अनुभव – कुणाल सकपाळे
अनुभव २०१८ चा आहे. मी तेव्हा १० वी इयत्तेत शिकत होतो. परीक्षा झाल्यानंतर सुट्ट्यांमध्ये नेहमी मामाच्या गावाला जायचो. माझ्या मामाकडे २ ट्रॅक्टर आहेत जे तो शेती साठी भाड्यावर द्यायचा. ट्रॅक्टर साठी नेहमी ड्रायव्हर लागायचे म्हणून त्याने ४ ड्रायव्हर ठेवले होते जे आलटून पालटून ट्रॅक्टर घेऊन जायचे. त्या वर्षी मी देखील मामा कडे हट्ट केला की मला ही ट्रॅक्टर चालवायला शिकायचे आहे म्हणून मग त्याच्या सोबत रोज रात्री शिकायला जाऊ लागलो. त्याच वेळी कधी कधी शेतात ही वापरायचे ट्रॅक्टर. मी, मामा आणि सोबत सागर नावाचा एक ड्रायव्हर असायचा. मला ती रात्र अजूनही आठवतेय. त्या दिवशी अमावस्या होती. मामा शक्यतो अमावस्येच्या रात्री ट्रॅक्टर चालवत नसे पण शेतकऱ्यांना पेरणीची घाई असल्याने मामाने अमावस्येचा दिवशी पण ट्रॅक्टर बंद ठेवले नाहीत.
त्या दिवशी आम्हाला नदिकडच्या शेतात म्हणजे मईत जायचे होते. ट्रॅक्टर वर मामा आणि सागरच होता. मी मामा ला म्हणालो की रोजच्या प्रमाणे मी हो येतो पण त्याने मला येऊ दिले नाही. रात्री २ च्या सुमारास ट्रॅक्टर चा आवाज आला तेव्हा मला कळले की मामा आणि सागर शेतात जाऊन परत आले असावेत. आवाजाने माझी झोपमोड झाली पण नंतर जास्त विचार न करता मी गाढ झोपून गेलो. तो सागर नावाचा ड्रायव्हर आमच्या घरा जवळच राहायचा. दुसऱ्या दिवशी सकाळी कोणी तरी सांगायला आले की तो खूप विचित्र वागतोय. माझा मामा आणि मी त्याच्या घरी त्याला भेटायला गेलो तेव्हा ११ वाजले असतील. तेव्हा कळले की तो अगदी वेड्या सारखा वागतोय.
घरातील अंडी त्याने तशीच खाऊन टाकली होती. आणि मटण मांस मागत होता. एक वेगळ्याच आवाजात गुरगुरत होता. असा प्रकार मी या आधी कधीच पाहिला नव्हता त्यामुळे भीती तर वाटत होतीच पण त्या पेक्षा खूप अस्वस्थ वाटत होत. मामाने मला घरी जायला सांगितले पण मी तिथेच थांबलो होतो. तो कोणाशी तरी बोलत होता जे मी त्याच्या नकळत ऐकले. तो सांगत होता की नदी कडच्या शेतात असताना मला देखील काही तरी जाणवले, कदाचित त्यानेच सागर ला झपाटले आहे. सागर च्या शरीरात जे कोणी होत ते फक्त कच्चे मटण मागत होत व न दिल्यास सागर ला कायमचे घेऊन जाईन अशी धमकी देत होत. हा सगळा प्रकार घडत असताना मी तिथेच होतो पण त्या नंतर मामा मला घेऊन थेट घरी आला. त्याच संध्याकाळी मला माझ्या राहत्या घरी घेऊन आला त्यामुळे त्या ड्रायव्हर चे पुढे काय झाले हे मला कळले नाही. हा प्रसंग इतका विचित्र होता की नंतर च्या काळात त्याच्या बद्दल विचारण्याचे धाडस ही मला कधी झाले नाही.