्पष्ट जाणवत होती. काही मिनिट ती तशीच उभी राहिली. थोड्यावेळाने शांत झाल्यावर तिने कपाट उघडुन पुन्हा पाहायचे ठरवले. थर थरत्या हातांनी तिने कपाटाच्या दरवाजाचे हॅण्डल पकडले आणि हळु हळू दरवाजा उघडू लागली. 

पण या वेळेस तिथे कोणीही नव्हतं. ‘मला भास होतायत कि खरंच कोणी आहे? भूत असेल तर? नाही नाही, भूत वैगेरे काही नसतं! मला नक्कीच भास होतायत.” असा विचार करून ती स्वताची समजूत घालत अभ्यासाला बसली. आजसुद्धा तिच्या रूममध्ये नेहमीसारखी शांतता होती, शांततेत तिचा खूप छान अभ्यास चालला होता. 

तिला वेळेचं भानही राहील नाही. रात्री चा १ वाजत आला होता. अचानक तिच्या पायाच्या तळव्याला काहीतरी ओला पदार्थ लागल्यासारखा वाटला. तिने तळपायाला हात लावून बघितलं, ते रक्त होत! हिम्मत करून तिने टेबलाखाली पाहिलं.. ते दृश्य पाहून ती विजेचा तीव्र झटका लागल्या सारखी शहारली. एक लहान मुलगी टेबला खालून तिला वाकून बघत होती. तिने केस मोकळे सोडले होते, मळका फ्रॉक घातला होता, अस वाटत होत ती मातीत लोळून आली आहे. तिच्या चेहऱ्यावर एका बाजूला कसलातरी जळल्यासारखा डाग दिसत होता. ती अतिशय विचित्र नजरेने तिला बघत होती आणि हसत होती. हसताना तिचे वेडेवाकडे दात खूप किळसवाणे आणि विचित्र दिसत होते. हळूहळू ती मुलगी टेबलाखालून रांगत बाहेर यायला लागली. तिला पाहून भूमी हळूहळू मागे सरकू लागली, “क..क..कोण आहेस तू? आणि इ..इथे कशी आलीस?” 

त्यावर ती मुलगी जोरजोरात हसू लागली. भूमी घाबरून ओरडणार इतक्यात त्या मुलीने तीच तोंड दाबलं आणि म्हणाली, “श्श्श्शश्श्श!!! ओरडू नको, ओरडलीस तरी कोणाला ऐकायला नाही जाणार!” हा सगळा विचित्र प्रकार बघून ती रडायला लागली, त्या मुलीने तिचा हात भूमीच्या तोंडावरून काढला. भूमी रडत रडत म्हणाली, “तू का आली आहेस इथे? मी तर तुला ओळ्खतसुद्धा नाही. का घाबरवतेयस मला?” त्यावर ती पुन्हा विचित्र हसत म्हणली, “मी तुझ्यासोबत खेळायला आले, दिवसा खेळलं तर सगळे मला चिडवतात. माझ्या चेहऱ्यावर डाग आहे ना म्हणून सगळे म्हणतात हा भुताचा डाग आहे.. मी कोणाला आवडत नाही. तू खेळशील ना माझ्यासोबत?” भूमीला काय बोलू काळत नव्हतं, ती एखाद्या पुतळ्यासारखी बसून होती. 

ती काहीच बोलत नाही हे ऐकून ती मुलगी रडायला लागली, “मी तुलासुद्धा आवडले नाही ना!!” तिला रडताना बघून भूमीला वाईट वाटलं. ती घाबरतच म्हणली आपण खेळूया!ते ऐकून ती मुलगी खूप खुश झाली आणि तिला म्हणाली, “मी तिकडे खिडकीत उभी राहीन आणि तू मला मागून धक्का दे!” तिचे ते वाक्य ऐकून ती भूमी ला धडकीच भरली. “तू वेडी आहेस का? हा सातवा मजला आहे” ती मुलगी रागात म्हणाली, “तुला सांगितलंय तेवढं कर!” भूमी तिला हात जोडून म्हणाली, “प्लिज तू जा इथून! मी काय वाईट केलाय कोणाचं? का छळतेस मला?” त्यावर तिने भूमीचे केस पकडले आणि म्हणाली, “तू काय केलंस! तू विधिसोबत वाईट वागली आहेस. म्हणून तिनेच मला पाठवलंय, तुला मारायला!” हे ऐकून भूमीच्या पायाखालची जमीनच सरकली….

