”  टननॅन टननॅन,  टननॅन टननॅन  
हॅलो बोल राहुल.. आज येतोस ना कट्ट्यावर ? राहुल म्हणाला..येतोय रे पण आदित्य कुठे गेलाय ? तो त्याच्या मामाकडे गेला राहुल म्हणाला..   

काही मिनिटांचे संभाषण संपवून त्याने फोन ठेवला. आजच्या जगात दिवसातले आठ-दहा तास सतत मोबाईल वापरणारे लोक अनेक आहेत. त्यातलाच एक मी आणि माझा मित्र राहुल.

कॉलेज ला सुट्टी पडून काही दिवस झाले होते पण आम्ही मित्र नेहमी एकमेकांना भेटायचो. त्यामुळे नेहमीप्रमाणे आजही कट्ट्यावर जायच ठरलं. 

साधारण 10.30 वाजता मी निघायचे ठरवले. मी ज्या रस्त्यावरून कॉलेजच्या कट्ट्यावर जातो तिथे माझा मित्र राहुल ही राहतो. हो पण त्या रस्त्याच्या आधी त्याच्या घराची दिशा आणि माझ्या घराची दिशा ही विरुद्ध आहे. त्यामुळे तिथून आम्ही वेगवेगळे घरी जातो.

एक विचित्र गोष्ट म्हणजे मी त्या रस्त्याबद्दल अनेक अफवा ऐकल्या आहेत की त्याच रस्त्यावर एका माणसाचा मोबाईल फोन मध्ये काही करत असताना अपघात झाला होता. वेगात जाणाऱ्या गाडीने त्याला उडवलं होतं कारण तो मोबाईल मध्ये बघत असल्याने त्याचं लक्ष आजूबाजूला नव्हतं. तो जागच्या जागीच मरण पावला होता. त्या घटनेनंतर रस्त्यावर तश्याच प्रकारे अपघात होऊन माणसांचा मृत्यू व्हायला लागला.

पोलिसांनी शोध घ्यायचा खूप प्रयत्न केला पण त्यांना कारण कळलं नाही की या रस्त्यावर एवढे अपघात कसे होतात. आणि अजून एक गोष्ट सांगायची राहिली की मृत्यू झालेल्या माणसाच्या बाजूला त्याचाच मोबाईल पडलेला असायचा आणि स्क्रीन वर मोठ्या अक्षरात एक मेसेज असायचा “मोबाईल खूप वाईट मोबाईल मुळे जीव जातो”. या बद्दल मला मित्रांकडून आणि परिसरातल्या इतर लोकांकडून बऱ्याचदा ऐकायला मिळालं होतं.

त्यामुळे मी त्या रस्त्यावर रात्री जायला शक्यतो टाळायचो. पण आज मित्रांनी जरा उशिराच कट्ट्यावर बोलवलं होतं त्यामुळे जाणं भाग होतं. मी कट्ट्यावर पोहोचलो तर तिथे माझा मित्र राहुल आधीच येऊन बसला होता. मी त्याला हाक मारली पण त्याने माझ्याकडे लक्ष दिलं नाही. तो मान खाली घालून मोबाईल मध्ये काहीतरी करत होता. मी पोहोचलो तेव्हा साधारण 11 वाजले असतील. मी त्याच्या बाजूला जाऊन बसलो आणि त्याला म्हणालो राहुल पटकन हॉटस्पॉट चालू कर. मित्रांकडून इंटरनेट घेऊन वापरण्याची वेगळीच मजा असते. पण का माहित नाही तो नेहमीप्रमाणे वाटत नव्हता. तो माझ्याशी एक शब्दही बोलला नाही.
काही वेळा नंतर माझे लक्ष आजूबाजूच्या परिसरात गेले आणि मला आश्चर्याचा धक्का च बसला. मी आलो तेव्हा वर्दळ दिसत होती पण आता मात्र त्या परिसरात दूरपर्यंत एकही व्यक्ती नजरेस पडत नव्हती. मी घड्याळात पाहिलं तेव्हा माझ्या घड्याळात रात्रीचा 1 वाजला होता. काही उमजेनास झालं. हे कसं शक्य होतं.

मी घरातून निघण्याआधी मोबाईल मध्ये पाहिलं होतं 11 वाजलेले आणि कट्ट्यावर यायला साधारण 20 मिनिटे लागतात. इथे येऊन मला अर्धा तास झाला असेल म्हणून 11.30 व्हायला हवे. पण असतील पण घड्याळात चक्क 1 वाजलाय. काही तरी विपरीत घडतंय. 

