आज ऑफिस वरुन निघायला बराच उशीर झाला होता. रात्री ११ वाजता ऑफिस सोडण्याची ही पहिलीच वेळ. काम ही तितकच होत म्हणा. एरव्ही सात साडे सात पर्यंत ऑफिस मधून निघायचो पण आज जरा जास्त च उशीर झाला होता. बाईक ने अर्ध्या पाऊण तासात घरी पोहोचायचो. पण आज मात्र सगळ्याच गोष्टी जणू माझी परीक्षा पाहत होत्या. ऑफिस बिल्डिंग च्या इमारती मधून खाली आलो. पार्किंग मध्ये लावलेली बाईक काढली आणि स्टार्टर मारला. आज नेमकी माझी बाईक सुद्धा चालू होत नव्हती. ‘म्हणजे आज घरी चालतंच वारी’, मी उमेद हारल्यागत नि:श्वास सोडत म्हणालो. तितक्यात आठवले की ऑफिस जवळ एक मेकॅनिक आहे. पटकन बाईक ढकलत तिथं पर्यंत नेली पण तो देखील आजच त्याच्या गावी गेला होता.

म्हणजे बाईकसुद्धा काय ती उद्याच दुरुस्त होणार होती. तिथे विचार पुस करत असताना मागून मला आवाज आला “सांभाळून जा रे आज घरी, किंवा राहा ना एक रात्र माझ्याकडे”. मागे वळून पाहिलं तर सुमित त्याची बाईक काढ्त होता. मी त्याला काही बोलणार तितक्यात तोच पुढे म्हणाला “ नाहीतर ती पांढऱ्या साडीतली बाई गाठायची तुला…” इतकं म्हणत त्याने बाईक ला किक दिली. सुमित हा माझा सहकारी आणि नविनच झालेला चांगला मित्र. अगदी धिप्पाड आणि दणकट शरीरयष्टीचा हा उंचपुरा माणुस आतून तेवढाच भित्रा होता. त्यात या ‘पांढऱ्या साडीतल्या बाई’ ची नवीनच दहशत पसरली होती आमच्या परिसरात. ती म्हणे लोकांना, विशेषतः पुरुषांना रात्री निर्जन जागी एकटं गाठून त्यांना दाट जंगलात फरफटत नेते. आणि आपल्या लांब नखांनी त्यांची छाती चिरुन त्यांचं रक्त पीते. एवढं वर्णन तिला एक urban legend बनवण्याइतपत पुरेसं होतं.

“येतोयस का?” सुमितने पुन्हा एकदा विचारलं आणि मी माझ्या विचारांतून बाहेर आलो. “नाही नको अरे, इथे पुढेच रिक्षा स्टँड आहे ना, तिथून पकडेन मी रिक्षा”, मी त्याला टाळत म्हणालो. सुमितसुद्धा निमुटपणे मान हलवून आपल्या बाईक वर तिथून निघाला. बहुतेक माझा त्याला टाळण्याचा हेतू लक्षात आला असावा. असो.. बाईक तिथेच लाऊन मी पुढे रिक्षा स्टँड पर्यंत चालत गेलो. सव्वा अकरा झाले होते. ऑफिस चा परिसर मी इतक्या रात्री पहिल्यांदाच पाहत होतो. त्यामुळे नेहमी ओळखीचा वाटणारा परिसर आज मात्र वेगळाच जाणवत होता. पुढे जवळपास अर्धा तास मी रिक्षाची वाट पाहत बसलो. आता येईल, नंतर येईल करत बराच वेळ रिक्षा काही आली नाही. कदाचित इतक्या उशिरा या भागात रिक्षा फिरकत ही नसाव्यात असे वाटले.