तिला काही कळायच्या आतच ती मुलगी खिडकीच्या गॅलरी मध्ये जाऊन पाठमोरी उभी राहिली.आणि तिने फक्त तिची मान पूर्णपणे भूमीकडे वळवली आणि म्हणाली, “लवकर ये ढकल मला, नाहीतर मी तुला आणि तुझ्या घरातल्या सगळ्यांना मारून टाकेन!” भूमीच्या डोळ्यातून अश्रू वाहातच होते, काय करू तिला काही कळतं नव्हतं, हे स्वप्न आहे की खरं? हे देखील तिला समजत नव्हतं. ती पुरती अडकली होती. तिचा आवाज तिच्या गळ्यातून निघेनास झाला. ती मुलगी जे म्हणते ते करणं तिला भाग होत. ती हळूहळू तीच्यजवळ गेली आणि तिने डोळे बंद करून तिला धक्का दिला. आणि तिच्या मनात विचार आला, ‘अरे देवा! हे मी काय केलं!!’ आणि तिने खाली वाकून पाहिलं, तिथे कोणीच नव्हतं.. आणि तितक्यात अचानक मागून भूमीला कोणीतरी धक्का दिला, पण ती मात्र खाली कोसळली.

दुसऱ्या दिवशी त्यांच्या कॉम्प्लेक्स मध्ये शोककळा पसरली. पोलीस तपास सुरू झाला. भूमीच्या आईबाबांची अवस्था तर बघवत नव्हती. घर माणसांनी भरलं होत. सगळे रडत होते. इतकी शांत आणि हुशार मुलगी, तिने आत्महत्या का केली असेल? हाच प्रश्न सगळ्यांना भेडसावत होता. भूमीची आई तिच्या मृतदेहाला मिठी मारून रडत होती. विधीसुद्धा तिच्या घरी तिला शेवटचं बघायला गेली होती. तिलासुद्धा खूप रडू येत होतं, शेवटी तिची बालपाणीपासूनची मैत्रीण होती. भूमीचे अंत्यसंस्कार आटोपल्यानंतर विधी आणि तिचे आईवडील त्यांच्या घरी गेले. भूमीच्या मृत्यूबाबत विधीच्या मनात खूप विचार येत होते, ‘त्या वेबसाईटमुळे तर नाही ना झालं सगळं? नाही नाही असं कुठे असत का! तिने आत्महत्याच केली असेल, पण ती आत्महत्या का करेल?’ असे एक ना अनेक प्रश्न तिच्या मनात येत होते. 

भूमीच्या मृत्यूचा खूप गंभीर परिणाम तिच्या मनावर झाला होता, आणि त्यामुळे ती खूप आजारी पडली. तिला कॉलेजकडून सुट्टी घ्यावी लागली, तिचे आईबाबा तिची खूप काळजी घेत होते. एके दिवशी रात्री गाढ झोपेत असताना विधीला तोच ऑडिओ पुन्हा ऐकायला येऊ लागला, त्यामुळे ती दचकून जागी झाली आणि पाहिलं तर तिचा कॉम्पुटर ऑन झाला होता. ती त्याच्याजवळ गेली आणि बंद करणार तेवढ्यात त्या कॉम्पुटर मधून एक हात बाहेर आला आणि तिने विधीचा हात धरला. आधार घेत त्यातून हळु हळू कोणीतरी बाहेर येऊ लागलं.. हो!! हि तीच मुलगी होती, जिने भूमीचा जीव घेतला होता. तिचा विचित्र चेहरा पाहून विधी खूप घाबरली, तिला घामच फुटला, “त…तू!! तू त्या वेबसाईट मधली मुलगी आहेस ना….??त..त..त..तू..ख..खरंच बाहेर आली..आली अअ आहेस….?” 

त्यावर ती मुलगी म्हणाली, “हो, मीच आहे ती! मी तुझं काम केलं ना, म्हणून तुला भेटायला आले आहे. जरा तिकडे बघ” अस म्हणून तिने कॉम्पुटर कडे बोट दाखवलं. त्यात विधीला ती घटना दिसली जेव्हा त्या मुलीने भूमीला मारलं होत. ते पाहून विधी थरथर कापायला लागली. तितक्यात ती मुलगी अचानक तिच्या समोरून गायब झाली. विधी एकदम दचकली. तिची बेधरलेली नजर तिला खोलीत शोधू लागली. तितक्यात तिच्या अंगावर वरून कसला तरी चिकट पदार्थ पडू लागला. तिने घाबरतच वर पाहिले “ती मुलगी पंख्याला उलटी लटकून काहीतरी विचित्र गोष्ट खात होती, आणि तिची लाळ विधीच्या अंगावर ओघळत होती”. ते पाहून विधीला खूप घाण वाटले तसे ती किंचाळली. त्या मुलीने रागात तिच्या अंगावर उलटी केली आणि ती जोरजोरात हसू लागली.