मी पटकन मोबाईल पाहिला. मला एक मेसेज आला होता. तो वाचून माझे लक्ष राहुल कडे गेलं. तिथे आल्यापासून मला राहुल चे वागणे खटकलेच होते. मान खाली घालून बसल्यामुळे त्याचा चेहरा ही नीट दिसला नव्हता. पण आता मात्र त्याचे लक्ष वेधण्यासाठी मी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. त्याने माझ्याकडे वळून पाहिलं आणि त्याच क्षणी माझं काळीज तुटून खाली पडणार की काय असं वाटू लागलं. आत्तापर्यंत मी ज्याला माझा मित्र राहुल समजत होतो तो राहुल नव्हताच. तो तोच माणूस होता ज्याचा त्या रस्त्यावर अपघात झाला होता. 

मी भीतीने थरथर कापू लागलो. कसलाही विचार न करता उठून सरळ घराच्या दिशेने पळू लागलो. तो माणूस माझ्या मागे वेगात येत होता. तो धावत नव्हता पण तरीही माझ्या दिशेने पुढे सरकत होता. मला लक्षात आलं की याच रस्त्यावर त्याचा अपघातात दुर्दैवू मृत्यू झाला होता. आणि त्याची हद्द संपेपर्यंत तो माझा पाठलाग सोडणार नव्हता. शरीरातील संपूर्ण शक्ती एकटवून जमेल तितक्या वेगात मी धावत होतो. तितक्यात काही अंतरावर मला कोणतरी व्यक्ती रस्त्यावर पडलेला दिसला. बहुतेक पुन्हा अपघात झाला होता. मी धावत त्याच्या जवळ आलो आणि त्या व्यक्तीच्या चेहऱ्याकडे लक्ष गेलं. माझा मेंदूचं बधिर झाला, पूर्ण शरीरात मुंग्यांच वारूळ उठाव तस संपूर्ण शरीर शहारलं. तो दुसरा तिसरा कोणी नसून माझा मित्र राहुल होता. त्याच्या बाजूला मोबाईल होता आणि स्क्रीन वर तोच मेसेज “मोबाईल खूप वाईट, मोबाईल मुळे जीव जातो”.

त्याची ही अवस्था पाहून मला रडूच कोसळले पण पुढच्याच क्षणी मी भानावर आलो. पण आता धावण्यासाठी शरीरात कसलाच त्राण उरला नव्हता. 

तितक्यात मला माझ्या आईचा फोन आला. मी धावतच फोन उचलला आणि रडतच बोलू लागलो पण त्या धावपळीत फोन कट झाला. मनात विचार आला की सगळे या मोबाईल मुळेच होतंय त्यामुळे हा फेकायलाच हवा. मोबाईल वर एक नजर टाकली आणि समोर पाहिले तेवढ्यात समोरून भरधाव येणाऱ्या गाडीने मला चिरडले. गाडी माझ्या अंगावरून निघून गेली होती. मी वेदनेने तडफडत होतो आणि रक्तस्त्राव झाल्यामुळे माझी शुद्ध हरपली. सकाळी जेव्हा मला जाग आली तेव्हा सगळे लोक माझ्या बाजूला गोळा झाले होते. पोलीस ही आले होते. बाजूला पडलेल्या मोबाईल कडे माझे लक्ष गेलं आणि त्यात तोच मेसेज “मोबाईल खूप वाईट, मोबाईल मुळे जीव जातो”. तितक्यात एका पोलिसाचे शब्द कानावर पडले “या रस्त्याला अपघात क्षेत्र घोषित करायला हवे साहेब”. समोरच्या अंबुलन्स मध्ये राहुल चे प्रेत उचलून ठेवत होते.

बहुतेक पोस्ट मोर्तम साठी नेत असावे. मी त्या दिशेने जाणार तितक्यात माझी आई तिथे आली आणि माझ्या नावाने जोरात किंचाळली. कारण ते प्रेत राहुल चे नाही तर माझे च होते. माझा आत्मा शरीरापासून कायमचा मुक्त झाला होता. पण आजही मी त्याच रस्त्यावर असतो वाट बघत – कोणीतरी त्या रस्त्यावर मोबाईल घेऊन येईल आणि त्याला मी समजावेन की मोबाईल वाईट मोबाईल मूळे जीव जातो जीव…

Leave a Reply