मग काय मी शेवटी पायीच घराची वाट धरली. याआधीही मी २-३ वेळा हा रस्ता पायाखालून घातला होता. फक्त फरक इतकाच होता की आज वेळ रात्रीची होती. त्यात त्या पांढऱ्या साडीतल्या बाईची कथा देखील डोक्यात सारखी घोळत होती. सुमित बोलला ते खर असेल का की नुसत्याच अफवा पसरवत असतील लोक..? तसा मी भुताखेतांना न मानणारा, एक बिनधास्त माणूस. ज्या गोष्टीला कधी पाहीलं नाही त्याची भीती कशाला बाळगायची? पण भुतांबाबत मला अगदी लहानपणापासून बरंच कुतूहल असायचं. म्हणजे हे जर खरंच माझ्यासमोर आले तर? भारी मज्जाच येईल! पण त्यासाठी निशाचरी व्हावं लागतं, ते काही मला जमलं नाही. मी रात्री १० वाजल्यानंतर निद्रेच्या अधीन होणारा माणूस. पण आज मात्र कधी नव्हे ते उशिरा पर्यंत जागा होतो आणि ते ही एका निर्जन, निर्मनुष्य रस्त्यावर चालत होतो. 

जणू नशीबाने आज ती संधी हातात आली होती. २ तसांच, किंबहुना त्याहून जास्त अंतर कपायच होत. चालायला सुरुवात करून अवघा अर्धा पाऊण तास झाला होता. पाहता पाहता शहराबाहेरच्या त्या पुलापर्यंत आलो. एरवी आजूबाजूला गर्द झाडींनी वेढलेला हा नयनरम्य पूल आज मात्र रात्रीच्या गडद अंधरामुळे अगदी भयाण वाटत होता. अगदी हॉरर चित्रपटांमध्ये दाखवतात तसा! नाही म्हणायला माझ्याही मनात कुठे तरी भीतीने घर केलं होतं, पण थ्रील देखील अनुभवायला मिळत होतं. म्हणून थोडी मजा ही येत होती. त्या संपूर्ण रस्त्यावर मी एकटाच होतो. ती शांतता अगदी भयाण रूप धारण करू लागली. मी पुलाच्या मधोमध येऊन पोहोचलो आणि अचानक मला कसलीशी चाहूल जाणवली. मागे वळून पाहिलं तर धक्काच बसला.

एक धुरकटशी पांढरट आकृती मला त्या झाडींमध्ये दिसली. जी तिथेच उभी राहून मला एक टक पाहत होती. मी नीट निरखून पहायला पुढे जाणार तेवढ्यात ती आकृतीच समोर आली आणि मी सावध झालो. पण जसे लक्षात आले तसे मात्र स्वतःवरच हसू लागलो. कारण ती कुठली पांढरट आकृती नव्हती, तर पांढरा शर्ट घातलेला एक दारुडा होता. जो दारूच्या नशेत डुलत माझ्या दिशेने चालत येत होता. काही सेकंद त्याची आणि माझी नजरानजर झाली. “किती वाजले?” वातावरणातल्या स्मशान शांततेला चिरत त्याने मला प्रश्न केला. तसे मी माझ्या मोबाईल स्क्रीन कडे पाहत म्हणालो “आता पुढच्या मिनिटभरात १२ वाजायला हवेत”. मोबाईलवरुन डोकं वर काढंल आणि त्या दारुड्यावर एक नजर फिरवली. 

त्याच्या चेहऱ्यावर चे भाव बदलू लागले. विशेष म्हणजे माझ्याकडे बघत असल्यामुळे तो तसे करतोय हे मला प्रकर्षाने जाणवले. माझ्याकडे पाहून क्षणाक्षणाला बदलत असलेले हावभाव पाहून मला जरा विचित्र वाटायला लागलं. तो अचानक माझ्या हातांच्या दिशेने इशारा करून काही तरी दाखवायचा प्रयत्न करू लागला. मी सहज माझ्या हातांकडे पाहिलं तर माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. माझी नखं अचानक लांब आणि मोठी होऊ लागली होती, रुप सुद्धा बदलायला लागलं होतं. माझ्या सोबत नक्की काय घडतंय ते मला कळत नव्हत पण तरीही तो भयाण प्रकार मी धढ धडत्या काळजाने पाहत होतो. समजून घेण्याचा प्रयत्न करू लागलो. हळु हळु माझी शुध्द हरपू लागली. माझे संपूर्ण रूप पालटलं, स्वतःची ओळख विसरण्या आधी एक गोष्ट माझ्या लक्षात आली की सुमित खरं बोलत होता….

Leave a Reply