विधी तिला म्हणली, “हे बघ तू इथून जा, नाहीतर मी सगळ्यांना जाग करेन..” त्यावर ती तशीच हसत म्हणाली, “तुझा आवाज कोणाला नाही जाणार, ठीक आहे मी जाते पण मी रोज येणार…तुला भेटायला…रोज!!!” आणि डोळ्यांदेखत ती दिसेनाशी झाली. या सगळ्या प्रकारानंतर विधी आणखी आजारी पडली. तिने तिच्या आईबाबांना सांगायचं विचार केला पण तिची हिम्मत झाली नाही, कारण तिच्या मैत्रिणीच्या मृत्यूला ती जबाबदार होती. विचार करता करता रात्र झाली, विधीच्या बाबानी तिला जेवण भरवून औषध दिली आणि ते त्यांच्या रूम मध्ये निघून गेले. आज मात्र विधीला झोप लागत नव्हती. ती सारखी कूस बदलत होती. त्या वेळी ती उजवीकडे वळली आणि समोर लक्ष गेलं. ती मुलगी तिच्या बाजूला आरामात पडून तिला एकटक बघत होती. विधी पटकन बेड वरून बाजूला झाली आणि रडायला लागली, “प्लिज मला नको त्रास देऊस ! मी काही नाही केलय..माझ्याकडून चुकुन ती वेबसाईट ओपन झालेली…” 

त्यावर ती मुलगी तिला म्हणाली, “चूक केलीस तर मी शिक्षा पण देणार तुला…” विधी तिला म्हणाली, “पण मी काय केलंय?तू माझ्या मैत्रिणीचा जीव घेतलास…तेही तिची काहीच चूक नसताना!! मी रागात तीच नाव टाकलं आणि तू खरचं तिला….” ती मुलगी हसायला लागली आणि म्हणाली, “तू नाव टाकलं स आणि भाग पाडल स मला..माझा खेळ आहे तो नाव येईल त्याला मारणं! पण त्याबदल्यात…” विधीने घाबरत विचारलं, “बदल्यात काय..?” ती विक्षिप्त हसत म्हणली, “त्याबदल्यात मी आयुष्यभर तुझ्यासोबत असणार, रोज तुला भेटायला येणार..” हे ऐकून विधी रडायला लागली आणि म्हणाली, “प्लिज मला माफ कर आणि नको दिसू पुन्हा!!”.. त्यावर ती मुलगी म्हणाली, “ठीक आहे मी नाही येणार, पण तुला मी सांगेन ते करावं लागेल आणि जर तू ते नाही केलंस तर मी आयुष्यभर तुला छळत राहणार!!” 

विधी लगेच म्हणाली, “तू सांग मी करेन..” त्या मुलीने हात मागे नेला आणि एक मोठा धार धार सूरा काढला. तो विधीला दिला आणि म्हणाली, “हा चाकु घेऊन तुझ्या आईबाबांच्या रूम मध्ये जा आणि त्यांना मारून टाक!! मी पुन्हा तुला कधीच त्रास देणार नाही..” हे ऐकून विधी एकदम सुन्न झाली, काय बोलावं, काय करावं तिला काही सुचत नव्हतं….तिची दृष्टी श्यून्यात होती, डोळ्यातून अश्रू सतत वाहत होते, शेवटी तिने निर्णय घेतला… तिने त्या मुलीच्या हातातला चाकु घेतला आणि ती तिच्या आईबाबांच्या बेडरूम च्या दिशेने निघाली…बेडरूम चा दरवाजा उघडून आतमध्ये गेली. तिचे आईबाबा अगदी शांतपणे झोपले होते. त्यांचा तो चेहरा पाहून तिच्या डोळ्यासमोर लहानपाणीपासून ते आतापर्यंतच सगळं चित्र तरळल.. तिच्या डोळ्यातले अश्रू थांबतच नव्हते, तीने मागे पाहिलं ती मुलगी तिथेच उभी होती. विधी हळूच म्हणाली, “मला माफ करा आईबाबा” आणि तिने तो चाकु स्वतःच्या गळ्यावरून फिरवला…

Leave a Reply